श्रावण शुद्ध ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


जगन्नाथ शंकरशेट यांचें निधन !

शके १७८७ च्या श्रावण शु. ८ रोजी मुंबई शहरांतील प्रसिध्द धनिक, अव्वल इंग्रजींतील सार्वजनिक कार्यकर्ते आणि विख्यात दानशूर नागरिक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचें निधन झालें !
यांच्या घराण्यानें अनेक पिढया व्यापार केला होता. म्हैसूरच्या लढाईत टिपू ठार झाला; आणि इंग्रज विजयी झाले, या वेळीं शंकरशेटांना खूप नफा होऊन सोळा लाख रुपये रोख व एक लक्षाचें जवाहीर प्राप्त झालें. आपली आई भवानीबाई हिच्या स्मरणार्थ त्यांनीं मुंबईस गवालिया टँकनजीक भवानीशंकराचें देऊळ बांधून एक धर्मशाळाहि बांधली आहे. कित्येक शिक्षणसंस्थांचे सूत्रधार म्हणून नाना शंकरशेटांचें नांव प्रसिध्द आहे. बाँबे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी, ही शिक्षणप्रसार करणारी एतद्देशीयांची पहिली संस्था होती. तिचेंच रुपांतर पुढें बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्यें झालें. एल्फिन्स्टन साहेबानें राजीनामा दिल्यावर मुंबईत उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जवळजवळ साडेचार लक्षांचा फंड जमविण्यांत आला होता, त्याचे ट्रस्टी शंकरशेटच होते ! यातूनच पुढें एल्फिन्स्टन काँलेजची स्थापना झाली. याशिवाय स्टूडंटस्‍ लिटररी अँड सायण्टिफिक सोसायटी, जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा, धि जगनाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड अँग्लो - व्हर्न्याक्युलर स्कूल, इत्यादि संस्थांचे चालक हेच होते. यांखेरीज अनेक सार्वजनिक कार्यात यांचा हात असे. धि बाँबे असोसिएशन या राजकीय संस्थेंतहि हे प्रमुखपणें काम पाहत असत. धि बाँबे ब्रँच आँफ धि राँयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला यांनीं पां हजार रुपयें दिले. त्यामुळें ‘जगन्नाथ शंकरशेट लायब्ररी’ थाटण्यास त्या संस्थेला सुलभ झालें. मुंबई विद्यापीठांत मँट्रिक परिक्षेंत संस्कृत घेऊन पहिला व दुसरा येणार्‍या विद्यार्थ्यास यांच्या नांवें शिष्यवृत्ति मिळत असते. मुंबईच्या  कायदे कौन्सिलच्या पहिल्या सभासदांत जगन्नाथ शंकरशेट प्रमुख होते. यांचा पुतळा राणीच्या बागेंत उभारण्यासाठीं मुंबईत पंचवीस हजार रुपये जमा करण्यांत आले होते. जगन्नाथ शंकरशेट हे अँग्रिहाँर्टिकल् चरल सोसायटी आँफ वेस्टर्न इंडिया, आणि धि जिआँग्राफिकल सोसायटी यांचेहि अध्यक्ष होते.
- ३१ जुलै १८६५

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP