मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६६०८ ते ६६३६ निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६६०८ ते ६६३६ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वाण प्रकरण - ६६०८ ते ६६३६ Translation - भाषांतर या प्रसंगीं आपल्या समागमी जनांस आलिंगनदेऊन तुकारामबावांनीं उपदेश केला. ॥६६०८॥ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥२॥नका शोधूं मतांतरें । नुमगें खरें बुडाल ॥३॥कलीमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥४॥==========तुकारामबावांची शेवटील विनवणी. ॥६६०९॥सखे सज्जन हो स्मरा नारायण । संगें येतें कोण सत्य सांगा ॥१॥आमुचे गांवीचें जरी रत्न गेलें । नाहीं सांगितलें म्हणों नये ॥२॥म्हणोनि सकळां केलें जरी ठावें । नाईकलें जावें पुण्यवाटे ॥३॥इतुकियावरी तुह्मी राहों नका । विनवितो तुका विठोबासी ॥४॥॥६६१०॥माहेरींचा मज आलासे मुळारी । उद्यां प्रात:काळीं जाणें मज ॥१॥बहूकाळ माझा केलासे सांभाळ । पांडुरंगें मूळ पाठविलें ॥२॥हीच आह्मा भेटी लोभ असों द्यावा । पुन्हा मी केशवा नये येथें ॥३॥तुका ह्मणे बहू न बोलों उत्तर । आतां फार असों द्यावी ॥४॥॥६६११॥सकळही माझी बोळवण करा । परतोन घरा जावें तुह्मी ॥१॥कर्म धर्म तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशिर्वाद ॥२॥वाढवूनी दिलें एकाचिये हांतीं । सकळ निश्चिती झाली येथें ॥३॥आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । मी माझीया भावें अनुसरलों ॥४॥वाढवितां लोभ होईल उशिर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥५॥धर्म अर्थ काम झाले एक ठायीं । मेळविला तीहीं हाता हात ॥६॥तुका ह्मणे आतां झाली याची भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥७॥॥६६१२॥चार लक्ष तीस हजार हीं पदें । तुह्मासी विषदें सांगितलीं ॥१॥पुन्हा नरतनु मिळणार नाहीं । ह्मणोनि या देहीं भव तरा ॥२॥सर्वाच्या चरणीं मस्तक ठेवितों । आह्मी आतां जातों निज धामा ॥३॥सर्वत्र मिळोनि विनंति हे ऐका । भजनीं करुं नका आळस कोणी ॥४॥पोटाचिये साठीं चिंता न करावी । देईल गोसावी अलबेले ॥५॥मन हें तुमचें अधीर हें आहे । ह्मणोनि यां बाहे चिंता बहु ॥६॥राजा जनालागीं चाकर ठेवितो । पोटालागीं देतो किंवा नाहीं ॥७॥म्हणोनि देवासी साधावें विचारें । देईल निर्धारें अन्न बहु ॥८॥पोटासाठीं इतुकी हळहळ लागली । कैसी भ्रांती आली देवाविशीं ॥९॥तुका ह्मणे माझ्या गळ्याची हे आण । जरी नारायण विसराल ॥१०॥॥६६१३॥उठा सकळिक भेटूं तुह्मी आम्ही । लक्ष लावा नामीं विठोबाच्या ॥१॥लहानथोर सारे आशीर्वाद घ्यारे । बोळवित यारे इंद्रायणी ॥२॥येथुनी आमुचा खुंटलासे मार्ग । तुम्ही कृपा लोभ असूं द्यावा ॥३॥तुम्हासाठीं जीव झाला कासावीस । कोणी हरिचे दास निवडाना ॥४॥तुका म्हणे आतां जाईल हीच भेटी । राहातील त्या गोष्टी बोलावया ॥५॥॥६६१४॥येतों काकुळती अर्थ धरा चित्तीं । आमचीये पंथीं हेत धरा ॥१॥आमुच्या पंथें नाहीं जकातिचें नातें । सणद आलिया पंथें । कोण दंडी ॥२॥असें मी सांगतों बरें धरा मनीं । अनहिताचें कोणी सांगत नाहीं ॥३॥परिहारासाठी वैद्य नारायण । औषध आपुला गुण करितसे ॥४॥॥६६१५॥रानोवनीं नाम दाटलें अपार । प्रेमाचें नीर वरुषला ॥१॥तेव्हां माझें रुप स्वरुपीं मिनलें । धन्य धन्य केलें तिहीं लोकीं ॥२॥तुझिये किर्तीचा वाजविला डंका । एकलाचि तुका चालविला ॥३॥॥६६१६॥तुम्हां सांगावया मूळ हें कारण । वैकुंठाहून आलों आम्ही ॥१॥कलीमध्यें झाल्या पापाचिया राशी । म्हणूनि आम्हांसीं पाठविलें ॥२॥नाम गर्जुनियां पाप जाळावया । जडजीव उद्धाराया कलीमाजी ॥३॥माझिया बोलाचा मानाल जरी शीण । भोगाल पतन यमपुरीं ॥४॥म्हणोनीयां तुम्हां येतों काकुळती । नाम धरा चित्तीं विठोबाचें ॥५॥तुमचीं हीं पापें जातील निरसुनी । हें तुम्हां सांगोनी जाइल तुका ॥६॥॥६६१७॥मज वाटे खंती आतां वैकुंठिची । पूर्ण संसाराची आशा झाली ॥१॥श्रीरंग सांवळा आहे वैकुंठासी । धर्मे हृषीकेशी राज्य करी ॥२॥तें सुख आठवितां झालें समाधान । आतां नाहीं येणें संसारासी ॥३॥आतां ऐका आम्ही सांडूं मृत्युलोक । हें तुम्हा कवतुक कळेल पुढें ॥४॥तुका म्हणे माझी वाट तुम्ही पहातां । दग्धलों संसारी म्हणोनियां ॥६॥॥६६१८॥कुडीसहित तुका जाईल वैकुंठासी । ते गुज तुम्हासी कळलें नाहीं ॥१॥पुढें जें होईल तें जाणें विठ्ठल । लौकिकां कळेल काय तेथें ॥२॥तुका म्हणे आतां काया ब्रम्ह झाली । विमानें उतरली आम्हा लागीं ॥३॥॥६६१९॥उठा एक आतां सांगतों तुम्हाला । देशनटा आला आम्हालागीं ॥१॥इंद्रायणीवरी उतरलीं विमानें । आम्हापासीं आले विष्णुदूत ॥२॥मत्युलोकीं माझें पूर्ण झालें मन । गाईलें कीर्तन विठोबाचें ॥३॥साधुसंतां पायीं गेलों लोटांगणीं । नित्य गर्जे वाणी विठ्ठलनामें ॥४॥आतां एक ऐका सांगतों तुम्हासी । जावें पंढरीसी सर्व काळ ॥५॥तुम्ही कोणी करा हरिनामकीर्तन । ऐसें तुम्हा सांगोन जातो तुका ॥६॥॥६६२०॥बैसा आतां आमचा राम राम घ्यावा । आम्ही गेलों देवा शरणांगत ॥१॥शरणांगत जातां ब्रम्ह झाली काया । गेल्या नासोनीया पापराशी ॥२॥तुमची आमची तुटी झाली येथोनी । तुम्ही स्मरा वाणी रामराम ॥३॥नामें करो विठ्ठल दूर अंतरला । भावें हा वळला पांडुरंग ॥४॥निरपेक्ष निरभिमानी असती जे प्राणी । त्यांसी चक्रपाणी जवळी आहे ॥५॥ज्यांचा भाव जडला विठोबाचे पायीं । त्यांसी मुक्ति देई पांडुरंग ॥६॥ज्ञान अभिमान अंगीं भरला ताठा । देवासी करंटा दुरावला ॥७॥ज्ञानाचा अभिमान सांडा म्हणे तुका । तरीं जोडेल सखा पांडुरंग ॥८॥॥६६२१॥पताकांचें भार मृदंगाचे घोष । जाती हरिचे दास पंढरिसी ॥१॥लोकांची पंढरी आहे भूमीवरी । आम्हा जाणें दुरी वैकुंठासी ॥२॥कांहीं केल्या तुम्हा उमजेना वाट । म्हणुनी बोभाट करुनी जातों ॥३॥मग पुढें रडाल कराल आरोळी । तुका कदाकाळीं मागें नये ॥४॥॥६६२२॥ऐसिये अवघड आमुची आहे वाट । नाहीं घाटनीट वाटेवरी ॥१॥जकातीचा गुंता नाहीं वाटेवरी । मार्ग मोकळे बरें यावें जावें ॥२॥ऐसें ज्या भोगणें असेल हें सुख । तेणें हो विन्मुख होऊं नये ॥३॥मग पडाल संकटीं भवसागरीं शोका । कोणे जन्मीं तुका सांपडेना ॥४॥॥६६२३॥बसारे गडयानों आज्ञा द्यावी आह्मा । आमुच्या रामनामा चित्तीं धरा ॥१॥उपकार करा पतीत उद्धरा । वारंवार उच्चारा रामनाम ॥२॥व्हारे वारकरी वेगीं जा पंढरी । निरोप महाद्वारीं एवढा सांगा ॥३॥तुका आमुचे गांवीं होता एक आपुला । नाहीं कोठें गेला पायाविणें ॥४॥॥६६२४॥गेलियाची हळहळ कोणी । नका मनीं धरुं कांहीं ॥१॥पावले तें म्हणों देवा । सहज सेवा या नांव ॥२॥जळतां अंगीं पडतां खाण । नारायण भोगितां ॥३॥तुका ह्मणे नलगे मोल । देव बोल आवडती ॥४॥॥६६२५॥बसा सर्वजन तुह्मी कृपा करा । सत्य मार्ग धरा आपुलाला ॥१॥माझा मार्ग नाहीं फुटणार कोणा । सद्भाववासना धरो नेदी ॥२॥पेरियेलें बीज विस्तारे मागुती । मग करा खंती नि:कार्याची ॥३॥उन्हाळीं पर्जन्य वर्षे शीळधारी । काय आह्मावरी उपकार ॥४॥समय उचित कोणी सावधान । होतो राज्यमान तुका म्हणे ॥५॥॥६६२६॥विमानांचे घोष वाजती असंख्य । सुरु झाला डंका वैकुंठींचा ॥१॥शब्दांचा विश्वास झाली आठवण । करा बोळवण सज्जन हो ॥२॥आले विष्णुदूत तेचि प्रेममूर्ति । अवसान हातीं सांपडलें ॥३॥झाला पाठमोरा इंद्रायणीतळीं । रामघोषटाळी वाजविली ॥४॥प्रथम तो पाय घातला पाण्यांत । राहिली ते मात तुका ह्मणे ॥५॥॥६६२७॥माडयावरुतें पांजलें हें शरीर । झाला धुंदुकार दाही दिशा ॥१॥टाळ घोळ विणा मृदंगाचे घोष । गाती हरिदास नाचताती ॥२॥नेणों मागें पुढें होती हरीकथा । पहातां पहातां भ्रम लोकां ॥३॥हातावरी हात मारुनि जातो तुका । परी कोणा एका उमजेना ॥४॥॥६६२८॥कंठ आणि उर झाले ते जीवन । परतलें मन मागुतें कीं ॥१॥जनीं जनार्दन आहे तुम्हापाशीं । व्यर्थ उपवाशी होती जीव ॥२॥इतुक्यांत एक येत पाठीवरी । कीर्ति हे माघारी जागवित ॥३॥कांहीं केल्या याचें द्रवेना तें मन । केवळ पाषाण दिसतसे ॥४॥सहस्त्रांत एक निवडीतां शूर । जागे तरुवर बरे होतें ॥५॥काढुनि डोईचा लोंभ लावी शेला । असेल आपुला यावें कोणी ॥६॥तुका म्हणे किती फोडावे या उर । करी परिहार आपुला तो ॥७॥॥६६२९॥सर्व हेत झाला एक आहे मनीं । ऐका विनवणी तुह्मी संत ॥१॥आह्मी संतलोकीं स्त्री ही मृत्यूलोकीं ॥ कोण धरा एकी सुपंथ हा ॥२॥ठायींची अचपळ तोंड फटकळ । सोसा वरदळ मजसाठीं ॥३॥इचा उपकार आह्मावरी झाला । पदर दिधला माळणीला ॥४॥अहो पांडुरंगा फेडा इचें ॠण । संबंध तोडणें इचा माझा ॥५॥बाकी देऊनि यां तुका मार्गी झाला । पदर दिधला माळणीस ॥६॥॥६६३०॥आमुची ही कांता तुमचे पदरीं । दया तिजवरी करावी ते ॥१॥आहे अचपळ तोंडें फटकळ । सोसा वरदळ मज साठीं ॥२॥पसरीं पदर धरीं दाढी होंटी । घालवे जी पाठीं अपराध ॥३॥इतुक्या शब्दांचा खरा हेत धरा । उपकार करा मजवरी ॥४॥तुका म्हणे नेणें बोलणें मी फार । करा अंगिकार तुह्मी आतां ॥५॥॥६६३१॥आह्मी जातों आपुल्या गावां । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥तुमची आमची हेचि भेटी । येथूनियां जन्मतुटी ॥२॥आतां असो द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥३॥येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥४॥रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥५॥॥६६३२॥घरचीं दारचीं भजा पांडुरंगा । वडिलांसी सांगा दंडवत ॥१॥मधाचिये गोडी माशी टाकी उडी । मोडलिया घडी पुन्हा नये ॥२॥गंगेचा हा ओघ सागरीं मिळाला । नाहीं मागें आला कदा काळीं ॥३॥ऐशी या शब्दांची बरी करा सोय । गेला तुमा नये मागुता तो ॥४॥॥६६३३॥लोकांची पंढरी आहे भुमीवरी । आह्मा जाणें दुरी वैकुंठासी ॥१॥कांहीं केल्या तुम्हां उमगेना वाट । म्हणोनी बोभाट करीतसे ॥२॥माघारे रडाल कराल आरोळी । तुका कदा काळीं मागुता नये ॥३॥॥६६३४॥निरोप दिल्यावरी न पहावें मागुतें । पुढील तो पंथ उरकावया ॥१॥थोडयासाठीं मागें ठेऊं नये घोर । आपुलें परिहार करावें तें ॥२॥पोट भरल्यावर न बोलाव्या गोष्टी । भ्रम अन्न पोटीं घेऊं नये ॥३॥देवाज्ञा झालीया न ठेवावी वासना । रांडा घोरें जाणा निरवूं नये ॥४॥तुका ह्मणे देवें मार्ग शुद्ध केला । वांटा तो आपुला आला हाता ॥५॥॥६६३५॥झालें परब्रह्म घोटयाखालीं शून्य । राहीलें बोलणें येथोनियां ॥१॥एकांतीं बोललों परिहारासाठीं । नामयाची बाकी फेडियेली ॥२॥बरा मी भाग्याचा ऋणी श्रीदेवाचा । वदविली वाचा तेणें माझी ॥३॥एवढे ऋणानें माझें काम झालें । आतां हरपला भवभ्रम ॥४॥व्याज हें मुद्दल आलें तुझे हातां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥५॥॥६६३६॥शालिवाहन शकें पंधराशें एकाहत्तर । विरोधीनाम संवत्सर उत्तरायणीं ॥ फाल्गुन वद्य द्वितिया दिवस सोमवार । प्रथम प्रहर प्रात:काळ ॥१॥तये दिवशीं शेवट कीर्तन करितां । ह्मणे मज आतां निरोप द्यावा ॥२॥तुका ह्मणे नमन साधुसंत पाया । ऐसें बोलोनियां गुप्त झाले ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 26, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP