श्रावण वद्य १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) " सेना बैसे समाधीसी !"

शके ११७० च्या सुमारास श्रावण व. १२ या दिवशीं प्रसिद्ध भगवद्‍भक्त सेना न्हावी यांनी समाधि घेतली. बाराव्या - तेराव्या शतकांत दरएक जातींत संत निर्माण होऊन परमार्थाच्या प्रांतांत जणुं लोकशाहीचें युग सुरु झालें होतें. ज्ञानदेवांच्यानंतर जरी सेना न्हावी यांचा काळ आहे तरी त्यांच्या अभंगांत ज्ञानेश्वरकालीन तत्त्वांचीच छाप विशेषेंकरुन आहे. सर्व अभंग साधे, प्रेमळ व रसाळ आहेत. नाभाजीनें भक्तमाला ग्रंथांत याचें चरित्र दिलें आहे. कोणा एका राजाची स्मश्रु करीत असतांना कांही चमत्कार होऊन राजास पश्चात्ताप झाला, आणि त्याचें सर्व लक्ष भगवंताकडे वळलें.

करितां नित्यनेम । रायें बोलाविलें जाणा ॥१॥
पांडुरंगें कृपा केली । राया उपरती झाली ॥२॥
मुख पाहातां दर्पणीं । आंत दिसे चक्रपाणी ॥३॥
कैसी झाली नवलपरी । वाटीमाजी दिसे हरि ॥४॥
रखुमादेवीवर । सेना म्हणे मी पामर ॥५॥

सेनामहाराजांच्या घरांत विठ्ठलभक्ति परंपरेपासूनच आलेली होती. उच्चनीचपणा धंद्यावर अवलंबूण नसतो, तर कोणाहि व्यक्तींचें मन पवित्र झालें कीं तीस मोठेपणा प्राप्त होतो. आणि मनास येणारी पतिव्रता परमेश्वराच्या चिंतनानें प्राप्त होते, असें सेनाच्या जीविताचे मर्म होतें. ‘आम्ही वारीक वारीक । करुं हजामत बारीक ॥’ हा यांचा रुपकात्मक अभंग प्रसिद्ध आहे. कृष्णभक्ति व संतप्रीति या दोन भावनांनीं यांची अभंगवाणी नटलेली आहे. यांनी कळकळीनें सांगितलें कीं, लोकांचा उद्धार आणि परोपकार हींच ध्येयें संतांनीं आपल्या नजरेसमोर ठेवावींत. स्वजातीयांनाहि ‘प्रतिपाळावें धर्मासी । व्यवहारासी न सांडावें ॥’ असा उपदेश सेनामहाराजांनी केला आहे. आपल्या समाधीविषयीं हे म्हणतात : ‘श्रावण वद्य द्वादशीं । सेना बैसे समाधीसी ॥" मोरोपंत कवींनीं यांच्याविषयीं म्ह्टलें आहे :

"जो भक्तिसरित्पूरीं षडरींची सर्व वाहवी सेना ।
रुचला मनास बहुतचि तो भगवद्‍भक्त नाहवी सेना ॥"

- सन १४४८
--------------

श्रावण व. १२

(२) शिवरायांची आग्र्‍याहून सुटका !

शके १५८८ च्या श्रावण व. १२ रोजीं औरंगजेबाच्या आग्र्‍याच्या कैदेंतून श्रीशिवाजीमहाराज यांनीं सुटका करवून घेतली. बादशहाच्या कपटी कैदेंतून सुटका होण्यासाठीं सर्व उपाय थकल्यावर श्रीशिवरायांनी एका अद्भुत प्रयोगास सुरुवात केली. त्यांनी आपले वर्तन साफ बदललें. ‘बादशहा सांगतील तसें आपण वागूं’ असे ते बोलूं लागले. आपल्या बरोबरच्या मंडळींना बादशहाच्याच ‘परवानगीनें त्यांनी दक्षिणेंत पाठवून दिलें. आणि आपण आजारी झाल्याची बतावनी सुरु केली. "औषधांच्या व अनुष्ठानशांति वगैरेच्या निमित्तानें दररोज सायंकाळीं त्यांनी ब्राह्मणास व बैराग्यांस वांटण्याकरतां मिठाई पाठवण्याचा प्रघात सुरु केला. पहिल्यापहिल्यानें पहारेकरी कसून तपासणी करीत. पण पुढें ही नित्याचीच गोष्ट झाल्यावर त्याची फिकीर कोण करतो ? श्रावण व. १२ रोजीं शिवाजीच्या नोकरानें पहारेकर्‍यांना कळविलें : " आज महाराजांस बिलकूल बरें वाटत नाहीं. गडबड करुं नका. -" मदारी मेहेत, हिरोजी फर्जंद हे विश्वासू इसम सेवाशुश्रूषा करीत होते. संध्याकाळीं हिरोजी फर्जंद हे विश्वासू इसम सेवाशुश्रूषा करीत होते. संध्याकाळीं हिरोजी फर्जंद शिवाजीच्या बिछान्यावर निजून राहिला. सोन्याचें कडें असलेला हात त्यानें पांघरुणाबाहेर ठेवला; व शिवाजी आणि संभाजी कावडीच्या दोन टोपल्यांत बसले. कोणाहि पहारेकर्‍यास संशय आला नाहीं; त्यांच्या कावडीबरोबर इतर कित्येक मिठाईच्या कावडी मागेंपुढें होत्या. शहराबाहेर एकांतस्थलीं शिवाजीची कावड येऊन पोंचलीं. शिवाजी व संभाजी हे दोघे चालत चालतच सहा मैल दूर असणार्‍या गांवास आले. तेथील रानांत निराजी रावजी, दत्ताजी त्रिंबक, रघुमित्र, आदि मंडळी घोडे सज्ज करुन तयार होती; चटकन्‍ स्वार होऊन शिवाजी व संभाजी यांनी उत्तरेकडे प्रयाण केलें. दुसर्‍या दिवशीं पहारेकर्‍यांनी हात पाहिला; नोकर पाय चेपतांना दिसला; त्यांना वाटलें, शिवाजी बीमार आहे. हिरोजी व नोकर या दोघांनीं पहारेकर्‍यांना सांगितलें, " महाराज झोंपले आहेत; आम्ही बाहेरुन येतों -" आणि तेहि निसटले. बराच वेळ झाला, कांहीं सामसूम दिसेना तेव्हां पहारेवाले आंत येऊन पाहतात तों काय, आंत कोणीच नाहीं !

- १७ ऑगस्ट १६६६

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP