दांभिकास शिक्षा - ६००१ ते ६०१०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६००१॥
वसोनि थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥२॥
फुगतें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥३॥
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥४॥
मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥५॥
॥६००२॥
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥
तैसें खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥२॥
काय करावी ती बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥३॥
तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी ! आपुलिया जैसी संवसंगें ॥४॥
॥६००३॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥१॥
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥२॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥३॥
तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥४॥
॥६००४॥
काळतोंडा सुना । भलते चोरुनि करी जना ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥२॥
मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥३॥
तुका म्हणे थीत । नागावला नव्हे हित ॥४॥
॥६००५॥
एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं ॥१॥
तरि तें संपादीलें सोंग । कारणांवांचूनियां व्यंग ॥२॥
वैष्णवांचा धर्म । जग विष्णु नेणे वर्म ॥३॥
अतिशये पाप । तुका सत्य करी माप ॥४॥
॥६००६॥
तोचि लटिक्यामाजी भला । म्हणे देव म्यां देखिला ॥१॥
ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे ॥२॥
बुडवी आपणासरिसे अभिमानें आणिकांस ॥३॥
आणिक नाहीं जोडा । देव ह्मणवितां या मूढा ॥४॥
आणिकांचे न मनीं साचें । तुका म्हणे या श्रेष्ठाचें ॥५॥
॥६००७॥
आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥१॥
सांडा सांडारे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥२॥
नाकेविण मोतीं । उभ्या बाजारें फजिती ॥३॥
हुकुमदाज तुका । येथें कोणी फुंदो नका ॥४॥
॥६००८॥
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरीनाथा ॥१॥
अवघे पोटासाठीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥२॥
लावी अनुसंधान । कांही देईल ह्मणऊन ॥३॥
काय केलें रांडलेका । तुला राजी नाहीं तुका ॥४॥
॥६००९॥
मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तिवाद काय । रंगवेगडीचा न्याय ॥२॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥३॥
काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे न लगे वाती ॥४॥
॥६०१०॥
न मनीं ते ज्ञानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥१॥
धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥२॥
न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥३॥
तुका ह्मणे तयां नमन बाह्यात्कारीं । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2019
TOP