दांभिकास शिक्षा - ६१२१ ते ६१३०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६१२१॥
खोटें कर्म बळें करी । नाना प्रयत्नें निर्धारी ॥१॥
काय म्हणावें तयाला । पापी पापासी लिंपला ॥२॥
मैंद मुखीचा कोवळा । भाव अंतरीं निराळा ॥३॥
काय लाधला तो दोषी । बळें जाय नरकासी ॥४॥
अभागिया खळा । जन्म नाहीं शुद्ध वेळा ॥५॥
तुका म्हणे जैसीं । फळें येती कर्मे तैसीं ॥६॥

॥६१२२॥
आला सन्निध तो काळ । व्यर्थ वांयां जाते वेळ ॥१॥
काय निदसुरा जगा । उभा मैंद पुढें दगा ॥२॥
माझें मीमी झोंबे शिरीं । नेणें ठाकूं कोणे परी ॥३॥
तुका म्हणे हेड । नेघे शिकविलें लंड ॥४॥

॥६१२३॥
द्रव्य घेउनीयां कथा जो करील । तरी तो जाईल अधोगती ॥१॥
माझी कथा करा ऐसें म्हणे कोण । तरी नारायणा जिव्हा झडो ॥२॥
साह्य तूं झालासी काय उणें आतां । इतर पैं भूतां काय मागों ॥३॥
तुका म्हणे सर्व सिद्धि तुझें पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंग ॥४॥

॥६१२४॥
जाणे विरळा विरळा । पाप कळा सांगतां ॥१॥
ह्मणे जाणोनियां आम्ही । एके ब्रह्मीं मिळाले ॥२॥
ठावें नाहीं क्रिया कर्म । कैसे श्रम यायाचे ॥३॥
तुका जेउनी तो धाला । तया आला गुणत्वें ॥४॥

॥६१२५॥
बहुरुपी नरें पालटिलें सोंग । अंतरींचा रंग जाणतसे ॥१॥
तैसें भक्तजनीं न करावें ऐसें । परमार्थी हांसें न होय तें ॥२॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदी जगीं फांसे कैसे ॥३॥
धिवर हा जैसा मास लावी गळीं । ओढोनियां नळी फाडीतसे ॥४॥
तुका म्हणे करी पराविया हाणी । पुढें पडे दुणी देणें लागे ॥५॥

॥६१२६॥
मैंद धरी सोंग स्त्रियेचा तो वेष । मार्गामध्यें बैसे वना माजि ॥१॥
देखोनि पांथिक रडे म्हणे कैसें । भ्रतारानें असे मोकलिलें ॥२॥
मज नाहीं कोणी मोकलिलें वनीं । फिरतसे झणी काय करुं ॥३॥
मोहूनियां त्यासी सांगुनी दु:खास । चोरुनी दृष्टीस फांसा घाली ॥४॥
तुका म्हणे करी विश्वास जो घात । तया यमदूत जाचीतसे ॥५॥

॥६१२७॥
मैंदें संपादिला वैष्णवाचा वेष । हातींचा तो पाश गुप्त राखी ॥१॥
भाविक कृपेचा फांसा घाली वाट । निर्दय तो नष्ट मारीतसे ॥२॥
मुखींचा कोंवळा दावी वेष भला । अंतरीं भरला कुबुद्धीनें ॥३॥
तुका ह्मणे पापी नाठवे आपणा । भोगील यातना अधोगती ॥४॥

॥६१२८॥
किती सांगावें हे नाइकती खळ । यमदूतीं गळ ठेविलासे ॥१॥
नका नका वरुं घातक या चेष्टा । पुढें जाल कष्टा वरपडा ॥२॥
डोळे झांकुनियां पातक सांचावें । दुष्ट मनी भावें कोण्या बळें ॥३॥
कोण राखे तुज कोण असे साह्य । विचारुनी पाहे स्त्रिया पुत्रां ॥४॥
कोण वेळ कैसी घडे अवचित । तेव्हां नाहीं होत साह्य कोणी ॥५॥
चित्त वित्त आप्त नये कोणी अंतीं । यमाची संगती होय जेव्हां ॥६॥
तुका ह्मणे दुरी नाहीं हें संनिध । आली जरा वृद्ध तेव्हां कळे ॥७॥

॥६१२९॥
वेष घेउनियां मैंद बैसे मार्गी । दिसों नेदी जगीं कृतिमता ॥१॥
कपाळासी हात लावोनियां बैसे । रडत आक्रोशें मार्गामध्यें ॥२॥
माझिया भ्रतारें मोकलिलें वनीं । नाहीं मज कोणी मायबाप ॥३॥
जवळी जातांची फांस घाली गळां । नसे त्या चांडाळा दया कांहीं ॥४॥
तुका ह्मणे कोणी करी अपघात । कल्पवरी होत जाच तया ॥५॥

॥६१३०॥
वेषधारी पोटासाठीं घेती छंद । विषरुपीं भेद विष होय ॥१॥
परमार्थ दावी विषय लोभीक । पाप तें अनेक संचितसे ॥२॥
तुका म्हणे मैंद करी अभिलाष । घडे निरयवास तात्काळिक ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP