स्त्रीधन - ज्ञानदेव

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

मराठी भाषेचें श्रेष्ठत्व अभिमानानें सांगणारा थोर कवि या नात्यानें मराठी मनाला ज्ञानदेवाची फार चांगली ओळख आहे. बहुजनसमाजाला संस्कृतांतील ज्ञान सोप्या भाषेंत कळावें म्हणून ज्ञानदेवानें ज्ञानेश्वरी लिहिली. गीतेमध्यें सांगितलेलें भगवान् श्रीकृष्णाचें महान् तत्त्वज्ञान ज्ञानदेवीनें मराठी मनाला सोपें करून सांगितलें आहे. त्यामुळें या ग्रंथाची कितीक पारायणें मराठी मनानें मोठ्या भक्तिभावानें आणि आवडीनें आजवर केलीं आहेत.
माणुसकीचा महान् मंत्र बहुजन समाजाला शिकवावा आणि संस्कृतमधील धार्मिक तत्त्वज्ञान मराठींतून त्यास ऐकवावें, म्हणून ज्ञानदेवांनीं पंढरपूरचें विद्यापीठ स्थापन केलें. टाळ मृदुंगांच्या निनादांत पंढरीच्या विठोबाचें राऊळ सामान्य मनाला शिक्षण घेण्यासाठीं खुलें झालें. नामदेवासारख्या कीर्तनकारानें ज्ञानदेवाला सहकार्य दिलें. भागवत संप्रदायाची स्थापना झाली. मराठीला आनंदाचें भरतें आलें. मायबोलीला उत्तम प्रकारची ग्रांथिक वाचा फुटली. सर्वांना काय चाललें आहे तें कळून घेतां येऊं लागलें.
त्यामुळें मराठी मनाला ज्ञानदेवाचें विलक्षण आकर्षण वाटत गेलें. अर्थांत सामान्य स्त्रियानींहि ज्ञानदेवाचें कार्य आपल्या परीनें ओळखीचें करून घेतलें. परंतु ज्ञानदेव हा संसारी पुरुष झाला नसल्याकारणानें स्त्रियांनीं ज्या ओव्या रचल्या आणि सांगितल्या त्यांमध्यें घरगुती जीवन कुठेंच आलेलें नाहीं ! स्त्रियांच्या ओव्या बहुतांशीं घरगुती आयुष्यावर उभारलेल्या खर्‍या परंतु ज्ञानदेवाचा विषय मात्र त्या गोष्टीस अपवाद झालेला आहे !
आळंदी सारकं गाव            सये असावं रहायाला
इंद्रावनीच्या पान्या जाया        खडा रुतना पायाला
आळंदीचा पार            देवा ज्ञानूबाला साजू
त्येच्या आंगुळीला            इंद्रावनी डाव्या बाजू
आळंदी वसविली            चाकनाच्या वाकनाला
गेनूबा देव उबा            सादू जमल कीर्तनाला
आळंदी वसविली            एरंड धोतर्‍यांनीं
समांध घेतली ग            गेनूबा खेतर्‍यांनीं
आळंदी वसविली            पांडुरंगा मायबापा
कुंडलिकाच्या देवळाला        इंद्रायनी देती थापा
सोनीयाचा पिंपळ            देवा गेनूबाच्या दारीं
भर्ताराच्या शिरावरी            आळंदी कर नारी
आळंदी गांव                साधुसंतांचं म्हायार
दुरूनी वळकिती            इंद्रायनीला न्याहार
इंद्रायनीच्या कडला            सव्वा खंडीचं पुरान
संत बसल जेवाया            तुपा भरल दुरान
दारीं सोन्याचा पिंपळ        पाठीशीं इंद्रायणी
ज्ञानदेव समाधिस्त            बैसले तया स्थानीं
काय सांगू सये             आळंदीची ग रचना
बैसले ज्ञानदेव            नामा करीतो कीर्तना
नगर प्रदक्षिणा            मी ग घालातें नेमानीं
समाधि ज्ञानोबाची            सये पहातें वातींनीं
चला जाऊं आपून            आळंदी गांवाला
चंदनाची उटी                चढे गेनूबा देवाला
ज्ञानदेवांच्या आळंदी गांवचें वर्णन या गीतांनीं केलेलें आहे. सामान्य मनानें पाहिलेली आळंदी कशी आहे म्हणून कोणी विचारलें, तर ती 'ही पहा अशी आहे,' असें अभिमानानें सांगतां यावें, एवढें हें वर्णन चांगलें झालेलें आहे. वारीला म्हणून कार्तिकीमध्यें आळंदीला जाणार्‍या वारकरणीनें त्या गांवची अशी शोभा पाहिली आणि ती इतरांना आपखुषीनें वर्णन करीत सांगितली, असा हा सुंदर देखावा आहे. या गांवचें वर्णन करतांना हें गांव रहायला चांगलें कां, तर पाणी आणायला जाताना पायाला खडे रुतत नाहींत म्हणून, अशी इथें सांगितलेली कल्पना माहेरवाशिणीनें आपल्या माहेराबद्दल बोलावें एवढी ह्रद्य झाली आहे.
या गीतांनीं रंगविलेलें आळंदीचे इतर चित्रहि सगळा देखावा समोर दिसावा एवढें स्वाभाविक झालें आहे.
देव ज्ञानूबा तोंड धुतो        इंद्रायनीच्या झर्‍याला
मुक्ताबाई त्येची भैन            मोतीं गुपीती तुर्‍याला
गेनूबा देव बोल            मला कशाला व्हवी रानी
भैनी मुक्ताबाई            आंगुळीला दे ग पाणी
गेनूबा देव बोल            मला कशाला व्हवी शेज
भैनी मुक्ताबाई            पाठीशीं ग माज्या नीज
ज्ञानदेव आणि मुक्ताबाई या बहीण भावडांच्यामधील निरपेक्ष प्रेमाची व जिव्हाळ्याची हकीकत या गीतामध्यें आलेली आहे. त्याचबरोबर ज्ञानदेवानें पत्‍नीची आवश्यकता नसल्याचें कसें सांगितलें, याची कल्पना सामान्य स्त्रीनें आपल्या परीनें कशी केली आहे, हेंहि यावरून दिसून येतें.
आळंदी पासूनी        देहू जवळ सांगीती
गेनूबा तुकाराम        एका तर्फला नांदती
देहूचा मासा बाई        आळंदीला आला कसा
देवा गेनूबाचा            सये साधूचा नेम तसा
द्यानूबा पालखींत        तुकाराम घोड्यावरी
दोनींची एवढी हुती        भेट वाकुर्‍या वड्यावरी
द्यानूबा तुकाराम         आळंदीचे देशमुख
दोगांच्या आंगूळीला        इंद्रायणी समाईक
आळंदी पासूनी         देहू हाय टप्प्याखालीं
फुलांच्या पाटीनं ग         माळीन चालली झोकाखालीं
आळंदी करूनी         मला देहूला जायाचं
लाल पिंजरींचं कुंकूं         माज्या बाळीला घ्यायाचं
पंढरीच्या वाट         आडवं वाकूर गांव खेडं
ज्ञानोबा तुकाराम         ततं साधूचा तळ पड
इथें आळंदी आणि देहू या गांवांच्यामधील अंतर आणि नातें, ज्ञानदेव व तुकारामांची मैत्री आणि या दोन्ही गावांना भेटी द्यायची आपली उत्सुकता या विविध गोष्टी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणें हीं दोन्हीहि गांवें जवळ जवळ असल्यानें माणूस एका गांवाहून दुसर्‍या गांवाला सहज जाऊं शकतो, याची कल्पना या दोन्ही गांवच्या देवांना फुलें देणार्‍या माळणीवरून इथें दिलेली आहे.
ज्ञानोबा पालखींत आणि तुकाराम घोड्यावर बसतो, अशी या गीतांत आलेली कल्पना दोघांच्या जीवनांतील कालमानाची तफावत दर्शवीत आहे ! तसेंच एके ठिकाणीं दोघांच्याहि देशमुखीचा आलेला उल्लेख समाजामधील त्यांच्या स्थानाची कल्पना देत आहे, असें म्हटलें तर वावगें होणार नाहीं.
हावस मला मोठी            आळंदीला ग जायाची
शेंडीचा ना                इंद्रावनीला वहायाची
आळंदीच्य ग माळावरी        कुनीं सुपारी फोडली
देवा गेनूबाच्या संगं            हौशानं बारस सोडिली
चल सये लवकर            नको करूंस घोटाळा
ज्ञानदेव सांगे अर्थ            ऐके मुक्ताई चित्कळा
चल सये लवकर            उचल पाऊल लगलग
ज्ञानदेव सखा माझा            बाई भेटल जिवलग
पंढरीला गेलें बाई            आळंदीला आलं चित्त
देव ग द्यानूयीचा            आला मनांत अवचित
चंदन मैलागिरी            उगळीतां गेलें दंड
ज्ञानोबा राया माज्या        सोडा झग्याचे वो बंद
या ओव्यांनीं वारकरणीच्या मनांतील आळंदीची हौस सांगितलेली आहे. शेंडीचा नारळ नदीला व्हायचा, बारस सोडायची, कीर्तन ऐकायचं, समाधीचें दर्शन घ्यावयाचें, देवाची आठवण यायची इत्यादी या नित्य व्यवहारांतील गोष्टी मनांतल्या मनांत तशा इथें सांगितलेल्या आहेत. नाहीं म्हणायला ज्ञानदेवानें परमेश्वराच्या दर्शनाचा अर्थ सांगावयाचा आणि स्वतः चित्कळा असलेल्या मुक्ताईनें तो टिपून घ्यावयाचा ही इथें आलेली कल्पना जुन्या कथा ऐकून निर्माण झालेली आहे. तसेंच दंड दुखेपर्यंत गंध उगाळल्यानें खुद्द ज्ञानदेवालाच आपल्या माणसाच्या झग्याचे बंद सोडायला केलेली विनंती मोठी गमतीदार आहे !
नदीच्या पल्याड ग         एक गुतली म्हातारी
गेनूबा काय देव        अंगं झाला उतारी
चांगदेव आले             वाघावरी झाले स्वार
गेनूबा रायाची        भिंत चाले भरभर
चांगयाचं पत्र             कोरा कागद केली घडी
देती उत्तर गेनूबा        लाभे मोक्षाची ऐलथडी
इंद्रावनीच्या काठायाला    झाडं तुळशीची हालत्याती
देवबी द्यानूयीबा        साधु समाधि बोलत्याती
ज्ञानदेवामुळें झालेला चमत्कार व होणारा चमत्कार या गीतांनीं दाखविलेला आहे. त्यामुळें अशा अद्‌भुतरम्यतेचा पगडा सामान्य मनावर एवढा विशेष होतो कीं,
ज्ञानदेव पाहुणे ग        ऐक सखे साजणी
आतां घालूं नका        फार दुधाला धारवणी
अशा ओव्या गात ज्ञानदेव घरीं पाहुणे होऊन यावेत आणि आपल्याला हवे ते चमत्कार घडून यावेत अशी प्रबळ इच्छा मनामध्यें डोकावते !
इंद्रायणीच्या कांठावरील झाडें हालतात म्हणजे खुद्द ज्ञानदेवच त्यांच्या रूपानें आपल्याशी बोलतात, ही या गीतामध्यें आलेली कल्पना विशेष अद्‍भुतरम्य तशीच कल्पनासौंदर्य दर्शविणारीहि झाली आहे.
या ठिकाणीं व्यक्त झालेला इतर चमत्कार नित्य परिचयाचा आहे. त्यामुळें वरील चमत्काराइतका तो विशेष वाटत नाहीं ! विठ्ठलानें ज्ञानदेवाचें स्वागत करावे म्हणून जो चमत्कार दुनियेला दाखविला, त्याचें वर्णन विठ्ठलावरील ओव्यांच्या स्वतंत्र प्रकरणामध्यें आलें आहेच. तसेंच दिंडी नाचाचेवेळीं गाण्यांत येणारें ज्ञानदेवाच्या थोरवीचें पदहि खेळांच्या गाण्यावरील स्वतंत्र प्रकरणामध्यें आलेलें आहे. या दोन्हीहि प्रकरणांतील भाग या गीतांच्या जोडीला पहाण्यासारखा आहे.
सामान्य स्त्रियांनीं पाहिलेला ज्ञानदेव हा असा आहे. परंतु त्याची कर्तबगारीच एवढी श्रेष्ठ आहे कीं, त्याचें गुणगान गावें तेवढें थोडेंच व्हावें !

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP