श्रावण वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
विठ्ठल शिवदेव यांचें निधन !
शके १६८९ च्या श्रावण व. ११ रोजीं पेशवाईंतील वीर विठ्ठल शिवदव विंचूरकर यांचे निधन झालें. हे सासवडचे वतनदार असून यांचे उपनांव दाणी असें होतें. दाणी कुटुंबाच्या दोन शाखा झाल्या. थोरली शाखा मालेगांवास राजेबहाद्दर या नांवानें उदयास आली आणि धाकटीचा मूळपुरुष विठ्ठल शिवदेव याचे वंशाला विंचूरकर असें नामाभिधान प्राप्त झालें. शिवाजीपंत दाणी यांना शके १६८७ मध्ये जो मुलगा झाला त्याचेंच नांव विठ्ठल शिवदेव. लहानपणीं हे फार हूडा असून त्यांना घोड्यावर बसण्याचा मोठाच शोक होता. बालपणींच्या उनाड वृत्तीस कंटाळून यांच्या वडिलांनीं यांना घरांतूण हांकून दिल्यावर हे सातार्याजवळील मढें गांवच्या अमृतस्वामींच्या सेवेंत जाऊन राहिले. येथेंच शाहूमहाराजांच्या बक्षीशीं यांचा परिचय झाला आणि यांना पागेंत नोकरी मिळाली. शाहूमहाराज एकदां डुकराची शिकार करीत असतां विठ्ठल शिवदेवांनीं पळून जाणारा डुकर हातांनीं धरुन आणिला. शाहूमहाराज प्रसन्न झाले. त्यांनीं यांना पागेंत दहा स्वारांची मनसबी दिली. सन १७२० मध्यें चिमाजीअप्पानें हबशांवर स्वारी केली तींत त्यांनीं मोठाच पराक्रम केला. सिद्दी साताचे घोडे पकडून आणून आपले शौर्या दाखविल्यावर शाहूनें यांना पेशव्यांच्या हाताखालीं नेंमलें. पुढें बाजीरावाबरोबर हे अनेक वेळां स्वार्यांवर गेले होते. आपल्या हुकमतीखालीं फौज जमा करुन दयाबहाद्दर व बंगश यांवरील स्वारींत मोठाच पराक्रम केला. नृसिंह हें यांचें कुलदैवत होय; निरानरसिंगपूरचें मंदिर यांनींच बांधलें. सन १७३९ मधील वसईच्या मोहिमेंतहि विठ्ठल शिवदेवांनीं चांगलाच पराक्रम केला. सन १७४० च्या नासिरजंगावरील स्वारींत जी जहागिरी बाजीरावास प्राप्त झाली तिची वहिवाट त्यानें विठ्ठल शिवदेवांस दिली. शेवटीं कर्नाटकांत हैदर नायकाशीं मराठ्यांचें जेव्हां युद्ध सुरु झालें तेव्हां विठ्ठल शिवदेव सावनूरचे बाजूस राहून हैदरची कुमक अडवीत होते. याहि लढाईत दिसून आलेली सत्तर वर्षांच्या या वृद्ध शूराची तडफ व कामगिरी तरूणांसहि लाजविणारी आहे.
- २० ऑगस्ट १७६७
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP