दांभिकास शिक्षा - ६१०१ ते ६११०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६१०१॥
वरी सुरस बोल । कथाज्ञान माजी फोल ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तयां इह ना परलोक ॥२॥
परिसे एक सांगे । अंगा धुळी ही न लागे ॥३॥
तुका ह्मणे हाडें । कुतर्‍यां लाविले झगडे ॥४॥

॥६१०२॥
देखोदेखी व्रत करी । शुद्ध नाहीं त्या अंतरीं ॥१॥
वरीवरी दावी सोंगें । क्रोध उभा पुढें मागें ॥२॥
लोकां सांगे आम्ही नीट । पोटीं बाधकेचा क्लिष्ट ॥३॥
तुका ह्मणे करी काय । लाभकैंचा वांया जाय ॥४॥

॥६१०३॥
वरी भाव दावित । जगालागिं तो भोंदीत ॥१॥
द्रव्यवासना धरुन । जगीं करीत कीर्तन ॥२॥
भाव दावितसे लोकां । त्याचे बोल न आइका ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६१०४॥
भलतेंचि स्थापी जाण । ह्मणे वैराग्य हें ज्ञान ॥१॥
सांगे ब्रह्म हतवटी । परब्रह्म नाहीं पोटीं ॥२॥
ह्मणे दिव्य दृष्टी करा । मनीं विषयाचा थारा ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६१०५॥
ह्मणे मीच एक कर्ता । मुखें करीत कविता ॥१॥
नाहीं अंतरीं तो भाव । ह्मणे जगीं आह्मीं देव ॥२॥
ज्ञान झालेंसे थोडेसें । ह्मणे जाणें ब्रह्मरस ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६१०६॥
दोन अभंग शिकला । म्हणे जाणें त्या ब्रह्माला ॥१॥
संतां दाखवीत ज्ञान । कळा कुसरी करुन ॥२॥
बहु दाखवी लाघव । अंतरीं निराळाचि भाव ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६१०७॥
ऐसें नव्हे संतपण । शुद्ध करी अंत:करण ॥१॥
डोयी बुडोन केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥
पाय घालुनी आडवा । काय जपतोसी गाढवा ॥३॥
मांजर करी एकादशी । उंदीर मारुन भरल्या कुशी ॥४॥
उंटकरी प्रदक्षणा । लक्ष लावी पिंपळपाना ॥५॥
तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥६॥

॥६१०८॥
भक्ति नाशितसे हेडी । दंभा लंडी आवडी ॥१॥
सिद्ध जेवितना पाक । नाशी ताक घुसळुनी ॥२॥
एका एकीं इच्छी पाटा नेणे चाट कां जेवूं ॥३॥
तुका म्हणे मुलाम्याचें । बंधनाचे शेवटीं ॥४॥

॥६१०९॥
सांगे ज्ञानमार्ग । करी मांगिणीसी संग ॥१॥
बहु अंतरींचा खोटा । पावे अपमान मोठा ॥२॥
नाहीं यातीचा आचार । घडे वाडयांत व्यापार ॥३॥
तुका म्हणे भोगी नर्क । राहे जोंवरीचंद्रार्क ॥४॥

॥६११०॥
शिष्याहातीं जप । घोर पाप संचिलें ॥१॥
द्रव्य मिळे नाडी लोकां । जोडी थुंका साधिला ॥२॥
शुद्धी नाहीं सांची रुका । पाप देखा नेणेंचि ॥३॥
तुका म्हणे जाणे प्रांतीं । नर्काप्रती एकदां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP