दांभिकास शिक्षा - ६०७१ ते ६०८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


N/A॥६०७१॥
गळां घालोनियां माळा । केला रामानंदी टिळा ॥१॥
टाळ मृदंगाचे घोळ । नित्य मांडिला गोंधळ ॥२॥
परी नाहीं भक्तिप्रेम । मनीं नाहीं सीताराम ॥३॥
तुका ह्मणे ढोंग केलें । संतपण वांयां गेलें ॥४॥

॥६०७२॥
ऐकोनियां गोष्टी सांगे ब्रह्मज्ञान । गुरुकृपा खूण कांहीं नेणे ॥१॥
ह्मणवितो संत मन नाहीं शांत । पोकळ आकांत भावाविण ॥२॥
तयाचे संगती न तरेचि कोणी । भोळ्या भाविकांनीं सोडावें तें ॥३॥
तुका ह्मणे तरुं आपण नेणती । दुजियां तारिती असंबद्ध ॥४॥

॥६०७३॥
आंत भगवें झालें नाहीं । बाहेर भगवें करुनी कायी ॥१॥
नाहीं वासना साधन । काय करुनी मुंडण ॥२॥
आधीं करुनी साचा नाश । मग घेई कां सन्यास ॥३॥
तुका म्हणे चित्त निर्मळ । संन्यास घेतल्याचें फळ ॥४॥

॥६०७४॥
संसाराचा केला त्याग । मनींचा राज जाईना ॥१॥
भजन तें ओंगळवाणें । नरका जाणें चुकेना ॥२॥
अक्षरांची आटा आटी । निंदा पोटीं संताची ॥३॥
तुका म्हणे मागे पाय । तया जाय स्थळासी ॥४॥

॥६०७५॥
मेंढा मारुनी यज्ञ केला । म्हणे सोमयाग झाला ॥१॥
भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥
सेंदूरें माखियेला धोंडा । पायां पडती पोरें रांडा ॥३॥
अग्निहोत्रासी सुकाळ । वडा पिंपळाचा काळ ॥४॥
सजीवाची तोडा तोडी । निर्जीवा लाखोली रोकडी ॥५॥
तुका म्हणे ऐशा रिती । काय विठ्ठल येईल हातीं ॥६॥

॥६०७६॥
आह्मी पवित्र आचारी । चोरोनियां भलतें करी ॥१॥
जना दावी पवित्रता । अंतरीं तो असे रिता ॥२॥
दावी वरी वरी सोंग । अंतरीचें दिसे व्यंग ॥३॥
तुका ह्मणे करी देखी । माती पडो त्याचे मुखीं ॥४॥

॥६०७७॥
थोर संत ह्मणोनी पायां पाडी जन । गेलें संतपण नरकासी ॥१॥
ढोंगियापें बापा कैंचा नारायण । भोंदियले जन दांभिकत्वें ॥२॥
बोलतसे भांड आपुलें भुषण । कवडीसाठीं प्राण देऊं पाहे ॥३॥
तीळभरी पुण्य नाहीं त्या पदरीं । तेथें कैंचा हरी पाखांडयापें ॥४॥
तुका ह्मणे त्यानें केली विटंबना । चौर्‍याशी यातना भोगावया ॥५॥

॥६०७८॥
दुर्जनाचे घरीं पुस्तकांचे भार । शब्दांचे व्यवहार ज्ञान सांगे ॥१॥
नको नको कधें तयाशीं संबंध । न भेटे गोविंद कदाकाळी ॥२॥
तुका म्हणे मुर्ख वागवी पुस्तक । दारोदारीं भीक मागावया ॥३॥

॥६०७९॥
स्वार्थ परमार्थ संपादीले दोन्ही । एकही निदानी नव्हे त्यासी ॥१॥
दोहों पेवांवरी ठेवूं जाता हात । होय अपघात शरीराचा ॥२॥
तुका ह्मणे त्यासी दोहींकडे धोका । सेवटीं नरका माजी पडे ॥३॥

॥६०८०॥
नाहीं भक्ति सुख । झाला जाणिवेचा मुर्ख ॥१॥
अंगीं जाणिवेची मस्ती । विद्यागर्वे होय स्तुती ॥२॥
कधीं न मानी कोणासी । फुगे गर्वे मदराशी ॥३॥
तुका ह्मणे वैष्णवांनीं । वेगीं सोडावें थुंकोनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP