दांभिकास शिक्षा - ६०४१ ते ६०५०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६०४१॥
एक ह्मणती आह्मी देवचि पैं झालों । ऐसें नका बोलों पडाल पतनीं ॥१॥
एक ह्मणती आह्मी देवाचीं पैं रुपें । तरी तुमचिया बापें न चुके जन्म ॥२॥
देवें उचलिली स्वकरें मेदिनी । तुमचेनीं गोणि नुचलवे ॥३॥
देवें मारियेलें दैत्य दानव मोठे । तुमचेनीं न तुटे तृणमात्र ॥४॥
रायाविठोबाचें पद जो अभिळाषी । पातकाची राशी तुका ह्मणे ॥५॥

॥६०४२॥
ह्मणवितां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन झाला जना कींव भाकी ॥३॥

॥६०४३॥
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥२॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥३॥
नाहीं इंद्रियां दमन । काय मांडिला दुकान ॥४॥
सारविलें निकें । वरि माजी अवघें फिके ॥५॥
तुका म्हणे अंतीं । कांही न लागेचि हातीं ॥६॥

॥६०४४॥
लटिक्याचे वाणी चवी ना सवाद । नाहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥२॥
अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥३॥
तुका म्हणे दोष आणि आवकळा । न पडतां ताळा घडतसे ॥४॥

॥६०४५॥
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरती बरवें वस्त्र काळें ॥१॥
उफराटी काटी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रांसी ॥२॥
चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका म्हणे त्यांस यम दंडी ॥३॥

॥६०४६॥
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥
खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥२॥
सेवी भांग अफू तमाखू उदंड ॥ परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥३॥
तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । खासी अंतरला पांडुरंग ॥४॥

॥६०४७॥
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥२॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥३॥
तुका म्हणे द्रव्य घेती ॥ देती ते ही नरका जाति ॥४॥

॥६०४८॥
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी ॥१॥
पोटीं सर्वकाळ । चिंतेची हळहळ ॥२॥
रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम ॥३॥
उफराटा भ्रम । गोवीं विषय माजिरा ॥४॥

॥६०४९॥
कळतां न कळे । उघडे झांकियेले डोळे ॥१॥
भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥
तुका ह्मणे जन । ऐसें नांव बुद्धिहीन ॥३॥
बहुरंगें भिन्न । एकीं एक निमालें ॥४॥

॥६०५०॥
जाणे वर्तमान । परि ते न वारे त्याच्यानें ॥१॥
तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥२॥
वेची अनुष्ठान । सिद्धी कराया प्रसन्न ॥३॥
तुका ह्मणे त्याचें ॥ मुदल गेलें हाटवेचें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP