स्त्रीधन - उखाणा ( आहाणा )

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .


आपल्या रोजच्या कामाच्या व्यापामधून सणासुदीप्रमाणें जर चुकूनमाकून कां होईना माणसाला फावला वेळ मिळाला, तर आपल्या जिवाभावाच्या मंडळींशी मोकळ्या मनानें बातचीत करावाला त्याला मोठा आनंद होतो. अशा वेळीं मनांतील खरीखुरी गोष्ट इतरांच्यापुढें ठेवतांना त्याला विशेष समाधान वाटते. जणुं आपली कर्तबगारी, आपलें वैभव आपला चांगुलपणा चारचौघांच्यासमोर ठेवायची संधि मिळाल्याच्या आनंदांत, झाल्यागेल्या बर्‍यावाइटाचा सारा शीण विसरून, एकप्रकारचा मानसिक वीसांवा घेतल्याचें सुख तो अनुभवीत असतो.
विशेषतः सर्वसामान्य स्त्रियांना अशी संधी मिळाली म्हणजे मनांतील सारें चारचौघींच्यापुढें ईर्षेनें मांडण्यात त्या दंग होऊन जातात. बोलणें साधेंसुधेंच असतें आणि गोष्ट देखील जुनीच असते, पण ती नव्यानें सांगितल्याचा आनंद आगळा असतो. त्यामुळें अशा वेळीं ह्या गप्पागोष्टी एवढ्या रंगलेल्या असतात कीं, जें सांगावयाचें तें शेलक्या शब्दांत व मोजक्या वेळेंत सांगून ऐकणाराचें भान कसें हरपतां येईल, याबद्दल एकमेकींत ईर्षा निर्माण होते. एखादी बाई आपल्या मुलावर जर रागावली असेल तर सरळ सरळ तसें न सांगतां ती ठसक्यानें म्हणते, "पोराची माया मेली राखवानी आनीक आईची माया म्हनशीला तर लाखवानी!" म्हणजे आईचा राग कितीहि पराकोटीला गेलेला असला तरी मूल समोर दिसतांच तिची त्याच्याबद्दलची माया पोटांतून उफाळून वर येते आणि राग कुठल्याकुठें पळून जातो! अशा वेळीं अशा प्रकारच्या बोलण्यामुळें आपण कांहीं विशेष केल्याच समाधान त्या बाईला मिळतें आणि मग ती खूप बोलत राहते. तोंडाला येईल तें सांगत रहाते. आणी 'असे कां? म्हणून कोणीं विचारलेंच तर म्हणते कशी,"बाई ग, केसानं केलाय दावा तरी माजा जीव हाय नवा." म्हणजे वय वाढलें म्हणून केंस पांढरे झाले असले तरी माझा उत्साह अजून मावळलेला नाहीं. उलट माझी हौस अजून तरणी आहे, असें तिला मुद्दाम सांगावेसें वाटतें. अशा प्रकारच्या या बोलण्याला "उखाणा" किंवा "आहाणा" असें म्हटले जातें.
उखाणा किंवा आहाणा म्हणजे कोडें, कूटप्रश्न, म्हण, उक्ति, वचन अलंकार, यमकयुक्त वाक्यरचना इत्यादि प्रकारचा अर्थ लक्षांत घ्यावा लागतो. हे सगळे अर्थ दर्शविणारे उखाण्याचे प्रकारहि वेगवेगळे आहेत. तरी त्या सर्व प्रकारांशी आमच्या स्त्रियांनीं अतिशय जिव्हाळ्यानें संबध ठेवलेला आहे.
एखादी बाई वरून दिसायला साधीभोळी असली आणि वेळ प्रसंगी फटाकड्यांची माळ उडावी तशी भराभर उखाणा घालीत कांहीं बोलायला लागली, म्हणजे तिच्या पाठांतराबद्दल मोठा अचंबा वाटायला लागतो. जन्मांत कधीं हातांत पाटी पेन्सिल किंवा पुस्तक न धरलेली बाई अशी घडाघड कशी बोलूं शकते, याचें उत्तर चटकन् सांपडूं शकत नसल्यानें मन एक प्रकारच्या कोड्यांत गुरफटून जातें! घरच्या वडीलधार्‍या बाईनें कधींकाळीं केलेली गोष्ट केवळ ऐकून जशीच्या तशीं मनांत सांठवून घ्यावयाची आणि वेळ प्रसंगीं ठेवणींतील जिन्नसासरखी दिमाखानें बाहेर काढावयाची, म्हणजे मोठी जादू वाटते, यांत शंका नाहीं.
'जात्यावर बसलें कीं आपोआप ओवी सुचतें' असें म्हणतात तें प्रत्यक्षांत पहावयास व ऐकावयास मिळालेलें आहे. स्त्रियांच्या ओठांवर खेळणार्‍या या भावनेचें सौदर्य विलक्षण भुरळ पाडल्यावांचून राहात नाहीं. ओवीची जी गत तीच उखाण्यांचीहि. "हं, घे बाई आतां नांव" असें एखादीनें दुसरीला कांहीं कारणानिमित्त म्हटलें म्हणजे आठवणीच्या कप्प्यांतील सारी भावना उफाळून वर येते. लाजत मुरकत कां होईना बाई मोठ्या दिमाखानें नवर्‍याचें नांव घेते. अशा वेळीं खरें म्हणजे नवर्‍याचें नांव असतें साधेंच चारचौघांसारखें. पण तें आहे तसें एका शब्दांत न सांगतां त्याच्या आवतीभोंवतीं आपलें बुद्धिचातुर्यपणाला लावून अशी शब्दरचना उभी करावयाची आणि अशा ठसक्यांत त्याचा उच्चार करावयाचा कीं, ऐकणारानें थक्क होऊन तोंडांत बोट घालावें; किंवा याहिपेक्षां ईर्षेनें पुढें होत आपली कल्पना नटवून सजवून सांगायला उतावीळ व्हावे! अशा वेळीं याच ईर्षेमधून उखाणा जन्माला येत असतो.

मराठींतील उखाणा फुगडीचा उखाणा
स्त्रियांच्या आयुष्यामध्यें उखाणा घालावयास पहिल्यांदा सुरवात होते ती त्या बाळपणांतच फुगडी खेळायला आरंभ करतात त्यामुळें. सणासुदीच्या निमित्तानें अगर खेळायला चारचौघी जमल्याच्या कारणानें मुली अगर मोठ्या बायका सर्व खेळांमध्यें मोठ्या आवडीनें फुगडी खेळतात. विशेषतः मुलीबाळी थोडें जरी रिकामपण सांपडलें, तरी मैत्रिणीचा हात धरून आपल्या बोबड्या बोलंनी उखाणा घालीत फुगडी खेळतांना सर्वत्र नेहमींच दिसून येतात. अशा वेळीं ऐकलेलें असतें तें लक्षांत घेऊन त्याला तोंडाला येईल ती पुष्टी जोडतांना त्या कसलीहि त्या मुळींश ठेवीत नाहींत. एवढेंच नव्हें तर एकमेकींचें उणेंपुरें काढायलाहि त्या मुळींश भीत नाहींत! पण सारें कांहीं मोठ्या खेळीमेळींने, तिथेंच ऐकावयाचें आणि तिथेंच सोडून द्यावयाचें
एखादीनें आपल्या जोडीदारणीला जर-
"साल; म्हन साल वाभळीची साल; नीट घुंबर घाल माजी पैठनी लाल
लाल लाल लकूटा आवळून घाल कासूटा; न्हाईतर धरीन तुज्या बचूटा"
असा ठेक्यांत दम दिला, तरी त्यामुळें ती मुळींच रागावत नाहीं. पण शेराला सव्वाशेर या न्यायाप्रमाणें तिच्यावर मात करीत ती बोलून मोकळी होते-
"इकडून आली तार तिकडून आली तार, आज माझा मंगळवार बाई बोलूं नको फार."
आणि मग रुसारुशी अगर चिडाचीड न होतां सारें काहीं शांतपणें, गोडगुलाबीनें, चालू रहातें.
फूगडी खेळावयाची म्हणजे तोंडानें पिंगा घालतां आला पाहिजे आणि उखाणाहि घालतां आला पाहिजे असा एक दंडक ठरलेला असतो. त्यामुळें एकमेकींचे हात हातांत येतांक्षणींच कुणींतरी बोलून जाते-
'लाही बाई लाही भाताची लाही, मुक्याने फुगडी शोभत नाही.'
फुगडी खेळणार्‍या मुली अगर मोठ्या बायकाहि तोंडानें पिंगा घालीत घरदर अगर अंगण घुमवून टाकतात आणि तापलेल्या तव्यांत लाही फुटावी त्याप्रमाणें एकेक उखाणा दुसरीच्या तोंडावर भराभर फेंकून देतात-
(१) फुगडी खेळतांना जमीन झाली लाल जमीन झाली लाल, माझ्या संगं फुगडी खेळतीस पक्‌वा तरी घाल.
(२) फुगडी खेळूं दण्णा दण्णा, रुपये मोजूं खण्णा खण्णा, रुपयाचा घेतला देवरपाट, देवरपाट हालना, सवत माजी बोलना, बोल बोल सवती, निर्‍यांत खवती, यील मेला सांगीन त्येला, चिंचाच्या पानानं दडवीन त्येला, आंब्याच्या फोंकानं बडवीन त्येला !
अशा प्रकारचे फुगडीचे उखाणे कितीतरी आहेत. या प्रकारच्या उखाण्यामधून घरगुती जीवनांतील अनेक कल्पनांचा वापर स्त्रियांनीं केलेला आहे. तसेंच आपलें कांहीना कांहीं कल्पित वैशिष्ट्य निर्भयपणानें बोलूनहि दाखविलें आहे. त्यामुळें साथ असलेल्या गाण्याप्रमाणें या उखाण्यांच्या सहवासांत बायका मुली मोठ्या इर्षेनें आपली फुगडी घुमवीत असतात. येथें अर्थापेक्षां यमक जुळविण्याकडेच मनाचा कल अधिक असलेला दिसून येतो. खेळाच्या सान्निध्यामधूनच या प्रकारच्या उखाण्याचा जन्म होत असल्यानें अर्थपूर्णतेचें बंधन या ठिकाणीं लागूं होत नाहीं. त्यामुळें या उखाण्याचा पहिला भाग अर्थहीन असला आणि पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशीं संबंध लागत नसला, तरीहि कांहीं बिघडत नाहीं ! आणि असें असूनहि ठसकेदारपणें मनांतील गोष्ट बोलून दाखविण्यासाठीं याचा फार उपयोग होतो, हें विशेष होय. त्यामुळेंच या उखाण्यांचा जीव दिसायला लहान असला, तरी त्यांच्यात अधून मधून तिखटपणा फार येत असल्यानें त्यास 'लवंगी मिरची' असेंहि म्हणतात.

मराठींतील स्त्रीधन उखाणा (आहाणा) हुमाणा (हुमान)

फुगडीच्या उखाण्याप्रमाणेंच दिसायला एवढेसें पण अंगीं कर्तबगारी मोठी असें ज्याचें वर्णन करतां येईल असा उखाण्याचा दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे 'हुमाणा'. याचा अर्थ कोडी घालणें असा होतो. म्हणजे चार माणसें एकत्र जमलीं आणि ख्याली खुशालीच्या गोष्टी चालल्या, म्हणजे एकमेकांच्या बुद्धीचें माप घेतांना प्रश्नोत्तरामध्येंच सर्वांना बोलावयाचे. या प्रकारचा उखाणा लहान मोठ्या सर्व माणसांना घालतां येतो. केवळ मुलीबाळी आणि मोठ्या बायका यांनाच तो येतो असें नसून क्वचित प्रसंगीं पुरुषमंडळीहि या प्रकारच्या उखाण्याचा उपयोग करीत असतात.
पुष्कळदां असें होतें कीं, रोजच्या व्यवहारामधील बोणणें देखील उखाण्यां मधूनच करावयाची संवय कांहीं लोकांना, विशेषतः स्त्रियांना असते. या नेहमींच्या वापरांतील उखाण्यांच्यामधील वर्णन इतकें सुंदर केलेलें असतें आणि एवढें ओळखीचें वाटतें कीं, त्यावरून उत्तर सहज सांपडावे! पण ही भाषा सरावांत नसेल तर हें उत्तर चटकन् सांपडत नाहीं. एवढेंच नव्हें तर पुष्कळ वेळ विचार करूनहि समाधानकारक अशी त्याची दाद लागत नाहीं! मात्र हुषार मनुष्य या उखाण्यांतील शब्दांच्या रेखीव मांडणीवरून ताबडतोब उत्तराचा अंदाज बांधूं शकतो.
एखादी बाई जर एखादेवेळीं सहज कुणाजवळ तरी असें म्हणाली कीं, "एवढंसं कार्टं पण घर कसं राखतं!" तर ऐकणाराला चटकन् वाटतें कीं, असेल एखादें मूल घरीं तेव्हा म्हणतेय तशी. पण नाहीं. तिला निराळेंच सांगावयाचें असतें. म्हणूनच बोलण्यापूर्वी तीं अगोदरच बजावतें, "हुमान घालतीया हं?" आणि तरीसुद्धां सराव नसलेल्या माणसाच्या चटकन् तें लक्षांत येत नाहीं! पण खेड्यांतील लोकांच्या वापरांत असलेल्या या 'हुमना' चा अर्थ स्पष्ट केला म्हणजे मग कळून चुकतें कीं, ती बाई दाराला लावलेल्या कुलुपाला उद्देशून तसे म्हणत होती!
हा हुमाणा शहरापेक्षां खेड्यांतील लोकांच्याच तोंडांत अधिक आहे. त्यांपैकीं मला मिळालेले कांहीं हुमाणे त्यांच्यापुढें दिलेल्या कंसांतील उत्तरासह असे आहेत-
(१) पांढरं वावर काळं बीं चतुर म्हणतो पेरीन मी. ( लेखक )
(२) एवढसा पक्षी पण कठीण फळं भक्षी. ( अडकित्ता )
(३) पांढरं देऊळ त्याला वाटच नाहीं. ( अंडें )
(४) ऊंच ऊंच बंगला, शिपाई टांगला. ( नारळ )
(५) तीन पाय त्रिकोनी, एक पाय गंगनीं, असा राजा पराकरमी, सर्व झाडांला घाली पानी. ( कुत्रें )
(६) काळी कुत्री नि डोंगर उतरी. ( फणी )
(७) बाजारांतून आणायचं नि पुढं घेऊन रडायचं. ( कांदा )
(८) ताडकन् तोडलं नि भिंतीला जोडलं. ( शेंबूड )
(९) आरदार बैल त्येची मान गरदार, दिल्लीला जातो पन पान्याला भितो. ( कागद )
(१०) धा मानसांत गोष्ट सांगावी खरी, बापाविना पुत्र जलमला आई पन नव्हती घरीं. ( लव्हाळा )
(११) आगदाणी बागदाणी, बागेंत पडल्या चौघीजणी, हिरवं लिंबू कुंकवावाणी. ( नागवेलीचा पानविडा, पोपट.)
(१२) साता समींदरांच्या पल्याड रामानं केला भात, आनीक एकेक शीत नऊ नऊ हात. ( शेवया )
(१३) साता समींदराच्या पल्याड रामानं केली रोटी, आनीक एकच गरब दोंगीच्या पोटीं. ( शिंपला )
(१४) सरळ सरळ खोप, त्यावर हजारों लोक. ( जोंधळ्याचें कणीस )
(१५) आट आटुकलीं, बारा पिटुकली, जमिनीनं केला जोर, बिब्बी नाचीवतीया मोर. ( रहाट, घागर, पाणी )
(१६) खोल्यांत खोल्या सात खोल्या, मदल्या खोलींत मोतीदाना, हुमान बळकील त्यो लई शाना. ( डाळींब )
(१७) झाडावर झरा, तोडाय येतो पर प्याला येत न्हाई. ( नारळ )
(१८) चंदनाच्या झाडाखालीं जेवण केलं, सोन्याची अंगठी विसरून गेलं. ( विस्तव )
(१९) अत्री अत्री झाड, कात्री कात्री पान, हुमान माजं वळीक न्हाईतर तुला मसूबाची आन ( एरंड )
(२०) आटंगा पटंगान, जेजूरीचं रान, बत्तीस पिपळाला एकच पान. ( जीभ)
(२१) अगाड बगाड, नाहींस दगाड, संबू शेटे, लांब दोर्‍या; पदम गांवच्या बायका गोर्‍या. ( शेवया )
(२२) न्हवं चंद्र, न्हवं इंद्र, शाई जाळीचा मासा, वेड्यानं घातलं हुमान, शान्याला पडला फासा. ( टोळ )
(२३) एवडीशी न्हनूबाई, सार्‍या गांवाच्या आदीं बोनं खाई. ( माशे )
(२४) एवडीशी न्हनूबाई, सार्‍या वाटेनं गीत गात जाई. ( घंटी )
(२५) कन कन कुदळी, मन मन माती, चंद्र उगावला मध्यान रातीं. ( उंबराचें फूल )
(२६) हत्ती वानी तुमी, नकावानी आमी, आनीक मस्करी केली तर रडतां का वो तुमी? ( विंचू )
(२७) आधीं होती साधी भोळी, मग ल्याली हिरवी चोळी, मग आली रंगाला, हात लावूं देईना अंगाला, मग ल्याली तापता, जन लोक चाखतां. ( मिरची )
(२८) आभाळांतून पडली धार, त्याच्या कचेरीला लागली ठेंच, असं पांखरूं दाणा वेचून खातं, त्याच्या काळजाला केस. ( आंबा )
(२९) झाडावर आहे पण पक्षी नव्हे, तीन नेत्र पण शंकर नव्हें, भगवी वस्त्रें पण संन्याशी नव्हे, नव्हे इंद्र, नव्हे चंद्र, नव्हे पृथ्वीचा राजा; जो माझा उखाणा जिंकील त्याला देईन जिलेबीचा घास ताजा. ( नारळ )
(३०) इकडून आले खेडकर, तिकडून आले बेडकर, खेडकर विचारतात बेडकराला, कशी काय खबर! खबर मोठी जबर, दोन्ही आण्या कोंवळ्या, मधीं निबर. ( त्रिकाल )
अशा प्रकारचे हे उखाणे ( हुमाणे ) कितीतरी आणखी असतील. मोजायला गेलेंच तर त्यांची संख्या सांगतां येऊं नये एवढे अमाप! साधें बोलणें नाहींच. ह्याचाच सतत वापर . त्यामुळें कंहीं माणसांच्या जिभेवर असें बोलणें अखंड नाचत असलेलें दिसतें.
ह्या उखाण्यांची एकंदर घडण आणि कंसामध्यें दिलेलें त्यांचें उत्तर मोठें मजेदार आहे यांत शंका नाहीं. अशिक्षितांच्या बुद्धिवैभवाचा हा दिमाख मोठा आगळा तर खराच, पण शहाण्यांना माघार घ्यायला लावणारा आहे! त्यामुळें त्यांच्या बुद्धीची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. अडाणी मनांतील शहाणपणाचा हा एक सुंदर आरसा आहे! स्त्रियांना आपल्या जीवनांत सैंपाकांतल्या मीठमिरचीप्रमाणें हरघडी त्यांचा उपयोग होत असल्यानें त्यांच्या मनांतील हरेक भावनेला इथें वाचा फुटली आहे. त्यामुळें त्यांच्या संभाषणाला चव तर आलींच आहे; पण मराठीला देखील हा एक घनसर अलंकार मिळालेला आहे, यांत शंका नाहीं.

मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) साधा उखाणा

स्त्रियांनीं व पुरुषांनीं ( पतिपत्‍नींनीं ) नेहमीच्या व्यवहारांत एकमेकांचे नाव उच्चारावयाचें नाहीं, अशी एक परंपरागत चाल पडलेली आहे. स्त्रीनें पतीचें नांव उच्चारावयाचें म्हणजे त्याचें आयुष्य कमीं होतें, अशी कल्पना रूढ झालेली आहे! त्यामुळें 'इकडून येणं झालं' 'इकडची स्वारी म्हणाली' अशा प्रकारें नवर्‍याबाबत बोलण्याची पद्धति पूर्वीं असे. तथापि प्रसंगविशेषीं नवर्‍याचें नांवाभोवतीं गमतीदार शब्दरचना करून मग त्याचें नांव घ्यावयाचें असा प्रघात आहे. पुरुषांचे बाबतींतहि हेंच आहे. अलिकडे काळ बराच बदलेला असल्यानें व शिक्षणाचा प्रसार बराचसा झाला असल्यानें, उखाणा घालून एकमेकांचें नांव घ्यावयाची चाल पूर्वीच्या मानानें मागें पडत चालली आहे. परंतु महाराष्ट्रांत अद्यापहि सर्वसामान्य मनाला ती न पटल्यानें उखाणा घालावयाची पद्धत अस्तित्वांत आहे.
उखाणा घालून पतीचें नांव घ्यावयाचें म्हणजे मोठी कौशल्याची गोष्ट असते. सर्वांनाच ती चांगली साधते असें नाहीं. त्यामुळें 'नांव घ्यावयाचें' म्हणजे जणुं परिक्षेची वेळ मानली जाते!
सामान्यतः सर्वसामान्य स्त्री दोन अडीच ओळींचा अगर फार फार तर तीन ओळींचा उखाणा घेऊन आपलें वैशिष्ट्य प्रकट करण्याचा प्रयत्‍न करीत असते. या प्रकारच्या लहानशा उखाण्यास 'साधा उखाणा' असें म्हणतात. या प्रकारचे कांहीं उखाणे असे आहेत-
१. लवंगी वाडी बदामी बंगला * * * रावांच्या प्रपंचांत जीव माझा रंगला.
२. मोठे मोठे डोळे पहाण्याची खुबी * * * रावांची मूर्ति माझ्या नजरेसमोर उभी.
३. वडिलांनी शिकविली विद्या, आईनं शिकवलं गृहशिक्षण * * * रावांची विद्या हेंच माझें भुषण.
४. नको गोट, नको तोडे, नको मोतीं माणीक * * * रावांच्या जिवापेक्षां कांहीं नको आणीक.
५. विद्येनं विभूषित, विनयानं साजे * * * रावांची कीर्ति जगभर गाजे.
६. चांदीच्या भांड्यांत केशराचें पाणी * * * रावांच्यासारखा शहाणा नाहीं कोणी.
७. अप्सरा मेनकेच्या पोटीं जन्मली शकुंतला * * * रावांचे गुण बघून अर्पण केले मला.
८. हिंदमातेच्या हिंदुस्थानांत, उभी होतें सज्जांत, * * * रावांचें नांव घेते काँग्रेसच्या राज्यांत.
९. रामराज्यांत मारले बाण, कृष्ण राज्यांत खाल्लें दहीं * * * रावांच्या राज्यांत करतें मी सही.
१०. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान * * * रावांचं नांव घेतें राखतें सर्वांचा मान.
११. शीतल चांदणं पडलं रामाच्या रथांत * * * रावांच्या मी आहें संसारत सुखांत
१२. कुलीन कुलांत जन्मलें, सुशील कुलांत आलें * * * रावांच्या जिवावर भाग्यशाली झालें.
१३. संसार सुखी सागरांत पति पत्‍नींची नौका * * * रावांचं नांव घेतें सर्वजण ऐका.
१४. संसार सुखी सागरांत पतिपत्‍नींची होडी * * * रावांचें नांव घेतें ठेवा जन्माची गोडी.
१५. शंकर पार्वती बसली कैलासावर, गणपति बसला अंकावर * * * रावांचं तेज झळके माझ्या कुंकवावर.
१६. निळ्या निळ्या आकाशांत उगवला शशि * * * रावांचे नांव घेतें बारशाच्या दिवशीं.
१७. चैत्र वैशाखांत वसंतऋतु येतो * * * रावांच्या मुलाबाळांत सहज वेळ जातो.
१८. संध्येच्या पळीला नागाची खूण * * * रावांच नांव घेते * * * ची सून
१९. पेटी वाजे तबला वाजे सुंदर वाजे वीणा * * * रावांचे नांव घेतें वंदेमातरम् म्हणा.
२०. विसाचे साडी तिसाचा पदर * * * रावांच्या नांवाला हळदीकुंकवाचा गजर.
२१. पेरूच्या झाडावर राघू पाकळला * * * रावांचं नांव घेते चंद्र सूर्य झाकळला.
२२. यमुनेच्या तीरीं कृष्ण करतो नाच * * * रावांना आयुष्य मागतें शंभरावर पाच
२३.चंदनाच्या पाटाला रुप्याच ठस * * * राव वर बस मला किष्णत सारकं दिस, आनीक मला लाजत्याली बगून वरचा चांदसूरव्या हंसं
२४. चहा देतें करून, पेरू देतें चिरून, केळीची काढतें साल * * * रावांच्या जिवावर कपाळीचं कुंकूं लाल.
२५.गळा भरला ठुशीनं, हात भरला गोटपाटल्यानं * * *  रावांचं नाव घेतें सर्वांच्या खुशीनं
२६. तांब्यावर तांबे ठेवले वीस, मधल्या तांब्यांत घावला रस * * * रावांच्या पटक्याला मोत्याच घस.
२७. घट्ट घट्ट दह्याला उत्तम चमचा * * * रावांचं नांव घेतें आशीर्वाद तुमचा.
२८. चांदीचं कारलं सोनारानं घडीवलं * * * रावांचं नाव घ्याला दिवाणसाबांनीं अडीवलं
२९. हिरवं लुगडं पानाचं, हळदकुंकू मानाचं * * * रावांच्या राज्यासारखं राज नाहीं कुणाचं
३०. वज्रटिकीचा गोंडा कळाबुतीनं आवळला * * * रावांचं नांव घेतें चंद्रसूर्व्या मावळला.
३१. चांदीच्या ताटांत फणसाचे गरे * * * राव दिसायला बरे पण वागतील तेव्हा खरे.
३२. काळी चंद्रकळा आडकली तोड्यांत * * * रावांचं नांव घेतें बाळंतिणीच्या वाड्यांत
३३. मागंपुढं गोट पाटल्या मधें भरतें केरवा * * * राव मुंबईला गेले परवा तेव्हा शालू आणला हिरवा.
३४. हिरवं लिंबू गारसं * * * रावांच्या बाळाचं आज आहे बारसं
३५.चांदीच्या ताटांत बदामी हलवा * * * रावांचे नांव घेतें वडील माणसं बोलवा.
३६. पेढ्यांचा पुडा सातारच्या बाजारीं * * * रावांची खुर्ची साहेबांच्या शेजारीं.
३७. समोरच्या दिवळींत होती लोणच्याची फोड * * * रावांना डोळे वटारायची लई वाईट खोड.
३८. महादेवाच्या पिंडीवर बेल वहातें ताजा * * * रावांचं नाव घेतें पहिला नंबर माझा.
३९. खंडीभर सुपार्‍या मापून घ्या काय जोकून घ्या पण * * * राव तुमचा विड्याचा नाद तुमी सोडून द्या.
४०. चांदीच्या डबींत अत्तराचा बोळा * * * रावांचं नांव घेतें शंभर रुपये तोळा.
४१. काळी घोडी कर करी, नेऊन बांधली सरकारी, सरकारनं दिली सरी, आत्याबाईंना केले गोट, मला केल्या पाटल्या * * * रावांच्या मंदिलाला हिरकण्या दाटल्या.
४२. सुपभर सुपारी मोजूं कशी, गळ्यांत ठुशी वाकूं कशी, पायांत पैजण चालूं कशी, आत्याबाई बसत्यात तुळशीपशीं * * * रावांचं नांव घेतें पोथीच्या पूजेपाशीं
४३. काळी करुळी दाजीबाची आरूळी; तेलच्याची चवड, नंदाव्याची दवड; तेलच्याची पाटीं, नणंदेची दाटी; ताकाचा डेरा, आत्याबाईचा फेरा, रुप्याची माडी, पाटलाची उडी, * * * रावांच्या हातांत शंभराची घडी.
४४. पांचशेंची बैलं, चारशेंच्या झुली * * * रावांचं नांव घेतें मी सदाफुली.
४५. अड्याल डोंगर पड्याल डोंगर, मधीं चुरमुर्‍याचा भारा * * * राव मला चमकी बांगडी भरा, न्हाईतर दुसरी बायकू करा.
४६. वाटेवर होती बोर, तिला आला मोहोर * * * रावांच्या जिवावर मी झालें चंद्रकोर.
४७. आदघर मदघर, मदघरांत होता खांब, खांबाला आला घाम * * * राव आतां लवकर उठा बैल गेली लांब.
४८. तारामती राणी, हरिश्वद्र राजा, रोहिदास पुत्र * * * रावांच्या जिवावर मी घालतें मंगळसूत्र.
४९. कुरुंदची सहाण, चंदनाचं खोड * * * रावांचा शब्द अमृतापेक्षां गोड.
५०. हिरवा पांचू चमकतो पोतांत * * * रावांचं नांव घेतें सासरच्या गोतांत.
सामान्यतः बहुतेक स्त्रिया अशा प्रकारचे उखाणे घालून पतीचें नांव घेत असतात. अशा प्रकारचे उखाणे आणखी शेकड्यांनीं सांपडतील. पण त्यांचा तोंडावळा कळून येण्यासाठीं वरील उखाणे पुरेसे आहेत. आपल्या प्रिय पतीची थोडक्यांत ओळख करून देण्याची ही पद्धत आटोपशीर तशीच मनोहरहि आहे. मनांत आलें तें यमक जुळवीत सांगून टाकलें असा हा प्रकार आहे. तथापि वेळ प्रसंगाप्रमाणें इथें समयसूचकताहि भरपूर आलेली आहे. सामान्य स्त्रीचें भाषाज्ञान व मांडणी आणि तिच्याजवळचा धीटपणा हें सर्व यावरून आजमवतां येतें.
या लहान उखाण्यांमधून त्या त्या वेळची सामाजिक चालरीत, घरांतील सासुरवाशिणीचें स्थान, तिची अपेक्षा, नवर्‍याबद्दलचें तिचें प्रेम इत्यादींची माहिती मोठ्या कौशल्यानें आलेली आहे. त्यामुळें आपली सगळी अक्कल खर्च करून आपण नवर्‍याचें नांव ईर्षेनेंच आपण सुंदर उखाणा घालीत घेतों, अशी बायकांची समजूत झालेली असते.
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) जानपद उखाणा

खेडोपाडींच्या अशिक्षित बायका आपल्या पतीचें नांव कांहीं प्रसंगानिमित्त घेतेवेळीं जो लांबलचक उखाणा घालीत असतात त्यास "जानपद उखाणा" असे म्हणतात. शहरामध्यें असा उखाणा सहसा आढळत नाहीं त्यामुळें कुणीं कुणीं यास "कुणबाऊ उखाणा" असेंहि म्हणतात. एकमेकींच्या आठवणींच्या कुपींत पिढ्यान् पिढ्या जतन केलेल्या या उखाण्यांत स्त्रियांचें खेडवळ मन अगदीं एकजीव झालेलें दिसून येतें. त्याचप्रमाणें या उखाण्यांमधील वर्णनें व कल्पना चातुर्य बघून ह्या बायकांना एवढें सुचलें तरी कसें याचा मोठा अचंबा वाटायला लागतो!
"झुण् झूण् झुण्यांत, बसलें मेण्यांत, खणचोळी अंगांत, शेंदूर भांगांत, जायफळ वाटींत, लवंगा मुठींत, सोन्याची किल्ली, चांदीचं कुलूप, हातीं दिली किल्ली, उघडली खोली, खोलींत हुते हंडे सात, हांड्यांत हुती परात, परातींत भात, भातावर वतलं तूप तुपासारंक रूप, रुपासारका चिरेबंदी वाडा, चंद्रभागेला पडला येडा * * * राव आतां तुमी काम सोडा पण आधीं मला म्हायाराला धाडा."
माहेरी जाण्यासाठी उतावीळ झालेल्या जुन्या काळच्या सासुरवाशिणीची ही भावना आहे. आणि त्यावेळच्या चालीरीतीनुसार ती या प्रकारें कशी व्यक्त झालेली आहे. हेंहि पाहाण्यासारखें आहे. आपल्या घरचें वैभव बोलून दाखवतांनाच माहेरची ओढदेखील विलक्षण असल्याचें ही सासुरवाशीण इथें सांगते आहे.
"झुनुक झुनुक जात होतें, खिडकीवाटें पहात होतें; तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, उभी राहिलें अंगणीं, हातीं दिलीं कंगणीं; उभी राहिलें तुळशीं, हातीं दिली कळशी; उभी राहिलें न्हाणी, हातीं दिली फणी; उभी राहिलें दारांत, हाती दिली परात; उभी राहिलें कोनांत, हातीं दिली बनात; बनातीवर खेळं तान्हं बाळ, बाळाच्या हातांत चांदीची डबी, डबींत होता पैका * * * रावांचं नांव आनंदानं घेतें सर्वजण चित्त देऊन ऐका."
या उखाण्यामध्यें घरांतील हालचाल सांगितलेली आहे. माहेरीं गेल्या नंतर काय काय घडलें त्याची ही हकीकत आहे. जरूर त्या सर्व प्रकारच्या गोष्टी घडून आल्यानें नांव घेण्यास आनंद वाटत असल्या़ची शेवटीं आलेली हकीकत मोठी मजेदार आहे.
"आडभिंत पडभिंत पडभिंतीला हुती दिवळी, त्यांत ठेवलेवते बक्षी गहूं, बक्षी गव्हाच्या पोटीं जन्मले तिरसिंगराव, तिरसिंगराव म्हनत्याती नगराला जाऊं, नगरांची भिंगरं, भिंगराचीं काचरं, सोलापुरांत घेतलीं धोतरं, पंचवीस रुपयांची घेतली गाडी, गाडीचा झाला चक्काचूर, पुढं लागलं मिरच्यापूर, मिरच्यापुरांत घेतला जोडा, कोरेगांव ठेसन सांगत्यात उजगाराला, बांदा भाकरी चला जाऊंया रोजगाराला, रोजगार न्हाई केला, तीन दिवस तसंच कटल, मग एका भाकरीचं घेतलं पीठ, भाकरी कराय काय यीना नीट, भाकरीला लागतंया दूध, मग लगीच येतीया भाताची सूद, माता झालीया बरी, भाकरी आली खरी, खानावळ खावी परघरीं, वाळ्याचा तांब्या, ओसरीला ठेवला पाडाचा आंबा, म्हादेवाला वाहिला, पोळ्याचं जेवान सासुरवाडीला जेवल, अस्तुरी मावसभैनीला भेटल, पुन्याच्या पारावर बरनी आली समईची आनीक * * * राव मला हवा सांगत्यात म्हमईची."
एखाद्या हटवादी अगर अजागळ गप्पीदास नवर्‍याची थट्टा करावी म्हणुन केवळ गमतीदाखल हा उखाणा बायका नांव घेतेवेळीं घालतात आणि मग खूप हंसत बसतात. घरांमधील कोनाड्यांत ठेवलेले बक्षी गहू खाऊन लहानाचे मोठे झालेले तिरसिंगराव  प्रवासाला निघतात आणि मग काय काय घडतें, त्याची मनोरंजक हकीकत इथें देण्यांत आलेली आहे. हाच उखाणा पुढीलप्रमाणें कुठें कुठें थोड्या वेगळ्या पद्धतीनें असाहि घालण्यांत येतो-
"आडभिंत पडभिंत, पडभिंतीत देवळ, तित जलामल पांजण भाऊ, त्यांत एक निगाला तिरसिंगराव, त्यो म्हनतो नगराला जाऊं नगराची भिंगरं, सोलापुरांत घेतलीं धोतरं, पुढं आलं मिरच्यापूर, मिरच्यापूरच्या आठसापूरची बंडी, बंडीचा साचा, रत्‍नागिरीचा काचा, काच्याची काय वाट, म्होर आस्तुर्‍या आल्या दाट आस्तुर्‍याचा पडला येडा, गारदौंडत घेतला जोडा, केडगांवचं ठेसान, सांगतें उजगार्‍यांनीं रोजगार केला जैनसैन, घरची अस्तुरी मावसबहिन, आंबा पाडाचा महादेवाला वाहिला, उठा उठा * * * राव पुणें देश पाहिला न् वाई देश राहिला."
त्या त्या भागाप्रमाणें गांवांचीं नावें बदलावयाचीं आणि एखाददुसरी नवी कल्पना जोडावयाची या पलीकडे या उखाण्यामध्यें फारसा फरक पडत नाहीं. आणि तो पडलाच तर मग तो घालणार्‍या बाईला इतर बायका विचारतात, "कोन गांवची पाव्हणीबाई?" आणि मग प्रश्नोत्तरें होऊन त्यावर चर्चाहि करतात.
"तार पुण्यांत केली, बातमी मुंबईत गेली, तिकडून आगीनगाडी आली, बोरीबंदर लाईनला गेली, बोरीबंदर लाईनला झाडी मोठी दाट, नीट कराडाची वाट, कराडांत दोनी मनूर्‍याची जोडी, तितनं लागली किष्णा थडी, किष्णाथडीची हवा पहा, ठेसनं लागली सहा, पुढं कोळशाची भट्टी पेटली, कळ कोपर्‍याला दाटली, नीट बल्लारी गांठली, तितनं गाडी बेळगांवला गेली, बेळगांवांत बदली खल्लास झाली, तितनं गाडी कोलापूराला जाती, कोलापूरला प्रदक्षिणा घालून पंढरपुरला जाती, पंढरपुरांत देवाचं दर्शन घेती, उभी येऊन पुन्यांत रहाती, चहा कप घेती, सरकारनं केलीया बहुत कीर्ति * * * रावांचं मुख बघून तहान भूक हरती."
महाराष्ट्रामध्यें आगगाडीचा प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवास करणार्‍या नवर्‍यानें कुठें कुठें प्रवास केला आणि काय काय पाहिलें, याची हकीकत या उखाण्यमध्यें सांगितलेली आहे. आगगाडी आणुन सरकारनें मोठी कीर्ति मिळविली, हा या उखाण्याचा शेवटहि वरील हकीकतीबरोबरच मोठा मनोरंजक तसाच खरी वस्तुस्थिती दर्शविणारा आहे. खेरीज आगगाडीच्या नव्या सुधारणेनें समाजिक जीवनामध्यें घडून आलेल्या बदलाचा इतिहास दर्शविणाराहि आहे. यांत शंका नाहीं. सामान्य मनानें नव्या सुधारणेंचें केलेलें स्वागत म्हणून हा उखाणा उल्लेखनीय ठरेल. एक साधी गोष्टच खरी. पण सरळ सांगावयाची ती जुन्या उखण्यांच्या गोवून दिल्यानें सर्वांच्या तोंडी व्हायला सोपी झालेली आहे! तसेंच जुन्या उखाण्यांच्या जोडीलाच नव्या उखाण्यांची भर कशी पडत जाते, हें पहाण्याच्या दॄष्टीनें उदाहरण म्हणूनहि हा उखाणा अवश्य पहाण्यासारखा आहे.
"चांदीचं घंघाळ आंगुळीला, जरीकांठीं धोतर नेसायला, चंदनाचा पाट बसायला, केशरी गंध लावायला, भागवत वाचायला, दिल्लीचा आरसा पहायला, समई मोरची, चांदीचे गडवे पेले, आंत गंगाभागिरथीचं पाणी, राजगिरी अत्तर, सुगंधी वासाचं तेल उदबत्त्याची झाडं, रांगूळी पुढं, पांची पक्वान्नांचं भोजन जेवायला, वर तरेतरेच्या कोशिंबिरी, सतरंजीची शोभा, पान पिकलं पुण्याचं, चुना लोणावळ्याचा, कातगोळ्या धारच्या, वेलदोडे इंदूरचे, जायफळ नगराचं, जायपत्री मद्रासची, चिक्कनसुपारी सोलापुरची, एवढं सामायन विड्याचं, ताट बिल्वराचं घुंगराचा आडकिता बागनीचा, उषा किनकापाच्या, हांड्या झुंबरांचा लकलकाट, समया लावल्या तीनशें साठ * * * रावांच्या जिवासाठी मी ह्यो केला थाट!"
आपल्या घरी एवढें ऐश्वर्य असो अगर नसो पण चारचौघींच्या समोर आपल्या घरचा रुबाब मोठ्या ईर्षेनें मांडण्यासाठीं हा उखाणा नांव घेतेवेळीं बायका घालतात. श्रीमंती बरोबरच देशाचा भूगोलहि या ठिकाणीं सांगण्यांत आलेल आहे! कुठें कुठें काय होतें तें सर्व गोळा करून घरीं आणतांना एवढ्या लांब लांब आपलें स्नेह गुंतले आहेत, असा दिमाखहि इथें खुबीनें सूचित करण्यांत आलेला आहे. हाच उखाणा थोड्याफार फरकानें कुठें कुठें असाहि आढळून येतो.
"चांदीचं घंगाळ पाणी विसणायला, रुप्याचा गडवा पाणी प्यायला, पिवळा शालू अंग पुसायला, जरीकांठी धोतर नेसायला, फिरके पाट बसायला, सान येवल्याची, खोड बडोद्याचं, पिकलं पान पुण्याचं, लवंग काशीची, चुना कळीचा, आरसा विलायतचा, पंढरपुरीं श्री भरला बाजार, रुपये लागले हजार, त्यांतली उरली दमडी, दमडीच्या घेतल्या करड्या, करड्याचा भरला घाना, घान्याची लावली डीकमाळ, डीकमाळेची हवा, पलंग घेतला नवा * * * रावांचं नांव घेतें लक्षांत ठेवा."
या उखाण्यामध्यें मागच्या उखाण्यापेक्षां वारकरी वृत्तीचा आणि पंढरपूरच्या बाजाराचा उल्लेख अधिक आला आहे. तथापि उखाणा घेणार्‍या बाईची ही मानसिक वृत्ति सोडून दिली, तर नवर्‍याचें वैभव सर्वांच्यापेक्षां उठून दिसावें म्हणून चाललेली धडपड मात्र सारखीच आहे. घरगुती वैभव बोलून दाखविण्याची ही पद्धत त्यामुळेंच विलोभनीय झालेली आहे.
"उभी र्‍हाइली सवाष्णींच्या मेळ्यांत, गुलाबाचं फूल माळ्याच्या मळ्यांत, नवरत्‍नांचा हार सासूरबाईच्या गळ्यांत, सासूबाईच्या पोटीं जन्मला हिरा, मामाजींच्या मंदिलांत मोत्याचा तुरा, मी पुजतें तुळस, कळस सोन्याचा खांबी, पाडगुडीचा आंबा, नाजूक केळीचा गाबा, हाय साक्षीला उबा, डाव्या ढोळ्याचा रोक, कमरला करदुर्‍याचा गोफ. वर हाय निर्‍याचा झोक बोलनं तरी कसं बोलतें गालांतल्या गालांत, इचारत्याती आईन म्हालांत, आईन म्हालाची नक्कल किती, बत्तीस गांवचा कारभार हातीं, हजारांची बांधली हवेली, हवेली ताडमाड, परसदाराला काडला आड, आडावर रामफळीचं झाड, साकार एकडाव फिक्की पडल पन * * * रावांचं नांव लई ग्वाड,"
या उखाण्यामध्यें नवर्‍याचें सर्वप्रकारचें वर्णन आलेलें आहे. घरच्या माणसांतील त्याचें स्थान, त्याचें सौंदर्य, त्याचा पोषाख, त्याचें बोलणें चालणें घरचा महाल, मोठी हवेली, परसदारींच्या आड वगैरे वगैरे सर्वा गोष्टी इथें मोठ्या हौसेनें वर्णन केलेल्या आहेत. त्यामुळें हा उखाणा ऐकणार्‍या बाईला वाटतें कीं, आपल्या घरचें हेंच सौंदर्य आपण जरूर सांगितलें पाहिजे! आणि मग त्याच ईर्षेनें ती याहिपेक्षां उत्तम उखाणा घालून नांव घ्यायला स्वखुशीनें राजी झालेली दिसून येते.
"वट सावित्रीचा पुजतें वड, बेंदरानं केला चड, बेंदराची घेतें काव, नागपंचमीचा पुजतें नाग, नागपंचमीच्या दिंडची करतें न्हयारी, आली गवराय गणपतीची स्वारी, गवराय गणपतीला वहातें दुर्वा, गवराय गणपतीची घेतें दोर, आल म्हळाच महिन म्होर, म्हाळाच्या महिन्याची निवडतें डाळ, आली घटाची माळ, घटाच्या माळला देतें गांठी, शिलंगनाची झाली दाटी, शिलंगनाचं घेतें सोनं, दोन दिवाळ्यांनीं केलं येनं, दोनी दिवाळ्यांची पाजळतें पंती, आली संक्रांत नेनती, संक्रांतीचं पुजतें सुंगड, आली माही पूनव जुगड, मोही पुनवेची पुजतें वोंबी, शिमगा खेळे झोंबी, शिमग्याची करतें पोळी, पुढं रंगपंचमी आली, रंगपंचमीचा उधळला रंग, पाडवा आला टोलेजंग, पाडव्याची उभारतें गुडी, आखितीन मारली उडी, आखितीचा पजतें करा, आनिक दिवाळी दसरा होस्तोवर जरा दम धरा, मगच * * * रावं येईन मी तुमच्या घरा, न्हाईतर माघरीं फिरा!"
हाच उखाण कुठें कुठें असाहि घेतात-
"कांडुन कुटून केला पोळा, पंचीमबाईनं उगडला डोळा, पंचीमबाईचा पुजतें नाग, गौराबाईला आला राग, गौराबाईचं काडतें चित्र, पुढं आलीं भादवी पित्रं, पित्राची निवडतें डाळ, पुढं आली घटाची माळ, दसर्‍याचं घेतें सोनं, दिवाळी बाईनं केलं येनं, दिवाळीबाईची लावतें पणती, संक्रांत आली नेणती, सक्रांतीचं पुजतें सुगड, म्हाई पुनव आली दुगड, म्हाई पुनवेची ओंबी, शिमगा खेळ झोंबी, शिमग्याची करतें पोळीं, रंगपंचमीं आली खेळी, पंचमीचा करतें रंग,पाडवा आला टोलेजंग, पाडव्याची उभारतें गुढी, आखितीनं मारली उडी! आखीतीचा पुजतें करा * * * रावांचं नांव मी एकडाव सोडून धा डाव घेतें, पर आदीं गलका बंद करा !"
आणि कुणीं कुणीं हीच हकीकत पुढीलप्रमाणेंहि उखाण्यांत गोवून सांगतात-
"शिराळ गांव शार, भवतन बारा वेशी, बारा वेशीला बारा बुरुज, बारा बरूजाला बारा तळीं,आंत एकशेंसाठ बळीं, बळीच्या तोंडांत मोत्यांचा चारा, नवास करतें शंकर सारा, नवसाला धाडतें पत्र, पंचमीला काडतें चित्र, पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेतें दोर, आलं शिलंगान म्होरं, शिलंगनाचं सोनं घेतें ताटीं, दुई दिवाळीनीं केली दाटी, दूइ दिवाळीचं न्हातें पाणी, संक्रांत आली तानी, संक्रातीचा पुजतें ववसा, नव्याची पुनव आली आठ चौ दिवसां नव्याच्या पुनवचा पुजतें नव, शिवरात घेती धांव शिवरातीचा पुजतें पाट, शिमगा आला घनदाट, शिमग्याची हूंदे बोंब,.शिपनं म्हनतं थांब, शिपन्याचा खेळतें रंग, आला पाडवा जबरदंग, पाडव्याची उभारते गुढी, आली आकिती लाडीलाडी, आकितीचा पूजतें करवर, बेंदूर आला म्होर, बेंदराच पुजते बैल आनिक * * * रावांचं गाडीघोड यील तवाच म्हनावं येनं जानं हुईल, न्हाईतर आकाड एकादशीलाच भेट घडल!"
या वेगवेगळ्या ठिकाणीं, देशकालपरत्वें, घेतल्या जाणार्‍या उखाण्यांच्यामधून एकच प्रकारची प्रमुख गोष्ट सांगण्यांत आली आहे. आणि ती म्हणजे हिंदूच्या सामाजिक जीवनांत येणार्‍या बारा महिन्यांतील सणांची माहिती ही होय. या ठिकाणीं प्रत्येक सणाच्या उल्लेखाबरोबरच त्याचें वैशिष्ठ्यहि सांगितलें असल्यानें आज कितीक वर्षें टिकून राहिलेली चालरीतहि इथें नमूद झालेली आहे. आमच्या संस्कृतीचें हें एक सत्यदर्शन आहे. सामान्यत: प्रत्येक सणाला माहेरच्या गणगोतामध्यें आनंदांत वेळ काढावा, ही जुन्या काळच्या लहानग्या सासूरवाशिणीची इच्छा असल्यानें, तिच्या मनांतील ही माहेरवासाची आवडती अभिनव कल्पना या प्रकारें व्यक्त झालेली आहे. त्याचप्रमाणें नवर्‍याला मुराळी म्हणून यावयास त्यानें किती दम धरला पाहिजे, हें इथें एवढ्या सुंदर रीतीनें सांगितलें आहे कीं, वरकरणीं तो धाक दिसत असला तरी त्या मागची भूमिकाहि त्यानें जरूर लक्षांत घ्यावी!
या प्रकारचें हे उखाणे म्हणजे नव्या पिढीला जुन्या पिढीनें घडविलेलें एक प्रकारचें सांस्कृतिक दर्शनच आहे. वाडवडिलांची ही चालरीत जतन करून ठेवून ती पुढच्या पिढीला देण्याचें भाग्य आपल्याहि वांट्याला येवो, अशी सुखद भावना स्त्रियांच्या मनांत निर्माण करण्याचें सामर्थ्य या उखाण्यांच्या अंगीं निश्चित आहे.
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहणा ) जानपद उखाणा

"नाव घेतें एक, मी हाय आबांची लेक, नांव घेतें लाडी, मी हाय रावसाहेबांची ध्वाडी, नांव घेतें मी ग पावनी, मी हाय रामचंदरची म्हेवनी, नांव घेतें गहिन, मी हाय सदाशिवरावाची लाडकी भैन, नांव घेतें खाशी, मी हाय येश्वदीची मावशी, आनीक अशा म्हायारला जायाला मी हाय लई खुशी, पर * * * रावांच्या मनांत शिरलीया लई येडीपिशी."
या उखाण्यामध्यें माहेरच्या नात्यागोत्यांचीं मोठी सुरेख गुंफण केलेली आहे. आणि अखेरीस अशा माहेरीं धाडायला राजी नसलेल्या नवर्‍याच्या वेडेपणाची नोंद केल्यानें एकप्रकारचा विनोदहि निर्माण करण्यांत आलेला आहे. त्यामुळें सासुरवासशिणीच्या मनांत चालूं असलेल्या घालमेलीचीहि इथें गमतीदार ओळख पटते.
"काळी चोळी कणखर, पुन्याची हिनकर, आलीवती दारीं, मी न्हवतें घरी, चिनगती वाडा, सोन्याचं कुलूप, रुप्याचा हात आंत उगडून बगतें जिरसाळीच भात भातावर तूप तुपासारकं रूप, रुपासारका जोडा, चंद्रभागला पडला येडा, बया बडाम कशाचं, नकुल बोटव्यांच झाड झुबराचं, फूल उंबराचं लाटनं पिंपळाचं सोजी गव्हाची, भैन भावाची, सन सासूसासर्‍याची, रानी भरताराची, यीनी आल्यात भेटीसाठीं नेसाय देतें पिवळी धाटी, जाईजुईचीं  फुलं राईरुक्मिनीच्या कानीं, हंसतमुखानं नावं घेतें * * * रावांची पट्टरानी."
या उखाण्यामध्यें लग्नाच्यावेळीं मुलीकडील मंडळींनीं मुलाकडींल मंडळींना द्यावयाच्या एक चालीची नोंद झालेली आहे. त्यामुळें या ' बडाम' नांवाच्या चालरीतीसाठीं लागणारी सर्व सामुग्रीहि इथें आलेली आहे. ( नवर्‍या मुलाच्या न्याहरीसाठीं अगर जेवणासाठीं जे खास पदार्थ न्यावयाचे त्यास 'बडाम' असें म्हणतात.) त्याचबरोबर पुण्याच्या सुंदर विणीच्या काळ्या चोळीची खरेदी वेळेला करतां न आल्याची चुटपुट आणि शेवटी आपण आपल्या नवर्‍याची खास पट्टराणी आहोंत हें बोलून दाखवावीशीं वाटलेली इच्छा यांचाहि या ठिकाणीं समावेश झालेला आहे. त्यावरून असें दिसून येतें कीं, जुन्या काळीं एकींपेक्षां अधिक बायका करायची जी पद्धति होती, तिची नकळत इथें नोंद झालेली आहे. बाकीचा या उखाण्यांत आलेला भाग इतर कांही उखाण्यांमधूनहि येणारा असा आहे.
"गांवंदरीला पेरला भात, भाताचा बांधला भारा, आनून टाकला दारा, गाई आली हुंगून गेली, म्हैस आली खाऊन गेली, म्हशीला झाला रेडा, गाईला झाला पाडा, आईबापांनीं दिला जांभळा घोडा, जांभळ्या घोड्याची लुटूक लुटूक धांव, न्हाई पाहिलं गांव, गांवाच्या लांब लांब वेशी, ठसे पडेल चौदेशीं, चौदेशींचे उंबर गाजं * * * रावांचा मंदिलाला शोभा तुर ताज.
या उखण्यांत खास शेतकरी जीवनाचा उल्लेख आलेला आहे. तसेंच माहेरच्या माणसांनीं लग्नाचेवेंळीं आंदण म्हणून दिलेल्या जांभळ्या घोडीचें आणि नव्या गांवचे वर्णनहि आलेलें आहे. आणि अखेरीस आलेल्या नवर्‍याच्या मंदिलाची शोभा मोठी देखणी आहे यांत शंका नाही. या सर्व वर्णनावरून जुन्या काळच्या सार्वजनिक जीवनाची कल्पना यावयास हरकत नसावी, एवढा हा संक्षिप्त रीतीनें आलेला मजकूर इतिहास या दृष्टीनें उल्लेखनीय ठरेल.
"रुक्मिणीच्या हातीं मोत्यांचें कंगण, माणीकमोतीं लावून केली आरती, शनिवार पेठ मंडईच्या वरती, शनिवारपेठवाल्यांचा आखाडा, विराच्या मारुतीपुढें नित वाजे चौघडा, नवरा निगाला देवाला, गळ्यांत गोफ पायांत तोडा, इंग्रजी बाजा वाजला, वराडांचा गाडा धडाडला, त्याला दिला शेला, पुढं वाजंत्र्याच्या थाट वेशींत, वेसकर्‍याची आट त्याला दिली, पासुड्याची घडी पुढं आली, वर ओवाळणींची पाळी, तिला दिली चोळी पातळाची घडी, ब्राम्हणांनीं मारली उडी, ब्राह्मण म्हणतो आवरा लग्न घटका राहिली थोडी, लगीन लागलं नवरा हंसला, नवरीचा मामा कन्यादानाला बसला, कन्यादानाचा ताट तांब्या, लाजाहोमाची तूपलोटी, खालीं मांडली पायापाटी, पुढं शेस भरायला झाली दाटी, विहिण म्हणती आणा काखळ्याची पाटी, नवरीचा भाऊ देतो काखळ्याची पाटी, काढा कानपिळीची अंगठी, विहीण म्हणते कानपिळीच्या अंगठीची मोडली चाल, भाऊ म्हणतो इकडंहि आमचे रेशनिंगनीं केलेत हाल, तर मी * * * रावांचं नांव घेत म्हणतें द्या आतां मला भर्जरी शाल."
जुन्या काळच्या थोड्या मोठ्या गांवांतील लग्नाच्या वेळची चालरीत दर्शविणारा हा उखाणा आहे. बदलत्या काळानुसार इथें कानपिळीची अंगठी देण्याची चाल मोडल्याचा आलेला उल्लेख आणि त्याच बरोबर रेशनिंगमुळें होणार्‍या हालाची. झालेली नोंद या गोष्टी आलेल्या आहेत. काळ बदलेल त्याप्रमाणें स्त्रिया आपल्या अक्कल हुषारीनें जुन्यावरच नवा साज कसा बेमालूमपणें चढवूं शकतात हें यावरून दिसून येतें. त्याचप्रमाणें जुन्या काळचा उखाणा हळूहळू कसा बदलत जाऊन स्त्रियांच्या जिभेवर घोळत असतो, हेंहि यावरून लक्षांत येतें.
"लग्न निगालीं शिताळींत काय मार्कीटांत, न्हवरा हिकुलंक्यांत, न्हवरीच्या मनाला बातमी कळली नात्यापुत्यांत, गडबड झाली, जुंदळदेशांत, जातीं टाकली अक्कलकोटांत, दळनं झालीं शिरवाड्यांत, बाशींग घेतलं येरावड्यांत, मांडव घातला पंढरपुरांत, परटीन बसली रत्‍नागिरींत, चौक भरला इसलामपुरांत, सवाष्णी सांगितल्या सोलापुरांत, हळदी लागल्या कोलापुरांत, भिजानं वाटलं रंकाळतळ्यांत, बकरं मारलं येराडाव, देवाक आलं कराडाव, समस्तमंडळी हात धुण्यास बसली पंचगंगला, सुपारी फोडून विडे वाटायला गेली मांडवांत , न्हवरान्हवरी नासकांत, आयार झालं आशींत काय दुशींत, भवलं घातलं भाईर गांवाला, शेसा भरल्या वाळकीशराला, काय मोट्या रस्त्याला, गोपा घेतला कलिनींत, आगीनगाडीला वाटा फुटल्या मुंबईत, रुखवत भरला बडोद्यांत, उतारला पारगांवांत, संतमंडळी ऐकाय बसली मिरजंत, न्हवर्‍याचा बाप हाय विजापुरांत, न्हवर्‍याची आई रामखंडांत न्हवर्‍याचा उल्लास झाला चाफळ सर्कशींत आनीक * * * रावांचं नांव घेतें मी हाय खुशींत."
या उखाण्यामध्यें विलक्षण अतिशयोक्ति आलेली आहे. एखाद्या बाईला गप्प बसवावी आणि आपल्या बुद्धीचा प्रभाव तिच्यावर पडावा या ईर्षेनें बायका असा उखाणा घालतात! या मधील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर लग्नाच्यापायीं कुठें कुठें फिरणें भाग पडतें याचा भला मोठा अंदाज येतो! त्याचबरोबर या ना त्या कारणापायीं चहूंकडे पसरलेल्या नात्यागोत्यांना जमा करावयाचें म्हणजे कोण धडपड करावी लागते याचीहि कल्पना येते!  हा उखाणा ऐकला म्हणजे तो घालणार्‍या बाईच्या सर्व सामान्य ज्ञानाची कल्पना मनाला थक्क करून सोडते यांत शंका नाहीं! कारण लग्नाची सगळीं चालरीत न चुकतां इथें एवढ्या मोठ्या पसार्‍यांत इतकी सुंदर बसविलेली आहे कीं, मी मी म्हणणार्‍यानेंहि तोंडांत बोट घालावें!
जुन्या काळच्या सामाजिक जीवनाची कल्पना देणारे असे आणखी पुष्कळ उखाणे असतील. मला जें मिळाले ते मी इथें देत आहें इतकेंच.
आपल्या पतीचें नांव उठावदार रीतीनें सर्वांच्या समोर यावें म्हणून खेडुत स्त्रियांनीं केलेला हा भावनेचा साज शिणगार मोठा हृद्य तसाच अभ्यासू मनाला विचार करावयास लावणारा आहे. आजकाल हें दुर्मिळ होत चाललें आहे. त्याची आवडहि नव्या पिढीला राहिलेली नाहीं. तथापि आमच्या वाडवडिलांची माहिती देणारी ही किमया मोलाची आहे यांत शंका नाही. आमची वडील मंडळी कोणत्या काळांत रहात होती, त्यांनीं कशाप्रकारचें वैभव उपभोगलें होतें, त्यांच्या मनाची घडण कशी झाली होती, त्यांना काय आवडत होतें इत्यांदींची हकीकत हे उखाणे अभिमानानें सांगात आहेत. या उखाण्यांतील वेंचक शब्दांनीं आणि आटोपशीर भावनेनें गुंफलेलें विचारसौंदर्याहि वाखाणण्यासारखें आहे. तशीच इथें वापरांत आलेली कल्पकताहि रसपूर्ण असून सुशिक्षित मनाला अचंबा वाटायला लावणारी आहे, यांत शंका नाहीं. त्यामुळें या उखाण्यांनी पतीच्या नांवास माधुरी आणली आहे, असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं.
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) रुखवताचा उखाणा

सामान्यतः नवर्‍याचें नांव घेण्यासाठीं बायका ज्याप्रमाणें उखाणा उपयोगांत आणतात, त्याचप्रमाणें या खेड्यांतील स्त्रिया लग्न समारंभाचे वेळीं 'रुखवत' आणतांनाहि उखाण्याचा उपयोग करीत असतात. खेड्यामध्यें नवरीच्याकडील मंडळी निरनिराळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ करून दुरड्यांत भरतात आणि ह्या दुरड्या नवर्‍याचे घरीं नेऊन पोहोंचत्या करतात. अशावेळीं ह्या दुरड्या पत्रावळीनें झांकलेल्या असून मोठ्या समारंभानें वाजत गाजत आणलेल्या असतात. त्यामुळें ही प्रत्येक दुरडी उघडतेवेळीं नवर्‍याकडील बाईनें उखाणा घालावयाची चाल आहे. मात्र इथें नवर्‍याचें नांव त्या उखाण्यांत गोवलेलें असतेंच असें नाहीं. केवळ "सुग्रीव" पणाचें मोजमाप करण्याच्या ईर्षेनें गंमतीदार उखाणा घालवयाचा एवढीच या भागची भूमिका असते.
'रुखवत' आणावयाचा म्हणजे वधूकडील मंडळींनीं वराकडील मंडळींना खाण्याच्या पदार्थांची देणगी द्यावयाची. अशावेळीं एकमेकींच्या उणेपणाची भरपाई करण्यासाठीं दोन्हींकडील बायका उखाणा घालीत असतात. उत्तराला प्रत्युत्तर सारखें चालूंच असतें. जणुं एक प्रकारची अक्कल हुषारीची इथें शर्यतच लागते! त्यामुळें प्रत्येक दुरडी उघडतांना बायका अहमहमिकेनें नवा उखाणा घालीत समोरच्या मंडळींना चकित करून सोडतात. अशा उखाण्यांचीहि लांबीरुंदी भरपूर असते. अशा ऊखाण्यापैकीं मला जे मिळाले त्यांचें अंतरंग असें आहे-
"पहिली दुरडी फुलाचा भार, इवाय मिळला हौसदार दुसरी दरडी केळाची फणी, रुखवत नवर्‍याचे भैनी, तिसरी दुरडी साकरशायी, रुखवत उघड न्हवर्‍याचे आई, चौथी दुरडी साकरभात, रुखवत उघड न्हवर्‍याचे गोता, पांचवी दुरडी गव्हाची लापशीं, रुखवत उघड न्हवर्‍याचे मावशी, साव्वी दुरडी अनारसं लाडू, रुखवत उघड न्हवर्‍याचे साडू, सातवी दुरडी साकरसोजी, रुखवत उघड न्हवर्‍याचे आजी, आटवी दुरडी ताजा खांडवा, रुखवत उघड न्हवर्‍याचे बंधवा, नववी दुरडी भरल काजू, आनीक आतां * * * रावांचं नांव घेतें तवा द्या बगूंया सगळीजनं बाज."
या उखाण्यामध्यें खाण्याच्या पदार्थाचा, गुणगोतांचा व दुरड्यांच्या संख्येचा उल्लेख आलेला आहे. शिवाय नांव घेण्यासाठीं अडविलेल्या मंडळींना शेवटीं उत्तर दिलें असल्याचेंहि दिसून येतें.
"आला आला रुखवत, त्यांत हुत्यां शेंगा, सुपारी गंगा, जाऊन भागीरथीला सांगा. यमुनाची परात काशीन घेतली, सपाट केलं नगर, इतका कां ग उशीर? वारघटी. फव भाजाय बसलीः साळू, कांडाय बसली बया न् बाळू. झिंगाई म्हनती बिस्कीट किती दळूं? हरीक मिरीक चांगुनाबाई हातांत लाटनं तुळजाबाई कुठं गेली माजी बाई? घरांत मानूस मात न्हाई. कळस फनी. नकस् गिरी चांदसूर्व्या मजसिरी. गितानं केली पातळ सोजी. नकुल तोडीत बसली राज दरवाजाच्या तोंडी. अंबाबाई बसली परसदाराशीं. समजी केली त्या दिशी. भिमानं केली सिमा. मिरगानं मारली गोळी. चंद्रानं बांदली जाळी. वाडगं येताळी. पुतळी पत्रावळी टाकी. सकु दुरान लावी. बया भात वाडी. आकू कडी वाडी. बकु भाजी वाडी. इतकं करून दिलं येताळ्यापाशीं, येताळ्यानं दिलं तिरताळ्यापाशीं. परतेक गांवच्या सुगरिनी आल्या मिळुन. पाय धुया गेली दरू. नांव तिचं सरू. कुंकुं लावाय गेली नगु. नांव तिचं छबू. विहीनबाई राजहंसाच्या लग्नाला खरच किती? पांचशें गेलं रुखवताला. नऊशें गेलं लग्नाला. हिशेब यीना न्हवर्‍याचा भावाला हिशेब करतें मी खडाखडी पन वर आदीं टाका पाटावाची घडी."
या उखाण्यांत रुखवताच्या निमित्तानें होणारी सर्व प्रकारची घरगुती हालचाल आलेली आहे. नांवांच्या विविधतेबरोबरच इथें कामाचीहि विविधता दिलेली आहे. तसेंच प्रत्यक्ष लग्नघराचीहि हकिकत सांगितलेली आहे. कुणांचें टोपण नांव दिलें तर लगेंच खरें नांवहि या ठिकाणीं उघड केलेलें आहे. तसेंच शेवटीं उखाणा घालणार्‍या बाईनें लग्नाचा खर्च विचारतांच अतिशयोक्तीचें उत्तर आल्यानें आपण स्वतः उत्तम हिशेब करून दाखवतों हें आव्हान स्वीकारलें असून त्यासाठीं पातळाची घडी मागितलेली आहे! कुठें कुठें दुरडीवर खण अगर पांतंळाची घडी ठेवण्याची जी चाल आहे, ती या रीतीनें इथें व्यक्त झालेली आहे. या उखाण्यांतील हीच कल्पना कुठें कुठें अशा रीतीनेंहि सांगतात-
"शाकुनवडी घाली रांगा, जाऊन भागीरथीसी सांगा. परात यमुनासी मागा, तिंबायासी. काशीनीं घेतली घागर, शोभे तिंबीती नागर. का ग उशीर वरणाला बोटव्यासी. अशी म्हणे माजी सई, कुठं गेल्या आत्तीबाई शाकुनवड्या कशा घालाव्या सांगा आम्हासी. यश्वदीनं धरली वाट, साऊबाई लावी भाजीला पीठ, भीमाबाई म्हणे आणा सुंठ. पहिल्यांनीं घरांतून आली गिरजाबाई, हातीं लाटणं घेऊनी. बुंदी पाडा ग रमा उमा, तिनं मोठी केली सिमा ( जलदी ), शेवायाचा रवा तिम्मा कृष्णाबाई. येऊबाई चौरंग मांडिती, नानीबाई वर्‍हाडाच पाय धुती, द्वारकाबाई लामन दिवा धरती, येनीशीं रुखवत दावीती कमळाबाई. शाकुन लग्नाची समई, रुखवत भरायची घाई, हळदकुंकूं देती सती भामाबाई. बत्तासे देती जानकाबाई. नारळ देती अनसाबाई. फुलं देती लक्ष्मीबाई. अत्तर देती आन्नपुर्नाबाई. वर्‍हाडाला मूळजाती सरस्वतीबाई. बोलायासी सगळी चारूळी काढूनी, सगळे बदाम फोडुनी, खारका काडल्या निवडुनी. चिक्कन सुपारी. गुळाचा पाक कर ग राधा. चुलीला जाळ लाव साधा. वरती धर झारा. मग बाई रांगूळ्या काढाव्या. समया आणून लावाव्या, उदबत्तीचा घमघमाट. केला चटनी कोशींबिरीचा थाट. यीनीला म्हनती बसा नीट पाटावरी. नर्मदीनं वाढला वरण भात. कमळानं वाढली पुरण पोळी. यिनीला म्हनती व्हा तय्यार जेवायासी. यिहीन म्हणे आणा आमटी. तिकडून आली भिकूबाई हिमटीं वाढायासी. यिहीन म्हणे आणा रस्सा. ठकूबाई म्हणे जाईबाई बसा. चंद्रज्योतीचा करा तमाशा यिहीनी पुढें. गहूं तांदळाच्या कोठ्या, खणानारळाच्या ओट्या. अत्तरदाणी गुलाबपाणी, यिहीन बसली आपल्या मनानं आत्तां लोढापासीं."
इथें मागच्या उखाण्यापेक्षां सर्व चालरीत अधिक विस्तारानें आलेली असून विहीण खूष झालेली दाखविलेली आहे. त्याचप्रमाणें पूर्वीच्यामानानें सगळा थाटहि थोडा श्रीमंती असलेला दिसून येतो. आपल्या घरीं खरोखरच कांहीं असो अगर नसो दाबून बोलायला हयगय करायची नाहीं, अशी जी या वेळची स्त्रियांच्या मनाची प्रवृत्ति झालेली असते, तिचाहि इथें भरपूर वापर झालेला आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. तसेंच या लग्नाकार्यासाठीं गणगोत व शेजारणीं पाजारणी किती आपुलकीनें खपत असतात, याची कल्पना या उखाण्यांत आलेल्या नांवांच्या यादीवरून यावयास हरकत असूं नये, एवढी इथें नांवांची गर्दि झालेली आहे!
"आला आला रुखवत मांडवाचे दारीं, आंत काय परी, शेवाया सरी. शेवाया साजूक, तेलच्या नाजूक. पानाच्या पट्ट्या, खोबर्‍याच्या वाट्या. गुळाच खड, उडदाच वड. पापडहार हारीं, घारी सजुरी. बुंदी बरफी झुलाप झारी. जिर साकार र्‍हाई पुरी. शेंडसिकट पांच नारळ. देंटासकट पिकलीं केळं. दराक्ष हंजीर रामफळं. करनी केली धनसंपत्तीच्या बळं रुखवत उवडतें खडाखडी. आनीक पाइजे तर * * * रांवांचं नांव वर घेतें, पन अगूदर रुखवतावर ठेवा चोळी पातळाची घडी."
या ठिकाणीं रुखवत कशा कशाचा आणला आहे हें नवरीकडील बाई सांगते आहे. त्याबरोबर एवढ्या थाटानें हें सर्व आणलें आहे, तर आपली करणी बघून योग्य तो मानपान राखण्यासाठीं चोळी पातळाची घडी दुरडीवर ठेवण्याची ती विनंति करीत असल्याचें दिसून येतें. मानापानाची ही भावना स्त्रियांच्या मनावर एवढी बिंबलेली असते कीं, त्यापायीं वाकुडपणा येण्याचा देखील संभव निर्माण होतो! अशावेळीं आपला पण मोठेपणा दाखविण्यासाठीं दुसर्‍या पक्षाकडून हमखास उत्तर येतें कीं-
"आला आला रुखवत त्येला चार घोड्यांचा टांगा. टांग्याच्या मोडल्या खिळा. घोड्याच्या गमावल्या घुंगूर माळा. मी काय यीन करनीची न्हवं व्हय! करायचीच हुते, आनीक बी काय काय करीनच म्हनतें.... यिहिनीला वजरटीक करीन म्हटलं ठशाची. नथ फाशाची. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायवीच हुतें, आनीक बी काय काय करीनच म्हनतें...यिहिनीला गळसुरी करीन म्हटलं तोळ्याची. युवायाची टुकडपट्टी आली खालच्या मळ्याची. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीच हुतें, आनीक बी काय काय करीनच म्हनतें.... यिहिनीला करीन म्हटलं राकडी पन सोनाराची बायकू पडली माज्यासंगं वाकडी. यिहिनीला घीन म्हटलं लुगडं तांबडं तर युवायाचं मेलं शंभर कोंबडं. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीच हुतें, आनीक बी काय काय करीनच म्हनतें...यिहिनीला करीन म्हटलं गोट पन सोनाराचं मोडलंया बोट. यिहिनीला करीन म्हटलं झुबा पन सोनाराला मोडलाय खुबा. मी काय यीन करनीची व्हवं व्हय! करायचीच हुतें आनीक बी करीनच म्हनतें...यिहिनीला जेवान करीन म्हटलं पोळ्याचं पन पानी आटलंय तळ्याचं न् रेडं मेलंय कोळ्याचं. यिहिनीला जेवायला पाडीन म्हटलं बुंदी पन राधी बामनीनीची म्हस गमावली फुंदी. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीच हुत आनीक बी काय काय करीनच म्हणतें. यिहिनीला करीन म्हटलं बारा भार जोडवीं पन यीन फोडतीया येतां जातां दह्याचीं खोडवीं. यिहिनीला घालीन म्हटलं कांकनं तर राती कासाराला आलंया दुखनं. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीचं हुतें आनीक बी करीनच म्हनतें...यिहिनीला घालीन म्हटलं न्हाऊं तर रातींच कोळ्याला आलंय हिंवू, यिहिनीला शिवीन म्हटलं चेपल्या बाजारी तर चांभार पडलाय आजारी. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीच हुतें न् करीन बी म्हनतें...यिहिनीला वाडीन म्हटलं ताक तर डेर्‍याखालीं गेलाय साप. विहिनीला वाडीन म्हटलं दुधभात तर रातीं म्हशीनं दिली लाथ न् चरवी सांडली अंगनांत. यिहिनीची भरीन म्हटलं वटी तर रातीं उंदरानं नेली खोबर्‍याची वाटी. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायचीच हुतें आनीक अजून बी करीनच म्हनतें... युवायाला शिवीन म्हटलं बाराबंदी तर रातींच शिंपी गेलाय आळंदीला घिऊन दिंडी. युवायाला कमरीं करगोटा करीन म्हटलं गोपाचा, शंभर रुपयच्या झोकाचा, तरी युवाय म्हनतो लोकाचा. मी काय यीन करनीची न्हवं व्हय? करायाचीच हुतें आनीक काय काय करीनबी म्हनतें...रुखवतांत सूप साजरं आनीक रुखवत भरनारनीच्या हातांत मोत्यांच आल गजर."
या लांबलचक उखाण्यामध्यें करणी करण्याच्या मोठेपणाची भुलावणी भरपूर आली असून त्या रुबाबाला तोंडावर फेंकतांनाच या ना त्या कारणानें बसणारा खोहि सांगितलेला आहे. त्यामुळे या थापेबाज विहिणीचें पालुपदासारखें येणारें स्वतःच्या कर्तबगारीचें वाक्य ऐकणाराला चिक्कार हंसूं आल्याखेरीज रहात नाहीं. त्याचप्रमाणें अमूक करायचें होतें पण अशानें असें झालें हें कारण वरचेवर पुढें केल्यानें, दुसर्‍या बाजूच्या विहिणीलाहि भरपूर चीड येत असल्यानें एकंदरीनें मांडवांतील सर्व वातावरण भरपूर गरम होतें! पण अशा चिडाचिडीमुळें उगाच भलतेंच वांकडें येऊं नये म्हणून आपल्या करणीचा प्रकार कसा कसा झाला हें सांगतांना विरुद्ध बाजूची बाई सरसावून पुढें येत म्हणते-
"आला आला रुखवत त्यांत रुपये हुते बारा, यीन मागती हाराडेरा, तिथं एक रुपाया खरचला. रुपय उरले धा, यिनीची करनी पहा, तिथं एक रुपाया खरचला. रुपय उरले न‍ऊ, यीन मागती घऊ, तिथं एक रुपाया खरचला. रुपय उरल आठ, यीन मागती ग्वाट, तिथं एक रुपाया खरचला, रुपय उरल सहा, यीनीची करनी पहा, तिथं एक रुपाया खरचला, रुपय उरलं पांच, यीन मागती माच, तिथं एक रुपाया खरचला. रुपय उरल चार, यिनीचं आलं प्वार, तिथं एक रुपाया खरचला. रुपय उरल तीन, यिनीची आली यीन, तिथं एक रुपाया खरचला, रुपय उरल दोन, यिनीचं आलं कोन कोन, तिथं एक रुपाया खरचला. अस रुपय बाराच्या बारा आटल. यिवाय रागरागं उठलं. यिवाय गेल बंदरा, तेनी रुपय आणले पंदरा, पंदरा रुपयाची आनली ठुशी, तवा यीनवाईच्या मनाची झाली खुशी आन मग आल्या मांडवापाशीं न् शास भराय गेल्या बावल्यापाशीं."
इथें जुन्या काळच्या स्वस्ताईच्या दिवसांत कशी चालरीत करीत असत त्याची कल्पना आलेली आहे. विहिणीच्या घरच्या किती लोकांना काय काय करावें लागें व खुद्द विहिणीचाहि हट्ट कसा पुरवावा लागे याचें हें एक उत्तम उदाहरण आहे. या उखाण्यामध्यें पुन्हा पुन्हां आलेलें 'तिथं एक रुपाया खरचला' हें वाक्य मोठें ठेकेदार तसेंच मागच्या व पुढच्या करणीचें मध्यंतर दाखवून किती राबावें लागतें हें सुचकतेनें सांगणारें असें आहे! हा उखाणा एकतांना बायकांची हंसून हंसून मुरकुंडी वळून गेलेली दिसून येते.
"आला आला रुखवत मांडवाच्या दारीं, वाटा सोडा पाट टाका. पाट न्हवं धोंडा, चवरंग मांडा दांत घासायला वासा, वासा पुरेना तुळी तासा. तोंड धुवायला हंडा, हंडा पुरना रांजून मांडा. बारा पायल्यांच्या केल्या भाकरी, न्हवर्‍याच्या घरीं लईजन हाईत चाकरी. बारा पायलीच्या केल्या तेलच्या, यीन म्हनती हाईत्या शिळ्या कालच्या. बारा पायलीच्या केल्या पिठाच्या, यीन म्हणती आतां न्हाई इटायच्या. बारा पायलीच्या केल्या वड्या, यीन म्हनती झाल्या थोड्या. बारा पायलीचा केला रस्सा, यीन म्हनती पुरल कसा. बारा पायलीची केलीं भजीं, यीन म्हनती शिळी का ताजीं बारा पायलीच्या केल्या रोट्या, यीन म्हनती न्हान का मोट्या. बारा पायलीच्या केल्या शेवाया, यीन यीना झालीय जेवाया. बारा पायलीचा केला भात, तवा यीनीनं धुतला हात. ततन युवाय गेल अष्टयाच्या पेटत, घेतल बारा खन. सा खनाची केली चोळी. सा खनाची केली लाकपट्टी. आनीक * * * रावांनीं जवा घेतली साठ रुपयांचीं ठुशी, तवा कुठं यीनीबाईच्या मनाची झाली खुशी."
एका विहिणीनें दुसर्‍या विहिणीला चिडविण्याची खटपट या उखाण्यांत केली आहे. भरमसाट बोलून विहिणीवर असे आरोप केल्या कारणानें अगर तिचे दोष दाखविल्यानें, शिवीगाळ होईपर्यंत मांडवांत कधीं कधीं हें प्रकरण जातें! असा टोमणा मारलेला कुणाला खपत नाहीं. खादाडपणाचा केलेला असा उल्लेखहि मग कुणाला सहन होत नाहीं. अशावेळीं समजुतीचे अनेक प्रकार पुढें येऊन कसा बसा राग कमी करण्याचा प्रयत्‍न होतो.
या ठिकाणीं गणागोतांच्यासाठीं पुरवठ्याला केलेल्या बारा पायलींच्या जिनसांची आलेली नामावळ मोठी मजेशीर वाटते.
"विहीणीच्या भैनी, नको बोलूं उणं, म्होरं लागलं पुणं. पुण्याची नऊलाख पायरी. म्होरं लागली धायरी. धायरीचं वांग. वांग पचना. भाऊ पुसना. भावाला न्हाई मया. जातें तळेगांव पहाया. तळेगांवचा कांदा. दुही टाकळी बांधा. दुही टाकळीच्या मधीं भेंड्याच्या भिंती, शिकरापूर धांवा घेती. शिकरापूरचा आड, बोरवरीला आला पाड. बोखरीचा आला फेरा, पिंपळ गांवानं केला जोरा. पिंपळ गांवाला दोराच्या नांवा, राहूला कवा कवा जावा. राहूचा पाडवा, पिंपळगांव दडवा. राहूनंतर यवत, यवताच्या गाया. छाक झाल्या बाया. नानाचं नानगांव. पानाचं पारगांव. दहीतनं खामगांव. आम्मळ न् चिम्मळ. कडेगांव जमलं. केडगांव हाजारी बाजारी. आंदळगांव शेजारीं. म्होरं लागलं जवळं. जवळ्याची काय सांगू इगूत. इंदूर पाबाळ निगूत. निगतांत निगाला हत्ती, कवठ्याला जाती. कवठ्याचा बाजार, थैमान शेजार. थैमानांत इकतो गूळ, मांजरी कराला धाडा मूळ. मांजरीकर पैक्याच्या भरात, युवाय पडला तुरंगांत. रुपय भरल तीनशें साठ. धरा थिऊर कोलीवडीची वाट. थिऊर कोलीवडीच्या जमल्या आयाबाया. गेल्या पुरना डोंगर पहाया. पुरनी डोंगरांतन घसरल्या. लोणींत यिऊन पसरल्या. लोणीकरांनीं दिली लाथ. पडल यीनीच दोनी दांत. विहीन उठली रागराग, धाकलं घोडं लागलं मागं. थोरल्या घोड्याला मळंतळं, आपटीकर विऊन पळ. आपटीकराला घावला कौल. बगा मरकळीचा डौल. मरकळांत इकत्यात गहूं, मावडीकर म्हणतो वज वज जाऊं.  मावडी करानं जुंपली गाडी, बेंदाच्या वडगांवांनीं मारली उडी. रुखवत आला रुखवत आला माका आनीक आमच्या कोंबडीला झालाय वाखा, तर तुमची गाडीबैल उतरून टाका."
लग्नाला आलें असतांना जवळपासचा मुलूख बघायला उतावीळ झालेल्या विहिणीची व तिच्या लोकांची कशी फजिती झाली तें इथें दाखविलेलें आहे! रुखवताच्या वेळीं उखाणा घालावयाचा म्हणजे उणेंपुरें बोलून थट्टा करावयाची हा प्रमुख भाग असतो, तो इथें पुरेपूर अंमलांत आणलेला आहे. त्यामुळें पुष्कळ विनोद निर्माण करण्यास हा उखाणा उपयोगी पडतो. हा उखाणा पुणें जिल्हांत मला मिळाला आहे. त्या कारणाने इथें आलेलीं गांवांचीं नांवें देखील त्या भागांतीलच आहेत. इतरत्र हा उखाणा त्या त्या विभागांतील गांवें घालून घेतलेला आढळून येतो. या ठिकाणीं शेवटीं कोंबडील वाखा झाला म्हणून व्याह्यानें आपलीं गाडीबैल उतरून टाकावींत म्हणून केलेली विनंति मात्र विलक्षण गंमतीची आहे यांत शंका नाहीं!
"हिरवे किंकर लाल मोतीं, खेडेगांव शहराच्या धरती. नारायणगांव शहर, चहुंकडून डोंगर. डोंगराचा तुटला कडा. गांवकुशी मारुतीचा वाडा. नित्य वाजे चौघडा गेला आडवा वर्‍हाडाला गाडा. गाड्याला दिला शेला. नवरा शिवपूजनाला गेला. शिवपूजनाचा थाट. पुढं कोळ्याची पडली आट. कोळ्याची पुजत होती कावड. वेशींत महारणीची दवड. महारणीला दिली वाटी. नवरा देवळांत जाण्याची दाटी. देवळी जाऊन पोषाक चढे. वरधावा गेला पुढें. तो गेला घाई घाई. तेलसाडी घेऊन करवली येई. वर ववाळण्यास मावळण जाई. मावळणीला दिली साडी. बामणांनी मारली उडी. बामण म्हणे आवरा आवरा लगीन घटका थोडी. बामण मंगल बोले कसा. तांदूळ पडे पसा पसा. मामा कन्यादानास बसा. नवरदेवा मनांत हंसा. कन्यादानाची थाळी वाटी. लाजाहोमाची तूपरोटी. जानवसघरीं माणूस दाटी जानवस घरीं केरसुणी दिवा. केरसुणी दिव्याची आट. येऊंद्या करवल्यांचं ताट करवल्याचं ताट येई झटंपट. येऊंद्या आतां वरबापचं ताट. वरबापाच्या ताटाची मजा. रुखवताला वाजतो बाजा. रुखवत बघून हंसले. राजबिंदीला बसले. कुणीं खेळती रंग. कुणी घालती अहाणे. कुणी पहाती रुखवताकडे. न्याहरींत टाकला रूपाया. नवर्‍याला केले कंठीकडे. वरमाईला दिले चारी गोट. भानुमतीला पहायची काढली मोठी आट. तिला पाहतां आली तेढ. वर्‍हाडानं जुंपली गाडी * * * रावांचं नांव घेतें मी पडलें भाबडी."
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) रुखवताचा उखाणा

लग्नाच्या अगोदर आणि नंतर खेडोपाडींची चालरीत कशी असते, याच्या कांहीं खुणा इथें सांगण्यांत आलेल्या आहेत. तसेंच मानापानाला हपापलेल्या भावनांचाहि उल्लेख आला असून, किती केलें तरी मुलीमध्यें कांहींतरी खोड काढून शेवटीं वर्‍हाड कसें एकदम चालूं लागतें आणि रंगाचा बेरंग कसा उडतो, याची मजेदार माहितीहि या ठिकाणीं आलेली आहे. हा प्रसंग रुखवतांच्यावेळीं उखाण्यांत आला म्हणून त्याची मजा. पण एरव्हीं प्रत्यक्षांत तसें घडतें तर मात्र तोंडचें पाणीच पळावयाचें, एवढा हा गंभीर प्रसंग! परंतु घडलें तें सांगितलें या पलीकडे याचें गांभीर्य यावेळीं कुणाला भासत नाहीं. त्या कारणानें सगळें कांहीं खेळीमेळीनें चाललें आहे असें समजून निर्माण होणारी चिडाचिड बायका विसरूं शकतात! नाहींतर लग्नासारख्या मंगलप्रसंगीं मारामारीचीच वेळ यायची आणि भलतेंच व्हायचें!
"मांडवाच्या दारीं विहीण बसली आंगुळीला. पाणी आणा गंगेचं. मखर बांधा भिंगाचं. सात खिडक्या रंगीत महाल. तिथं जाऊन पलंग घाल.  पलंग विणला हारोहारीं. विडे केले नानापरी. हातांत घेऊन मुखांत घाल. गरम झालं वारा घाला. देशोधडी बंदरा धाडा. भिलानं धरला घाट. रुपये मोडले बेलपत्रीं. कारकुनाचा पैका. विहीणबाई आतां नांव घेतात सर्वजण कान देऊन ऐका."
या लहानशा उखाण्यामध्यें विहीण बाईची करतां येईल तेवढी स्तुति केली असून तिची बडदास्त कशी ठेवली पाहिजे हेंहि सांगितलेलें आहे. विहिणीला खूष करण्याचाच हा एक प्रकार होय. त्याचबरोबर त्यासाठीं वैभव देखील एवढें उभारलेलें आहे कीं, अशक्य गोष्टी शक्य झाल्याचा भास ऐकणाराला व्हावा!
"मांडवाच्या दारीं शिव्यांची पाटी. विहीणीच्या कपाळाला पडली आठी. व्याही बसला तसा उठी. बाईला मातुर आला घुस्सा. विहीणबाईचा घुस्सा काढा. वीस भुयांची पालखी बसायला धाडा. अवो अवो, मला कशाला पालखी? मी तुळशीच्या फूलाहून हालकी. सहज बसली घालून मांडी तर मोडली पालखीची दांडी. आनीक जोकून बगीतलं तवा वजन भरलं आकरा खंडी."
या उखाण्यांत विहिणीची भरपूर थट्टामस्करी केलेली आहे. अंगानं जाडजूड असलेल्या तिच्या वजनाचा तर अगदीं आवाक्याबाहेरचा हिशोब इथें केलेला दिसतो! तसेंच विहिणीच्या स्वभावाचें इथें आलेलें वर्णनहि गंमतीदार वाटतें.
"लाडभाऊ साडभाऊ, लाडवाचे लाड गेले वाळवंटी. वाळवंटीचे गहूं घोरपडीचे मांडे. तळेगांवचे उंडे. सात दुरड्या रोट्याच्या सात दुरड्या पुर्‍याच्या. सात थाळे नकुले. सात थाळे बोटवे. एकटा मी जेवतों. पोटावर हात ठेवतों. काय बाई अंवार छपके. दिवा नाहीं करूं काय? खरचला लोभ. घडविला दिवा. पाठविला विहिणीच्या गांवा फलटणचा तांब्या. ओझरची वाटी. पारनरेची तिवई. जेवणं होतीं संगमनेरीं. विडे होते जुन्नरीं. बोलवा जुन्नरचे तेली. आधीं गाळा खोबरेल. मग गाळा मोगरेल. मोगर्‍याची भाजी गोडाची. फोडणी दिली तेलाची. फोडणी दिली ओतुरीं. वास गेला कोठूरीं. अशी विहीण पुतळी कीं सव्वा मणाची कोथळी."
या उखाण्यामध्यें गांवाच्या नांवाबरोबरच माणुसकीचा उच्चार झाला असून खादाडपणाचीहि नोंद झालेली आहे. समोरच्या मंडळींना आवाच्यासवा कचकून बोलून घ्यावयाच्या वृत्तीचा हा उखाणा निदर्शक ठरले! अतिशयोक्ति पराकोटीला किती जाऊं शकते, हेंहि यावरून दिसून येईल.
"आला आला रुखवत गाडी केली बारामती. धारान पाहिली सोलापुरीं. माप केलं कोलापुरीं. वस्ती केली महाडमंदी. पानी पेली भोरमंदीं. पेठ पावी शिरवाळची. दिपवाळी पावी मुंबईची. दसरा पावा बडोद्याचा. बोरगांवीं घेतले तांदूळ. सडले किल्ल्यावरी. सूप सासवडी. बिछाना धानवडी. खजपुर खंजवडी. मजपुर मंजवडी. बेळगांव शेळगांव. दह्यांतलं खामगांव. भिवरान बोपगांव नको मला तोंड दावूं. युवाय मिळाला आंधळ्या न् चंभळ्या तोंडाचा. शिरी टिकला गंधाचा. धोंडा खाईना बांधाचा. हुबळीधारवडी लावली जाई. खरंच यीनीबाई तुमच्या गांवाचं नांव काय! गड सातारा नळाची दाटी. वाईघोम कृष्णाकाठीं. हात धोड्यांच केंजाळ. धावजी बुवानं दरोजा बांधला. रुपये पटेल तीनशेंहजार. त्याला खिडक्या लावल्या दाट, जाती येळ्याला वाट. येळ्याची वाट नऊखंड जबर. घेते धायगुड्या पाटलाची खबर. कुडाळी गांवांत कुडाळी गंगा, हढताळ मशव्याल जाऊन सांगा. हडताळ मस्व केलं माळ्यानीं साजरं. युवायाला घीन म्हटलं हार गजर. हार गजर्‍याला सोन्याच्या काड्या. खालीं निवाल्या बारा वाड्या. बारा वाड्या शिलेदारी. शेवगांवीं केला शिरा. गोपगांवचा पानमळा. कलकत्याची सुपारी. मंमईची जायपत्री. पुण्याचा चुना. चिलावळीची पानं आणा. विनीला घीन म्हटलं फडकीं. खालीं आली खडकी. खालीं आला मरड्याचा घाट. या घाटाला पायर्‍या तीनशें साठ. चला माहुलीला जाऊं. किष्णाबाईचं दर्शन घेऊं कोरेगांव पाण्याचा ठाव. यिनीला यीना पाण्याची चव आणा. डिसकळच गहूं रुखवतांत जाईजुई. आण्याला उत्तर देणारी कोण हाई?"
या उखाण्यामध्यें प्रतिपक्षाला उत्तरादाखल बोलावयास पुढें येण्याचें आव्हान केलें आहे आणि गांवोगांव फिरून रुखवत कसा तयार केला याची मोठी मनोरंजक माहितीहि दिली आहे. हौसेबरोबरच निर्माण होणारा पसाराहि इथें स्पष्टपणें सांगितलेला आहे. तसेंच कृष्णामाईचें दर्शन घेऊन आल्याची सूचनाहि दिलेली आहे. आपापल्यापारीनें आपली हौस आणि चालरीत भागवितांना ओळखीच्या मुलखाचा केलेला उल्लेख इथें उठून दिसत आहे त्याचप्रमाणें त्या मुलखाचा स्वभावहि अनायासेंच या प्रकारें व्यक्त होत आहे.
"आला आला रुखवत त्यांत हुती आरती, उघडून बघतें तर विठ्ठलाची मूर्ति. आला आला रुखवत त्यांत हुता मळा, उघडून बघतें तर विठ्ठलाचा चोकामेळा. आला आला रुखवत त्यांत हुता कुंकवाचा पुडा, उघडून बघतें तर चंद्रभागला पडला येडा. आला आला रुखवत त्यांत हुंत माणीक; उघडून बघतें तर भक्त कुंडलीक . आला आला रुखवत त्यांत हुती गोळी, उघडून बघतें तर वाल्मिकी कोळी. आला आला रुखवत त्यांत हुतं फूल, उघडून बघतें तर. गोर्‍या कुंभाराचं मूल. आला आला रुखवत त्यांत हुतं उंबार, उघडून बघतें तर गोरा कुंभार.  आला आला रुखवत त्यांत हुता हात, उघडून बघतें तर गोरखनाथ. चांदवडी फूल र्‍हाई रुक्मिनीच्या कानीं * * * रावांचं नांव घेतें त्येंची लाडकी रानी."
हा उखाणा पूर्वीच्या उखाण्यांच्या मानानें अगदीं निराळा आहे. भाविक मनाच्या स्त्रीची ही भावना आहे. रुखवतासाठीं तिनें आपल्या ओळखीच्या संतमंडळींना गोळा केलें आहे! तसेंच पाककौशल्याची करामत तिनें त्यांच्या चरणीं ठेवलेली आहे. जवळचें सर्व चांगलें तें देवाला वहावें ह्या कल्पनेचा हा आविष्कार आहे. त्याचप्रमाणें हें सर्व करीत असतांना आपण आपल्या नवर्‍याच्या आवडत्या आहोंत, ही शेवटीं दिलेली कल्पनाहि मोठी हृदयंगम आहे.
"कालं बेलं कासेगांव वंडू मंडू नांदगांव. साळशिरंबं वाटेगांव. हातांत कांदा गुंडवाडकरणी, पाटीवर गोंडा मोराळकरणी, बारवचं पाणी निमसडकरणी, चिपट्यांत नांद ग म्हासूर्णकरणी, टेकाव रहा ग गडकरणी, भाजी खा ग पळसगांवकरणी, तव्याचं काळं खरसिंगकरणी, तळ्यांत पव ग औंधकरणी, देवाला जा ग नांदूसकरणी, कलागत कर ग कळंबी करणी, आंबरस कर ग उचठाण करणी, सैंपाक कर ग पुसाळकरणी, टेंब्यांत बस ग कुर्लेकरणी, खिंडींत रहा ग शामगांवकरणी. ऊंस लाव ग किवळकरणी, ऊंस खा ग चिखलकरणी, आडसाराला रहा ग नाजगीरकणी, पान तोंड ग अर्वीकरणी, कुराड कर ग वाठारकरणी, तेलाचं. टीप ग रहिमतपूरकरणी, ठेसनाव उभी कोरेगांवकरणी, काला खा ग कालगांवकरणी, धार लाव ग नांदगांव करणी, काट्या पाड ग कोपर्डकरणी वतात रहा ग कवठकरणी, टेकाव रहा ग खेरडकरणी, शेरडं पाळ ग इंदूलकरणी, बाजार भर ग चरेगांवकरणी, अड्ड्यावर बस ग उंब्रजकरणी, मेवा खा ग शिंवडकरणी, वरण कर ग वराडकरणी, बनांत राहा ग कोनेगांवकरणी, जागा सोड ग तासावडकरणी, अफू पाळ ग बेलावडकरणी, ढोल बांध ग न‍उशीरकरणी, दुपारती टाक गं कोपर्डीकरणी, कयताळ वाजीव नागांवकरणी, माळावर रहा ग मुंढेकरणी, टेकडावर घर ग गोटकरणी, टुंगींत रहा कराडकरणी, संगमावर रहा ग सैदापूरकरणी, ठेसनावर रहा ग गडकरणी पळून जा ग करवडकरणी, वाघ मार ग वांगीरकरणी, रेशीम भर ग रिसवडकरणी, टाका मार ग आतवडकरणी, गाया पाळ ग सुरलकरणी, धारा काड ग कामटीकरणी, औषध उडीव ग कडेपूरकरणी, सवतीवर नांद ग सवलकरणी , दारू काड ग तोंडलकरणी, बकरं काप ग शाळगांवकरणी, सांगावा ने ग रायगांवकरणी, कैफ आण ग हिंगणगांवकरणी, फिर्याद कर ग कोळजकरणी, साक्षी दे ग खेरडकरणी, खटला चालीव ग येतगांवकरणी, सुपारी फोड ग चिखलहोळकरणी, दंड काढ ग नागवाडीकरणी, पान खा ग घानवडकरणी, तंबाख खा ग गार्डीकरणी, नाक्यावर रहा ग विटेकरणी, नदार राक ग निवरीकरणी, तांदूळ चर ग ढवळसर. करणी, भात कांड ग भाळगणीकरणी, चटणीला जवास आळसुंदकरणी, जेवाय वाड ग कार्वेकरणी, पारव पाळ ग पारेकरणी, माप घाल ग सांगलीकरणी, माप घे मिरजकरणी, नारळ तोड ग तासगांवकरणीं, डोंगराव पीर ग डोंगरकरणा, लाह्या भाज ग जोंधळखिंडीकरणी, नथीचा आंकडा वेजेगांवकरणी, माती उकर ग सांगालकरणी, चाळशी घाल ग साळशिंगकरणी, काकड नाचीव वलकाडकरणी, कंबरला खुरपं माहूलकरणी, पट्टा वड ग इबतकरणी, खिंडींत रहा तरसवाडीकरणी, कांदा खा ग झरकरणी, वस्तीला रहा ग महुदकरणी, दर्शन कर पंढरपूरकरणी, गाया पाळ ग लोटवाडीकरणी, भिंत बांध ग लिंबूडकरणी, सनई वाजीव ग वरकूटकरणी, कुत्रं पाळ ग पिंपरीकरणी, खांद्याव खोरं मांडवकरणी, धयाचं गाडगं दहीवडीकरणी, गोंदुन काड ग गोंदावलकरणी, खेळण्याचा अड्डा नरावणकरणीं, बक्षीस दे ग खातवळकरणीं, बोरं खा ग बोंबाळकरणी, पाटीवर गोंडा मोराळकरणी, आटत उभी ईकळकरणी, कुंकवाचा टिळा मायणीकरणी, आंकूडबांधा शेडगवाडीकरणी, निर्मळ धुणं चितळकरणी; सीतासावीत्रीचा रुखवत आला बघून घ्या, आमच्या आण्याचा दुनावा भरून द्या."
या उखाण्यामध्यें अशा प्रकारें लग्नाला गोळा झालेल्या आणि आमंत्रण करूनहि न आलेल्या गणगोतांतील व इष्ट मैत्रींतील बायकांचें व त्यांच्या गांवचें वैशिष्ट्य त्या गांवच्या नांवासह दिलेलें आहे. त्यामुळें हा उखाणा ऐकतांना मोठी मजा येते. खेरीज एवढें मोठें सर्वसामान्य भूगोलवजा ज्ञान सर्वांच्यापुढें ठेवलें आहे, तेव्हां ह्या उखाण्याची भरपाई करून दाखवा म्हणुन प्रतिपक्षाला केलेलें आव्हान देखील मोठें गंमतीदार आहे.
रुखवताच्या उखाण्यांचा प्रकार हा असा आहे. असे उखाणे खेडोपाडी शेंकड्यांनी सांपडतील. पण तर्‍हा जवळ जवळ अशीच असते असें म्हणावयास हरकत नाहीं. रुखवताच्या वेळीं नाहीं म्हणायला आणखी एक प्रकारचा उखाणा घेतात, तो असा असतो-
"आला आला रुखवत आंब्याच्या बनांत, नवर्‍याचे कुरवली म्हणती मी एकली, हाना वरमायला चेपली. वरमाय म्हणती मी नवर्‍याची माता, द्या वराडाला लाता. वराड म्हनतं आमी सुकाची पांकरं, घ्या वाजंत्र्याची धोतरं. वाजंत्री म्हनत्यात आमी मौजच गडी, उपटा पुडायताची दाडी. पुडायत म्हनत्यात आमासंग कां वाकडं, घाला भटाच्या पाटींत लांकडं. भट म्हनतो माजी कवळी कातडी, काडा वधूबापाची कातडी. वधुबाप म्हनतो मी काय केलं, धनसंपदा बगून लेकीला दिलं."
इथें प्रतिपक्षाचे भरपूर वाभाडे काढलेले आहेत. हा शिवीगाळीचा प्रकार आहे! समजुतीनें न घेतां भांडणाचें पर्यवसान पराकोटीला गेलें कीं असें होतें. पण मग त्यामुळें हा उखाणा जी बाई घालील तिच्यापायीं विहिणीचें मन सांभाळणें जड होऊन बसतें. कारण असे उखाणे घरच्यापेक्षां दारच्या बायकाच अधिक घालीत असतात आणि मग सारें घरच्या बाईला निस्तरावें लागतें. या उखाण्यामध्यें सांगितल्याप्रमाणें अशा वेळीं परस्परांवर सगळें ढकलून टाकण्यांत सर्वजण पटाईत असतात. तथापि असा प्रसंग निर्माण होऊं नये, याची शक्य तों खबरदारी घेऊनच मुलीची आई मांडवामध्यें वावरण्याचा प्रयत्‍न करीत असते.
खेडोंपाडींच्या स्त्रियांच्या तोंडीं असलेल्या अशा या उखाण्यांत ठराविक अक्षरगण अगर मात्रागण किंवा अक्षरावली अगर मात्रवलि यांचें बंधन दिसून येत नाहीं. त्याचप्रमाणें या ठिकाणीं ओळींचें बंधनहि असलेलें आढळत नाहीं. यमकांचा भरपूर वापर करीत मनांत आलें तें सांगून मोकळें झालें असा हा प्रकार आहे. त्यामुळें या उखाण्याबाबत 'म्हटलें तर गद्याप्रमाणें वाचावा अगर पद्याप्रमाणें म्हणावा' असें कोणीं कोणीं म्हणतात, तें एकपरी खरें वाटूं लागतें. कारण अलिकडेच मराठीमध्यें रूढ होत चाललेल्या 'मुक्त छंद' चें आवरण ह्या उखाण्याभोंवतीं असल्याचें दिसून येईल. या उखाण्यांचा उपयोग मनांतील गोष्ट ठासून सांगण्यासाठीं पार्श्वसंगीताप्रमाणें होत असतो. त्यामुळें अर्थापेक्षां इथें यमकाचें प्राबल्य विशेष! तथापि पुष्कळदां जरूर तो अर्थ सांगण्यासाठींहि कांहीं उखाण्यांचा चांगला उपयोग होत असतो.
उखाणे घालण्याची ही चाल महाराष्ट्रांत फार जुनी आहे. मागोवा काढीत गेले तर त्या बाबतचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्यें असा सांपडतो-
"जैसे न सांगणें वरी । काळापतीसी रूप करी ।
बोलु निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥"
(अ. १५।४६८, साखरे प्रत)
म्हणजे नवी नवरी नवर्‍याचें नांव न उच्चारतांच जसें तें अकर्तेपणें सुचविते, तसेंच ब्रह्माचें वर्णन कांहीं न बोलूनच करतां येतें असें ज्ञानदेवांनीं येथें म्हटलेलें आहे.
उखाणा घालून पतीनें नांव घेण्याची पद्धति समाजामध्यें रूढ असल्याचा उल्लेख एकनाथांच्या वाङ्मयांतहि आलेला आहे. 'रुक्मिणी स्वयंवरां' त १५ ते १८ या अध्यायामध्यें तत्कालीन विवाहाच्या पद्धतीची जी माहिती आली आहे तीमध्यें पुढील वर्णन सांपडतें-
"रेवती म्हणे जी यादवा । आधिं घ्या ईचीया नांवा ।
हळदी मग ईसी लावा । देवाधि देवा श्रीकृष्णा ॥
मराठी भाषेंतील वाङ्मयप्रकार अगदीं मूळचा असा आपल्याकडीलच आहे. त्यासाठीं परक्या भाषेची अगर विचारांचा आवश्यकता आमच्या बायका मंडळींना कधीं भासली नाहीं.मराठीचा जुना खजिना आणि अस्सल सौंदर्य ज्यांना पुरेसें वाटलें. त्याच कारणानें वाडवडिलार्जित अशी ही आपली संपत्ति आमच्या बायकांनीं आपल्या मराठमोळा भाषेच्या बळावर व आठवणीच्या शक्तीवर वर्षानुवर्षे सांभाळलेली आहे. एका पिढीनें हें बोल स्वखुशीनें आणि मोठ्या भक्तिभावानें पुढील पिढीच्या हवालीं केलेलें आहे. बालवायांतच मिळविलेली ही बौद्धिक देणगी स्त्रियांना मोठेपणीं बौद्धिकदृष्ट्या मोठी वैभवशाली वाटत असते.
डॉ. कमलाबाई देशपांडे यांनीं या वाङ्मयप्रकारास अपौरुषेय वाङ्मयांतील 'अनुष्टभ छंद' असें म्हटलें आहे. अनुष्टुभछंद हा वाल्मिकी ऋषींना सहजस्फूर्त झालेला असा अभिजात संस्कृतांतील पहिला छंद आहे. त्या दृष्टीनें या वाङ्मय प्रकारास हें नांव देणें योग्य आहे, असें म्हणावयास हरकत नाहीं.
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) म्हणी

सामान्यतः लोकांच्या तोंडीं असलेल्या म्हणी ह्या दिसायला उखाण्यासारख्याच आहेत. गद्यमय रचना आणि यमक असणें या गोष्टींचा विचार केला तर त्यांचा तोंडावळा उखाण्यांसारखाच आहे. परंतु दोहोंच्या स्वभावांत अंतर मात्र भरपूर आहे. निरर्थक शब्द म्हणींमध्यें खपावयाचे नाहींत. उलट आटोपशीरपणें व अगदीं मोजक्या शब्दांनी आपल्यामनांतील भाव लोकांना सांगणें हें म्हणींचें काम असतें. इथें मनोरंजनाला थारा नसतो. शहाणपणाची इथें मोजदाद होत असते.
कितीकदां व्यावहारिक जीवनाचा विचार करतांना असें आढळून येतें कीं, पुष्कळांना आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्यें म्हणींचा वापर करण्याची सवय फार असते. अर्थात् तें अगदीं सहजगत्या होत असते. म्हणींचा उपयोग स्त्रियांच्याप्रमाणें पुरुषहि करीत असतात. त्यामुळें कोणतीहि म्हण सर्वांच्या तोंडीं रुळलेली असते. तथापि प्रमाणच पहावयार्चे झालें तर स्त्रियांच्याकडून म्हणींचा वापर अधिक झालेला दिसून येतो. उदाहणादाखल कांहीं म्हणीं इथें देत आहें-
१. सवत साहीना मूल होईना.
२. जिकडे गेली वाझं तिकडे झाली सांज.
३. सून आली घरांत नि सासू पडली केरांत.
४. दिसायला गरती नि गांवभर फिरती.
५. नाजूक नार, मोत्यांचा हार, पर चाबकाचा मार.
६. साप म्हणूं नये बापडा नि नवरा म्हणूं नये आपला.
७. पहिल्या वरा न् तूंच बरा.
८. जाळावांचून कढ नाहीं व मायेवांचून रड नाही.
९. जात्यावर बसं नि ववी सुसं.
१०. केसांनीं केलाय दावा तरी जीव हाय नवा.
११. पोराची माया राखवानी नि आईची माया लाखवानी.
१२. गळा न् वळा गांव झाला गोळा.
१३. खाण तशी माती.
१४. पुण्य करतां ऊन लागतं
१५. घरोघरीं मातीच्या चुली.
१६. जित्यांची खोड मेल्याशिवाय जात नाही.
१७. बळी तो कान पिळी.
१८. पळसाला पान तीनच.
१९. कानामागून आली नि तिखट झाली.
२०. ऊंस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊं नये.
अशा प्रकारच्या म्हणीं शेंकडों आहेत. आणि आजवर त्यांचा संग्रहहि अनेकांनीं केला असून त्याचें प्रकाशनदेखील झालेलें आहे. त्यामुळें याठिकाणीं त्याबाबत अधिक विचार झालेला नाही. तथापि या वाङ्मयप्रकारासंबंधीं एवढें दिसून येतें कीं, काळ कितीहि बदलेला असला तरी सुशिक्षित मंडळींच्याहि तोंडीं म्हणी असलेल्या सर्वत्र ऐकावयास मिळतात! म्हणजे पूर्ववतच म्हणींची लोकप्रियता अद्यापहि कायम आहे.
मराठींतील स्त्रीधन उखाणा ( आहाणा ) पुरुषांचा उखाणा

पतींचें नांव घेण्यासाठीं स्त्रिया ज्याप्रमाणें उखाण्यांचा उपयोग करतात त्याप्रमाणें पत्‍नीचें नांव घेण्यासाठीं क्वचितप्रसंगी पुरुषहि उखाण्यांचा उपयोग करतांना दिसून येतात. पण उखाणा घालून पुरुषानें नांव घेण्याचा प्रसंग फार क्वचित येतो. लग्न कार्याच्यावेळीं चुकूनमाकून कोणीं आग्रह केलाच तर ही वेळ येते. एरव्हीं पुरुष बायकोचें एकेरी नांव घेऊनच हांक मारीत असतात.
पुरुषमंडळी घेत असलेला उखाण्यांच्यापैकीं नमुन्यादाखल म्हणून कांहीं असे आहेत-
१. आंगर काठी, डोंगर काठी, सातारा गांव, झणकार्‍यानं कुंकूं लावती तिचं * * * नांव.
२. श्रावणांत पडतो पाऊस आणि * * * हिच्या नांवाची मला फार हौस.
३. उगवला सूर्य, प्रकाशिलं ऊन सीतामाई मातुश्रीची * * * सून.
४. भाजींत भाजी मेथीची * * * माझ्या प्रीतीची.
५. चांदीच्या ताटांत बुंदीचे लाडू, ऊठ ऊठ * * * सोमवार सोडूं.
परंतु अशा उखाण्यांची संख्या एकंदरीनें कमीच आहे. आणि आहेत त्या उखाण्यांमध्यें मनोरंजनाच्या दृष्टीनें अगर विचार करायला लावणार्‍या वाक्य रचनेच्या दृष्टीनेंहि कांहीं विशेष नसल्यानें त्याबाबत कुठें गाजावाजा झालेलाहि ऐकिवांत नाहीं!
उखाण्यामध्यें येणारा सर्व प्रकार या पद्धतीचा आहे. या सर्व उखाण्यांच्या वरून एक गोष्ट धान्यांत येते कीं, स्त्रियांच्यामध्यें असलेला धीटपणा, समयसुचकता, बुद्धिचातुर्य आणि रचनाकौशल्य यांची पारख यावरून निश्चितपणें करतां येण्यासारखी आहे. एवढेंच नव्हें तर या अडाणी अंतःकरणांत हें एवढें सुंदर वैभव मावलें तरी कसें असा सुशिक्षित मनाला भ्रम पाडण्याची यामध्यें ताकद आहे. आणि फाटक्या लुगड्याखाली झाकलेल्या मनाला साधी मीठभाकर खाऊन एवढें सुचलें तरी कसें ही मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, यांत शंका नाहीं. उत्तम प्रकारच्या अलिकडील वाङ्मयाची कसोटी लावून या वाङ्मय प्रकारची पारख करतां येणार नाही. तथापि असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, कुठें कुठें आढळणारी रचनेंतील शिथिलता अगर निरर्थक शब्दांचा भरणा सोडला, तर अभ्यासू मनाला जुन्या मराठीची ओळख करून देणारी ही किमया आहे. एवढेंच नव्हें तर अभिमानानें 'ही आमची मराठी' म्हणून मराठीच्या दरबारांतील मानाचें हें रत्‍न विद्वानांच्यापुढें ठेवावयास कुणालाहि हरकत वाटूं नये, एवढा हा उखाणा वैभवशाली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP