निर्वाण प्रकरण - ६५१८ ते ६५२९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


ऐसें बोलून तुकारामबावांनीं वैकुंठवासी देवानें सत्वर यावें ह्मणून त्यांचा धांवा केला तो अभंग.

॥६५१८॥
धांवे धांवे गरुडध्वजा । आह्मा अनाथांच्या काजा ॥१॥
बहु जाहलों कासाविस । ह्मणूनी पाहे तुझी वास ॥२॥
पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥३॥
असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥४॥
न लावावा उशीर । नेणों कांहो केला धीर ॥५॥
तुका ह्मणे चालीं । नको चालूं धांव घालीं ॥६॥
====

असा धांवा केल्यावर देव येत आहेत असें पाहिलें.

॥६५१९॥
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुडाच्या फडत्कारें । नाभी नाभी ह्मणे त्वरें ॥२॥
मुगुट कुंडलांची दिप्ति । तेजें लोपला गभस्ती ॥३॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥४॥
मेघ:श्याम वर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥५॥
चतुर्भुज वैजयंती । कंठीं माळ हे रुळती ॥६॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥४॥

॥६५२०॥
शंखचक्र गदा पद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
नाभी नाभी भक्तराया । वेगें पातलों सखया ॥२॥
दुरोनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टीं ॥३॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥४॥

॥६५२१॥
पुष्टकांती निवती डोळे । हे सोवळे श्रीरंगें ॥१॥
अंतर्बाह्य विलेपन । हें भूषण मिरवूं ॥२॥
ईच्छे ऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥३॥
तुका करी नारायण । दया सेवन नामांचें ॥४॥
====

हें यमाच्या किंकरांनीं पाहून ते तुकाराम बावांस सोडून पळाले.

॥६५२२॥
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥
आले वैष्णव वीर । काळ कांपती असुर ॥२॥
गरुड टकियाच्या भारें । भुमि गर्जे जयजयकारें ॥३॥
तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥४॥
====

याचवेळेस पंढरीनाथ आपल्या परिवारासहित आले.

॥६५२३॥
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥
आला पंढरीचा राणा । दिसती त्या याच्या खुणा ॥२॥
सुख वाटे मनां । डोळे बाह्या स्फुरती ॥३॥
उठिले गजर नामाचें । दळभार वैष्णवाचे ॥४॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥५॥
====

ऐसें बोलून आपले समागमीं संत महंत होते त्यांसहित पंढरीनाथास सामोरे परम सद्भावें लोंटांगणीं चालले तेव्हां बोललेला अभंग.

॥६५२४॥
चला जाऊंरे सामोरे । पुढें भेटों धुरे ॥१॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ॥२॥
फेडावया धणी । प्रेमसुखाची आटणी ॥३॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥४॥
तुका आळंगिला बाहीं । ठेविला विठ्ठलाच्या पायीं ॥५॥
====

नंतर नारायणाचें स्तवन केलें.

॥६५२५॥
नमो विष्णु विश्वरुपा मायबापा । अपार अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आयकावें ॥२॥
तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेती नेती ॥३॥
ऋषी मुनी बहु सिद्ध कवीजन । वर्णितां गुण न सरती ॥४॥
तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जी कीर्ति वाणी तुझी देवा ॥५॥
====

मग तुकाराम बावांनीं देवांस घरीं येण्यास अमंत्रण केलें.

॥६५२६॥
चाल घरा उभा राहे नारायणा । ठेऊंदे चरणांवरी डोई ॥१॥
प्रक्षाळुं दे पाय बैस माज घरीं । चित्त स्थिर करी नारायणा ॥२॥
आहे त्या संचितें करविन भोजन । काय न जेऊन करशी आतां ॥३॥
करुणाकरें कांहीं कळों दिलें वर्म । दुरी होतों कोण वरीं ॥४॥
तुका ह्मणे आतां आवडीच्या संता । बोलिलों अनंता करविन तें ॥५॥
====

देव घरीं आल्यावर त्यांस आपल्या स्थितीचें वर्णन केलें.

॥६५२७॥
इह लोंकीं आम्हां भुषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥
निमाली संपदा भया विरहीत । सर्वकाळ चित्त समाधान ॥२॥
छिद्रांचा अश्रम उंदिर कुळवाडी । धाम नामा जोडी देवाचें तें ॥३॥
तुका ह्मणे एकें सेवटीं रहाणें । वर्ताया जन अवघे या ॥४॥
====

देवास व संतांस पावण्हेर केला.

॥६५२८॥
पाहुणे घरासी । आजी आले ऋषीकेशी ॥१॥
काय करुं उपचार । कोप मोडकी झांजर ॥२॥
दुरदुरीत कण्या । माजि रांधियेल्या पाण्यां ॥३॥
घरीं मोडकिया बाजा । वरीं वाकळांच्या शेजा ॥४॥
मुख शुद्धी तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥५॥

॥६५२९॥
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
कांहीं ठेविलें चरणीं । घेती तेवी पुरवणी ॥२॥
तुका पायवणी । घेउनी निराळा ॥३॥
नसतां कांहीं संत्रित । भेटी झाली अवचित ॥४॥
देव मिळोनीयां भक्त । तुका म्हणे केला सनाथ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP