श्रावण शुद्ध १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


ईश्वरचंद्र विद्यासागरांचे निधन !

शके १८२३ च्या श्रावण शु. १३ रोजीं विधवाविवाहाच्या कायद्याचे जनक व सुप्रसिद्ध संस्कृत पंडित ईश्वरप्रसाद विद्यासागर यांचें निधन झालें. प्रारंभीच्या आयुष्यांत शिक्षकापासून प्राचार्याच्या जागेपर्यंतचीं कामें केल्यावर हे ‘एज्युकेशनल इन्स्पेक्टर’ झाले. पण वरिष्ठांशी मतभेद झाला म्हणून त्यांनीं ती नोकरी सोडली. वर्णपरिचय, कथामाला, वेताळपंचविशी, वगैरे शालेय पुस्तकांनीं त्यांना भरपूर अर्थसाहाय्य केलें. बंगाल्यातील भरभराटीस आलेली ‘मेट्रोपोलिटन इंन्स्टिट्यूट’ ही संस्था त्यांनींच स्थापन केली. विधवाविवाहाच्या समर्थनार्थ यांनी एक पुस्तक लिहिलें आणि त्यामुळें ते एकदम लोकमान्य झाले. यांच्या मातृभक्तीविषयीं असें सांगतात कीं, आजारी आईच्या भेटीसाठी मध्यरात्रीं पावसापाण्याची फिकीर न करतां दुथडी वाहणार्‍या नदीया पुरांत उडी टाकून त्यांनी पैलतीर गांठलें आणि आजारी आईची भेट घेतली. त्यांच्याच दीर्घ प्रयत्नामुळें सन १८५६ मध्यें विधवाविवाहाचा कायदा झाला. कलकत्ता येथें भरलेल्या दरबारांत राणीकडून बहुमानाची सनद आणि पुढें सन १८९० मध्यें सी.आय्‍.ई. पदवी यांना मिळाली होती. कमालीची मातृभक्ति, साधेपणा, निर्भयता, आणि नीतिमत्ता यांमुळें यांची छाप सर्व समाजावर पडे. सुधारणेचीं तत्त्वें यांनी आचरणांत आणलीं. आपल्या मुलींचीं लग्नें त्या चौदा वर्षांच्या झाल्यानंतरच केलीं. एका मुलाचें लग्न बालविधवेंशीं केलें. आणि आपल्या खर्चानें गांवांत एक इंग्रजी शाळा व दवाखाना सुरु केला. शैक्षणिक क्षेत्रांतीलहि यांची कामगिरी महनीय अशीच आहे. जुन्या पाठशालांच्या पद्धतींत फरक करुन त्यांत नवीन शिक्षणपद्धति सुरु केली. स्त्रीशिक्षणासाठीं मुलींच्या शाळा सुरु केल्या. यांनी ‘वेताळपंचविशी’ नांवाचे एक पुस्तक मुलांसाठीं लिहिलें आहे. उपक्रमणिका, कौमुदीचे तीन भाग, शाकुन्तलाचें बंगाली भाषांतर हीं यांची पुस्तकें आहेत. शिवाय वर्णपरिचय, कथामाला, चरितावली, वगैरे शालेय पुस्तकेंहि यांनी लिहिलीं आहेत. या पुस्तकांचे मासिक उत्पन्न कांही काल पांच हजार रुपयांपर्यंत होई. विधवाविवाहाच्या पवित्र कार्यास आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद यांनीं घेतला होता.

- २९ जुलै १९०१
-------------------

श्रावण शु. १३

(२) सखारामबापू बोकिलांचे निधन !

शके १७०३ च्या श्रावण शु. १३ रोजीं मराठेशाहींतील अत्यंत थोर राजकारणी पुरुष सखारामबापू बोकील यांचा अंत झाला. बाबा पुरंदरे यांच्याकडे सखारामबापू प्रथम शिलेदार होते. बाजीरावानें आपणाकडे घेऊन यांना सखारामबापू प्रथम शिलेदार होते. पुढें नानासाहेंब पेशवे यांचेबरोबर उत्तरेकडील स्वार्‍यांत हे होतेच. पानपतच्या लढाईपर्यंत अनेक राजकारणांत याचा भाग असे. अहमदाबादचा किल्ला सर करणें, रोहिल्यांचा पाडाव करुन दुआब जिंकणें, कुंभेरीच्या वेढ्यांत शौर्य गाजवणें, दिल्लींत मराठ्यांचे वर्चस्व स्थापित करणें, इत्यादि कामीं यांची कामगिरी मोठी आहे. नानासाहेबांनीं आपल्या मृत्युसमयीं यांना मुख्य कारभारी नेमलें. माधवरावानेंहि मरतेसमयी नारायणरावाला यांचे हातीं देऊन विश्वास व्यक्त केला. राघोबाकडे यांचा कल असूनहि नारायणरावांच्या वधानंतर जें बारभाईचें कारस्थान रचलें गेलें त्यांत हा प्रमुख होता. गरोदर असणार्‍या गंगाबाईची व्यवस्था यांनीच लावली. आणि राघोबा, निजाम, भोसले, होळकर, शिंदे, व इंग्रज यांची व्यवस्था लावून यांनीं मराठी राज्यांत स्थैर्य निर्माण केलें. पुढील राजकारणांत नाना-बापू यांचे बरेच मतभेद होऊं लागले. बापू यांनी फितुरी केली अशा अर्थाच्या दोन चिठ्ठ्या राघोबानें शिंद्यांना दाखवल्या. तेव्हां बापू कैद झाले. या वेळीं निजामची मदत घेण्यास सुचविलें. तेव्हां हे उद्‍गारले, "अंत:कलहांत परक्यास हात घालूं दिला तर राज्यनाश होतो." सिंहगड, प्रतापगड, रायगड, अशा ठिकाणीं बापू कैदेंत होते. यांच्या सुटकेचे प्रयत्न झाल्यामुळें यांना बेडी घालण्यांत आली. कैदेंत यांचे फार हाल झाले. शेवटीं अतिसाराच्या विकारानें या थोर पुरुषाचा अंत झाला. यांना ‘राजकारणांतील विधि’ ‘प्रतिसृष्टि’ निर्माता’, ‘शहाणा’ अशीं विशेषणें तत्कालीन पत्रांतून लावलेलीं सांपडतांत. " राजकारणांतील शस्त्र व अस्त्र हा चांगलेंच जाणीत असे. हा अत्यंत बुद्धिमान व हातीं येईल तें काम पार पाडणारा होता." शिवाजीच्या वेळेपासून यांच्या घराण्यांतील लोकांनी राजकारणांत प्रामुख्यानें भाग घेतला होता. पंताजी गोपीनाथ हे यांच्याच वंशांतील.

- २ आँगस्ट १७८१

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP