श्रावण शुद्ध ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


नागपंचमीचें रहस्य !

श्रावण शु. ५ हा दिवस नागपंचमीचा म्हणून प्रसिध्द आहे.
भारताच्या बहुतेककरुन सर्व भागांत या दिवशीं नागांची पूजा होत असते. पण या सणाच्या उत्पत्तीबद्दल मात्र मतभेद आहेत.‘सर्वाभूतीं भगवद्‍ भाव’ कल्पिणार्‍या भारतीय संस्कृतीनें नागांपासून संरक्षण व्हावें म्हणून त्यांच्यांत देवत्व कल्पून त्यांची पूजा सुरु केली. वित्त - संपत्तीचा रक्षणकर्ता म्हणून नागाची ख्याति असून शिव, विष्णु, गणपति, इत्यादि देवांशीं आलेला त्याचा संबंध प्रसिध्दच आहे. बंगालमधील ‘मणिपूर’ गांवच्या कहाणींतून हाच विचार स्पष्ट होतो. तेथील लोक सर्पापासून संरक्षण व्हावें म्हणून ‘मनसा’ नांवाच्या देवीची पूजा करतात. ही मनसा म्हणजे शेषाची बहीण, तिच्या भक्तीनें विष बाधत नाहीं अशी समजूत असल्यामुळें तिला ‘विषहरा’ असेंहि नांव आहे. हिंदूंच्या धार्मिक वाड्गमयांतहि सर्प - नाग यांच्या कथा पुष्कळ आल्या आहेत. बायबलांत तर माणसाला ज्ञानप्राप्ति करुन देणारा ‘नाग’च आहे असें दर्शविलें आहे. आपल्याकडे भागवत, विष्णुपुराण, आदि पुराणांत नागकथा सांपडतात. दक्षिण हिंदुस्थानांत तर दाविडी संस्कृतीनें नागांची देवालयें बांधिलीं आहेत.
पण या नागपंचमीचे पाठीमागें थोडा सामाजिक इतिहासहि असावा. महाभारत काळीं नाग नांवाची मनुष्यजात होती. आर्य आणि नाग यांची युध्दें वारंवार होत. नागांच्या तक्षक राजानें परिक्षित राजाचा खून केला. दोन जमातींत भयंकर संग्राम सुरु झाला. हा झगडा कोणी मिटविला ? तर ज्याची आई नागकन्या असून पिता आर्य होता अशा आस्तिक ऋषींनीं ! नाग आणि आर्य यांच्या आंतरजातीय विवाहानें हा झगडा मिटण्यास मदत झाली. कलारसिक, नगररचना - कुशल आणि पौरोहित्याचें काम करण्याइतपत विव्दान अशी नागजाति आर्याच्यामध्यें मिसळली. आणि त्यांच्या संतोषाप्रीत्यर्थ नागपंचमी सण आला असावा. महाराष्ट्रांतहि नागपंचमीचा सण पाळला जातो. घरोघर मातीच्या नागाची पूजा होत असते. गारुडी लोकांच्या जवळील नागांसहि दूध पाजून या देवाविषयींचा आदरभाव व्यक्त केला जातो.
----------

श्रावण शु. ५
कालिया सर्पाचा पराभव !

श्रावण शु. ५ या दिवशीं भगवान्‍ श्रीकृष्णांनीं कालिया नांवाच्या नर सर्पाचा पराभव केला !
गोकुळाच्या उत्तरेस एका कोसावर यमुनेच्या काठावर एका प्रचंड डोहाशेजारीं कालिया नांवाचा दुष्ट नर - सर्प राहत होता. व्रजवासीयांना त्रास देण्यासाठीं कालिया यमुनेच्या पाण्यांत विष कालवीत असे. त्यामुळें कोणताहि प्राणी त्या डोहाच्या आसपास फिरकत नसे. दुष्ट कालियास हांकलून द्यावें; आणि यमुनेचें पाणी सर्वाना पिण्यास स्वच्छ करावें,या निश्चयानें श्रीकृष्ण एके दिवशीं एकटाच गाई घेऊन निघाला. डोहानजीक आल्यावर तेथील एका कदंब वृक्षावर चढून श्रीकृष्णानें दंड थोपटले आणि कालियास पाचारण केले. कालियाहि खवळून डोहापासून कृष्णाकडॆ आला. कालियाचे नेत्र रागानें लालभडक झाले. जणुं त्यांतून विषवृष्टि होत होती ! नाकांतून विषारी फृत्कार बाहेर पडत होते. आपल्या प्रचंड शरिरानें कालियानें श्रीकृष्णास विळखा घातला. श्रीकृष्ण सावध होताच. त्यानें आपल्या शक्तिशाली हातांनीं कालियाचें नरडें पकडलें. कालिया - कृष्णाच्या या युध्दाची हकीगत सर्व गोकुळांत समजली, आणि नंद - यशोदेसह सर्व जण डोहाकडे धावून आले. कालियाच्या विळख्यांत कृष्ण सांपडलेला पाहून त्या सर्वांनीं एकच आकांत केला. इतक्यांत कृष्णानें कालियाचें नरडें जोरानें दाबल्याबरोबर तो गतप्राण झाल्यासारखा होऊन त्याचे विळखे सैल पडले. त्यानंतर कृष्णानें त्याच्या डोक्यावरच प्रहार करण्यास सुरुवात केली. कालियाचें हें भयंकर दु:ख पाहून त्याची बायकापोरें रडूं लागलीं. त्यांनीं कृष्णाची प्रार्थना करुन कालियाच्या प्राणांची भिक्षा मागितली. आपल्या परिवारासह कालियानें येथून निघून जावें, आणी पुन्हां गोकुळांतीळ लोकांना कोणत्याहि प्रकारचा त्रास देऊं नये या अटीवर श्रीकृष्णानें कालियास जीव - दान दिलें. कृष्णाच्या पकडींतून मुक्त झाल्यावर कालियानें त्याच्या पायावर डोकें ठेविलें आणि अनन्यभावानें स्तुति करुन कालिया आपल्या गणगोतासह  दूर निघून गेला. बाल वयांत श्रीकृष्णानें हा मोठाच विजय मिळविला होता.

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP