मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|
स्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस

स्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


अशा प्रकारे कन्येच्या कुळाच्या निष्पुरुषतेवर शास्त्रकारांचा इतका कटाक्ष असण्याचा हेतू तिच्या पोटी पुत्रसंतती न होता स्त्रीसंतती होत राहण्याची भीती हा होय. स्त्रीसंतती झाली असता ती टाकून द्यावयाची असा प्रकार जरी कोणी सहसा करीत नाही, तरी स्त्रीसंततीपेक्षा पुरुषसंततीची हौस प्राय: सर्वत्र अधिक असते हे निश्चित आहे. अतिप्राचीन काळापासून आजपावेतो ही स्थिती एकसारखी अबाधित चालत आल्याचे आर्यलोकांच्या इतिहासावरून स्पष्ट दिसून येते. स्त्रीसंततीत ‘ पुत्री ’ व पुरुषसंततीस ‘ पुत्र ’ अशा संज्ञा असून, व्याकरणदृष्ट्या दोन्ही शब्दांचा मूळ प्रकृतिभाव एकच आहे, तथापि पुत्रीपेक्षा पुत्राचेच सर्वत्र अधिक महत्त्व मानण्यात आलेले आहे.
ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात हरिश्चंद्र राजाचे कथानक आले आहे, त्यात त्या निपुत्रिक राजास नारदाने पुत्राचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे. मनुष्यमात्र व विशेषत: त्रैवर्णिक ह्याच्या पाठीमागे पुत्रोत्पादन करणे हे पितरांचे ऋण या स्वरूपाने नेहमी लागले असते, व त्यातून तो पार पडला तर त्यास ब्रह्मलोक, सूर्यलोक इत्यादी लोकांत अनंत काळापर्यंत राहण्यास सापडते; नाही तर त्यास ‘ पुत् ’ नामक नरकात वास घडतो, इत्यादी प्रकारचे तिखटमीठ लावून अधिक रुचिकर वर्णन उत्तरकालीन पुराणग्रंथांतून जागोजाग केलेले आढळते. आपणास कसा तरी एकदा पुत्र होवो, त्याचे मुख एकवार दृष्टीस पडले म्हणजे आपल्या जन्माचे सार्थक झाले असे मानण्याची स्थिती निपुत्रिक दशरथराजाची झाली होती, व श्रावणवधाच्या वेळी त्यास अखेरीस पुत्रशोकामुळेच मरण येण्याचा शाप झाला होता, तरीदेखील त्याने आपल्याला निपुत्रिकतेचा डाग लागत नाही याच एका गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या जिवाचे समाधान करून घेतले होते, इत्यादी कथा रामायण वगैरे अनेक ग्रंथांतून वर्णिल्या असल्याचे सर्वत्र प्रसिद्धच आहे.
द्वारकानाथ श्रीकृष्ण याच्या पोटी संतती नव्हती, व त्याने तपश्चर्या केल्यावर त्यास मदन पुत्र झाला; अश्वपतिराजा निपुत्रिक होता, त्यास ताश्चर्येच्या अंती देवता प्रसन्न होऊन सावित्रीनामक कन्या झाली; इत्यादी अनेक कथा पुराणग्रंथांतून वर्णिल्या आहेत. या कथांत कित्येक ठिकाणी पुत्राची व इतर ठिकाणी कन्येची प्राप्ती झाल्याचे वर्णिले आहे, तथापि निपुत्रिक मनुष्याने कन्याप्राप्तीकरिता तप आरंभिल्याच्या कथा प्राय: कोठे आढळत नसून, तपश्चर्येचा मूळ हेतू पुत्रप्राप्तीचा असल्याचेच दिसून येते. आता दशरथराजास राम, भरत, शस्त्रुघ्न व लक्ष्मण हे पुत्र झाले होते, त्याप्रमाणे शान्तानामक कन्याही झाली असून ती अंगदेशचा राजा रोमपाद अथवा लोमपाद याने दत्तक म्हणून मागितली, व मित्रस्नेहास्तव दशरथाने ती त्यास दिली, ही कथा वाल्मीकी रामायणात बालकांडात वर्णिली आहे हे खरे, तथापि तिजवरून रोमपाद राजाला कन्या असल्याचीच हौस अधिक वाटली, व म्हणून ती त्याने दशरथ राजापाशी मागितली, अशी कोणी कल्पना करू गेल्यास ती चुकीची होईल. कारण ही कन्या मागण्याचा हेतू आपणास कन्या पाहिजे अशा प्रकारचा नसून, त्या राजाच्या राज्यात पडलेल्या अवर्षणाचे निवारण करण्यास ऋष्यशृंग ऋषीस ती कन्या अर्पण करणे, व नंतर अवृष्टीच्या दूरीकरणार्थ ऋष्यशृंगाकडून यज्ञ करविणे, हाच काय तो उपाय होता.

तेव्हा एकंदरीत विचार करिता कन्या-संततीपेक्षा पुत्र-संततीचीच योग्यता प्राय: सर्वत्र अधिक मानण्यात येत होती, हाच पक्ष बलवत्तर दिसतो. शिवलीलामृतात शेवटल्या म्हणजे १४ व्या अध्यायात श्रियाळ राजाची कथा वर्णिली आहे, तीत त्या एकुलत्या एक पुत्राच्या मांसाचा पाक भोजनार्थ मागितला असता त्या सत्त्वधीर राजाने तो सिद्ध करविला. पुढे भोजनाची पात्रे मांडिली, तेव्हा आयत्या वेळी आपण निपुत्रिकाचे अन्न घेत नाही असे शिवाने म्हटले, त्या प्रसंगी त्याच्या तोंडी कवीने पुढीलप्रमाणे ओव्या घातल्या आहेत :
यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी । अन्न न ध्यावे सर्वथा ॥६३॥
निपुत्रिकाचे न पहावे वदन । मग तेथे कोण घेईल अन्न ॥
दीपेवीण शून्य सदन । पुत्रावीण तेवी तुम्ही ॥६४॥
नासिकेवाचून वदन । की वृक्ष जैसा फ़ळावीण ॥
की बुबुळावीण नयन । शून्य सदन तुमचे तेवी ॥६५॥
या प्रकारचे ग्रंथ, निदान त्या ग्रंथांतील कथा, या देशात प्राय: प्रत्येक आबालवृद्धांच्या तोंडी आहेत, व यावरून आपल्या लोकात पुत्रप्राप्तीचे केवढे महत्त्व मानिले जात असे, व अद्यापिही मानिले जाते, हे समज व्यक्त होण्याजोगे आहे. उलटपक्षी कन्या झाली तरी ती बोलून चालून परक्याचे धन होय, ती बालपणी काय आपणापाशी राहील तेवढीच. तिचे पुढील आयुष्य तिच्या पतीच्या घरी जावयाचे. सासरी गेल्यावर तेथे तिचे हाल झाले किंवा काही झाले, तरी तिच्या दु:खाचे पुरतेपाणी परिमार्जन करण्यास आपण असमर्थ आहो.
दुर्दैवाने तिचा पती निवर्तला, किंवा अन्य कोणत्याही प्रकाराने तो तिला कायमचा निरुपयोगी ठरला, तरीदेखील प्रचलित रूढीच्या बलास्तव तिला दुसर्‍याने पती करून देण्यासही आपण असमर्थ आहो; इत्यादी प्रकारचे निराशेचे उद्गार प्रसंगाने मातापितरे इत्यादिकांच्या तोंडून निघत असतात. एकीकडून कालिदासासारखे कवी ‘ अर्थो हि कन्या परकीय एव ’ इत्यादी श्लोकात ( अभि. शाकुं. ना. अंक ४ ) कन्या ही नवर्‍याची ठेव आहे, ती त्याच्याकडे परत पोचविली म्हणजे आपण सुटलो, इत्यादी सौम्य रीतीने हा प्रकार वर्णितात; तो दुसरीकडून अर्वाचीन संगीत नाटकाचार्य --
झाली ज्याची उपवर दुहिता ॥
चैन नसे त्या तापवि चिंता ॥
काळजि निशिदिनि पोळवि चित्ता ॥
( सं. सौभद्र अंक १ )
इत्यादी पद्यातून कन्या ही पित्यास जन्मभर चिंतेचे माहेरघर आहे आशा प्रकारचे स्वरूप जनसमुदायाच्या अंत:करणावर बिंबविण्यास तयार असतातच, व त्यातच सुभाषितकारांचीही लहर या चित्तेचे स्वरूप पुढील प्रकारे अधिक भयंकर आहे हे दाखविण्याकडे लागलेली दृष्टीस पडतेच :
चिंता चितासमानास्ति बिंदुमात्रविशेषत: ॥
सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता ॥
भावार्थ असा : ‘ चिंता ही चितेशी बिंदुमात्र म्हणजे किंचित असमान, अर्थात तिजहून निराळी आहे, कारण ‘ चिंते ’ त ( म्हणजे ‘ चिंता ’ या शब्दात ) एक बिंदू ’ अथवा एक अनुस्वार अधिक आहे. गरीब विचारी चिता मनुष्य मेल्यावर त्याला जाळिते, परंतु ही बिंदुमात्र निराळी म्हणावयाची जी चिंता, ती तर जिवंत मनुष्यासही सदोदित जाळीत राहते ! ’ असो. तात्पर्य सांगावयाचे ते इतकेच की, मोठे मोठे वेदकाळचे ऋषी व राजे यांपासून तो त्याहून अधिक अर्वाचीन काळचे व अलीकडाचे कवी, सुभाषितकार, भगवद्भक्त, सामान्य लोकांतून वाहवा मिळविणारे नाटककार, इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांस कन्येचा कमीपणा व त्या मानाने पुत्राचे अधिक महत्त्व एकसारखे वाटत आले आहे; व धर्मशास्त्राच्या दृष्टीनेही कोणीही मनुष्य मेल्यानंतर त्यास सद्गती देण्याचे, अर्थात त्याचे नाव चालू ठेवून त्यास श्राद्धी पिंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीसंततीच्या मानाने पुरुषसंततीत अधिक मानिले गेले आहे. या सर्व कारणांमुळे ज्या विवाहापासून पुरुषसंतती होण्याचा संभव मुळीच नाही, अगर असला तर तो फ़ार कमी आहे, असा विवाह करण्याकडे कोणाचीही प्रवृत्ती सहसा न व्हावी हे गैरवाजवी आहे असे मानण्याचे कारण नाही.
 
( लृ ) वधूवरांचे गोत्रप्रवर एक नसावे


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP