निर्वाण प्रकरण - ६६३७ ते ६६४९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


इतकें बोलून तुकारामबावा देवांसमागमें देहासहित वैकुंठास गेले तेव्हां समागमें घालवीत गेले होते ते ह्मणाले कोणी
देह वैकुंठीं नेला होता काय ? कोणी म्हणाले डोहांत गेले असतील कोणी ह्मणाले भागिरथींत देह टाकला असेल, इतक्यांत हातींच्या टाळासी गोंवलेलें पत्र वरुन पडलें.

॥६६३७॥
आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळां सांगावी विनती माझी ॥१॥
वाढवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळी विठो आह्मासी पावला । कुडीसहित झाला तुका गुप्त ॥३॥

॥६६३८॥
तुका उतरला तुकीं । नवल झालें तिहीं लोकीं ॥१॥
नित्य करितों कीर्तन । हेंचि त्याचें अनुष्ठान ॥२॥
तुका बैसला विमानीं । संत पाहती लोचनीं ॥।३॥
देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी गेला ॥४॥

॥६६३९॥
मरणाहातीं सुटली काया । विचारा या निश्चयें ॥१॥
नासुनियां गेली खंती । सहज स्थिती भोगाची ॥२॥
न देखेसें झालें तम । आलें वर्म हातासी ॥३॥
तुका ह्मणे कैंची कीव । कोठें जीव निराळा ॥४॥

॥६६४०॥
हरिनामाचें करुनी तारुं । भवसिंधु पारु उतरलों ॥१॥
फावले फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥२॥
हरिनामाचा छत्र घोडा । संवसाग गाढा छेदिला ॥३॥
हरिनामाचे करुनी धनुष्यकांड । विन्मुख तोंडें कळिकाळ ॥४॥
येणेंचि बळे स्मरते आह्मीं । हरिचे नामीं लोकीं तिहीं ॥५॥
तुका ह्मणे झालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥६॥

॥६६४१॥
लक्ष्मिसहित उतरलीं विमानें । येउनी दिले ठाणें इंद्रायणीं ॥१॥
आंतणीं असतां आलें बोलावणें । समस्तां कारणें सांगितले ॥२॥
करीत कीर्तन चालिले तेथुनी । गर्जत नामध्वनी विठोबाची ॥३॥
ब्रह्मा विष्णु रुद्र आले तिघेजण । घेतलें उचलून विमानांत ॥४॥
तुमच्या तें नेत्रीं झांपड पडली । विमानें चाललीं आकाशपंथें ॥५॥
ब्रह्मा विष्णु रुद्र तिघांसी भेटलों । चरणासीं लागलों आवडिनें ॥६॥
चोकोशांवरी थांबिलीं विमानें । पत्र हें तेथून तुम्हां लिहिलें ॥७॥
धन्य झाला तुका नामें उद्धरला । कुडी सहित गेला वैकुंठासी ॥८॥

॥६६४२॥
वाराणसी पर्यंत असों सुखरुप । सांगावा निरोप संतांसी हा ॥१॥
येथुनियां आह्मां जाणे निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥२॥
कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातसों माहेरीं तुका ह्मणे ॥३॥
===========
तें पत्र वाचून सकळ समाधान पावून स्नान करुन श्रीच्या देवळीं येऊन विठोबास नमून आपल्या घरीं गेले. परंतु कान्होबा, जिजाबाई, महादेव, विठोबा हीं चौघेजणें देवळात बसून देवाशीं भांडूं लागलीं तेव्हां देवानें गरुडास तुकारामबावाकडे पाठविलें. गरुडानें वैकुंठीं पाहून, तुकारामबावाकडें पाठविलें. गरुडानें वैकुंठीं पाहून, शेषशयनीं जाऊन तुकारामबावांनीं पत्र लिहून दिलें तें गरुडानें आणून कान्हयापाशीं दिलें ते अभंग.

॥६६४३॥
न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दु:खासी ॥१॥
कृपेचिये सिंहासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥२॥
वाजतां तो नलगे वारा । क्षीरसागरा शयनीं ॥३॥
तुका म्हणे अवघेठायीं । मज पायीं राखिलें ॥४॥

॥६६४४॥
आतां येणेविण नाहीं मज चाड । कोण बडबड करी वायां ॥१॥
सुख तेंचि दु:ख पुण्य पाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥१॥
तुका म्हणे वाचा राहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥

ऐसें हें पत्र कान्हयानें वाचून जिजाई व विठोबा यांस समजाविलें तेव्हां अवघीं परमानंदें विठोबास नमून आपल्या स्थळास गेलीं.
=============
तुकारामबावा वैकुंठास गेल्यानंतर पंढरीनाथानें शोक केला.

॥६६४५॥
दु:खाचे हें आसूं आलें असे डोळां । मनीं कळवळा कोण जाणे ॥१॥
काळवेळ चंद्र कोपलाकां हरी । चित्त भक्तीवरी ठेऊं नेदी ॥२॥
पडतां हा बिंदु दु:ख झालें चित्तीं । एवढी कां खंती करितसां ॥३॥
कोणें तुझा भक्त नेला हो हातींचा । कां केश नासींचा उपडिला ॥४॥
मग पुन्हा बोले रुक्मिणीचा वर । नाहीं मज थार बैसावया ॥५॥
न बोलें मी कांहीं असत्य बोलणें । सखा माझा म्हणे तुका जाण ॥६॥

॥६६४६॥
माझा प्रेमाचा पुतळा । तुका टाकोनियां गेला ॥१॥
माझ्या जिवीं त्याचा छंद । पांडुरंग रडे फुंदे ॥२॥
काय सांगों तुज गोष्टी । दु:ख न माये तें पोटीं ॥३॥
ह्मणे रुक्मिणीचा कांत । माझें संबोखावें चित्त ॥४॥
सर्व गुणांतील गोड । तुका लावण्याचें झाड ॥५॥

॥६६४७॥
सर्व बोधांतील बोध । तुका पंचम तो वेद ॥१॥
कैसा ब्रह्मीं गुप्त ठेला । नेणों वारापाणी झाला ॥२॥
हरी म्हणे वो रुक्मिणी । दावा आणुनियां कोणी ॥३॥
तुका म्हणे ऐका । सांगों वैकुंठनायका ॥४॥

॥६६४८॥
भक्ति आनंदानें केली । माझी कल्पना निमाली ॥१॥
नेलें अंतर खोलुनी । प्रेम प्यालासे धुवोनी ॥२॥
माझे देह रंगशीळा । नाहीं गेला कळीकाळा ॥३॥
तुका ह्मणे हरी भला । नेणों देह सर्व गेला ॥४॥

॥६६४९॥
वाट पाहे दाहीं वाटे । तुका दिसों नेदी कोठें ॥१॥
ऐसें कैसें मज केलें । सर्व सुख दु:ख नेलें ॥२॥
त्याही सुखें सुखावला । मोठा घात माझा केला ॥३॥
तुका ह्मणे तेंचि धन । दीन दुबळ्याचे प्राण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP