निर्वाण प्रकरण - ६५०९ ते ६५१७
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
पत्र पाठविल्यानंतर गरुडानी लक्ष्मीची व शेषाची प्रार्थना केली.
॥६५०९॥
गरुडाचे पायीं । ठेवीं वेळो वेळां डोई ॥१॥
वेगें आणावा तो हरी । मज दिनातें उद्धरी ॥२॥
पाय लक्ष्मीचे हातीं । ह्मणुनी येतों काकुळती ॥३॥
तुका म्हणे शेषा । जागे करा ऋषीकेशा ॥४॥
====
हें पत्र नारायणानें पाहून विष्णुस आज्ञा केली कीं तुकारामास देहासहित वैकुंठास आणून तेथील सुख दाखवून येथें आणून घालावा तेव्हां विष्णुनें सनकादिकांस समाचारास पाठविलें.
॥६५१०॥
तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥
एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥
माझी भाकुनी करुणा विनवा वैकुंठीचा राणा ॥३॥
तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥
====
तेव्हां सनकादिकांनीं तुकोबास वृत्तांत सांगितला कीं श्री नारायणाचे आज्ञेवरुन विष्णु तुह्मास वैकुंठास देहासहित न्यावयास सत्वरच येतील असें सांगून सनकादिक वैकुंठास गेले तेव्हां तुकोबा परम समाधान पावून अभंग बोलले.
॥६५११॥
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥
सुख दु:ख माझें ऐकियलें कानीं । कवळला मनीं करुणेचा ॥२॥
करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिवसें एकें न्यावयासी ॥३॥
त्याची पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहे नित्य माहेराची ॥४॥
तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया माय बाप ॥५॥
====
वैकुंठास जाण्यापूर्वी पंढरीनाथास भेटावें ह्मणून त्यास पत्र पाठविलें.
॥६५१२॥
संतांचे उपदेश आमचे मस्तकीं । नाहीं ईह लोकीं रहाणें आतां ॥१॥
ह्मणुनी बहू तळमळे चित्त । येई हो धांवत पांडुरंगें ॥२॥
उपजलि चिंता लागला उशिर । होत नाहीं धीर निढळ वाढें ॥३॥
तुका ह्मणे पोटीं रिघालेंसे भय । करुं आतां काय ऐसें झालें ॥४॥
====
पत्र वाचतांच पंढरीनाथ रुक्मिणी वगैरे स्त्रिया व पुंडलिकादि भक्तांसह भेटीस निघाले असतां तुकारामबावांस सुचिन्हें होऊं लागलीं.
॥६५१३॥
चिन्हें उमटताती अंगीं । शकुनजोगीं उत्तम ॥१॥
आठवले बाप माय । येईल काय मुळ नेणों ॥२॥
उत्कंठित झालें मन । तेची खूण तेथींची ॥३॥
तुका ह्मणे काम वारी । आळस घरीं कर्मेना ॥३॥
॥६५१४॥
आरोनियां पाहें वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियासी पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥२॥
दळीं कांडीं लोकां ऐसें । परी मी नसें ते ठायीं ॥३॥
तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥४॥
॥६५१५॥
येथिलिया अनुभवें । कळों जीवें येतसे ॥१॥
दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥२॥
भुकें भूक खाउन धाय । नुरे होय अन्नाची ॥३॥
तुका म्हणे सुख झालें । अंतर धालें त्या गुणे ॥४॥
॥६५१६॥
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा रोकडा अनुभव ॥१॥
सुख झालें सुख झालें । नये बोलें बोलतां ॥२॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥३॥
तुका म्हणे जतन करुं । हेंची जीवेसीं ॥४॥
====
सत्वरच अपणास श्रीहरीचें दर्शन होईल ह्मणून तुकारामबावा परम संतोष पावले इतक्यांत यमधर्मानें काळ यमदुतांस अज्ञापिलें कीं सत्वर जाऊन तुह्मी तुकारामबावांस नमन करुन सांगणें कीं आपण कृपा करुन यावें ऐसें ऐकून काळ यमदुतांनीं येऊन तुकारामबावांस नमून सांगितलें तेव्हां स्वामी अभंग बोलले.
॥६५१७॥
आतां चक्रधरा । झणी आह्मासी अव्हेरा ॥१॥
तुमचें म्हणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥२॥
काळ आम्हा खाय । तरी तुझें नाम जाय ॥३॥
तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2019
TOP