स्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
भाऊ पाहिजेत : पुत्रीकरणशंकारूप हेतू : वधूला भाऊ असले पाहिजेत असे याज्ञवल्क्यस्मृतीत सांगितले आहे, त्याचे हेतू दोन आहेत. एक हेतू मागे कलम ११ येथे दाखल केलेल्या असावी अशा शंकेच्या रूपाचा आहे. या पुत्रिकाधर्माच्या कथा पुराणग्रंथांत अनेक वर्णिल्या असून त्यात “ अस्यां यो जायते पुत्र: स मे पुत्रो भवेदिति ” म्हणजे या कन्येच्या पोटी होणारा पुत्र कन्येच्या पतीस न मिळता कन्येच्या पित्याचा होईल; अर्थात त्या पुत्रावर त्याच्या खर्या पित्याची सत्ता राहणार नाही, व तो पुत्र आपल्या आजाचा वारस व पिंडदाता होऊन साक्षात पित्याच्या श्राद्धाशी अगर कुळाशी त्याचा म्हणण्यासारखा संबंध राहणार नाही;- अशा अर्थाचा करार कन्येचा पिता आपल्या जावयापासून अगोदरच करून घेत असतो.
वरीलप्रमाणे करार करून घेऊन आपली कन्या दुसर्यास देऊन टाकिल्यावर त्या कन्येच्या पोटी पुत्रसंतती झाली, तर त्या संततीच्या योगाने प्रत्यक्ष पित्याचा वंश चालू राहिला असा अर्थ होत नाही, तर ही पुत्र संतती आपल्या मातेच्या पित्याचे गोत्रनाम चालविणारी होते. मनुस्मृती अ. ९ श्लो. १२८-२९ येथे दक्षप्रजापतीने याच करारावर आपल्या दहा कन्या धर्मास ( ? यमास ), तेरा कन्या कश्यपास, व सत्तावीस कन्या सोमराजास दिल्याचा उल्लेख केला आहे. असो; एकंदरीत सांगण्याए तात्पर्य हे की, ज्या अर्थी प्राय: प्रत्येक मनुष्यास आपला स्वत:चा वंश पुढे चालत रहावा अशी इच्छा असते, त्या अर्थी पुत्रिकाधर्माच्या कन्येशी, अर्थत जिला भाऊ नाहीत अशीशी, विवाह करू नये असे शास्त्रकारांनी सांगणे हे सर्वथैव विहित आहे.
कन्यागुणवर्णनाचे मनूक्त श्लोक मागे आले आहेत, त्यांत शेवटल्या श्लोकात “ पुत्रीकरणशंकया ” असे पद घातले आहे, त्यावरून कित्येक धर्मशास्त्रग्रंथात, ज्या कन्येच्या संबंधाने ही शंका घेण्यास नको अशी खात्री होईल त्या कन्येस भाऊ नसले तरी तिच्याशी विवाह करण्यास हरकत नाही, असे सांगितले आहे.
हेतू दुसरा : हा जो हेतू सांगितला त्याचे प्राचीनकाळी फ़ार मोठे महत्त्व मानण्यात येत असे. प्रस्तुत काळी या हेतूची उदाहरणे प्राय: कोठे होत नाहीत; व जिला भाऊ नाही अशा कन्येशी विवाह करण्याचा विचार कोणी मनात आणिला असता तिची संतती तिच्या पित्याच्या वंशाकडे जाणार नाही अशी खात्री अगोदर करून घेतली म्हणजे तेवढ्याने सर्व प्रकारची अडचण निघून जाऊ शकते. परंतु या हेतूहून आणखी एक निराळा हेतू शास्त्रकारांनी सांगितला आहे, तो मात्र वैद्यकाच्या व व्यवहाराच्या दृष्टीने खरोखरी विचार करण्यासारखा व महत्त्वाचा आहे. हा हेतू मागे कलम ८ येथे मनुस्मृती अ. ३ पैकी ७ वा श्लोक लिहिला आहे, त्यातील ‘ निष्पुरुषं ’ या शब्दावरून ध्वनित होतो. या शब्दाचा निवळ व्याकरणदृष्ट्या अर्थ करू गेल्यास ‘ ज्या कुळात पुरुष नाही असे कुळ ’ एवढाच होतो, परंतु मनुस्मृतिवरील निरनिराळ्या टीकाकारांनी त्याचे पुढे लिहिल्याप्रमाणे अर्थ केले आहेत :
( अ ) “ मेधातिथी : ‘ निष्पुरुषं स्त्रीप्रसु यत्र प्रायेण कन्या जायंते न पुमांस : ’ म्हणजे ज्या कुळात बहुधा स्त्रियाच जन्म पावतात, पुरुषसंतती होत नाही ते.
( आ ) “ कुल्लूक ” : ’ स्त्रीजनकं ’ म्हणजे कुळात स्त्रियांची उत्पती होत असते असे कुळ.
( इ ) “ राघवानंद : ‘ निष्पुरुषं स्त्रीजननप्रधानं ’ म्हणजे ज्या कुळात पुरुषसंततीपेक्षा स्त्रीसंततीच अधिक होते ते कुळ.
( ई ) “ नंदन ” : ‘ निष्पुरुषं स्त्रीशेषं ’ म्हणजे ज्या कुळात पुरुषसंतती झाली असली तरी नाहीशी झाली आहे, व स्त्रीसंतती मात्र बाकी राहिली आहे, ते कुळ.
( उ ) “ गोविंदराज ” : ‘ स्त्रीजनकं ’ कुल्लूकाप्रमाणेच.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP