स्त्रीधन - शेजी

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

शेजारीण म्हणजे बहुधा दुखल्या खुपल्यावर मायेनें फुंकर घालणारी जिवलग मैत्रीण. भल्याबुर्‍या बोलाची पाखर करून प्रेमानें चार समजुतीच्या गोष्टी सांगणारी जिवाभावाची सोबतीण; घरकामांत वेळ पडली तर मनापासून हात देणारी हक्काची सखी; किंवा घरात कांहीं आहे नव्हे हें बघून वेळ प्रसंगीं पुरवठा करणारी प्रेमळ पाठीराखीण असते. त्यामुळें बायकांना तिची विशेष आवड एवढेंच नव्हे तर-
अंतबीरींच गुज            माज्या हुरदीं झाली गोनी
मायेची शेजी माजी            माप घेनार झाली रानी
तिच्याबद्दल ही विलक्षण भावना मन सांभाळून रहातें ! मनांत आलें त्यांचा उलगडा करायची जणुं शेजी म्हणजे एकमेव जागा ! ह्रदयांतील विचारांच्या गोण्यांचे माप घेणारी जणुं ती राणी !
शेजी तूं आईबाई            तुजा संबाळ सोनचांफा
अवकाळ माजा बाळ            सई मोडील त्येचा ढापा
शेजीचं एवडं बाई            बाळ आलं तसं गेलं
माज्या ग राजसानं            मन माजं रंजवीलं
शेजारनी बाई                तुजा शेजार सोईयीचा
शीतळ हाय बाई            मदीं ताटवा जाईयीचा
आपल्या मुलाच्या दृष्टीनें शेजारणीपाशीं असलेलें नातें या गीतामध्यें प्रकट झालें आहे. शेजारणीच्या मुलाला सोनचांफ्याची दिलेली ही उपमा आकर्षक आहे. त्याचप्रमाणें आपलें बाळ म्हणजे दोघींच्या मधला जाईचा ताटवा मानावयाचा ही कल्पनाहि मोठी सुरेख आहे. लोकांचें बाळ घटकाभर येऊन मन रमवितें पण आपलें बाळ सतत मनाला विसांवा देते, या सत्यकथेचाहि इथें आवर्जून उल्लेख आलेला आहे.
बंधुजी पावईना            शेजी म्हनीती आला आला
                    चंद्र वाड्यांत उगवला
बंधुजी पावईना            शेजीबाईला पडलं कोडं
                    मी देतें ग दूध पेड
बंधुजी पावईना            जीव माजा धगाधगा
                    शिंगी जबर नव जागा
आपला भाऊ घरीं आल्यामुळें शेजारणींत व आपल्यांत काय बातचीत झाली, त्याची माहिती बायका इथें सांगत आहेत.
माझा भाऊ म्हणजे वाड्यांत उगवलेला चंद्र आहे. आणि तो आला म्हणून शेजीला कोडें पडलें तरी मी दूधपेढे त्याला खाऊ घालीन हा बहिणीला इथें वाटणारा अभिमान आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्याचबरोबर नवी तरणी घोडी घेऊन भाऊ घरीं आल्यानें काय प्रसंग ओढवेल ह्या धास्तीनें ती अस्वस्थ झाली आहे, अशी इथें आलेली कल्पनाहि वस्तुस्थितीला धरून आली आहे.
उंच उंच चोळ्या            घरामागली शेजी लेती
माऊली माजी बाई            तिच्या परास चड घेती
शेजारणीच्या चोळ्या कितीहि उंची असल्या तरी तिच्यापेक्षां माझ्या आईने घेतलेली आपली चोळी उंची असल्याचा हा अभिमान ईर्षा दर्शविणारा आहे. तुझ्यापेक्षां माझेजवळ जास्त आहे, हें बोलून दाखविण्याच्या स्त्री सुलभ भावनेचाच हा एक आकर्षक आविष्कार आहे.
शेजारनी बाई                मला उसनी द्यावी सोजी
                    बया पावनी आली माजी
शेजारनी बाई                तूं ग उसन द्याव लाडू
                    वंदु पावना कसा वाडूं
शेजीचं उसनं                मी ग फेडितें काडी काडी
बयाचं उसनं                 माज्या भिनलं हाडोहाडी
शेजीचं उसनं                मीं ग फेडूनी टाकीलं
बयाचं उसनं                न्हाई मनांत राहिलं
एकमेकींनी एकमेकींच्याकडून उसनें आणून चालती घडी भागवून घेण्याची जी चाल आहे, तिचा इथें उल्लेख आला आहे. वेळ पडेल त्याप्रमाणें शेजारीण कशी उपयोगी पडते व तिची परतफेडहि कशी होते, त्याचा हा एक सुंदर दाखला आहे. या गीतांत लग्न झाल्यानंतर आईदेखील मुलीला कशी शेजारीण होतें याची कल्पना मोठ्या हिकमतीनें सूचित झाली आहे !
हावस मला भारी            बंदुसकट जेवायाची
आजी माजी गवळन            दुरडी येळीती शेवायाची
मावळनी आत्याबाई            एका म्हायारीं दोगी जाऊं
                    माज बापाजी तुमच भाऊ
आंबारीचा हत्ती            साजासकट उबा केला
बापाजी सांगत्याती            बाळ अंदान दिला तुला
पाटानं जातं पानी            ऊंस पिऊनी खपलीला
माय मालन हां मारी        लेकी संगट नातीयीला
मावळ्याच्या घरीं            भाची पावनी विलासाची
मामी परवी हटाला            केली पत्रावळी चिंचची
आपल्या माहेरच्या प्रेमळ माणसांची हकीकत इथें बायका शेजारणीच्या कानावर घालीत असतांना, आपली बाजू अधिक महत्त्वाची कशी आहे ते पटवून देत आहेत. माहेरचें हें राजविलासी वैभव अशा वेळीं शेजीच्या मनाला खुपतें आणि मग तिचें तसें नसल्यानें ती नाराज झाली, म्हणजे उगाचच अबोला धरते.
सया मी जोडील्या            बाई वाटनं जातां जातां
शेजी माजीला किती सांगू        सोड अबूला बोल आतां
धनसंपत्तीची नार            लाडू बुंदीच लाग कडू
गेली संपत्ता निगूनी            मग अंबाडी लाग ग्वाडू
शेजीच्या घरीं गेलें             ती ग बोलली उशीरानीं
माजे तूं गडयीनी            न्हाई जायाची दुसर्‍यांनीं
शेजारनी बाई                एका दिलानं दोगी वागूं
अंगनांत खेळे                तुझी मैना माझा राघू
शेजारनी बाई                संबाळ तुजं ग वाळवन
आचपळ माजं बाळ            माता करील मिळवन
शेजारणीनें दुसर्‍याच्या सांगण्यावर भरवसा ठेवून अगर कारण नसतांना उगाचच अबोला धरला तर एकमेकींत समजुतीचीं बोलणीं कशी चालतात, तें इथें चित्रित झालेलें आहे. या गीतांत आलेली श्रीमंत बाईची श्रीमंती चव आणि गरिबींतील चव यांमध्यें दाखविलेला फरक लक्षांत घेण्याजोगा आहे. तसेंच दोघींत पुन्हां एकदिलानें झालेली भाषाहि वाखाणण्याजोगी आहे.
पारध्या माज्या बंदु            तुजी पारध कुनीकड
हरणीचं बाळ                गेलं बाईच्या गांवाकड
पारध्या माझ्या बंदु            तुजी पारध यवरथी ( व्यर्थ )
हरणीचं बाळ                तुला बग दूवा देती
हरणीचं पाडस            नको मारूंस माज्या दिला
                    माज्या गळ्याची आन तुला
मोट नि मोट डोळ            हरन्या बायंनू भिऊ नका
                    माजा वाटनं जातो सका
आपल्या घरच्या शिकारी कारभार्‍याची आणि भावाची बोलतां बोलतां गोष्ट निघाली म्हणजे शेजीजवळ एखादी बाई अशी गुजगोष्ट करीत असते. हरणाबद्दल मुळांतच सर्वांना प्रेम. तशांत बायकांना हरिणीबाईच्या पाडसाची विशेष काळजी. त्यामुळें घरधन्याच्या व भावाच्या हातून हरीणाची शिकार घडूं नये यासाठीं त्यांच्या जिवाची जी घालमील होते, ती इथें जिव्हाळ्यानें बोलून दाखविण्यांत आलेली आहे.
शेवग्याच्या शेंगा            अंतराळी लोंबत्यात्या
उंच उंच चोळ्या            माज्या दंडाला सोबत्यात्या
चाट्याच्या दुकायीनीं            उबी पाराला धरुयीनी
ताईता बंदुजीला            घडी दावीते हेरुयीनी
भाऊबीजच्या दिवशीं ग        काय भावानं करनी केली
सावळ्या राजसानं            चंद्रहाराला सोबा दिली
आपल्याला काय शोभून दिसतें आणि त्याप्रमाणें आपला भाऊ भाऊबीजेच्या निमित्तानें आपली हौस कशी भागवितो याची कल्पना इथें शेजारणी एकमेकींना देत आहेत. या गीतांत उंच (कोपरापासुन बरीच वर ) असलेल्या चोळीमुळें शेवग्याच्या शेंगेसारखें दंड शोभतात, अशी केलेली कल्पना उपमा अलंकाराच्या दृष्टीनें वाखाणण्याजोगी आहे.
झाल्या तिनीसांजा            दिव्याची वात करा
लक्ष्मी आई आली            मोत्या पवळ्यांनी वटी भरा
झाल्या तिनीसांजा            दिवा लावीतें लगवरी
उजेड पडतो ग            गाई म्हशीच्या पागवरी
तिन्ही सांज झाली आहे तेव्हां गोठ्यांतील जनावरांच्यावर उजेड पडेल या बेतानें मधल्या तुळीवर दिवा लावल्याची आणि लक्ष्मीआई बत्तीच्या रूपानें घरीं आल्याकारणानें तिची मोत्यापोवळ्यानें ओटी भरण्याची इथें केलेली घाई मोठी चित्ताकर्षक, तशीच जुनी चालरीत दर्शविणारी आहे. शेजारणी शेजारणी अशा चालरीती एकमेकींना नेहमीं शिकवीत असल्याचें खेडोपाडी दिसून येतें.
तू आपलं बाळ            शेजी दे ग मांडीवरी
                    गुज बोलूं खिनबरी
एकमेकींचें तान्हें बाळ एकमेकींच्या मांडीवर घेऊन घटकाभर गप्पा गोष्टी मोकळ्या मनानें करू या, अशी इच्छा इथें शेजारणींनीं एकमेकींच्याजवळ व्यक्त केलेली आहे.
ये ग ये ग तूं गाई            चरूनी भरूनी
बाळाला ग माझ्या            दूध देई
ये ग ये ग तूं गाई            खा ग तूं कणसं
बाळाला नीरसं            दूध देई
नीज नीज बाळा            म्हणूं किती तुला
गुलाबाच्या फुला            राजसा
नीजसर आले                बाळा तुझे डोळे
अंथरुण केले                पाळण्यांत
एकमेकींशीं बोलतांना मुले जर शांत राहिलीं नाहींत तर अशा प्रकारची अंगाई गात, शेजी आपल्या बोलण्यामध्यें येणारा अडथळा दूर करावयाचा कसोशीनें प्रयत्‍न करीत असते. अशा वेळीं आपल्या बाळाचें कौतुक तिच्या ओठांवर मोठ्या आवडीनें खेळत असतें आणि मग कधीं कधीं तर शेजारच्या बाळावर एखादीचा स्वतःच्या बाळाप्रमाणें लोभ जडतो !
लेन्यामंदीं लेनं            बाई लच्च्याचं झालं घाळ
                    चाल निगाली बोरमाळ
जुने दागिने मागें पडून नवीन पुढें येत गेले म्हणजे ते स्वतःला करून घेण्यासाठीं बायका नेहमींच धडपडत असतात. इथें रंगीत कांचेच्या मण्यांची माळ (लच्च्या) मागें पडून सोन्याची बोरमाळ घालण्याची पद्धत निघाल्याची बातमी एक बाई आपल्या शेजीला देत आहे.
पावना आला म्हनूं            नंदकामिनीचा पति
                    सोप्यां समया लावू किती
पावना आला म्हनूं            सासू मालनीचा भाऊ
                    नंद कामिनी दिवा लाव
घरामधील दिव्यांचा उजेड वाढलेला दिसला अगर दिव्यांची संख्या वाढलेली दिसली, म्हणजे त्या घरांत कुणीतरी पाहुणा आला असला पाहिजे अशी खूणगांठ बायका बांधतात. शेजीनें तसा प्रश्न केल्यावर मानाच्या पाहुण्याच्या आगमनाचें तिला दिलेलें हें उत्तर आहे.
हावस मला मोठी            बाई लुगडं भरजरी
                    नातू घेतला कडेवरी
आपल्या मुलाबाळांना मुलें झाल्यानंतर आजी म्हणून होणारा आनंद या गीतानें शेजीच्या कानावर घातलेला आहे.
शेजी घाली जेवूं            जगा लोकाला दावूनी
बया वाडी जेवुं            दोनीं कवाडं लावूनी
शेजी घाली न्हाऊं            न्हाई भिजला माजा माथा
बया घाली न्हाऊं            भरला रांजन केला रिता
शेजीचा उपयोग आईप्रमाणें हरघडी होत असला, तरी आईची गोष्ट किती निराळी असते, याची माहिती देणारा हा एक उत्तम दाखला आहे. ही तुलना दाखविण्यासाठीं या गीतांत आलेलीं उदाहरणें इथें अगदीं यथायोग्य अशीं आहेत.
आगीन गाडीला            लई लोकांड आटलं
जिला न्हाई लेक            तिला नवाल वाटलं
मोटार गाडीचं                बसनं घाई घाई
शाऊबाई सईचं            बोलनं झालं न्हाई
जुन्या काळचीं वहानें मागें सरून नव्या सुधारलेल्या जगांत आलेल्या मोटर व आगगाडी या वहानांची सामान्य मनानें केलेली ही पारख आहे. बदलत्या काळाप्रमाणें लोकगीतांची भावगंगा कशी अखंड वहाती रहाते त्या दृष्टीनें हीं गीतें जरूर पहाण्यासारखीं आहेत. त्याचप्रमाणें मुलगी सासरीं जातांना या नव्या वहानांच्यामुळें झालेली ही धांदलहि लक्षांत घेण्याजोगी आहे. खेड्यांतील बायका पूर्वी बैलगाडी अगर घोडा नजरेआड होईपर्यंत बराच वेळ मुलीला निरोप देत उभ्या रहात. ती सोय या वहानांनी नाहीशी झाल्याबद्दलची ही जणुं आपुलकीची तक्रार आहे !
गांवाला जाती शेजी            बाई नदीच्या निवार्‍यानं
                    शालू भिजला दैवार्‍यानं
भल्या पहाटेची उठून आणि नवा शालू नेसून गांवाला जाणार्‍या शेजीची वाटचाल या गीतांत आलेली आहे. नदीकिनार्‍यानें ती चालत गेल्यानें दहिंवरानें शालू भिजल्याची माहिती इथें आली असून पूर्वी दळवळणांच्या साधनांच्या अभावी पायीं परगांवी जावें लागत असे, हेंहि यावरून दिसून येते !
गांधीया म्हाराजांचा            नऊ खंडांत झाला डंका
सवराज्याच्या कामीं            नेली लुटून भाव लंका
गांधी या म्हनूं गांधी        कसला न्हाई त्यो पाहिला
संवतंत्र राज्यापायीं            झेंडा तिरंगी लावीला
अगदी अलीकडच्या काळांत गांधीजींचा खून झाल्यानंतर सामान्य स्त्रियांनी आपल्या राष्ट्रपित्याला वाहिलेली ही श्रद्धांजलि आहे. एवढ्या मोठ्या माणसाची शेजीजवळ होणारी ही भोळ्या मनाची गुजगोष्ट आहे. देशाच्या स्वराज्य प्राप्तीसाठीं गांधीजींनीं तिरंगी निशाण उभारलें आणि नऊखंडांत म्हणजे जगभर बोलबाला होईल अशी भावलंका लुटून नेली, ही इथें आलेली कल्पना विशेष ह्रदयस्पर्शी आहे. काळ बदलेल त्याप्रमाणें लोकगीतांचे विषयहि कसे बदलत जातात, हें या गीतांच्या उदाहरणानें पहाण्यासारखें आहे.
घर माझं निर्मळ            ढगावांचून आभाळ
जीवनांतील हरएक बाबतींत शेजीशीं होणारीं बोलणी अखेरीस स्वतःच्या घरावर येऊन ठेपतात ! माझं घर निरभ्र आकाशाप्रमाणें आहे असे सांगणार्‍या सामान्य मनाच्या या कल्पनाशक्तीचें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे.
शेजीबद्दलचें गीत आयुष्यांतील जणुं प्रत्येक भावनेनें असें नटलेलें असते. स्थलकालाचें आणि विषयाचें त्यास बंधन म्हणून नाहींच !

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP