कुलपरीक्षेसंबंधाने ज्या गोष्टी पाहावयाचा, त्यासंबंधाने लिहिताना धर्मबिबंधग्रंतात स्मृतिवचनांचा आधार असलेल्या कित्येक गोष्टी सांगितल्या असून त्यांपैकी सदाचारदिगुणवत्ता, आणि हीनक्रियत्वादी दोषहीनता या दोन गोष्टींचा मोघम उल्लेख केलेला आहे. कारण दोहींचेही स्वरूप केवळ व्यावहारिक असून ते प्रत्येक प्रसंगी परिस्थितिविशेषणावर अवलंबून राहणार हे उघड आहे. तात्विक दृष्टीने अमुक गोष्ट खात्रीने चांगली अगर वाईट असे कोणासही केव्हाही म्हणता यावयाचे नाही. जी गोष्ट एखाद्या व्यक्तिविशेषास चांगली वाटेल, तीच गोष्ट निराळ्या व्यक्तींस अगर समाजास तद्विरुद्ध प्रकारची वाटेल; व प्रत्येक व्यक्ती अगर समाज आपआपल्या मताचे समर्थन आग्रहाने व युक्तिवादाने करीत राहील.
चोर्या करणे, वाटा मारणे, खोटे दस्तऐवज करणे हा आमचा कुलपरंपरागत धंदा आहे, व तो चांगला असल्याने आम्ही सोडणार नाही, असे म्हणणारे लोक जगात थोडेथोडके नाहीत. त्याचप्रमाणे तद्विरुद्ध मतांचे प्रतिपादन करणार्या लोकांची संख्याही काही लहान नाही. आमचा कुलपरंपरागत व्यवसाय आजन्म भिक्षा मागून उपजीविका करण्याचा आहे, व यासाठी आमच्या पोषणाचे ओझे इतरांनी सोसलेच पाहिजे, असे उघडपणे सांगणारे, व तदनुसार वर्तन करीत राहून त्यातच आपल्या सदाचारसंपन्नतेची आढ्यता मिरविणारे, लोक आपल्या दृष्टीस पडतात; त्याचप्रमाणं प्रत्येक मनुष्याने दुसर्यावर विनाकारण भार न घालिता आपल्या उद्योगाने व प्रामाणिकपणाने आपला चरितार्थ चालवावा असे सांगणारे व त्याप्रमाणे वागणारे लोकही जगात वास्तव्य करितात. तेव्हा यातून अमुकच पक्षाचे म्हणणे खरे अगर खोटे याचा निर्णय कोणी कसा करावा ?
शास्त्रकर्ते व निबंधकर्ते यांच्या मनात आताचे हे विचार आलेच असले पाहिजेत, व एवढ्याकरिताच त्यांनी हा विषय नुसत्या मोघम शब्दांनीच सांगून ठेविला आहे. श्रुती, स्मृती, पुराणे अथवा सूत्रे या ग्रंथांतोन कित्येक गोष्टी आचारदृष्ट्या चांगल्या अगर वाईट असे स्पष्ट शब्दांनी सांगितले आहे; तथापि त्या सांगताना त्याच ग्रंथांत देशाचार, ग्रामाचार व कुळाचार पाळावे असेही सांगितल्याची अनेक उदाहरणे दृष्टीस पडल्यावाचून राहात नाहीत. शास्त्राप्रमाणे वर्तन ठेवणे याचेच नाव ‘ सदाचार ’, व त्या सदाचारापासून शान्ती, दया, क्षमा इत्यादी सद्गुणांची उत्पत्ती होते. देशाचार इत्यादिकांचे घोडे पुढे सरसावले की शास्त्र बिचारे आपोआप मागसते, व शास्त्राने निंद्य मानिलेल्या गोष्टीही ‘ रूढी ’ या प्रतिष्ठित नावाने ‘ सदाचारा ’ चे नाव पटकावितात. ही रूढी ज्यांस पसंत नसेल, ते लोक रूढीच्या अनुयायांत हीनक्रिय ( शास्त्राप्रमाणे क्रिया अथवा वर्तन न करणारे ), क्षमाशून्य इत्यादी निंजाव्यंजक शब्द लावितात.
तात्पर्य मिळून इतकेच की, परिस्थिती म्हणजे देशकालवर्तमान यास अनुसरूनच पुष्कळ गोष्टींच्या बर्यावाईटपणाचा निर्णय होत असतो. अर्थात शास्त्रवचनाने ज्या गोष्टींस काही आळा घालिता येत नाही, अशा गोष्टींसंबंधाने वधूचे कुल चांगले अगर वाईट आहे हे ठरविण्याचा निश्चित मार्ग सांगता येण्याजोगा नसल्याने त्याचा निर्णय ज्या त्या प्रसंगी ज्याचा त्यानेच करून घेत जावा, इतके सुचविण्याचा शास्त्रकारांचा स्पष्ट हेतू आहे. याच वधूविवाहप्रकरणी सपिंड संबंध नको असे धडधडीत सांगूनही ‘ देशाचारव्यवस्थेने मातुलकुलाशी संबंध करण्यास अडचण नाही ’ असा निबंधकारांनी निर्णय केला आहे, या गोष्टीत या हेतूचे स्पष्ट प्रतिबिंब पडले आहे.