श्रावण वद्य ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पार्वतीबाईंचें निधन !
शके १७०५ च्या श्रावण व. ४ या दिवशीं पानिपतच्या संग्रांमांत धारातीर्थी पडलेले सदाशिवरावभाऊ पेशवें यांच्या पत्नी पार्वतीबाई निधन पावल्या. पार्वतीबाई पेशवे यांनी आपल्या पवित्र पतिप्रेमानें आपल्या घराण्याचें नांव उज्ज्वल केलें आहे. या अति सरळ आणि सुस्वभावी होत्या. सवाई माधवरावाच्या बालपणांत त्यांची काळजी यांनींच उत्तम प्रकारें घेतली होती. त्यांच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे उद्गार काढतात : "मातोश्री होती तोंपर्यंत श्रीमंत राजश्री रावसाहेब यांजविषयीं, घरांतील बंदोबस्ताविषयीं खातरजमा होती. सांप्रत बंदोबस्त खातरजमेंचें कोणी दिसत नाहीं." पार्वतीबाईचें उत्तरायुष्य करुणास्पद प्रसंगांनीं भरुन गेलें आहे. पानिपतच्या युद्धांत सदाशिवरावभाऊ मरण पावल्यानंतर कांहीं वर्षांनीं एक कनोजा ब्राह्मण मीच ‘भाऊसाहेब’ म्हणून पुढें आला ! माधवराव पेशव्यांनीं केलेल्या चौकशींत तो खोटा ठरला. त्यास दौलताबादेच्या किल्ल्यांत कैदेमध्यें ठेविलें. त्यानंतर त्याची रवानगी रत्नागिरीस झाली. सदर इसम ‘तोतया’ ठरला असूनहि हजारों माणसें त्याच्या भजनीं लागलीं. आणि खेदाची गोष्ट ही कीं, खुद्द पार्वतीबाई यांना या बैरागी तोतयाविषयीं ते भाऊसाहेबच असतील अशी शंका वाटे. आणि या आधारावर त्या सौभाग्यचिन्हें, धारण करीत ! "हे, अशीं बैरागीपणाचीं सोंगें घेऊन हिंडतात. काय करावें ! नाना लक्ष देत नाहींत, चार दिवस मजवर दृष्ट देऊन येथेंच ठेवणें व आपली परलोकास जावयाची वाट झाली पाहिजे.-" अशी एकसारखी विवंचना क्षयानें आजारी झालेल्या या साध्वी बाईंना लागलेली होती. पण या दु:खी अबलेच्या यातनांची पर्वा निष्ठुर राजनीतीनें ठेविली नाहीं. शके १६९८ मध्यें तोतयाचा निकाल लावल्यानंतर थोड्याच अवधींत ही अभागी स्त्री मरण पावली. यांचे करुणरम्य चित्रण कै. तात्यासाहेब केळकर यांनीं. ‘तोतयाच्या बंडां’ त कुशलतेनें रेखाटलें आहे. भाऊसाहेब कधीं तरी परत येतील, किंवा कारभार्यांनीं त्यांनाच कैदेंत ठेविलें आहे, अशा समजुतीनें देवाला सांकडे घालणार्या या एकनिष्ठ पतिव्रतेची मूर्ति मराठयांच्या इतिहासांत एकमेव अशीच आहे.
- १६ आँगस्ट १७८३
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP