दांभिकास शिक्षा - ६०५१ ते ६०६०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६०५१॥
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय ह्मणें धीरें फळ टोंकें ॥१॥
कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाठीं ॥२॥
तुका म्हणे होतें लोटिलें न कळे । झांकीतसे डोळे पांडुरंगा ॥३॥

॥६०५२॥
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥२॥
रिद्धिसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥३॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥४॥

॥६०५३॥
दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥१॥
रिद्धिसिद्धि येती घरा । त्याचा करिती पसारा ॥२॥
मानदंभासाठीं । पडे देवा सवें तुटी ॥३॥
तुका म्हणे मेवा । कैंचा वेठीच्या निर्दैवां ॥४॥

॥६०५४॥
उष्टया पत्रावळी करुनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकी पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा ध्याई । वरकडा वाहीं शोक असें ॥३॥

॥६०५५॥
काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥
तो मी हीणाहूनि सांडें । देवा दुर्‍हें काळतोंडें ॥२॥
मानूनी भरंवसा । होतों दासा मी ऐसा ॥३॥
तुका म्हणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥४॥

॥६०५६॥
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥२॥
तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥३॥

॥६०५७॥
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥२॥
नागवला अल्प लोभाचिये सांठी । घेऊनि कांचवटी परिस दिला ॥३॥
तुका म्हणे हात झाडिले परत्रीं । श्रम तोचि श्रोत्रीं वेठी केली ॥४॥

॥६०५८॥
नायकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वखाणी अद्वैत भक्ति भावेंवीण । दु:ख पावे शिण श्रोता वक्ता ॥२॥
अहंब्रम्हवीण चालवीसी तोंडा । न बोलावे भांडा तया सवें ॥३॥
देखे बरिर्लट करितां पाखंड । तुका म्हणे तोंड काळें त्याचें ॥४॥

॥६०५९॥
वाढवूनी जटा लावूनियां राकह ॥ भोंदी जन लोक नानापरी ॥१॥
ध्यान धरुनियां आरण्यांत बैसे ॥ गळां घाली पाश मार्गस्थासी ॥२॥
प्रात:काळीं जपे रुद्राक्षाच्या माळा । अंतरीच्या कळा शुद्ध नाहीं ॥३॥
तुका म्हणे त्याचें जळो अंत:करण ॥ करितां ताडन दोष नाहीं ॥४॥

॥६०६०॥
निजध्यास नाहीं जया स्वरुपासी । बहु बोले वाचेसी ठक गोष्टी ॥१॥
लोकांसी पाहून म्हणे राम राम । अंतरींचे वर्म खोटाईचें ॥२॥
देखील्या वांचूनि सांगे रुप रेखा । त्यासी म्हणे तुका जगभोंदू ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP