कुले वर्ज्य करण्याची कारणे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आताच्या या मनुवचनात निषिद्ध म्हणून वर्णिलेल्या दहा प्रकारच्या कुळांपैकी पहिले व तिसरे या कुलांबद्दलचा उल्लेख वर ८ व्या कलमात होऊन गेला आहे. बाकी दुसरे व ४ ते १० पावेतोची कुले राहिली, त्यांजबद्दल्चे निषेध स्पष्ट असून त्या निषेधांचे हेतूही बरेच उघड दिसण्याजोगे व योग्य आहेत. कारण मनुष्यप्राणी हा प्राय: सुखाभिलाषी आहे, व न्यायशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे आपल्या मनास अनुकूल अथवा प्रतिकूल वेदना देणार्या गोष्टीत अनुक्रमे सुख व दु:ख मानीत राहून तो साधेल तो पावेतो सुखकारक परिणाम साधण्याचीच खटपट करीत असतो. सुखकारक परिणाम चांगले व दु:खकारक परिणाम वाईट मानण्याची त्यांची साहजिक प्रवृत्ते असते, तथापि कित्येक प्रसंगी परिणामांचा चांगुलपणा अगर वाईटपणा तत्काळ समजून येण्यासारखा नसतो. रोगराईचे परिणाम त्यास वाईट वाटतात, व ते त्यास लौकर समजू शकतात, यामुळे ते परिणाम नकोत म्हणण्याकडे त्याची प्रवृत्ती लौकर होते.
वरील कारणांचे स्थूल व सूक्ष्म स्वरूप : कसेही असो; वधूचे कुल पसंत असले तर त्या कुलाशी संबंध जोडण्याचा विचार करावयाचा, नाही तर त्या कुलाचे नाव घ्यावयाचे नाही; हे या शास्त्रानुशेचे स्थूल स्वरूप आहे यात संशय नाही. तथापि सूक्ष्म दृष्टीने थोडा अधिक विचार करू गेल्यास या स्थूल स्वरूपाआड शास्त्रानुज्ञेचे याहूनही अधिक महत्त्वाचे तत्त्व राहात असल्याचे स्पष्ट होईल. हे महत्त्वाचे तत्त्व म्हटले म्हणजे कुलातील माणसांच्या अंगचे गुणदोष सहवासाने किंवा आनुवंशिकतेने ( पिढीजादपणे ) भावी वधूच्या अंगी येणे शक्य असते हे होय. या गुणदोषाची स्वरूपे दोन प्रकारची असावयाची. एक बाह्यस्वरूप, व दुसरे अंत:स्वरूप. याच दोन प्रकारांस वर ( १ ) बाह्यलक्षणे, व ( २ ) अंतर्लक्षणे या संज्ञा लाविल्या आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP