दांभिकास शिक्षा - ५९९१ ते ६०००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५९९१॥
कोरडया गोष्टी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥
कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥२॥
घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥३॥
तुका ह्मणे आपुल्या मति । काय रितीं पोकळें ॥४॥

॥५९९२॥
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणीं या विषयांचे ॥१॥
ठेवूनियां लोभी लोभ । झाला क्षोभ आत्मत्वीं ॥२॥
केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥३॥
तुका ह्मणे मोठा घात । वाताहात हा देह ॥४॥

॥५९९३॥
कानीं धरीबोल बहुतांचीं मतें । चाट त्या परतें आणिक नाहीं ॥१॥
पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतां ॥२॥
शब्दज्ञानी एक आपुलाल्या मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥३॥
तुका ह्मणे एक भाव न धरिती । पडली हे माती त्यांचे तोंडीं ॥४॥

॥५९९४॥
घरोघरीं बहु झाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥२॥
काढावें आइतें । तेंचि जोडावें स्वहितें ॥३॥
तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥४॥

॥५९९५॥
कथा करोनियां द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥१॥
रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥२॥
असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥३॥
तुका ह्मणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥४॥

॥५९९६॥
तक्र शिष्या मान । दुग्धा ह्मणे नारायण ॥१॥
ऐशीं ज्ञानाचीं डोबडें । आशाविटंबिलीं मूढें ॥२॥
उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥३॥
रसनाशिश्नाचे अंकीत । तुका ह्मणे वरदळ स्फीत ॥४॥

॥५९९७॥
जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥१॥
दु:ख पावायाचें मूळ । रहणी ठाव नाहीं ताळ ॥२॥
माळामुद्रांवरी । कैचा सोंगें जोडे हरि ॥३॥
तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥४॥

॥५९९८॥
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥२॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥३॥
तुका ह्मणे वेषधारी । हिजडया नारी नव्हेइ ॥४॥

॥५९९९॥
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥१॥
पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥२॥
उभारोनी बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥३॥
वैकुंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥४॥
पुंडलिके थारा । देउनि आणिलें या चोरा ॥५॥
तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरुं त्याला ॥६॥

॥६०००॥
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं झाला त्याग अंतरींचा ॥१॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥२॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकल हें ॥३॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥४॥
तुका म्हणे मज भोरप्याचि परी । झालें सोंग वरी आंत तैसें ॥५॥  

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP