श्रावण शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
संत तुलसीदासाचा जन्म !
शके १४५३ च्या श्रावण शु. ७ रोजीं हिन्दी भाषेंतील विख्यात रामभक्त महाकवि संत तुलसीदास यांचा जन्म झाला !
यांच्या आईचें नाव हुलसी व वडिलांचें नांव आत्माराम दुबे. हे जातीनें सनाढय ब्राह्मण असून यांचा जन्म एका अत्यंत गरीब अशा कुळांत झाला. असें सांगतात कीं, बारा महिने आईच्या गर्भात राहिल्यानंतर यांचा जन्म झाल्यामुळें यांची अंगयष्टि बळकट होती. जन्मल्याबरोबर न रडतां यांच्या मुखांतून राम शब्द बाहेर आला. यांच्या जन्मावेळीं मूळ नक्षत्र होतें; मुखांत दांत होते; अशा या विलक्षण मुलाला पाहून हुलसी चितित झाली; आणि शेवटीं अशुभ टाळण्याच्या निमित्तानें तिनें आपल्या मुलाचा त्याग केला. चुनिया दासीनें यांचें पालनपोषण भलेपणानें केलें. पांच वर्षानंतर चुनिआचा पण देहान्त झाला; आणि तुलसी अनाथ होऊन दारोदार भटकूं लागला. या वेळीं रामशैल पर्वतावर श्रीअनन्तानन्दर्जीचे प्रिय शिष्य श्री नरहर्यानन्दजी रहात होते. त्यांनीं या अनाथ मुलाला आपल्याजवळ घेतलें, आणि त्यांचें नांव ‘रामबोला’ असें ठेवलें; न शिकवतांच रामबोला गायित्री मंत्र जपूं लागला ! वैष्णवधर्मास अनुसरुन संस्कार झाल्यावर तुलसीदास आयोध्येमध्यें राहून विद्याभ्यास करुं लागले. ज्ञानविद्या पूर्ण झाल्यानंतर दीनबंधु पाठक यांच्या सुंदर मुलीशीं यांचा विवाह झाला. एकदां त्यांची पत्नी रत्नावली आपल्या माहेरीं गेली असतां तुलसीदास तिच्या पाठीमागें गेले. पत्नीनें त्यांचा धिक्कार केला आणि म्हटलें, “हाडामांसाच्या शरीरावर ऐवढें प्रेम करतां त्यापेक्षां परमेश्वरावर लक्ष द्या. तुमचें कल्याण होईल.” पत्नीच्या या शब्दामुळे तुलसीदासांना मोठेंच वैराग्य निर्माण झालें. साधुवेष धारण करुन तीर्थाटन करीत करीत ते काशीस येऊन पोंचले. तेथें ते रामकथा सांगूं लागलें. हमुमानाच्या सूचनेवरुन हे चित्रकूट पर्वतावर गेले व तेथें त्यांना रामदर्शन झालें. त्यांनीं तुलसीदासांना चंदनाचा टिळा लावला आणि रामचंद्र अंतर्धान पावले. त्यानंतर तुलसीदासांनीं अफाट वाड्गमय - संपत्ति निर्माण केली.
- २० जुलै १५३१
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP