स्त्रीधन - मारुती

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

प्रभु रामचंद्राचा एकनिष्ठ सेवक म्हणून मारुतीची सर्वांना ओळख आहे. स्वतःची सर्व शक्ति पणाला लावून मारुतीनें राम आणि सीता यांची सेवा केली. एवढ्या त्याच्या कर्तबगारीवरच सामान्य माणसें बेहद्द खूष आहेत.
मारुतीचें दुसरें नांव हनुमान किंवा हनुमंत असें आहे. या हनुमंतानें रामरावण युद्धामध्यें रामाची बाजू फारच चांगली सांभाळली असून सीतेची सुटका करण्यास मदत केली आहे. याच हनुमानाची स्वामीभक्तीची खूण म्हणून एक लोककथा सांगतात. सीतेला घेऊन राम भारताला परतल्यानंतर एके दिवशी सकाळीं असा प्रसंग निर्माण झाला कीं, रामाला तहान तर लागली होती परंतु शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय पाणीग्रहण करावयाचें नाहीं, असा रामाचा नियम असल्याकारणानें शिवलिंगाचा शोध सुरू झाला. परंतु शिवलिंग ऐनवेळीं कुठें मिळेना. त्यावेळीं हनुमात सात वनें ओलांडून दोन शिवलिंगे पैदा करून आला. परंतु तो येण्यापूर्वीच सीतेनें आपलें सत्त्व पणाला लावून मातीचें शिवलिंग तयार केले होते व त्याची पूजा करून रामानें पाणीग्रहण केलें होतें. हनुमानाला या गोष्टीची कल्पना नव्हती. म्हणून त्यानें सीतेनें केलेलें शिवलिंग उचलून टाकून त्या जागीं आपण मिळवून आणलेलें शिवलिंग स्थापावयाचा प्रयत्‍न केला. पण त्याच्या शक्तीनें माघार घेतली. सीतेची थोरवी त्या मातीच्या शिवलिंगानें पारखली होती. तें कांहीं केल्या हालेनाच ! त्यावेळीं हनुमानानें आपल्या शक्तीचा गर्व मनांतून बाजूला काढून सीतेच्या पायावर लोळण घेतली, अशी ही कथा सर्वत्र थोड्या फार फरकानें सांगितली जाते.
आठ दिसाच्या शनीवारीं        देवा मारुतीला आंगूळ
                    किष्णा सारीतीया घोळ
दर शनिवारी मारुतीची पूजा करून त्यास स्नान घालण्यांत येतें व तो प्रसन्न व्हावा म्हणून लोक उपवास करतात त्याची माहिती इथें अशी आली आहे. या मारुतीला स्नानासाठीं पाणी मिळावें म्हणून कृष्णानदी आपला घोळ (पाण्याचा लोंढा) त्याच्याकडे धाडते, ही या गीतांत आलेली भावना मोठी ह्रदयस्पर्शी आहे.
आतां सांपडला            वल्या धोतराचा पिळा
आंगुळीला गेला            देव मारुती ग भोळा
वल्या धोतराचा पिळा        बाई घावला पान्या जातां
देव मारुती कां ग            आंगुळीला गेला होता
या ओव्यामध्यें मारुतीच्या आंघोळीची कल्पना ओल्या धोतराच्या पिळ्यावरून केलेली आहे; तसेंच ओलेत्यानें मारुतीची पूजा करणार्‍या भक्ताचीहि माहिती इथें नकळत सुचित केली गेली आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. कारण भल्या पहाटेच्या वेळीं ओल्या कपड्यानिशीं मारुतीची पूजा करण्याची चाल मराठी मुलखांत आहे.
चौघडा वाजतांना            सारा डोंगर दणाणला
                    देव मारुती जागा झाला
पहाटेच्या वेळीं होणार्‍या मारुतीच्या पूजेची हकीकत या ओवीनें दिली असून देवाला जाग येईपर्यंत पूर्वी चौघडा वाजविला जात असे, याची खूण इथें डोंगर दणाणल्याच्या निमित्तानें सांगितली आहे ! देव जागा व्हावयाचा म्हणजे गांवचीं माणसें जागी होऊन त्याचें दर्शन घ्यावयास यावयाचीं व काकड आरतीला एकत्र जमा व्हावयाचीं, असा याचा अर्थ घ्यावयास हरकत नाहीं !
दुपारचा जोगी            दूध मागीतो प्यायाला
देव मारूती गं            आला सतव घ्यायला
दुपारच्या वेळीं भिक्षेसाठीं दारी आलेला जोगी ज्याअर्थी दूध मागतो आहे, त्याअर्थी मारुतीच सत्त्व घेण्यासाठी जोग्याचें रूप घेऊन दारीं आला असला पाहिजे, अशी सामान्य मनानें केलेली खात्री इथें व्यक्त झाली आहे. पूर्वीच्या काळी देव सत्त्व घेण्यासाठीं असा येत असल्याच्या महाभारतकालीन कथांच्या श्रवणाचा हा परिणाम असला पाहिजे असें म्हणता येईल. ऐकलेल्या कथेंतील देव कोणता का असेना त्याची जागा आपल्या आवडत्या देवानें भरून काढावी, अशी भोळी श्रद्धा बाळगूनच बायका अशा ओव्या रचतात !
माता अंजनीच्या पोटीं        बाळ जन्मलें जगूजेठी
गुप्त सोन्याची कासोटी        मुखीं रामनाम
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
आमी जातों लंकेच्या तटीं         सीताबाई माऊलीसाठीं
तिथं राक्षसांची दाटी            मशीं ध्यान
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
रावनाची मंडोदरी            तिथं गेले बरमचारी
सीता आनली रावनचोरी        कुठं ठेविली सांग
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
सीताबाईला लागली निद्रा        जागी करूनी दिली मुद्रा
तिथं आले रघुपति            सपनीं राम
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
सीतामाईची आज्ञा घेतो        कंदफळें वेंचूनि खातो
मुंगी होऊन तिथं रहातो        फार लहान
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
ह्या वनांत बहुफळं दिसती        तिथ राक्षसांची वस्ती
बाळ अंजनिचा खेळे कुस्ती        पुच्छा फिरवी लांब
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
मारुतीनी राक्षस मारीले        रावन राजापाशीं सारे नेले
मोठं कठीन काम            करी हनूमान
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
आले मारूती महानंदी        तिथं राक्षसांची बंदी
सीता पुष्पाच्या हाराखालीं        घेई रामनाम
नको जाऊं मारूती            जरा थांब थांब थांब
मारूतीच्या जन्माची हकीकत देऊन त्यानें लंकेला केलेली कामगिरी इथें वर्णन केलेली आहे. हें गाणें बायका 'मारुतीचें गाणें' या नांवानेंच ओळखतात व सांगतातहि.
मारुतीच्या मुखीं असलेल्या रामनामाची व त्याच्या जन्मतःच असलेल्या सोन्याच्या लंगोट्याची हकीकत इथें सुरवातीसच मोठ्या अभिमानानें दिलेली आहे.  'गुप्त सोन्याची कासोटी' असा हनुमानच्या लंगोट्याचा इथें उल्लेख आला आहे !
लंकेमधील हनुमानाची कौशल्यपूर्ण कामगिरी सर्वांच्याच परिचयाची आहे, ती इथें थोड्या विस्तारानें आली आहे असें म्हणतां येईल. कारण नेहमींची कथा सांगितली जाते त्यापेक्षां लंकेंतील फळांच्या बागेंत राक्षसांची वस्ती असतांनाहि तीं मिळावींत म्हणून मारुती त्यांच्याशी कुस्ती खेळतो, सीतामाईच्या आज्ञेने कुंदमुळें खातो, सीतेला जागी करून रामाची मुद्रा देतो, मंदोदरीजवळ हा ब्रह्मचारी सीतेची विचारपूस करतो, सीतेवर पुष्पांचा वर्षाव करून तो तिला लपवून ठेवूं पहातो इत्यादि इथें आलेली हकीकत थोडी वेगळी आणि तपशीलवार वाटते.
या गाण्यांतील मारुतीला 'जाऊं नको जरा थांब' असा केलेला अडथळा रावणाच्या भव्यतेची व हनुमानाच्या धैर्याची कल्पना देत आहे. वानरांच्या सैन्याच्या बळावर राक्षसांचा निःपात करणें अवघड असल्याची धोक्याची सूचनाच हा अडथळा व्यक्त करीत आहे ! तथापि मारुतीनें एवढी भरीव आणि कौतुकास्पद कामगिरी केली कीं, त्याला दृष्ट लागूं नये म्हणून प्रत्येक कृतीनंतर त्यास 'आतां थोडें थांब' असा इषाराहि इथें दिला असणें शक्य आहे !
रामसीतेच्या सहवासांत मारुतीचा विकास झाल्यानें त्यांच्याविषयींच्या वेगळ्या प्रकरणामध्यें मारुतीची माहिती याखेरीज आणखी निराळी अशी आलेली आहेच.
शक्तीचा एक उपासक या दृष्टीनेंहि मारुतीचा नांवलौकिक असून पहिलवान मंडळी त्या दृष्टीनें त्याची आणखी वेगळी अशी उपासना करतांना दिसून येतात.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP