स्त्रीधन - एकादशी

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

आपलें आणि आपल्या मुलाबाळांचें भलें व्हावें, म्हणून खेडोपाडींच्या असंख्य स्त्रिया उपासतापास करीत असतात. त्यामुळें आपल्या इच्छित कार्यास चांगली फलप्राप्ति होते अशी त्यांची समजूत असल्याकारणानें, हे उपवास त्या मन लावून आणि भोळ्या श्रद्धेनें करीत असतात. एवढेंच नव्हे तर त्या आनंदांत इतर कशाचेंहि भान राहूं शकत नाहीं एवढा एखाद्या उपवासाचा छंद त्यांना लागलेला दिसून येतो ! दर पंधरवड्याला येणार्‍या एकादशीचें माहात्म्य तर विशेष असतें. हा उपवास बहुतेक सर्व भाविक मनाच्या स्त्रिया करतांना दिसून येतात.
शेजी विचारीती            सडा पोतीरा आज काई
                    आली एकादशी बाई
एकादशी करावयाची म्हणजे स्वतः डोक्यावरून स्नान करावयाचें आणि घरदार किंवा विशेषतः सैंपाकघर सारवून काढावयाचें. सर्वत्र स्वच्छता राखल्यानें मनहि प्रसन्न रहातें हा त्या मागचा हेतु आहे. त्यामुळें असें सारवण निघालें म्हणजे साहजिकच एखादीला 'आज काय बेत ग ?' असे शेजारीण विचारीत असते आणि तिला 'आज एकादशी नाही का?' असें उत्तरहि मिळते. त्याच भावनेचा या ओवीमध्यें आविष्कार झालेला आहे.
या ओवीवरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती अशी कीं, जुन्या काळी असें सारवणसुरवण अशा उपवासाच्या निमित्तानेंच तेवढें होत असावें ! एरव्ही तें जर नित्यांतलें असतें तर असा प्रश्न विचारावयाचें कारणच उरलें नसतें.
एकादशी बाई                कां ग दारांत तूं उभी
केळीच्या पानावरी            चल बारस सोडूं दोघी
एकादशी बाई                सांग माझ्या ग कानामंदी
बारस सोडायाला            जाऊं तुळशी बनामंदीं
एकादशी बाई                तुजं कुठंवर ग जानं
तुळशीवनीं आमचं ठाणं        घरी सांजला आमा र्‍हानं
उपवास सोडावयास चांगले अन्नपात्र म्हणून केळीच्या पानाची निवड केली जाते. हेतु एवढाच कीं, एक तर तें स्वच्छ असतें आणि अन्नाचा लवलेशहि त्यापूर्वी त्यास लागलेला नसतो. तेव्हां या केळीच्या पानाचा उल्लेख इथें त्या दृष्टीनें आलेला आहे.
खुद्द एकादशीलाच 'तूं दारांत उभी कां ?' अशी आंत येऊन माझ्याबरोबर उपवास सोड,' अशी इथें विनंति केली आहे ! त्यामुळें हा मोठाच अद्‌भुत चमत्कार वाटतो यांत शंका नाहीं.
हा उपवास बारस सोडावयाचा तर तुळशीच्या बनामध्यें जाऊंया अशी कानगोष्ट या गीतांत एकादशीशीं केलेली असून, आमचें रहाणें दिवसा तुळशींबनांत परंतु रात्रीं मात्र घरीं असा इषाराहि तिला दिलेला आहे ! कारण बारस सोडायला म्हणून जें जावयाचें तें वेळेला घरी येण्याच्या टप्प्यांत असावे हा हेतु तिला जरूर कळावा, ही त्या इषार्‍यामागची भावना आहे ! एकादशीशीं केलेली ही कानगोष्ट अतिशय परिणामकारक उतरली असून, तिच्या मागें असलेली प्रामाणिक पण सत्य गोष्टहि आकर्षक झाली आहे. स्त्रियांनीं वेळींच घरीं परतावें अशी इथें नकळत सूचित केलेली भावना सत्य परिस्थितीला धरून अशीच आहे. पण ती प्रत्यक्ष सरळ सरळ बोलून न दाखवितां या रीतीनें सांगितली आहे इतकेंच !
एकादशी बाई                दुवादशीला करतं वांगं
बारस सोडायाला            देव आल्याती पांडुरंग
एकादशी बाई                दुवादशीला करते भात
बारस सोडायाला             देव आल्याती एकनाथ
एकादशी सोडावयाची म्हणजे व्यवस्थित सैंपाक करून मग जेवण्याची प्रथा आहे. आदल्या दिवशीं उपवास घडल्यानें भूक लागलेली असते आणि गोडधड अन्न ग्रहण करून पोट भरावें ही त्या मागची भावना असते. कुणी कुणी फक्त पाण्यावर राहूनहि एकादशी करतात ! त्यांना अशा जेवणाची आवश्यकता असते आणि केवळ फराळ करून दिवस काढल्यानें कुणाची भूकहि भागलेली नसल्यानें त्यांना पण चवीचें जेवण हवें असतें. तेव्हां वांगें आणि भात केला असून जेवायला पांडुरंग आणि एकनाथ आल्याची माहिती या जेवणाच्या निमित्तानें दिली आहे. वास्तविक वांगें अगर भात या जिनसा आजकालच्या रोजच्या जेवणांतील आहेत. परंतु ज्याअर्थी त्यांचा इथें उल्लेख आला आहे, त्याअर्थी पूर्वीच्यकाळीं सणावारीच त्यांचा वापर होत असावा, असें दिसून येतें.
एकादशी बाई                नांव तुजं कवयीळं
लगूड बंदापाशीं            रामसीत्तेचं देवूयीळ
एकादशी हें नांव कोवळ्या मुलीसारखें नाजुक असून तिच्या निमित्तानें ठराविक ठिकाणीं असलेल्या रामसीतेचे दर्शन घ्यावें लागत असल्याचें हें गीत सांगतें आहे. या ओवीत दक्षिण सातारा जिल्ह्यांमधील अष्टें (ता. वाळंबे) येथील लगूडबंदाच्या विहीरीजवळील देवळाचा उल्लेख आलेला आहे. परंतु इतरत्र त्या त्या गांवाप्रमाणें हें स्थान बदलतें रहातें. ओवीचा इतर भाग मात्र असाच कायम असतो.
या गीतांत एकादशीला कोवळी म्हटली आहे त्याचें कारण माझ्या कल्पनेप्रमाणें तिच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा असला पाहिजे. एरव्हीं या विशेषणाची आवश्यकता भासली नसती.
एकादशी बाई                आहे निर्मळ तुझा धंदा
                    संत लागले तुझ्या छंदा
ज्याअर्थी संत मंडळी-वारकरी मंडळी एकादशी करीत असतात, त्या अर्थ तिची योग्यता मोठी असून तिचा हा व्यवसायहि निर्मळ आहे, असें एकादशी माहात्म्य ही ओवी दर्शवीत आहे. एकादशीचा हा व्यवसाय म्हणजे तिच्या निमित्तानें घरींदारीं व अंतःकरणांत होणारी स्वच्छता असा घेतां येईल.
उपासातापासावरील अशीं पुष्कळ गीतें मराठींत सांपडतील. त्याचप्रमाणें श्रावणांत सांगण्यांत येणार्‍या व्रतवैकल्यावरील कहाण्याहि मराठीमध्यें आहेत. परंतु केवळ वानवळा म्हणूनच मी हें एकादशी माहात्म्य इथें सांगितलें आहे.    

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP