स्त्रीचे रमणीयत्व
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
‘ रमणीय ’ शब्दाचा अर्थ प्रस्तुत काळी योग्यता : स्त्री जातीच्या ‘ रमणीय ’ त्यासंबंधाने ‘ कान्ता ’ असे पद मूळ वचनांत असून, त्याचा मिताक्षरा इत्यादी ग्रंथांत ‘ वराच्या नेत्रांस आणि हृदयास आनंद देणारी ’ असा अर्थ केला आहेअ. कन्येच्या कुलाची व अंतर्बाह्य लक्षणांची परीक्षा समाधानकारक वाटली, तरच तिचा स्वीकार करावयाचा असे वर सांगितलेच आहे. त्या दृष्टीने पाहू गेल्यास ‘ कान्ता ’ या शब्दाच्या अर्थाचा अशा प्रकारे निराळा उल्लेख करण्याचे वस्तुत: कारणच राहात नाही; तथापि संस्कारकौस्तुभ इत्यादी ग्रंथात हा अर्थ स्पष्टपणे लिहिला आहे, एवढेच नव्हे, तर वराच्या नेत्रांस व हृदयास आनंद देणारी वधू ही श्वशुर इत्यादी इतर नातलग मंडळीस तशी आनंद देणारी नसली तरी चिंता नाही, असाही आणखी या शब्दाचा विशेष गर्भित अर्थ त्यात निराळा नमूद केला आहे.
प्रस्तुतच्या लोकसमाजाच्या स्थितीकडे लक्ष न देता हा अर्थ पुष्कळांस चमत्कारिक व अनावश्यकही वाटेल यात संशय नाही; कारण आजची लोकस्थितिच प्राय: अशी आही की, ज्या वराचा विवाह व्हावयाचा तोच मुळी अल्प वयाचा असतो, व यामुळे लग्न ठरविण्याच्या हरएक बाबतीत त्याच्या घरची वडील माणसे म्हणतील ती पूर्वदिशा असाच बहुधा सर्वत्र अर्थ होत असतो. वधूची कुलपरीक्षा, तिचे गुण इत्यादी गोष्टींचे सार बहुधा हुंड्याच्या व मानपानाच्या रकमेत येऊन बसले आहे, यामुळे विवाहास उभी राहणारी मुलगी आपल्या पतीस कितपत आनंद देणारी होईल या प्रश्नाच्या चर्चेस अवकाशच मिळण्याचे कारण राहात नाही.
प्राचीन काळी तरी निदान ही शोचनीय स्थिती नव्हती; व मौंजीबंधनानंतर किमानपक्ष बारा वर्षे तरी ब्रह्मचार्यास गुरुगृही वास करावा लागत असे, यामुळे विवाहाचा काळ होईपावेतो वर आपोआप जाणत्या वयाचा होत असे, व त्याला आपले हित अगर अहित कशात आहे हे स्वत:च्या बुद्धीने ठरविण्यास आयतीच संधी मिळे. मागे वधूकुलपरीक्षा व तिच्या गुणांची परीक्षा होणे अगत्याचे आहे म्हणून सांगितले, परंतु ही परीक्षा करावयाची कोणी याबद्दलचा निर्णय सांगितला गेला नाही. ही परीक्षा वरानेच करावयाची अशी स्थिती मानावयाचे म्हटल्यास संस्कारकौस्तुभकारांचा अर्थ चमत्कारिक व अनावश्यकही कदाचित ठरेल. परंतु सद्य:स्थितीच्या तुलनेने प्राचीन काळच्या स्थितीची स्पृहणीयता मनात आणिता हा अर्थ सांगणे हे अत्यंत योग्य व प्रसंगोचित म्हणावे लागेल यात संशय नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP