मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|
स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’

स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


अर्थ व पुनर्भू स्त्रिया : विवाह्य कन्येसंबंधाने कलम ५ येथे ज्या गोष्टी पाहावयाच्या म्हणून सांगितले आहे, त्यातील ( इ ) पेटाकलमात ती अनन्यपूर्विका असावी असे सांगितले आहे. ‘ अनन्यपूर्विका ’ म्हणजे अन्यपूर्विका नव्हे ती, अर्थात ती होणार्‍या विवाहापूर्वी दुसर्‍या कोणाही पुरुषास प्राप्त झाली नसली पाहिजे, असा या संज्ञेचा अर्थ निबंधकारांनी वर्णिला आहे. पुरुषास स्त्री सामान्यत: दोन प्रकारांनी मिळते. हे दोन प्रकार दान व उपभोग हे होत. निबंधकारांच्या मते या दोन प्रकारांत सात प्रकारच्या पुरर्भू स्त्रियांचा समावेश होतो. ‘ पुनर्भू ’ म्हणजे शब्दश: पुन: होणारी, अर्थात पुनर्विवाह करणारी स्त्री होय, व तिचे प्रकार पुढे दर्शविल्याप्रमाणे समजावे :
( १ ) “ मनोदत्ता ” म्हणजे कन्यादान करण्याचा ज्यास अधिकार आहे, अशा पुरुषाने जीस अमुक पुरुषास देण्याचे मनाने ठरविले ती.
( २ ) “ वाचादत्ता ’’ म्हणजे जी कन्या अमुक पुरुषास द्यावयाचे मी ठरविले आहे असे त्या पुरुषापाशी अगर त्याचा पिता इत्यादिकांपाशी कन्यादान करणार्‍या पुरुषाने वचन दिल्याप्रमाणे बोलून दाखविले आहे ती.
( ३ ) “ अग्निं परिगता ” म्हणजे विवाहविधीत अग्नीभोवती जिची प्रदक्षिणा झाली आहे ती.
( ४ ) “ सप्तमं पदं नीता ” म्हणजे सात पावले चालत नेलेली. ( विवाहाच्या विधीत वधूचा हात धरून तिला तांदुळांच्या निरनिराळ्या राशींवरून एकेक पाऊल चालत नेतो हे प्रसिद्धच आहे. )
( ५ ) “ भुक्ता ” म्हणजए स्त्रीपुरुषांचे नाते पूर्णपणे जोडले जाऊन जिला पतिसमागम घडला आहे ती.
( ६ ) “ गृहीतगर्मा ” म्हणजे जिच्या पोटी गर्भ राहिला ती.
( ७ ) “ प्रसूता ” म्हणजे बाळंतीण झालेली.
या सात प्रकारांपैकी पहिल्या तीन प्रकारच्या स्त्रियांस ‘ पुनर्भू ’ ही संज्ञा शास्त्रत: लागत असली तरी ‘ पतित्वं सप्तमे पदे ’ या स्मृतिवचनास अनुसरून विवाहविधीतील सातवे पाऊल वधू चालून गेली म्हणजेच वरास पतीचा अधिकार पूर्णपणे येतो. अर्थात हे पाऊल वधू टालीतोपावेतो त्यास ‘ तिचा पती ’ ही संज्ञा पूर्णप्णे लागत नाही. यावरून पहिल्या तीन प्रकारच्या पुनर्भूंस तिच्या पतीच्या पातित्यादी दोषांबद्दलचा बळकट पुरावा झाल्यास निराळ्या पुरुषाशी विवाह करण्यास अडचण नाही असे संपूर्ण निबंधकारांचे स्पष्ट मत आहे.
वरपक्ष व वधूपक्ष या उभयतांचे ऐकमत्य होऊन विवाह होण्याचे निश्चित होऊन गेल्यावर, अथवा केव्हा केव्हा साक्षात विवाहविधी चालू झाल्यावरही, वरासंबंधाने अगर वधूसंबंधाने विपरीत दोषकल्पना निघून, म्हणजे पूर्वी न समजलेल्या वर्ण, जाती, कुल, पातित्य, दैहिक अगर मानसिक विशेष व्यंगे, अथवा लोकव्यवहारास अनुसरून विशेष अडचणीच्या गोष्टी नवीन कळून येऊन, जुळून आलेले लग्न मोडते, अगर ते अर्धवटच टाकून न व्हावे, व विवाहकृत्याच्या पूर्णतेची कोठे तरी मर्यादा मानिली जावी, या हेतूने शास्त्रकारांनी अशा प्रकारे निर्णय केला आहे. हा निर्णय सर्वतोपरी योग्य आहे हे निराळे सांगणे नलगेच.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP