दांभिकास शिक्षा - ६०८१ ते ६०९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६०८१॥
ऐसे वेषधारी जगांत हिंडती । नानापरी घेती प्रतीग्रह ॥१॥
परमार्थसंगें त्यजिना संसार । आपण साचार भ्रष्ट होय ॥२॥
काय भुललासि वरील रंगासी । काय जाब देसी यमसभे ॥३॥
तेथें कैंचा आप्त मान धन जन । सोडविल कोण जन्ममृत्यु ॥४॥
जन्म संवसार त्यजियलें सुखें । तोचि निष्कलंक सूर्य जैसा ॥५॥
तुका ह्मणे ज्याचे मनीं नाहीं आस । वोळंगति त्यास सर्व सिद्धी ॥६॥

॥६०८२॥
ऐशीं मैंदाचीं लक्षणें । भोंदिताति अवघे जन ॥१॥
ह्मणे सारासार करा । गोविंदाची भक्ति धरा ॥२॥
भोळे भाविक हे जन त्यांसी सांगतसे ज्ञान ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०८३॥
ऐसा पतंगी जो रंग । त्यासी कैचा पांडुरंग ॥१॥
कथा करी बाजारांत । ह्मणे जगीं आह्मी संत ॥२॥
जन मूढ प्राणी । त्यांसी मंत्र सांगे कानीं ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०८४॥
मखरा लाउनी बेगड । आंत मांडोनि दगड ॥१॥
हातीं घेऊनियां टाळ । घाली वाचेचा गोंधळ ॥२॥
काय केलें रांडपोरा । वर्म चुकलासी गव्हारा ॥३॥
तुका ह्मणे खोटें । तुझें कपाळ करंटें ॥४॥

॥६०८५॥
देवा घरीं काय उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥१॥
करी अक्षरां अटाटी । एका कवडीचिया साठीं ॥२॥
एका निंदी एका स्तवी । सदा चिंतातूर जिवीं ॥३॥
तुका म्हणे पाहे रांडे । काय पोरें व्यालिस भांडे ॥४॥

॥६०८६॥
शांती दाखवित भावें । कोणी आला त्यावरी धांवे ॥१॥
मनीं धरीत विरक्ती । परी काम पुढें उठती ॥२॥
नाहीं अंतरीं तो भाव । लोकां दावितसे देव ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०८७॥
सोंग दावितसें लोकां । हरीरुपीं नाहीं निका ॥१॥
त्याचे बोल नाइकावे । नाही अंतरीं तो देव ॥२॥
सदा चित्त परद्वारीं । अघोर भोगीं निरंतरी ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०८८॥
अमंगळ पापराशी । भाव दाखवी मानसीं ॥१॥
मैंदपण धरी मनीं । विषयवासना धरुनी ॥२॥
सदा करी अनाचार । दु:ख भोगितो अपार ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०८९॥
राम नाहीं हा वाचेसी । करी संकल्प मनासीं ॥१॥
म्हणे वैकुंठासी जावें । प्रेम धरोनियां भावें ॥२॥
नाहीं अंतरीचें ज्ञान । म्हणे जगीं आह्मी धन्य ॥३॥
तुका म्हणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

॥६०९०॥
ऐसा अभागी जो नर । तोचि कुंभाराचा खर ॥१॥
जन्मवरी कष्ट करी । नाहीं पुण्य तीळभरी ॥२॥
थोरपण बोले संता । ह्मणे मज म्हणा कर्ता ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । त्याची भीड मला नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP