श्रावण वद्य १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


खंडोजी भोसले यांचे निधन !
शके १७११ च्या श्रावण व. १० रोजीं नागपूरकर मुधोजी भोसल्यांचे चिरंजीव खंडोजी उर्फ चिमणाजी भोसले यांचें निधन झालें. पेशवे यांच्या लष्कराबरोबर बदामीच्या स्वारीस हे गेले असतां तेथे यांनीं खूपच शौर्य गाजविलें. पहिल्या इंग्रज-मराठे युध्दांत पेशवे, निजाम व हैदर यांना मुधोजी मिळाला. आणि त्यानें दसर्‍याच्या मुहूर्तावर चाळीस हजार फौजेनिशीं खंडोजीस बिहार प्रांतावर पाठवून दिलें. पण यांचे हातून ही कामगिरी नीट पार पडली नाहीं. हेस्टिंग्जनें बंगालमधून क. बेळी नांवाच्या सरदारास ससैन्य कटकहून मद्रासला पाठवलें, त्या वेळीं त्याला यांनीच मदत केली. निव्वळ लढाऊ वीर म्हणून यांची ख्याती आहे. हे अतिशय धीट व शूर होते. "हे शरिरानें धिप्पाट असून त्या वेळीं यांच्याइतका सशक्त मनुष्य क्वचितच असेल. हे अत्यंत धाडसी व पराक्रमी होते. हे सशक्त व ऐन पंचविशीच्या वयांत असल्यामुळें व आजारी नसतांना एकदम मरण पावल्यामुळें रघूजीनें यांस जादूनें मारलें असा लोकप्रवाद त्या वेळीं उठला होता. हे रघूजीस आपली वांटणी मागत असत. त्यामुळें उभयतांचे मन शुद्ध नव्हतें. यावरुन रघूजी व त्याचा विश्वासू कारभारी महादजी लष्करी यांनीं मूठ मारुन मारिलें अशी बातमी उठली. " खंडोजींस रघूजीनें २१-४-१७७९ रोजी दारव्हे, गिरोली महागांव, खडी, धामणी, माहूर भाम, वगैरे परगणे खाजगीचे सरंजाम दिले होते. १७६४ मध्यें जानोजीनें चिमणाजी बापूस ओरिसा प्रांताचे सुभेदार म्हणून पाठवलें, यांचेबरोबर भवानी काळू हाहि होता. खंडोजी भोसले यांनीं शिवभटाचा मोड करुन त्याला प्रातांतून हांकून दिले. मुधोजीचा भाऊ बिबाजी यास पुत्र नसल्यामुळें त्यानें चिमणाजी बापूसच आपला पुत्र मानले होतें; व आपलें ठाणे रतनपूर येथील कारभार खंडोजीनें पाहावा असें ठरले होतें. बिबाजीची बायको आनंदीबाई ही वारल्यावर यांनींच त्या सुभ्याचा कारभार पाहिली; परंतु यांचें वास्तव्य रतनपुरास मात्र नसे.
- १६ ऑगस्ट १७८९

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP