श्रावण वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) प्रतापसिंह भोसल्यांचे दुर्दैव !
शके १७६१ च्या श्रावण व. १३ रोजीं मराठ्यांचे शेवटचे छत्रपति प्रतापसिंह भोसले यांना मुंबईचा गव्हर्नर काँरनॅक यानें सातारच्या गादीवरुन पदच्युत केलें. इंग्रजांशीं बेइमानपणा केल्याचा आरोप प्रतापसिंहांवर होता, तरीहि इंग्रज ‘दया’ दाखविण्यास तयार होते, पण ती नाकारुन प्रतापसिंहांनीं तहनाम्यावर सही केली नाहीं. अर्थात् त्याचा परिणाम अत्यंत विपरीत असाच झाला. इंग्रजांनीं मराठ्यांच्या या छत्रपतीला विश्वासघातानें कैद केलें. ही सर्व हकीकत मोठी रोमहर्षक आहे. आदल्या दिवशीं प्रतापसिंहमहाराज आणि त्यांचे सेनापति बाळासाहेब हे दोघे झोपीं गेले ते दुसर्या दिवशीं कैदेंतच सावध झाले. इंग्रजी सैन्याच्या सहा तुकड्या पुण्याहून सातार्यास आल्या. कर्नल ओव्हान्स यांच्याकडे नेतृत्व होतें. मध्यरात्रीच्या सुमारास मोठमोठ्या आवाजांचे गोळीबार झाले आणि राजवाड्यास वेढा पडला. त्यांचे साथीदार प्रतापसिंहांचे बंधु अप्पासाहेब हे होते. बाळाजीपंत नातू यांचा हात या कारस्थानांत होताच. खाड्खाड् बूट वाजवीत ओव्हान्स सोजिरांसहित छत्रपतींच्या शयनमंदिराकडे आला आणि झटदिशी पलंगाजवळ जाऊन त्यानें गाढ निद्रेंत असलेल्या प्रतापसिंहाच्या मनगटाला धरुन खस्सकन् त्यांना खालीं ओढलें. ‘टुम चलो हमारे साथ’ म्हणून दटावणी सुरु झाली. अर्थातच छत्रपतींनीं कांहींहि प्रतिकार केला नाहीं. या वेळीं त्यांच्या अंगांत फक्त मांडचोळणा होता, दुसरें वस्त्रहि नव्हतें. वाड्याबाहेर महाराजांना आणल्यानंतर त्यांना एका पालखींत बसविलें, आणि पालखी मार्ग चालूं लागली. आपल्या अत्यंत आवडत्या छत्रपतीला उघड्याबोडक्या अवस्थेंत नेत आहेत हें पाहूण सबंध सातारा हळहळला. महाराजांना लिंब येथें आणून गाईम्हशी बांधण्याच्या गोठ्यांत आणून ठेविण्यांत आलें. यानंतर प्रतापसिंहाची रवानगी काशी येथें झाली. वाटेंत त्यांचे अत्यंत हाल झाले. यानंतर प्रतापसिंहांची रवानगी काशी येथें झाली. वाटेंत त्यांचे अत्यंत हाल झाले. मध्येंच खानदेशांत सेनापति बाळासाहेब यांची बायको एका झुडपाआड एखाद्या वडारणीप्रमाणें बाळंत झाली ! कोण हा प्रसंग !
- ५ सप्टेंबर १८३९
-----------------------
(२) स्वातंत्र्यमंदिराच्या दारांत !
शके १८६९ च्या श्रावण व. १३ या दिवशीं दिल्ली येथें भारताच्या सत्ता संपादनासाठीं घटनासमितीचें अभूतपूर्व अधिवेशन रात्रीं अकरा वाजतां सुरु झालें. सौ. सुचेता कृपलानी यांनीं ‘वंदे मातरम्’ गीत म्हटल्यानंतर नेहमींप्रमाणें मुस्लिम सदस्य घटनासमितींत आले. समितीए अध्यक्ष बाबू राजेंद्रप्रसाद यांनी " आजपर्यंत स्वातंत्र्यसंग्रामांत ज्या अज्ञात नरवीरांनीं आपलीं शिरकमलें मातृभूमीच्या चरणीं वाहिली, ज्यांनी हंसतमुखानें शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या, ज्यांनीं अंदमानच्या कोठडींत जिवंत मृत्यूला कवटाळलें’ त्या सर्वांना श्रद्धांजलि अर्पण केली, आणि दोन मिनिटें स्तब्ध उभें राहून सर्व सदस्यांनीं त्यास अनुमति दिली. त्यानंतर पंडित नेहरु यांनीं आजन्म देशसेवेचा प्रस्ताव सभेंत मांडला. "भारतीय जनतेच्या आत्मक्लेशानें व त्यागानें प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्यसंपादनाच्या महतक्षणीं मी भारत व भारतीय जनता यांच्या सेवेला वाहून घेण्याची, भारताला जगांत मानाचें स्थान प्राप्त करुन देण्यासाठीं आणी जागतिक शांतता आणि मानवतेचें कल्याण यांच्या पूर्तिसाठीं आजीव, अहर्निश प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतों." अशा आशयाची प्रतिज्ञा पं. नेहरुंनी केली. त्यानंतर अध्यक्षांनीं भारतानें सत्तासंपादन केल्याचें जाहीर करण्याचें ठरविलें आणि ही घटनासमिति राष्ट्राचें भवितव्य घडविणारी सार्वभौम लोकसभा झाली असल्याचें घोषित झालें. सौ. हंसा मेहता यांनीं भारतीय स्त्रियांच्या वतीनें तिरंगी ध्वज फडकाविला ! शेवटीं सौ. कृपलानी यांनीं ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’, आणि ‘जनमणगण’ हीं राष्ट्रगीतें म्हटलीं व नंतर अपूर्व असें हें अधिवेशन समाप्त झालें. दीडशें वर्षे इंग्रजांच्या मगरमिठींत सांपडलेलें भारतराष्ट्र स्वातंत्र्याच्या दारांत पाऊल टाकीत होतें. सर्व देशांत उत्साहाचें आणि आनंदाचें भरतें येऊं पाहत होतें.
- १४ आँगस्ट १९४७
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP