स्त्रीधन - राम आणि सीता

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

मराठी मनाचें एक आवडतें दैवत आणि आदर्श देवता म्हणून राम आणि सीता यांचा लौकिक आहे. रामाचें राज्य म्हणजे भारताची आदर्श राज्यव्यवस्था अशी लोकांची कल्पना आहे. त्यामुळें राजा म्हणून त्याचा लौकिक. त्याचप्रमाणें त्यानें अंगिकारलेलें एक पत्‍नीव्रतहि लोकांना विशेष प्रिय. त्यासाठींहि त्याची कीर्ति. त्यानें वडिलांच्या शब्दासाठीं आणि सावत्र आईच्या इच्छेसाठीं वनवास पत्करून दाखविलेला त्याग म्हणजे मोठें दिव्य आहे. सामान्य लोकांना या त्यागाची थोरवी फार आहे. रामानें रावणाचा केलेला पराजय सर्वश्रुत असल्यानें योद्धा म्हणूनहि त्याचें श्रेष्ठत्व समाजानें मान्य केलें आहे. या अनेक कारणांमुळें रामाबद्दल लोकांच्या मनांत विशेष श्रद्धा निर्माण झाली असून, त्याच्या या मोठेपणाला कारणीभूत झालेल्या सीतेचीहि थोरवी त्यांच्या मनाची पकड घेऊन राहिली आहेत. सीतेनें रामाबरोबर भोगलेला वनवास, लंकेमध्यें भोगलेला त्रास, केलेलें अग्निदिव्य आणि गरोदरपणीं एकटीनें सोसलेल्या हालअपेष्टा या तिच्या चढत्या श्रेणीमधील त्यागाची किंमत मराठी मनानें पारखली आहे. त्यामुळें मोठ्या सहानुभूतीनें समाजानें आजवर तिच्याकडे पाहिलें आहे.
'रामायणां'तील रामसीतेची कथा सामान्य स्त्रियांनीं वारंवार ऐकलेली असल्यानें आपल्या भाषेंत ती अमर करून ठेविली आहे.
सकाळच्या पारीं        माज्या हातांत गंधवाटी
                रामचंद्र यीयासाठीं
सकाळच्या पारी        काय वाजतं भराभरा
                राम तुळशीला घाली वारा
सकाळच्या पारी        लाभ कशाचा झाला मला
                करंड सोन्याचा गवसला
'रामप्रहर' या नांवानें ओळखल्या जाणार्‍या सकाळच्या वेळेस रोजच्या आयुष्याची मंगल सुरवात कशी होते, याच्या खुणा या ओव्यांनीं मोठ्या भक्तिभावानें सांगितल्या आहेत. तुळशीची पूजा, गंध उगाळणें आणि करंड गवसणें या बायकांच्या दृष्टीनें शुभगोष्टी मानल्या जातात. त्याचीच इथें अशी वाच्यता झालेली आहे.
काळी चंद्रकळा तिच्या पदरीं रामसीता
माऊली माजी बया नेसली पतिव्रता
राम नि सीताबाई दोनी माजी ग साडीचोळी
सकाळच्या पारीं मी कां मोडीतें त्येंची घडी
'काळी चंद्रकळा' म्हणजे जुन्या काळच्या स्त्रियांचें आवडतें महावस्त्र. त्या महावस्त्राच्या पदरावर रामसीता विणलेली असून तें वस्त्र आपली पतिव्रता आई नेसली आहे, ही इथें व्यक्त झालेली भावना स्त्रियांच्या ठेवणींतील भावनांपैकीं ह्रद्य अशी एक आहे. त्याचप्रमाणें प्रत्यक्ष रामसीता म्हणजेच आपली साडीचोळी असून रोज सकाळीं त्याची आपण घडी मोडतों, ही या गीतांत प्रकट झालेली भावना विशेष चित्ताकर्षक आहे. आपल्या वस्त्रांमुळें आणि जणुं रामसीतेच्या आशीर्वादामुळें आपणाला खरी शोभा येते, असा या गीतांचा भावार्थ मोठा सुंदर आहे. कल्पकतेचा एक सुंदर नमुना म्हणून या गीतांच्याकडे अभिमानानें पहावयास हरकत नसावी, एवढें त्यांचें अंतरंग उत्तम आहे.
रामवदनीं कौसल्या घास घाली ॥ ध्रु० ॥
दशरथनंदन करि व्रतबंधन लगबग झाली
येई भोजना शामसुंदरा, संगे लक्ष्मण सुकुमारा,
शत्रुघ्ना ये भरत कुमारा, बाळलेणी सर्व ल्यालीं
रामवदनीं कौसल्या घास घाली ॥ १ ॥
पाट रांगूळी, झाली सर्व तयारी
मातृभोजना बसल्या जमूनी नारी
नानाविध श्रृंगारी नटलीं पक्वान्नें पात्रीं भरलीं
रामवदनी कौसल्या घास घाली ॥ २ ॥
चटण्या कोशिंबिरी लोणचें
कामधेनु त्या अंगणी नाचे
ब्रम्हबाळा माय व्याली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ३ ॥
प्रेमकवळ घे रामा कौसल्येचा
भक्तिग्रास घे बाळ सुमित्रेचा
कैकई म्हणे मम अति आदराचा
भगिनी प्रिया तो वदनीं घाली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ४ ॥
मामी चुलती आते मावशी देई मान तो
गुरुमातेशीं खरा सुदिन तो
गमत मनाशीं वर्णना वाणी थकली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ५ ॥
बहुदेशाचे नृपवर आले
वामदेव शुक मुनीजन जमले
शुभमंगल मुखीं नामा धरिलें
पुत्र बाप कंठीं माळ घाली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ६ ॥
चंद्र गुरुबळ मुहूर्त शोधिला
असती अनुकूल ग्रह रामाला
दशरथ रायें ग्रहमुख केला
अष्ट वर्गी जेवूं घाली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ७ ॥
दिधलीं कितिक दानें ब्राम्हणा
कोण करीतो त्याची गणना
गो भू रत्‍नं परींचीं नाना
लग्न घटिका भरत जाली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ८ ॥
सर्व जगाचा राजा भुकेला
कौसल्येचा अंकी बसला
भरवी माता करिं धरी कवला
ब्राम्हणांनी गर्दी केली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ९ ॥
फिटला अंतरपाटचि आतां
घे बहुवेषा श्री रघुनाथा
वाद्य गजर तो गगनीं जातां
पुष्पवृष्टीं वरुनी केली
कौसल्या रामवदनीं घास घाली  ॥ १० ॥
मुंजिमेखला कौपीन साजे
कंठी यज्ञोपवित विराजे
दंडकाष्टकार झगझग तेज
ध्यानीं मूर्ति नित्य बसली
कौसल्या रामवदनीं घास घाली ॥ ११ ॥
ॐ भवति भिक्षां देही म्हणतो
घेऊनि झोळी विश्व रक्षितो
ब्रम्हचारी हा व्रत गाजवितो
माय भीक्षा त्वरित घाली
कौसल्या रामवदनीं घास घालीं ॥ १२ ॥
व्रतबंधन महिमा रामाचा
चटकदार बहुत मजेचा
वर्णन करुनी आपुली वाचा
म्हणते मी शुद्ध केली
कौसल्या रामवदनी घास घाली ॥ १३ ॥
प्रभु रामचंद्राच्या मुंजीचें वर्णन करणारें हें गाणें आहे. मध्यम व पुढारलेल्या वर्गांतील स्त्रियांच्या तोंडीच हें गाणें आढळतें. या वर्गामध्यें मुलाची मुंज साजरी करतात तो सारा सोहळा रामाच्या निमित्तानें इथें जसाच्या तसा सांगण्यांत आला आहे. जातां जातां इथें रामाच्या घरची हकीकतहि थोडक्यांत आलेली आहे. या गीताच्या शेवटीं म्हटल्याप्रमाणें हें सुंदर वर्णन केल्यानें आपली वाचा शुद्ध झाली असें सामान्य स्त्रीस वाटतें आहे, तेंच हें गीत ऐकल्यानें इतर स्त्रियांनाहि तसें वाटत असल्याचा अनुभव येतो ! 'हें गाणें जुनें आहे. राम महिमा फार जुना. आठवतो तेवढा सांगावा'  अशी या गाण्याची कीर्ति एका म्हातार्‍या बाईनें माझ्या कानावर घालीत हें गाणें जेव्हां मला दिलें, तेव्हां तिच्या या अभिमानाचा मला थोडा हेवा वाटल्याखेरीज राहिला नाहीं !
मोठ्या बायकांनीं खेळ मांडिला
चौरंग सोन्याचा रामा चौरंग सोन्याचा
चौरंग सोन्याचा नि चेंडू झुगारिला मोत्याचा
रामा चेंडू झुगारिला मोत्याचा
झुगारिला मोत्याचा नि चेंडू आकाशीं धांवला
रामा चेंडू आकाशी धांवला
तिथं इंद्राला भेटला नि माघारीं परतला
रामा चेंडू माघारीं परतला
मागं परतला नि चेंडू धरणीव पडला
रामा चेंडू धरणीव पडला
तिथं करदळीच्या जाळीं नि तिथं होता जंबू माळी
रामा तिथं होता जंबू माळी
त्यानं लावील्या मखमली
रामा लावील्या मखमली
मखमलीचीं फुलं जाऊं दे बायकांच्या देवाला
रामा बायकांच्या देवाला
या गाण्यामध्यें लहानग्या रामाला मखमलीच्या फुलांची एक लहान पण सुंदर अशी परीकथा सांगितलेली आहे. लहान मुलाला खेळवीत असतांना मोठ्या बायका चिटुकली गोष्ट सांगून त्या मुलाचें मनोरंजन करीत असतात, त्यांपैकीच हा एक प्रकार आहे. परंतु रामासारख्या मुलाला सामान्य मुलाच्या मानानें इथें थोडें भव्य वातावरण निर्माण करणारी अद्‌भुत कथा सांगितली आहे, एवढाच काय तो फरक. शेवटीं मखमलीचें फूल देवाला वहायचें असल्याची सूचित झालेली या ठिकाणची हकीकत मुलानें उगाच फुलें तोडून त्यांचा चोळामोळा करूं नये, म्हणून केलेली थोडी धमकीवजा कानगोष्ट आहे.
थोरामोठ्यांच्याकडे जुन्या काळीं सोनें नाणें व मोतीं यांची किती स्वस्ताई व खैरात असे याचा हा एक उत्तम दाखला आहे. मुलें जुन्याकाळीं मोत्यांच्या चेंडूनें खेळत ही कल्पना आतां एखाद्या परीकथेइतकाच अद्‌भुतरम्य वाटते.
पहिली माझी ववी            देवा रामाला गाईली
त्याच्या ग पदावरी            लक्ष तुळस वाहिली
पहिली माझी ववी            पैला अभंग मला येतो
रामाच्या शिखराला            कळस सोन्याचा ढाळ देतो
पहिली माझी ववी            पहिला माजा नेम
तुळशीखालीं राम            पोथी वाची
या गीतांनीं उठल्याबरोबर दळायला बसतेवेळीं रामनामाचा केलेला पवित्र उच्चार आणि त्या निमित्तानें केलेली पूजा दर्शविलेली आहे. कोणत्याही कामाला प्रारंभ करावयाचा म्हणजे रामनामाचा जप करावयाचा, या भोळ्या श्रद्धेचा स्त्रीमनानें केलेला हा आविष्कार आहे. या तिन्ही ओव्यांना 'पहिली माझी ओवी' म्हटलें असलें तरी तिन्ही प्रकारचें असें वेगवेगळें गुणवर्णन करून, रामाचा महिमा वाढीला लावण्याचा प्रयत्‍न केलेला आहे.
राम गं म्हनूं राम            राम साकबारीचा पेला
माज्या ग हुरयीदी            त्येनं बंगला बांधीयीला
राम ग म्हनूं राम            राम वलणीचा शेला
रामाचं नांव घेतां            शीण अंतरींचा गेला
राम ग म्हनूं राम            राम माझा ग मयीतारू
रामाचं नांव घेतां            ध्याई झाली या पवितारू
राम ग म्हनूं राम            राम कौसल्या बाईचा
रामाचं नांव घेतां            झाला उद्धार ध्याईचा
राम ग म्हनूं राम            राम कंठीचं कारयीलं
रामाचं नांव सये            मीं ग हुरदीं साठविलं
राम ग म्हनूं राम            राम माजा तो गुरुभाऊ
तुळशीच्या वृंदावनीं            सये वाचूनी मला दावू
राम ग म्हनू राम            राम अमृताचा पेला
रामाचं नांव घेतां            शीन माजा सारा गेला
राम ग म्हनू राम            राम आयुद्धीचा राजा
माज्या जिवाला आधार ग        त्येला दंडवत माजा
रामनामाच्या उच्चारानें किती प्रकारचें समाधान मिळतें याची माहिती या ओव्यांनी दिलेली आहे. आपल्या माहितींतील चांगल्या गोष्टींची रामाशीं तुलना करून त्यामुळें मनाला मिळणारा विसांवा व्यक्त करण्याची ही रीत मोठी ह्रदयंगम आहे. निरनिराळ्या प्रकारच्या भावना बोलून दाखवीत असतांना, तुळशीवृंदावनाच्या तिथें रामाची पोथी-रामायण-वाचून दाखविण्याची इथें केलेली विनंती. सामान्य मनांत रामाबद्दल असलेली विलक्षण ओढ दर्शवीत आहे.
सीता सैंयवर                राजा जनकाच्या घरीं
पत्रिका धाडिली            दूर देशावरी
सीता सैंयवर                जनकाचं भाग्य थोर
मोत्याच्या मंडपांत            आले जावई रघुवीर
सीता सैंयवर                राजांची भरली सभा
रामचंद्र राजा                ऋषी मंडळींत उभा
सीता सैंयवर                 राजे बसले थोर थोर
सीताबाई म्हणे            नाहीं दिसले रघुवीर
सुकुमार राम                कसा उचलील चापबाण
सीताबाई म्हणे            किती अवघड केला पण
सीता स्वयंवराची थोडीफार कल्पना या गीतांतून आलेली आहे. सर्वांच्या परिचयाचा हा विषय असल्याकारणानें त्याची विशेष गोडी. त्यामुळें बायका या ओव्या अनेकदां घोळून घोळून म्हणत असतात. अशावेळीं एक गोष्ट ऐकणाराच्या मनावर असा ठसा निर्माण करूं पहाते कीं, जुन्या काळची ही स्वयंवराची पद्धति आतांहि या स्त्रियांना पसंत असली पाहिजे ! एरव्हीं एवढ्या आवडीनें या ओव्या गाण्याची त्यांना इच्छा व्हायचें कारण काय ?
शिंदेशाई तोडे                सीताबाईला कवा केल
लाडके मैनाबाई            राम इंदूबीर्‍याला गेल
शिंदेशाई तोडे                सीताबाईच्या हातायांत
उजेड पडयीला            रामचंद्राच्या रथायांत
रामाचे मुद्रखडे            सीता घालीती वेनीयींत
सीताचा प्रेमचार            राम आनीतो ध्येनायांत
पावसानं फळी            बाई मांडिली आटिकीटू
सीतबाईच्या न्हाणीवर        रामचंदर हाणी मोटू
सीताबाईला एवड डोळ        लवअंकुशा बाळा येळ
मिरीयाच बाई घस            राम तोडीतो कवळ
जनकराजा बोल            सीता कुनाला द्यावी
दशरथ याही                 राम साजती जावई
राम नि लक्षुमन            दशरथाची दोनी बाळं
सोन्याच्या मंडपांत            सीता रामाला घाली माळ
सीताबाई नवरी            जनकाला पडलं कोडं
रामाच्या धनुक्षाचं            तिनं बसाया केलं घोडं
उगवला नारायण            किरण टाकीतो झाडावर
रामाचा उजेड ग            सीताबाईच्या चुड्यावर
रामाला आला घाम            सीता पुसती पदरानं
कुनाची झाली दिष्ट            रथ गेला बाजारानं
राम आणि सीता यांच्यामधील परस्परांच्याविषयींच्या प्रेमभावनेची कल्पना सांगतां येईल तेवढ्या पद्धतीनें या गीतांनीं सांगितलेली आहे. सीतेसाठीं रामानें काय केलें आणि रामामुळें सीतेचें वैभव कसें वाढलें याची कल्पना या हकीकतीवरून यावयास हरकत नाहीं. रामाला दृष्ट झाली म्हणून सीतेनें आपल्या पदरानें त्याचा घाम पुसला, ही या ठिकाणीं सांगितलेली कल्पना सामान्य स्त्री मनाचा एक चित्ताकर्षक आविष्कार आहे.
उगवला नारायण            पिवळी त्याची काया
दशरथाच्या पोटी            जलमले रामराया
आगाशीं पाळणा            खालीं धरतरी मावली
नांगराच्या ताशीं            सीता जनकाला धावली
राम आणि सीता यांच्या जन्माची व वंशाची हकीकत या गीतांनीं दिलेली आहे. राम हा दशरथाचा मुलगा हें सर्वांना माहीत आहे. परंतु सीतेच्या जन्माची ही कथा अद्‌भुतरम्य असल्यानें तिची गोडी मात्र अधिक.
राम नि लक्षुमन            राजा दशरथाचीं मुलं
लाडके भैनाई                बाई गुलाबाचीं फुलं
राम नि लक्षुमन            डावीकडे सीता शोभे
भरल्या सभेमध्यें            मारुती दास उभे
राम नि लक्षुमन            डावीकडे सीता खेळे
रामाच्या चरणीं            मारुती दास लोळे
रामाची सीता                लक्षुमणाची वहिनी
दशरथाची सून            ज्येष्ठ नारी ती कामिनी
राम नि लक्षुमन            दोघ पटाईत वाघ
सावळ्या सीतेला            रावणाचा हाई डाग
राम आणि सीता यांचा त्यांच्या कुटुंबियांशीं असलेला संबंध इथें सांगितलेला आहे. गुलाबाच्या फुलांशीं रामलक्ष्मणांची केलेली तुलना व शेवटीं सीतेला रावणामुळें लागलेला कलंक या दोन्ही कल्पना इथें मोठ्या प्रामाणिकपणानें व्यक्त झालेल्या आहेत. रामलक्ष्मणाची वाहवा केली आणि सीतेचेंहि कौतुक केलें, तरी रावणामुळें निर्माण झालेला प्रसंग सामान्य मन विसरूं शकत नसल्याची ही एक निशाणी होय.
डेरी दुधानी वाजती                नगरीं चौघडे गाजती
बोलवा ग श्रीरामाला                गादीवरी बैसायाला
राम गादीवर बसला                कैकयीला राग आला
कैकयीला राग आला                राम ढकलूनी दिला
राम हुर्दी खुर्दी झाला            गेला पित्याच्या महाला
ऐसा पित्याला आनंद            आमी जातों वनवासाला
नको ऐसा छंद बाळा            नको जाऊं वनवासाला
अर्धी हवेली देतों तुला            राम ऐकेनासा झाला
गेला मातेच्या महाला            ऐसा आनंद मातेला
राम बोले जननीला                आमी जातों वनवासाला
नको ऐसें बोलू बाळा            गळीची आण तुला
राम ऐकेनासा झाला                गेला बंधूच्या महाला
ऐसा आनंद बंधूला                आमीं जातो वनवासाला
ऐसी बंधूजी बोलला                संगं येतों वनवासाला
राम पुढं लक्ष्मुन मागं            गेले सीतेच्या महाला
ऐसा सीतेला आनंद                रामचरणीं घाली मिठी
राम सीतेला बोलतो                अग तूं सीता ग सुंदरी
आमी जातो वनवासाला            सांभाळावं तूं जीवाला
सीता रामाला बोलती            मी तर येतें तुमच्या संगं
नको येऊं आमच्या संगं            रानामधीं होईल रहाणं
कंदमुळं लागल खाया            पाणी नाहीं मिळल प्याया
सीता ऐकेनाशी झाली            रामासंगं निघायीली
मुख भरलं तांबोळानं            भांग भरला गुलालान
हात भरल चुडीयानं                पाय भरल पोलादानं
नेसली वनवासी वस्त्र            तीन मूर्ति रथामंदीं
रथ चाल घडाघड                जन खळाखळां रड
रामाच्या राज्यारोहण प्रसंगीं घडलेला पेचप्रसंग आणि रामाचें वनवासाला जाणें या दोन प्रमुख गोष्टींची माहिती या गाण्यामध्यें आलेली आहे. फेरासाठी म्हणण्यांत येणार्‍या (खेळांच्या गाण्याविषयींच्या प्रकरणांत अलेल्या) गायाप्रमाणेंच हें गाणें आहे. परंतु याचें अंतरंग विस्तारानें नटलें आहे. राम राज्यावर बसला म्हणून प्रत्येकाला होणार्‍या आनंदावर रामाच्या वनवास गमनाची हकीकत ऐकून पडलेलें विरजण इथें मोठ्या ह्रदयस्पर्शी भावनेनें चित्रित झालेलें आहे. प्रत्येकानें रामाची समजूत घातली परंतु रामानें आपला निश्चय सोडला नाहीं आणि लक्ष्मण व सीता त्याच्याबरोबर वनवासाला जायला तयार झालीं, अशी हकीकत इथें आली असून ती चटकदार झाली आहे. सीतेनें वनवासी स्त्रीला शोभेल अशा प्रकारें स्वतःमध्यें केलेला फरक इथें फारच सुंदर रीतीनें सांगितलेला आहे. रथाची चाल आणि लोकांचे रडणें या दोन भिन्न गोष्टींत दाखविलेलें इथलें साम्य तर बहारीचें आहे !
कोन्या देशीं दशरथ राजा            त्याच्या घरीं फुलाच्या बागा
त्याच्या घरीं रामलक्षुमन            गेले शिकारीला दोघ
गांवाचा गुराखी खालती            तिथं आला जोगी पापी
बाळा विचारूं लागला            सांगा रामाचा वाडा मला
तिथं वाड्याची वो खूण            दारीं तुळशी वृंदावन
दारीं चांदीचं घंगाळ                तोच रामाचा वाडा
जोगी तिथूनी निगाला            गेला रामाच्या वाड्याला
दारीं अल्लख गाजविला            सीता विचारूं लागला
सीता बोलूंजी लागली            घरीं आहें मी एकली
घरीं नाहीं घरवाशी                आम्ही आहें सासरवाशी
जोगी सीतेला बोलला            सत्त्व नेईन मी रामायाचं
सीता तिथूनी उठली                काढलं चवरंगी सूप
काढल्या साळी नि बा डाळी        जोग्या भिक्षा वाढीयीली
जोगी मनांत हांसला                हात सीतेच्या अंगाला
सीता नार किंकाळली            जोग्या हातीं लागीयीली
राम आणि लक्ष्मण हे हरणाची शिकार सीतेच्या छंदासाठींच करावयास गेले असतांना, रावणानें आपलें पापी मन बैराग्याच्या रूपानें सीतेपुढें प्रकट केलें; आणि त्यानें तिला युक्तीनें पळवून नेलें या संबंधींची वनवासांतील ही हकीकत आहे. भीक्षा वाढ नाहीं तर रामाचें सत्त्व हिरावून नेईन अशी रावणानें सीतेला धमकी घातल्यानें, तिनें त्याला अगोदर नकार दिला असतांहि भिक्षा घातली व त्यामुळें रावणानें तिला पळवून न्यायची संधि साधली, अशी ही कथा या गाण्यानें दिली आहे. अनेकदां रामायण ऐकल्याच्या परिणामामुळें या प्रसंगावर हें गाणे रचलें गेलें असावं, असें त्याच्यामधील हकीकतीवरून दिसून येईल.
राम या लक्षुमन            दोघ हिंडती रानींवनीं
                    सीता नेलीया रावनानीं
राम या लक्षुमन            दोघ झाल्याती रानभरीं
                    सीता रावनाच्या घरीं
राम या लक्षुमन            दोघ झाल्याती चित्तागती
                    सीता रावनाच्या हातीं
रावणानें सीतेचें हरण केल्यानंतर रामाच्या व लक्ष्मणाच्या मनाची खुळ्या-भैर्‍याप्रमाणें झालेली अवस्था इथें वर्णन करण्यांत आलेली आहे.
रावनांनीं नेली सीता                मागं पुढं पाहूनी
देव मारुती वो गेल                बैरागी होऊनी
चांदीची लंका                    सोन्याची इंद्रबाह्या
देव मारुती गेला                रावनाची लंका पाह्या
जळती लंका                    जळतं सोनं नाणं
कुनाचं काय गेलं                मस्ती केली रावनानं
जळती लंका                    जळूनी झाली होळी
सीतेच्या सत्त्वानीं                त्वांड वान्यारांचीं काळी
लंकचा रावन                    अभिमानानं तंबतो
रामाच्या सीतेला                जिंकीली म्हनीतो
लंकचा रावन                    बाई पैला ग भिकारी
रामाची नेली सीता                मग पडला विच्यारी
रावनानीं नेली सीता                मारुती देतो कान
मुद्‌रकाची अंगूठी                मुखींचा राम राम
रावनाच्या मंडपांत                सीता रामाची दुचीयीत
रामाची मुद्रीयीका                टाकी मारुती अवचीत
रावनाच्या मंडपांत                सीता करीती रोजयीना (धांवा)
रामाचि मुद्रुका                टाकी मारुती सजयीना
अडलंकचा बाई                पडलंकला ग उभा
देवा रामाची फौज                वानराची बघा बघा
रावणानें सीतेला नेल्यानंतर मारुतीनें रामाच्या वतीनें केलेली कामगिरी या गीतांमध्यें आलेली आहे. त्याचप्रमाणें रावणाच्या लंकेत सीतेची मनःस्थिति कशी होती त्याचीहि हकीकत इथें देण्यांत आलेली आहे. सीतेच्या सत्त्वामुळें लंका जळाली, पण वानरांची तोंडें फक्त काळीं झाली, अशी या गीतामध्यें व्यक्त झालेली कल्पना मोठी गंमतीची आहे. सीतेला जिंकली म्हणून रावणाला वाटणार्‍या अभिमानाचाहि इथें उल्लेख आलेला आह ! तसेंच रामाची मुद्रा धारण करणारी अंगठी मारुतीनें दिल्या कारणानें सीतेला होणारा आनंदहि इथें सूचित झालेला आहे.
मंडोदरी म्हनीयीती            सीताबाई तूं माजे भैनी
लंकच्या रावणाचं            राज करूं या दोगीजनी
सीताबाई म्हनीयीती            मंडूदरी तूं माजी कशी
रामाच्या राज्यामंदीं             तुज्या सारक्या माज्या दासी
लंकेमध्यें असलेल्या सीतेनें रावणाच्या मंदोदरीस दिलेलें स्वाभिमानी उत्तर आणि मंदोदरीनें सीतेला केलेली घमेंडखोर मागणी या गीतामध्यें सांगितलेली आहे.
सीता नार ही वनवाशी        झाडाझुडाला मारी मिठी
लव अंकुशा बाळा येळं        सव्वा म्हइन्याचा गर्भ पोटीं
सीताबाई वनवाशी            रथ येशील थटला
सीताबाईला घालवाया        राम सभचा उठला
सीताबाई वनवाशी            मागं सयांचा घोळका
सीता सईला सांगीती        राम भुकचा आळका
सीताबाईला वनवास            केला हुता ग बाई कवा
माजे तूं भैनाबाई            राम भरांत आला तवा
लक्षुमण दीर सये            कां ग निगाले वनाला
रेशमाचे गोंडे                त्येंच्या धनुक्ष बानाला
लक्षुमण दीरा                मला नेतोस कुन्या वना
लक्षुमण बोलीयीतो            नेतों वहिनी माहेराला
लक्षुमन दीरा                तान लागली वनामंदीं
तुळशीच्या काड्या             पाणी केळीच्या डोळ्यामंदीं
सीता सांगे कथा            राम सांगून देईना
सीते तुजं दुक            माज्या हुरदीं माईना
सीतेला सासुरवास            बाई कैकयीनं केला
रामसीतेचा जोडा            न्हाई तिला बगवला
सीता निगाली वना            सया गेल्या तीन कोस
फिरा मागारीं बयानू            शिरीं माज्या वनवास
सीता निगाली वनाला        संगं वानीनी बामनी
वनाला चालली ग            रामचंद्राची कामिनी
सीता निगाली वनाला        मागं सयांचा घोळका
फिरा मागारीं बयानू            देतें वटीच्या खारका
लक्ष्मणाला बरोबर देऊन रामानें लोकांच्या समाधानाखातर म्हणून सीतेला वनवासाला धाडलें त्यावेळची ही कथा आहे. पूर्वीच्या काळीं राजाच्या राणीनें लोकांच्या मर्जीनुसार असलें पाहिजे अशी प्रथा असे ! त्यामुळें अग्निदिव्य झाल्यानंतरहि एका परटानें सीतेसोबत रावणाच्या घरच्या वास्तव्याचा उच्चार करून शंका काढल्यानें रामानें सीतेला वनवासाला धाडली होती, ती ही हकीकत आहे.
जरूर ती चालरीत करून सीतेच्या प्रेमांतल्या आयाबाया सीतेला निरोप देत तिच्याबरोबर जात असतां, सीतेनें त्यांना इथें दिलेलें उत्तर ह्रदयस्पर्शी झालें आहे. ओटीच्या खारका परत करावयाच्या, रामाच्या भुकेची काळजी घ्यायला सांगायची आणि मोठ्या कष्टानें पाऊल उचलीत सर्वांना मागें फिरा म्हणून सांगावयाचें, ह्या इथें व्यक्त झालेल्या भावना काळजाचा ठाव घेणार्‍या आहेत !
लक्ष्मणानें माहेरची वाट म्हणून खोटें सांगत वनाला नेलें असतां, पाणी मिळेना म्हणून डोळ्यांत आसवें आलेली केळीच्या कोंबासारखी सीता इथें जिव्हाळ्यानें रंगविलेली आहे.
सीता आपली कथा सांगूं इच्छित असतां तें ऐकून दुःख होईल म्हणून सांगणारा राम इथें वर्णन करून सांगितला आहे. त्यामुळें तो कितीहि चांगला असला तरी सीतेवर तो अन्याय करीत असल्याची रुखरुख ही ओवी ऐकणाराच्या व सांगणाराच्याहि मनाला लागल्याविना रहात नाही !
येवड्या वनामंदीं            काय दिसतं लाल लाल
सीताबाई बाळातीन            लुगड्याचं दिलं पाल
सीताबाई वनवाशी            दगडाची केली उशी
एवड्या वनामंदीं            झोप सईला आली कशी
एवड्या वनामंदीं            कोन रडती ऐका ऐका
सीतानारीला समजाया        बोरी बाभळी बाईका
एवढ्या वनामंदीं            कोन करीती जूजुजूजू
सीताबाई बोल            लवांकुशा बाळा नीजू
सीता नार बाळातीन            तिनं तणांची केली शेज
सीताबाई बोल              लवअंकुशा बाळा नीज
सीता नार ही बाळातीन        झाली गोसाव्याच्या मठीं
चिंचचा पाला वाटी            लव अंकुशा देतीं घुटी
एवडा वनवास            सीता सारक्या नारीला
बारा दिसांची बाळातीन        दोन बाळुती नदीला
सीता नार बाळातीन            न्हाई मिळाला कातबोळ
माजे तूं भैनाबाई            नार पेली चिंच कोळ
नाचन्या कोंडा            नको खाऊं सीताबाई
लवअंकुश बाळ             उद्यां होतील शिपाई
लव अंकुशाच्यावेळीं वनामध्यें बाळंतीण झालेल्या सीतामाईच्या हालअपेष्टांची ही ह्रदयस्पर्शी नोंद आहे ! एवढी रामाची राणी आणि जनकराजाची लेक पण तिच्या नशिबीं हा केवढा वनवास ! लुगड्याचें पाल देऊन बाळंत झालेली, दगडाची उशी केलेली, लव-अंकुशाला तणांची शेज केलेली, तोंडानें अंगाई गाणारी, चिंचेचा कोळ पिणारी, नदीला धुणं धुणारी, नाचण्यांचा कोंडा खाणारी अशी इथें वर्णन केलेली सीता ऐकणाराच्या मनाला चटका लावून सोडते. तिच्या या हाल अपेष्टांनीं ऐकणाराचें मन भरून येतें ! आणि गोसाव्याच्या मठांत एकट्या असलेल्या या सीतेला बोरीबाभळी ह्या मानवीरूप घेऊन येऊन समजूत घालतात हें ऐकलें म्हणजे तर जिवाची विलक्षण उलाघाल होते !
सामान्य स्त्रियांनीं वनवासी सीतेची सांगितलेली ही कथा विशेष उल्लेखनीय तर आहेच पण ह्रदयंगमहि आहे.
वधीली सीता नार            साक्षी आणीले तिचे डोळे
                    राम धरनीला लोळे
वधीली सीता नार            तिचा आनीला हात
                    जेवी कैकई दूधभात
लक्ष्मणानें सीतेला वनवासांत सोडली आणि तिचा मृत्यु झाल्याची खूण म्हणून आणलेल्या या खूणांनी रामाला झालेलें दुःख आणि कैकेयीला झालेला आनंद इथें सांगितला आहे. परंतु वनवासी सीतेचें दुःख ऐकून पिचून गेलेल्या मनाला या बर्‍यावाईटाची फारशी कदर वाटत नाहीं, अशी वस्तुस्थिति या ओव्या गातांना दिसून येते !
वनवासी सीताबाई            सांगी जन्माची परवडी
लवअंकुशा बाळा येळं        न्हवती रानीला शेगडी
वनवाशी सीताबाई            सांगी आपुलं वनवाळं
लवअंकुशा बाळा येळं        न्हवतं बाळाला काजळ
बाणा मागं बाण            बाण येत्याती झराझरां
लव नि अंकुयीस            रामचंद्राचा वंश खरा
बाणा मागं बाण            बाण सुटले चळक
लव अंकुशाची            न्हाई रामाला वळक
लव अंकुशा ग बाळ            सीताबाईच कैवारी
लाडके भनाबाई            बाण सोडीले रामावरी
अंकुश रामायाचा            लव कुणायाचा सांगूं
सितेला पोटीं घ्याया            धरनी लागली दुभंगूं
राम आणि सीता यांची पुन्हां भेट झाली त्यावेळीं घडलेली हकीकत या गीतांनीं दिलेली आहे. सीता वनवासांत झालेली हाल अपेष्टा स्त्रीस्वभावानुसार इथें रामाला सांगते आहे. शेकशेगडी आणि बाळाला काजळ नसल्याची तक्रार ती मांडीत असतां, सामान्य स्त्रियांच्या डोळ्यांत पाणी उभें रहातें आणि मनांत हळहळ व हलकल्लोळ उडवून सोडते !
लव आणि कुश यांच्या तिरंदाजीमधील कौशल्यानें रामाला पटलेली ओळख म्हणजे इथे रंगविलेला एक अभूतपूर्व असा नयनमनोहर प्रसंग आहे. खुद्द रामावरहि सीतेचा कैवार घेऊन लवकुशांनी केलेली बाणांची वृष्टी म्हणजे सीतेचा मोठा विजय आहे ! आणि असें असूनहि कुश रामाचा असला तरी लव कुणाचा सांगूं म्हणून तिला कोडें पडलें असतां, पुन्हां कांहीं दिव्य करायची पाळी तिच्यावर येऊं नये म्हणून ज्या धरणींतून ती वर आली तीच धरणी दुभंगून तिला पोटात घेत असल्याचा अखेरीस सांगितलेला इथला प्रसंग अवर्णनीय आहे ! सामान्य स्त्री मनांतील सीतेबद्दलच्या आदरानें इथें आपला परमोच्च बिंदू पाहिला आहे !
भाव माझा भोळा            भक्ति माझी अशी कशी
सावळ्या रामराया            कसं माजं चालवीसी
भाव माझा भोळा            विसांवा कुठं घेऊं
शिणल्या भागल्याचा            सखा नांदतो तिथं जाऊं
भाव माझा भोळा            भक्ति मजला येईना
दीनबंधु राम माजा            चालवीता राहीना
रामाबद्दलचा भोळा भाव इथें प्रकट झालेला आहे. रामायण ऐकून मनाची शांति झालेल्या भोळ्या श्रद्धेची ही प्रामाणिक साक्ष आहे. राम म्हणजे आपला पालनकर्ता आणि विसांव्याचें ठिकाण आहे तेव्हां त्याच्या भेटीला जावें, ही इथें सांगितलेली कल्पना मनोहर आहे.
अहिल्या झाली शिळा            ऋषी गौतमाची कांता
तिला उद्धरावी                सीता सैंयवराचा दाता
अहिल्या झाली शिळा            ऋषी गौतमाची भार्या
तिला उद्धरावी                 तुमच्या पदरीं रामराया
अहिल्येचा उद्धार करण्याचि विनंति रामाला करून नाशीकला गेल्यानंतर सामान्य बायका सांगू लागतात-
बारा वर्से झाली        सीताबाईला जायाला
तापले डागर            खडे रुतती पायाला
बारा वर्से झाली        सीताबाईच्या तपाशी
वळखीं येईना            लवअंकुश रामाशीं
आणि पुन्हां सगळें रामायण त्यांच्यापुढें उभें राहतें !
रामकुंडावरी            हिरवी पालखी कोणाची
आंगूळीला आली        सीता राणी ती रामाची
राम कुंडावरी            हिरवा मंडप जाईचा
आंगूळीपायीं आला        पुत्र कौसल्याबाईचा
नाशीकच्या रामकुंडावरील हिरवळ बघून सामान्य बायकांना सुचलेली ही रामसीतेच्या स्नानाची कल्पना मोठी विलोभनीय आहे !
रामसीतेच्या कथा सांगणार्‍या अशा कितीक गीतांनीं मायबोली नटलेली आहे. तथापि मला गवसला तेवढा हा वानवळा मीं इथें दिलेला आहे.
रामाविषयीचा पाळणा प्रस्तुत ग्रंथातील अंगाई गीताच्या स्वतंत्र प्रकरणामध्यें आलेला आहे. त्याचें वाचनहि याच संदर्भात होणें अगत्याचें आहे.
राम ग राम                बाई सुचना काय काम
रामावरी ग                हाई आमचं मन
रामावांचुनी                घेवना बाई अन्न
राम आमुचा मुरारी            बसा बाई खिनबरी
रामाला आमुच्या शीन फार    दावी वैकुंठीचं द्वार
कर जोडुनी करीतो येडं        रामनामाची आमा लई खोड
करतें देहाचा पाट            करतें मनाचा थाट
करतें जिवाची शेवंती        उभा म्होर हनुमंत मारुती
कापूर जळ काकड आरती        सीतामाईचा ग सारथी
रामाचा ग लई कैवारी        आलं विघन निवारी
शेवटीं रामनामाच्या पवित्र उच्चारानें मनाला होणारे समाधान आणि त्या अनुषंगानें सुचलेली पूजेची कल्पना या गाण्यामध्यें सांगण्यांत आलेली आहे. काकड आरतीच्या वेळची ही गीत-पूजा मोठी सुंदर आहे यांत शंका नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP