(१) रक्षाबंधन आणि समुद्रपूजन !
श्रावण शु. १५ ही पावती पोर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. पावतें धारण करण्याच्या शास्त्रोक्त विधीस पवित्रारोपण असें नांव आहे. उत्तर हिंदुस्थानांत या विधीस ‘रक्षाबंधन’ म्हणतात. पूर्वी नागापासून इजा होऊं नये म्हणून श्रावणे नांवाच्या नागासाठीं पाकयज्ञ केला जात असे. त्याचेंच रुपांतर शत्रूच्या ‘विषारी’ वागणुकीचा ताप होऊं नये म्हणून ‘रक्षाबंधन’ विधींत झालें. शत्रूच्या गोटांत जाऊन रजपूत स्त्रिया आपल्या पतीविरुद्ध लढणार्या वीर बांधवांच्या हातांत रक्षा बांधीत असत. आणि त्यामुळें युद्धप्रसंग टळतहि असत. भारतीय समाजांतील ऐक्य व प्रेमभाव वाढून युद्धकुशल लोकांमध्यें परस्परांचीं मैत्री वाढावी म्हणून हा रक्षाबंधनाचा विधि रजपूत लोकांत विशेषत्वानें रुढ झाला. हा दिवस नारळी पोर्णिमा म्हणूनहि प्रसिद्ध आहे. वरुण देवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करुन त्यास नारळ अर्पण करण्याची चाल आहे. परदेशगमन निषिद्ध मानणार्या भोळ्या भारतीयांनी पूर्वकालांत समुद्रमार्गानें सबंध विश्वांत संचार केला होता. त्यांच्या दृष्टीनें या दिवसाला फार महत्त्व आहे. पावसाळ्याचा जोर कमी झालेला असल्यामुळें सागरावरील धोका कमी झालेला असतो; तेव्हां समुद्रावर सत्ता गाजविणारी वरूण देवाची पूजा केल्यावर कोणतीच भीति उरणार नाहीं अशी समजूत दर्यावर्दी भारतीयांची होती. रामायण, बृहतसंहिता, बौद्धजातकें, रत्नावली, दशकुमार अशा भिन्न प्रकारच्या वाड्मयावरुन भारतीयांचा सागरविक्रम ध्यानांत येतो. उत्तरसमुद्रप्रवास त्याज्य मानण्यांत येई. नौकाबंधनाचा शास्त्रशुद्ध विचार ‘युक्तिकल्पतरु’ ग्रंथांत दिसून येतो. नौकाबंधनांत पटाईत असणार्या भारतीयांकडून इंग्रज लोकहि आपलीं जहाजें बांधवून घेत. ब्रह्मदेश, सयाम, मलाया, बोर्निओ, सुमात्रा, जावा आणि फिलिपाइन्स बेटें इत्यादि द्वीपसमूहांत व जपान, बोर्निओ, सुमात्रा, जावा आणि फिलिपाइन्स बेटें इत्यादि द्वीपसमूहांत व जपान मांचुरिया, मंगोलिया, चीन इत्यादि पूर्वदेशांतून भारतीय संस्कृतीनें आपला प्रचार केला आहे. आफ्रिका व अमेरिका खंडांत भारतीयांनी प्रवास केल्याचे दाखले सांपडतात. त्या दृष्टीनें हा दिवस पूर्वपराक्रमाची आठवण देणारा आहे.
श्रावण शु. १५
(२) भारताच्या रवीन्द्राचा अस्त !
शके १८६३ च्या श्रावण शु. १५ रोजीं भारताचे कविसम्राट रवींद्रनाथ टागोर निधन पावले. कवि, तत्तज्ञ, राष्ट्रीय पुढारी म्हणूनच नव्हे तर भारतीय संस्कृतीचें एकमेव प्रतीक म्हणून त्यांची किर्ति त्रिखंडांत पसरलेली होती. सन १८७५ सालीं ‘हिंदु मेळावा’ नांवाच्या सभेंत त्यांनी एक स्वत:ची कविता म्हटली आणि तेव्हांपासून लोक त्यांना कवि म्हणून ओळखूं लागले. त्यानंतर त्यांनीं वडिलांच्याबरोबर जगभर प्रवास केला. सन १९१२ च्या दरम्यान बंगाली भाषेंत ‘गीतांजलि’ प्रसिद्ध झाली होती. तिच्या इंग्रजी अवताराचें कोडकौतुक यीट्स, ब्रँडले, शाँ, एच. जी. वेल्स आदि पाश्चात्य पंडितांनीं मुक्तकंठानें केलें आणि सन १९१३ मध्यें भारतांतील या कलाकृतीस नोबेल पारितोषिक मिळालें ! रवींद्रनाथ महाकवि झाले. सदैव रणकुंडांत होरपळणार्या असमाधानी पाश्चात्यांना ‘गीतांजली’ तील मधुर भक्तिसुधा चाखून शांति आणि समाधान मिळालें. नाटकें, काव्यें, कादंबर्या, गोष्टी, टीकालेख, इत्यादि वाड्मयरुपानें रवीन्द्रनाथ अमर आहेत. पूर्वायुष्यांत टागोर यांनीं राजकारणांतहि भाग घेतला होता. वंगभंगाच्या चळवळींत स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांच्यावर प्रभावी कवने करुन त्यांनी जनमनाची पकड घेतली होती. सन १९२० च्यानंतर ते म. गांधींच्या राजकारणाशी समरस झाले. कित्येक प्रसंगीं ते गांधीचे सल्लागारहि असत. रवीन्द्रनाथ यांची शिक्षणविषयक कामगिरी फार मोठी आहे. राष्ट्रीय शिक्षणाची दिशा विस्तृतपणें ‘शांतिनिकेतन’ मध्यें अमलांत आणून काव्य, गायन, नृत्य, चित्रकला यांत भारताचें वैशिष्ट्य काय आहे हें त्यांनी सार्या जगाला दाखविलें. अशा प्रकारचा हा कविसम्राट, जगन्मान्य तत्त्ववेत्ता, मोठा साधु, त्रिखंडपंडित, श्रावण शु. १५ ला दिवंगत झाला. प्रत्यक्ष भारताचा ‘रवीन्द्र’ च भर दुपारी बारा वाजतां अस्त पावला.
- ७ आँगस्ट १९४१