परमहंस मंडळीची स्थापना !
शके १७७१ च्या श्रावण शु. १२ या दिवशीं मुंबई येथें सामाजिक व धार्मिक चर्चेसाठीं ‘परमहंस मंडळी’ स्थापन झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मिशनरीं लोकांच्या हिदु धर्मावरील हल्ल्यामुळे हिदुधर्मीयांना आत्मनिरीक्षणाची जाणीव निर्माण झाली. विष्णुबोवा ब्रह्मचारी विरोधकांना तोड देण्याचे कार्य धडाडीने करीत होतेच. परंतु अज्ञानजन्य आचारविचार, बालविवाह, विधवांची वाढती संख्या, इत्यादि गोष्टींचा विचार तत्कालीन मंडळी करुं लागली होती. दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण (जयकर), डाँ. आत्माराम पांडुरंग, लक्ष्मणशास्त्री हळबे, इत्यादि शिक्षित मंडळींना हिदु धर्मातील दोष काढून टाकण्याची जरुरी वाटत होती. याच सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर मुंबईस आले, आणि त्यांच्या प्रेरणेमुळे ही ‘परमहंस सभा’ स्थापन झाली. जातिभेदाचा उच्छेद, मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार, मानवांचें बंधुत्व, इत्यादि उद्देश या सभेचे असत. ही सभा गुप्तपणें चालत असे. सभेचा दीक्षाविधि ठरलेला होता. सभेचे सूत्रधार दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ नांवाचा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. तो जणुं या सभेची ‘स्मृति’ च असे. दादोबा आपल्या धर्मविवेचनांत म्हणतात, "नीतिविना ज्ञान केवळ शुष्क. नीति हे ज्ञानाचे मूल्य होय तद्व्यतिरिक्त जें ज्ञान तो केवळ वरील झळझळाट व आडंबर मात्र. अनृत, लोभ, मत्सर, वैर, आलस्य, गर्व, क्रूरता, इत्यादि दुर्गुणांपासून अलिप्त असावे." या मंडळींच्या शाखा पुणे,नगर,सातारा, वेळगांव, इत्यादि दूरच्या शहरींहि निघाल्या होत्या. अशा प्रकारे प्रसार होत असतां कोणी एका सभासदाने सभासदांच्या यादीचें पुस्तक लांबविलें. आणि यादी प्रगट होणार कीं काय या भीतीनेंच जणुं सन १६८० च्या सुमारास या सभेचें काम बंद पडले; परंतु याच सभेंतील मंडळीच्या विचारांना पुढें केशवचंद्र सेन याच्याकडून चालना मिळाल्यावर १८६७ मध्यें ‘प्रार्थना समाजा’ ची स्थापना झाली आणि १८७० नंतर समाजाला रानडे, भांडारकर यांच्यासारखे बुद्धिमान पुरस्कर्ते मिळत गेले.
- ३१ जुलै १८४९