दांभिकास शिक्षा - ६०२१ ते ६०३०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६०२१॥
ब्रह्मज्ञानाजी भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी ॥१॥
थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥२॥
कथा करी वरिवरि । प्रेम नसेचि अंतरीं ॥३॥
तुका ह्मणे कवित्व करि । मान वस्तु हे आदरी ॥४॥
॥६०२२॥
सुगरणी बाई थिता नास केला । गुळ तो घातला भाजी मध्यें ॥१॥
क्षिरीमध्यें हिंग दुधा मध्यें बोळ । थितेंचि वोंगळ कैसें केलें ॥२॥
दळण दळोनी भरुं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥३॥
कापुराचें सांते आणिला लसण । वागवितां सीण दु:ख होय ॥४॥
रत्नाचा जोहारी रत्नचि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥५॥
तुका ह्मणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरि ॥६॥
॥६०२३॥
भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवूनि जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥२॥
कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥३॥
तुका ह्मणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगेंचि ॥४॥
॥६०२४॥
न कळे ब्रह्मज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥२॥
द्रव्य इच्छेसाठीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥३॥
पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥४॥
तुका ह्मणे तया काय व्याली रांड । येउनियां भांड जनामध्यें ॥५॥
॥६०२५॥
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥
निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहताती मान आदराचा ॥२॥
तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनार्दन भेटे केवीं ॥३॥
॥६०२६॥
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगाया साचार नांव त्याचें ॥२॥
जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥३॥
॥६०२७॥
मुखें सांगे ब्रह्मज्ञान । जन लोकाची कापितो मान ॥१॥
ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥२॥
कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥३॥
तुका ह्मणे तोचि वेडा । त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥४॥
॥६०२८॥
संतचिन्हें लेऊनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥
पडिले दु:खाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥२॥
कामक्रोधलोभ चित्तीं । वरि वरि दाविती विरक्ती ॥३॥
आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती झालों आह्मी मुक्त ॥४॥
त्यांचे लागले संगती । झाली त्यांची तेचि गति ॥५॥
तुका ह्मणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥६॥
॥६०२९॥
जगीं कीर्ति व्हावी । ह्मणोनि झालासी गोसावी ॥१॥
बहु केलें पाठांतर । वर्म राहिलेसे दूर ॥२॥
चित्तीं नाहीं अनुताप । लटिके भगवें स्वरुप ॥३॥
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥४॥
॥६०३०॥
इंद्रियासीं नेम नाहीं । मुखीं राम ह्मणोनि कायी ॥१॥
जेवीं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥२॥
कीर्तन करावें । तैसें करुनी दावावें ॥३॥
हे तों अंगीं नाहीं चिन्हें । गाईलें वेश्येच्या ढव्यानें ॥४॥
तुका म्हणे रागा । संत शिवूम नेदिती अंगा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 11, 2019
TOP