स्त्रीधन - सातवी मुलगी
लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब माणूस रहात होता. त्याची फार गरिबी. रोज रानांत जावं, लाकडं तोडून आणावींत, बाजारांत नेऊन विकावींत आणि मिळेल त्यावर भागवावं अशी त्याची गत. तशांतच घरांत खात्यापित्या सात मुली. एकीपेक्षां एक देखणी. त्यांचं रूप नक्षत्रासारखं. पण पोटाला मिळायची मारामार. बिचार्या रानावनांत भटकायच्या. मिळालंच तर कांहीं खायच्या. एरव्हीं सारा तिन्हीकाळ उपास.
तर एकदा काय झालं कीं, त्या गरीब माणसानं बायकोला एक गोष्ट सांगितली. म्हणाला, 'आपल्या पोरींना पुरणपोळी कर. खावी वाटतेय.' त्यावर बायकोनं विचार केला. तिनं मोजक्या सातच पुरणपोळ्या केल्या. पोरींना वाढल्या.
संध्याकाळ झाली. तो माणूस घरीं आला. पहातो तों त्याला पोळी नाहीं. त्याच्या तर ती आवडीची. तो रागावला. बायकोला मारहाण केली.
एक दिवस त्यानं विचार केला. घरांतल्या मुलींचा त्रास नको म्हणाला. सर्वांना त्यानं जंगलांत नेऊन सोडलं. वाघ, सिंह, अस्वल, रानडुक्कर त्यांना खाऊन टाकतील म्हणाला. पोरींना फुलं, फळं आणायला सांगून स्वतः निघून गेला. नाहीं म्हणायला जातां जातां त्यानं धाकट्या मुलीचा मुका घेत एवढीच बडबड केली कीं, 'ही सातवी मुलगी तेवढं नांव काढील.'
इकडे त्या साती मुली दिवसभर रानांवनांतून फिरल्या. रात्र झाली. एका ठिकाणीं जमल्या. बापाची वाट पहात राहिल्या. जमवलेली फळं फुलं बघत बसल्या. पण बाप आला नाहीं. वाट बघून कंटाळल्या नि वाट फुटेल तिकडे गेल्या.
होतां होतां काय झालं की, वाटेंत त्यांना एक जांभळीचं झाड दिसलं. झाडावर जांभळं कचकून होतीं. टिप्पूर चांदण्यांत ती दिसलीं. मोठीनं पाहिलीं. ती सरसर झाडावर चढली. तिनं एकेक जांभूळ चाखून खालीं टाकलं. सगळ्याजणींनीं तें उचलून खाल्लं. पण धाकटी तशीच राहिली. मोठीनं तें पाहिलं तिनं एक जांभूळ तोडून तिला खालीं टाकलं. स्वतः खालीं उतरली. पहाते तों तें जांभूळ मुंगी घेऊन चाललेली ! सगळ्याजणी मुंगीच्यामागं धांवल्या. पण मुंगी तशीच पुढं नि ह्या तिच्यामागं. अखेर शेवटीं मुंगीची नि त्यांची गांठ पडली ती एक राजाच्या घरांत !
सातवी धाकटी मुलगी तिथं आली तों दारात राक्षस झोपलेला. आतां काय करावं ? तिनं विचार केला. बहिणींना बाहेरच बसवून ती एकटी आंत गेली. तिथं पहातेय तो एका मोठ्या कढईत दूध तापत होतं. धाकटीनं एका भांड्यात तें रसरशीत निखार्यावरचं दूध घेतलं. हळूच बाहेर आली. राक्षसाच्या तोंडांत तिनं तें दूध ओतलं. तशी राक्षस तडफडून मेला. मग बिनघोरी सगळ्याजणी आंत आल्या. बघतात तर ऊनऊन सैंपाक तयार होता. त्यांना आनंद झाला. त्या पोटभर जेवल्या. तरतरीत झाल्या. नंतर त्यांनीं सगळा वाडा पाहिला. खूप खोल्या होत्या. प्रत्येकीनं एकेक खोली ताब्यांत घेतली. आणि आतां त्या झोपणार तर एकाएकीं देवघर दिसलं. तिकडे गेल्या. धाकटीनं देवघराचं दार उघडलं. आंत देवाची सुंदर मूर्ति. सगळ्याजणी देवापुढं बसल्या. देवाच्या पाया पडल्या. देव प्रसन्न झाला. धाकटीला म्हणाला, 'कोंड्याच्या खोलींत नीज. तुझं भलं होईल.' धाकटीला तें पटलं. कोंड्याच्या खोलींत जाऊन ती निजली. बाकीच्या दुसरीकडे गेल्या. प्रत्येकीच्या खोलींत मोतीं पोवळीं भरलेली ! धाकटीच्या खोलीत मोहरा भरलेल्या !
एक दिवस सगळ्याजणींना आईची आठवण फार आली. म्हणून मोतीं पोवळीं घेऊन घरीं जायला निघाल्या. धाकटीनं एका गोणींत मोहरा घालून वर शेणमाती शिंपली नि मग सर्वांच्या बरोबर निघाली. पण वाटेंत चोर आले. सहा जणींची धनसंपत्ति त्यांनी लांबविली. सातवीच्या वाटेला कुणी गेलं नाहीं.
सगळ्या घरी आल्या. सहाजणी रडत होत्या. धाकटी हंसत होती. तिनं बापाच्यापुढं गोणीतल्या मोहरा ओतल्या. झाली गोष्ट तिनं बापाला घडली तशी सांगितली. बापान सर्वांना घरांत घेतलं. आनंदी आनंद झाला. सातवी मुलगी नशीबवान ठरली. तिचं कौतुक सर्वांनी केलं. ज्याच्या त्याच्या तोंडीं आपलं तिचंच नांव झालं. ती भाग्यवान ठरली. तिचं सुख तें तुमचं आमचंहि होवो.
या कथेमध्यें अद्भुत चमत्कार घडून एखाद्याचें नशीब कसें उजाडतें, याची चित्ताकर्षक माहिती आली आहे. त्याचप्रमाणें चिकाटीनें वागल्यास चांगले दिवस कसे येतात याचीहि माहिती आली आहे. बापानें मुलें टाकलीं आणि गरिबीचा अव्हेर करायचा प्रयत्न केला, तरी मुलें चांगले दिवस कसा आणूं शकतात, हेंहि इथें दाखविलेले आहे. स्वतःच्या पुरणपोळीच्या स्वार्थी आवडीखातर बापानें एवढा त्याग केला, तरी मुली त्याच्यावर उलटलेल्या नाहींत, हें दाखवितांना इथें वडील माणसांच्याबद्दल आवश्यक असलेला आदर सूचित केलेला आहे.
देव प्रसन्न व्हावयाचा आणि मुंगीनें राजवाड्याची वाट दाखवून भले दिवस यायला मदत करावयाची, हा अदभुतरम्य कथा भाग इथें मोठ्या आकर्षक पद्धतीनें सांगितलेला आहे. 'आटपाट नगर होतं-' अशी ही कथेची झालेली सुरवातहि स्थळकाळातीत घडलेल्या या गोष्टीच्या जुनेपणाची साक्ष देणारी आहे. त्याचप्रमाणें शेवटीं गोष्टींतील सुख आपल्याहि वाट्यांला येवो, अशी व्यक्त केलेली आशा देखील मोठी चित्ताकर्षक आहे.
N/A
References : N/A
Last Updated : December 25, 2013
TOP