दांभिकास शिक्षा - ६०९१ ते ६१००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६०९१॥
करी संतांची हेळणा । मिरवी आपुला थोरपणा ॥१॥
दावी जाणिव ते कळा । मनीं भाव तो निराळा ॥२॥
यासि नाहीं तो हा मार्ग । ह्मणे दावा पांडुरंग ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०९२॥
श्रृंगारिला ज्ञानेविण । जैसा गाढवावरी जीन ॥१॥
त्यासी उदंड खरारा । परी जातीचा गाढव खरा ॥२॥
त्यासी अमृत पाजाल । दीर्घ गर्जना करील ॥३॥
तुका ह्मणे हरभरे चारा । परी जातीचा गद्धा खरा ॥४॥

॥६०९३॥
संत होती महा भले । परी रांडांनीं नाशिले ॥१॥
स्नान संध्या बुडविली । पुढें भांग ओढवली ॥२॥
देवपुजेचा कंटाळा । हातीं सोंकटयाचा चाळा ॥३॥
वैश्वदेवा आलात्रास । हुका पेटवी सायास ॥४॥
तुका ह्मणे अंतीं । जातोयमाचिये हातीं ॥५॥

॥६०९४॥
आणिताती गती । हंस कावळे न होती ॥१॥
नाकाविणें मोती । उभ्या बाजारीं फजिती ॥२॥
शुद्ध नाहीं क्रिया । सर्व तेंही गेलें वांया ॥३॥
हुकुमदाज बोले तुका । प्रेमाविणें फुंदूं नका ॥४॥

॥६०९५॥
देव पुजेचा कंटाळा । हातीं गंजिफांचा चाळा ॥१॥
गंध उगाळीतां कष्टी । आवडीनें भांग घोटी ॥२॥
हरीकथे न जाय लंडी । दासीचीं तीं घरें धुंडी ॥३॥
तुका ह्मणे सारा । त्याचा यमलोकीं थारा ॥४॥

॥६०९६॥
न मनीं नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटीभासी ॥१॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे वेगळा निश्चळ ध्यानीं ॥२॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें ठाके तस्कर घाई ॥३॥
तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शजग ॥४॥

॥६०९७॥
गोसावी असोनी संसाराची चिंता । लोकांसी सांगतां लाज नाहीं ॥१॥
म्हणती उदास असावें संसारीं । आपण दारोदारीं हिंडताती ॥२॥
तुका ह्मणे तेणें गोसावी ह्मणविलें । आपणा बुडविले तपाविणें ॥३॥

॥६०९८॥
स्नानाविण करी शोभन तांतडी । चार ते धगडी करीतसे ॥१॥
कुंथाचे ढेंकरें न देवेल पुष्टी । रुप दावी दृष्टी मलीन वरी ॥२॥
तुका ह्मणे नको देखीचा दिमाक । मोडसीचें दु:ख पोट फोडी ॥३॥

॥६०९९॥
बांधोनियां माज खांद्यावरी धना काखेसी बांधोन पोथी हिंडे ॥१॥
आधीं तो व्यापार करी आठवडा । अंत्यज निधडा सवें व्याजी ॥२॥
जाउनी घरासी शिव्या मायलेंकी । देतां घेती लेखी मांगिणीसी ॥३॥
होऊन ब्राह्मण ख्रिस्तीचा व्यापार । म्हारासी व्यवहार नित्य काळीं ॥४॥
एकमेका गाळी देतां उडे थुंका । संमार्जन मुखा होत तेणें ॥५॥
तुका ह्मणे आग लागों व्यासंगासी ॥ जाणे निर्यवासीं तया लागे ॥६॥

॥६१००॥
लौकिकीं मान्यता व्हावी द्रव्यकांता । बरवें बहुता मज ह्मणे ॥१॥
काया शृंगाराची आचार जनांचा । तेथें विठोबाचा राहे कैसा ॥२॥
टिळे माळा मुद्रा वैष्णव सोंवळा । दावी प्रेमकळा दांभिकांची ॥३॥
तुका ह्मणे नाहीं ज्यास शुद्ध भक्ति । चित्रींचे भासती शृंगारिक ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP