दांभिकास शिक्षा - ६१६१ ते ६१७३

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६१६१॥
जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥१॥
तो एक नांवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥२॥
सांडुनियां शाळिग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥३॥
नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो अर्थ ॥४॥
तुका म्हणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥५॥

॥६१६२॥
ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि । पाहा श्रुतीमधीं विचारुनी ॥१॥
जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नर्तन वैष्णवांचे ॥२॥
सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥३॥
तुका ह्मणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ठ होय ॥४॥

॥६१६३॥
करिती ब्राह्मण खिस्तीचा व्यापार । सांडून आचार भ्रष्ट होती ॥१॥
सांडी स्नानसंध्या स्वधर्म विचार । गायत्री उच्चार तेथें कैंचा ॥२॥
नाहीं शुद्ध क्रिया धेंडासी पर्वत । आवडीनें नित्य कर्म करी ॥३॥
रांडामुंडा शिव्या आईमाई लेंका । परस्परें थुंका तोंडावरी ॥४॥
कवडीसाठीं तो प्राण देऊं पाहे । जाउनी राहे उभा दारीं ॥५॥
मांगिणीसी लेखा ब्राह्मणाकारणें । शुद्ध आचरणें बुडविलीं ॥६॥
तुका ह्मणे द्रव्य मेळविलें श्रमें । यमाजीचें धाम जोडी केली ॥७॥

॥६१६४॥
खिस्तीचा व्यापार करुनी आवडी । पूर्वजांसी धाडी अधोगती ॥१॥
कायसा व्यवहार लोकांमाजी खोटा । न भरतां पोटा कांटे भरो ॥२॥
अविंधाची सेवा अखंड लाधली । मनीं बोला बोली तेचि होय ॥३॥
तुका ह्मणे धर्म आपुला सांडितां । जातो त्याचि पंथा नर्कामाजी ॥४॥

॥६१६५॥
सांडिला आचार । द्विज झाले चाहडखोर ॥१॥
करुनी ईजारा व्यापार । प्रजा नागविती फार ॥२॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥३॥
वैश्य शुद्रादिक । हेतो सहजचि लोक ॥४॥
तुका ह्मणे श्रेष्ठ । झाले लोक कर्मभ्रष्ट ॥५॥

॥६१६६॥
चित्त नाहीं हितावरी । धणी करी अपेक्षा ॥१॥
तीर्थपर्वी देतां सर्व । स्वयें भाव मनासी ॥२॥
प्रतिग्रह या वचनें । घेतां दान न भिये ॥३॥
तुका ह्मणे नेम नेणे । शुद्ध पुण्य हारवी ॥४॥

॥६१६७॥
सांडी सत्कर्म आचार । सदा हिंडे देशावर ॥१॥
ऐसें पोटाचें पांगिलें । धन लोभिष्ट सांचिलें ॥२॥
नाहीं आठव तिहींची । वाचा आर्वादि वेदांची ॥३॥
तुका ह्मणे जना मागे । दिलें नाहीं पांडुरंगें ॥४॥

॥६१६८॥
नामासारिखा आचार । कांहीं देखती साचार ॥१॥
सर्व देहींचें हें ज्ञान । काय शिक्षा भागे जन ॥२॥
अंगीं अभिमान वस्ती । बळगर्वे अंगीं मस्ती ॥३॥
तुका ह्मणे जातो नर्का । त्याच्या तोंडावरी थुंका ॥४॥

॥६१६९॥
अविद्या खाटकी निर्दय माहारी । हे तुम्हा अंतरीं नांदताहे ॥१॥
काम तो चांभार क्रोध तोचि मांग । कासयानें चांग उंच तुम्ही ॥२॥
बीज सामाऊनी मौजाहार रीती । काय ते फजीती सांगों आतां ॥३॥
दासीवेश्येघरीं तुमचें मैथून । ह्मणवितां ब्राह्मण लज्जा नये ॥४॥
इतकें बोलणें कासया लागतें । सोंवळे नसते जरी तुम्हा ॥५॥
बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणे । कलियुगीं ब्राह्मण परिसावे ॥६॥

॥६१७०॥
धन कवडी कवडी । ठेवी सांचून करंडी ॥१॥
पाप्या न मिळे खावया । अंतीं सांडी सत्यक्रिया ॥२॥
अधम जातीचा । करी व्यापार खिस्तीचा ॥३॥
तुका म्हणे रांडलेका । पडे जन्मोजन्मीं नर्का ॥४॥

॥६१७१॥
नव्हे तो एकाचा । लेंक बहुतां बापांचा ॥१॥
दासी राखिती ब्राम्हण । त्यांसी बाप दोघे जण ॥२॥
परयोनींत पडतां बिंदु । तेथें पातकांचा सिंधु ॥३॥
त्याचा आचार पापराशी । तया नाहीं हृषीकेशी ॥४॥
धर्मदान केल्या त्याचे । वेष धनीया नराचे ॥५॥
पांडुरंग ह्मणे त्याला । काय पुजोनी विप्राला ॥६॥

॥६१७२॥
मनीं धरोनियां ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥
वायां विण पुढें द्वाड । नर सुख इच्छी भांड ॥२॥
ग्वाहीविण स्थापी मात । बळें आपुलें सतत ॥३॥
तुका म्हणे ऐसे किती । नर्का गेले अधोगती ॥४॥

॥६१७३॥
सांगतों मी तरी नायकती बटकीचे ॥ पुढें शिंदळीचे रडतेल ॥१॥
नको नको भिऊं या रांडेस । पुढें यमफांस पडतील ॥२॥
तुका ह्मणे जेव्हां ब्रह्मीं नाहीं चाड ॥ हाणुनी थोबाड यम फोडी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP