दांभिकास शिक्षा - ६१४१ ते ६१५०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६१४१॥
आह्मी पुरणपोळीचे संत । कोण जाणे आमुचा अंत ॥१॥
आह्मा तुपाची आवडी । न लगे ती चिंच कढी ॥२॥
पान सुपारीचे सवें । गोड खाणें तेंच व्हावें ॥३॥
कांहीं काम तें करीना । घरीं कदान्न खाईना ॥४॥
तुका ह्मणे ऐसे संत । त्यांसी न भेटे भगवंत ॥५॥
॥६१४२॥
ब्रह्मज्ञान्याघरीं भक्तीचा दुष्काळ । शब्दांचा सुकाळ खटाटोप ॥१॥
नाम नाहीं वाचे दया नाहीं पोटीं । तत्वाचिया गोष्टी प्रेमेंविण ॥२॥
इंद्रियांसी जया नाहीं कोणे काळीं । म्हणती मृगजळीं कोण बुडे ॥३॥
तुका म्हणे हे तो अवघेचि सांग । वळविती जग पोटासाठीं ॥४॥
॥६१४३॥
देवें दिला देह भजना गोमटा । तो या लाभा भाटा बाधिकेच्या ॥१॥
ताठोनियां मान राहिली वरती । अहंकार हातीं लवों नये ॥२॥
दास म्हणावया न वळे रसना । सैर ही वचना बागडला ॥३॥
तुका ह्मणे कोठें ठेवावा विटाळ । स्नान तें निर्मळ व्हावयासी ॥४॥
॥६१४४॥
अपवित्र अनाचारी । खाय चोरुनी निर्धारी ॥१॥
जना दावी पवीत्रता । असे अंतरींचा रिता ॥२॥
दावी वरी वरी सोंग । दिसे अंतरीं तें व्यंग ॥३॥
तुका ह्मणे करी देखी । माती पडे त्याचे मुखीं ॥४॥
॥६१४५॥
कवडीसाठी फोडी शिर । काढुनी रुधिर मलंग तो ॥१॥
पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥२॥
तुका ह्मणे त्यास नव्हती स्वधर्म । न कळतां वर्म गोविंदाचें ॥३॥
=========
ब्राह्मणास शिक्षा.
===========
॥६१४६॥
महारासी सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥२॥
ना तळे चांडाळ । त्या अंतरीं विटाळ ॥३॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याति ॥४॥
॥६१४७॥
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥१॥
कांरे सिणलासि वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥२॥
मानदंभासाठीं । केली अक्षराची आटी ॥३॥
तप करुनि तिर्थाटन । वाढविला अभिमान ॥४॥
वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥५॥
तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म ॥६॥
॥६१४८॥
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म झाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥२॥
सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥३॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥४॥
बैसोनियां तक्तां । अन्नेविण पिडिती लोकां ॥५॥
मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥६॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥७॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासि तोडी ॥८॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥९॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवे वरी सोंग ॥१०॥
तुका ह्मणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥११॥
॥६१४९॥
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥१॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥२॥
रिघतां धांवा पेंवामध्यें । जोडे सिद्धि ते ठायीं ॥३॥
काय भस्म करील राख । अंतर पाप नाहीं तों ॥४॥
वर्णाआश्रमाचें वर्म । जाती श्रम झालिया ॥५॥
तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥६॥
॥६१५०॥
वेशा नाहीं बोल अवगुण दुषीले । ऐशा बोला भले झणें शोभा ॥१॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥२॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥३॥
याती शुद्ध परी अधम लक्षण । वांया गेलें तेणें सोंगेंही तें ॥४॥
तुका ह्मणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडन भारवाही ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP