श्रावण वद्य ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीज्ञानदेवांचा जन्मदिवस !
शके १९९७ मध्यें श्रावण व. ८ ला मध्यरात्रीं मराठी भाषेंतील श्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि प्रतिभासंपन्न कवि संत श्रीज्ञानेश्वर यांचा जन्म झाला. हा दिवस कृष्णाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ज्ञानदेवांना कृष्णाचा अवतार मानण्याची प्रथा आहे. ‘महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर’ अशा प्रकारचा गौरव बहुतेक संतांनीं केला आहे. धर्मसंस्थापनेचें कार्य श्रीकृष्णांनीं केलें; अर्जुनाला युद्धासाठीं प्रोत्साहन दिलें. परंतु हें सारें तत्त्वज्ञान संस्कृतांतच असल्यामुळें सर्व समाजाला त्याचा लाभ झालेला नव्हता. तो व्हावा म्हणूनच कीं काय श्रीकृष्णांनीं आपल्याच जन्मदिवशीं जणुं ‘ज्ञानदेवां’ चा अवतार घेतला. आणि श्रीकृष्णाचें तत्त्वज्ञान लोकभाषेंत सांगून, "म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणे ॥" असा उपदेश तत्कालीन जनतेला ज्ञानदेवांनीं केला. श्रीकृष्णजन्माप्रमाणेंच ज्ञानदेवांची जन्मकथाहि अलौकिक आहे. ज्ञानदेवांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ति जरी होती तरी गुरुपदेश मात्र नाथसंप्रदायांतील होता. विठ्ठलपंत हे ज्ञानदेवांवे वडील. ते ‘वैराग्य डोळस मूर्तिमंत’ असे होते. काशीस जाऊन त्यांनी संन्यास घेतला, परंतु पुन्हा - ‘स्वदेशा जाउनी करावा आश्रम । सुस्वरुप स्वधर्म चालवावा ।’ या गुरुच्या आज्ञेवरुन ते पुन: गृहस्थाश्रमांत आले. आणि या ‘संन्याशा’ ला निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशीं दोन दोन वर्षांच्या अंतरानें चार मुलें झालीं. अर्थातच तत्कालीन समाजानें त्यांचा छळ केला. देहान्त प्रायश्चित्तासाठीं ज्ञानदेवांचे आई-वडील महास्वर्गस्थपंथाला निघून गेले आणि इकडे या चार पोरक्या पोरांनीं सार्या जगाला आपल्या दिव्य सामर्थ्यानें थक्क करुन सोडलें. ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून भागवतधर्म प्रचलित होता. पण त्या धर्माला तत्त्वज्ञानाच्या बैठकीची जोड देऊन भागवतधर्मीयांची संघटना बनविणें हेंच ज्ञानदेवांचे लोकोत्तर कार्य होतें. वेदांचा अर्थ स्त्रीशूद्रादिकांना सुलभ करुन त्यांनी एक प्रकारची क्रान्ति केली. त्यांचा अद्वितीय ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ आजहि आपल्या तत्त्वज्ञानानें व काव्यसंपदेनें तळपत आहे.
- १६ आँगस्ट १२७५
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP