आपल्या पोटीं बाळ जन्माला येणें म्हणजे जीवनांतील सर्वोत्तम आनंद उपभोगणें अशी दृढ श्रद्धा मनाशीं बाळगुनच सर्वसामान्य बाई आपल्या जीवनाकडे पहात असते . तिंचे बाळ म्हणजेच जणुं तिंचें उभें आयुष्य . त्यामुळें घरच्या ठेवीरेवीनें , ऊठबसीनें आणि कामाधामानें आलेल्या थकव्याचा विसर पडावा , म्हणून आपल्या बाळाच्या सहवासाची तिला विलक्षण ओढ लागते . एवढेंच नव्हे तर बाळाचें दर्शन हाच तिचा विसांवा असतो . मग तें बाळ लहान असो अगर मोठें असो तिच्या या भावनांत बदल म्हणून नाहीं . फार तर वाढत्या वयाचें लेणें बाळ अंगावर चढवीत राहील तसें कौतुक बदलत रहातें , एवढेंच म्हणतां येईल .
पुतबीराचीं फळं बाई उदंड देवापाशीं
लाडके भैनाबाई दिल्यावांचुनी घ्यावी कशी
पुतबीराचीं फळं तुला देवाजी देतां झाला
माज्या ग बाळाईनं वटा शालूचा पसरीला
पुतबीराचीं फळं बाई देवाजी वाटीयीत
सावळे राजूबाई वटा पसर दाटनीत
शंबर माजं गोत न्हाई गोताची मला चाड
लाडक्या बाळराजा केळी नारळीमंदी वाड
एखादीला लौकर मूलबाळ झालें नाहीं तर इतर बायका तिच्याभोंवतीं पुत्रप्राप्तीचें श्रेष्ठत्व असें गात बसतात . मूल म्हणजे जणुं देवाची देणगी हीच त्याची भावना . शास्त्रीय जगताकडे पहायची त्यांची तयारी नाहींच . त्यामुळें देवाला प्रसन्न करीत पुत्रप्राप्ति करून घ्यावी याकडे त्यांच्या मनाचा कल अधिक . म्हणुन देवाच्या घरीं पुत्रांचीं भरपूर फळें आहेत , पण तीं त्यानें दिल्याखेरीज घ्यावयाचीं कशीं असा पडलेला प्रश्न इथें आलेला आहे ! परंतु नंतर लगेच खुलासाहि केला आहे कीं , शालूचा पदर पसरल्यानें देवांनीं अशीं फळें देऊन टाकलीं आहेत . देव प्रसन्न झाला आहे . या गीतामध्यें देव पुत्रांचीं फळें वाटतो आहे म्हणून झालेल्या गर्दिमध्यें घुसून आपली वर्दी लावून घेण्याविषयीं केलेली विनंति मोठी गमतीची आहे ! परंतु तशी ती थट्टेवारीच नेऊं नये म्हणून इथें केळीनारळींची मुलींना उपमा देऊन त्यांच्यामध्यें वाढत असलेल्या मुलग्याचा सर्व गणगोतांपेक्षां वाटणारा अभिमान आवर्जून आला आहे !
दिवस उगवला उगवतांना तानं बाळ
शिरीं सोन्याचं जावळ
दिवस उगवला उगवतीला पाणी पडं
माज्या चुड्याला रंग चढं
सकाळच्या प्रहरीं पुढ्यांत दिसणार्या बाळाला उद्देशून केलेली ही कल्पना आहे . सूर्य उगवतेवेळी तो लहानग्या बाळाप्रमाणें दिसत असून त्याच्या डोक्यावरील जावळ सोनेरी दिसत आहे , असें आपल्या लाडक्याकडे बघून इथें माउली म्हणते आहे . त्याचप्रमाणें पूर्वेकडे दिसणार्या पाण्याच्या धारेप्रमाणें आपल्या बाळामुळें सौभाग्याला सौंदर्य प्राप्त झाल्याचेंहि ती इथें सूचित करते आहे !
सदरीं सोप्यामंदी नारुशंकर तांब्या लोळे
लाडका बाळराजा बाई जावळाचा खेळे
बारीक बांगडी गोर्या हातांत चमक मारी
लाडका बाळराजा जावळ कुरळं मागं सारी
मुलाचें जावळ काढावयाचें म्हणजे त्याच्या मामाला बोलावून समारंभानिशीं पार पाडावयाचा एक कौतुकाचा सोहळा असतो . हा सोहळा अजून व्हावयाचा आहे असें येथें जावळाचें मूल घरांत आहे या कल्पनेनें व्यक्त केलें आहे . बाहेरच्या ओसरीवर नाशीककडून आणणेला तांबडा चिमूकला तांब्या लोळत असून त्याच्याशीं बाळ खेळत असल्याची माहिती इथें आली आहे . त्याचप्रमाणें या बाळाचे कुरळे केस मागें सारतांना आपल्या गोर्या , नाजूक हातांतील राजवर्खी बांगडी चमकत असल्याचेंहि अभिमानानें सांगून टाकलें आहे .
अवकाळ बाळराज केळी नारळीवर चड
लाडक्या बाळराजा तुजी मावशी पाया पड
उभ्या मी गल्ली जातें माज्या पदराची सारासारी
सावळा बाळराजा बाळ रागीट पारावरी
आकाशीं वावडी ग चंग लावूनि सोडीयीली
माज्या ग बाळकांनीं नगरी मामाची येडीयीली
माळ्याच्या मळ्यामंदीं माळी मळ्यांत येऊं दीना
लाडका बाळराज फुलं जाईला र्हाऊं दीना
समोरल्या सोप्यां कुनीं सांडिली तूपपोळी
लाडकी बाळाबाई माजी जेवली चांफेकळी
शेजीच्या घरीं गेलें बस म्हनीना जोत्यावरी
लाडका बाळराज हाई अवकाळ कडवरी
दुरून वळकीती तुज्या चालीचा गरका
लाडका बाळराजा डोले मुन्सुबा सारका
माज्या ग अंगनांत काळी निळी दोन घोडीं
रामचंदर दौलती भीम अर्जुनाची जोडी
रांगत रांगत बाळ गेलंय उंबर्यांत
लाडका बाळराज हिरा झळकतो बंगल्यांत
या गीतांनीं अवखळ बाळाच्या लीलांचें वर्णन केलें आहे . इथें सुरवातीला आलेला केळीनारळीचा उल्लेख कोंकणपट्टींत असलेल्या आजोळाची किंवा पानमळा असलेल्या घरची साक्ष देत आहे .
रागारागानें बाळ झाडावर चढत असून मावशीं त्याची विनवणी करीत आहे , पदर सावरीत धांवत जाऊन आई त्याला पारावरून ( मोठ्या झाडाच्या बुंध्याला बांधून काढलेली जागा ) माघारीं आणते आहे , गांवभर मुलानीं उडविलेल्या वावड्यांनीं ( पंतगांनीं ) मामाच्या घराला शोभा आली आहे , बागेंतील जाईची फुलें बाळ तोडतो म्हणून माळी त्यास प्रतिबंध करीत आहे , त्याचा अवखळपणा ओळखून शेजारीण बैस म्हणत नाहीं , त्याच्या चालण्यावरून तो लांबूनहि ओळखूं येतो आहे इत्त्यादि प्रकारच्या बाळलीलंनीं नटलेला हा भावनाविष्कार आहे . इथें बाळ मुन्सफासारखा चालतो आहे या कल्पनेनें आईच्या मनांतील त्याच्याविषयींच्या अपेक्षांना वाचा फुटली आहे ! उंबर्यावरील रांगेंत बाळ घरामधील हिर्यासारखें शोभून दिसत असल्याचें सांगून इथें अंगणांतींल हीं रामचंद्र व दौलती नांवाचीं मुलें भीमार्जुनांसारखीं दिसत असल्याचें कौतुकानें आई बोलते आहे .
या गीतांत तूपपोळी सांडल्याच्यां निमित्तानें मुलीचा आलेला उल्लेख मोठा सुंदर आहे . तसेंच आईनें आपल्या या मुलीला इथें चाफेकळीची उपमा देऊन तिच्या सौंदर्याचा गौरव केलेला आहे . तोहि मनोवेधक आहे !
पोथी पुस्तक वाचतांना बाई कानींचा डूल हाल
लाडका माझा बाळ सये कागदासंगं बोल
पोथी नि पुस्तकाचं बाई मांडीला झालं वज्जं
लाडक्या बाळाराजा हाई गिन्यानी हुरदं तुजं
साळला जातो बाळ पाटी मागतो बेगडीची
लाडक्या राजसाची बोली कळना बोबड्याची
शाळच्या पंतोजीला देऊं केली म्यां चंबूवाटी
माज्या ग बाळायाला लिनं बारीक यीयासाठीं
मोठं नि मोठ डोळ सई रागूबा रतनाच
लाडका माजा बाळ वाची कागद वतनाचं
लिहायला वाचयला शिकणार्या बाळराजाच्या कौतुकानें या ओव्या नटलेल्या आहेत . बाळाच्या कानांतील डूल हालतांना बघून तो कागदाबरोबर बोलत असल्याचे ( वाचीत असल्याची ) आईनें बांधलेली खूणगांठ मोठी हृद्य आहे यांत शंका नाही . त्याचप्रमाणें पुस्तकांच्या भारानें बाळाच्या मांडीला ज्याअर्थी ओझें होत आहे त्याअर्थीं तें पेलूं शकणार्या बाळाचें अंतःकरण ज्ञानी असलें पाहिजे , म्हणून तिनें केलेला अंदाजहि हृदयस्पर्शी आहे . सामान्य स्त्रीची ही कल्पनाशक्ति विचारवंतालाहि लाजविणारी आहे , असें म्हणावयास हरकत नाहीं .
बाळाचे डोळे राघूप्रमाणें आणि रत्नाप्रमाणें चमकदार असून तो वतनाचे कागद वाचीत असल्याची इथें आलेली माहिती जुन्याकाळच्या वतनदारी पद्धतीची कल्पना देत आहे .
आपल्या पाटीची किनार चमकदार बेगडीची असावी म्हणून बोबड्या बोलांनीं मागणी करणार्या बाळासाठीं इथें कौतुक आनंदलें आहे ; आणि त्याला वळणदार लेखन यावें म्हणुन त्याच्या पंतोजीला बक्षिस म्हणून देऊं केलेली चंबूवाटी इथें अभिमानानें सांगितलेली आहे . गुरुजींना या वस्तु द्यावयाच्या म्हणजे बाळाच्या वयाच्या त्यांच्या मुलाच्या त्या उपयोगी असून त्यामुळें त्या मुलाबरोबर याचेंहि शिक्षण आपुलकीनें व्हावे , अशी त्या मागची भूमिका इथें सुचकतेनें आलेली आहे .
इसाचं नेसयीनं माजं रुपाया भारायाचं
पोटीचं बाळराज दोनी पदर जरायाचं
नार लेणं लेती ईस पुतळ्या बोरमाळ
माजा ग बाळराज सये उगडा चंद्रहार
पुतळ्याची माळ बाई लोंबती पाठीपोटीं
माजा ग बाळराज चंद्रहारानं केली दाटी
लेन्या लुगड्याची न्हाई कशाची जोड केली
पोटीचं बाळराज माजी ठेवनीची शालजोडी
दागदागिन्यांचा आणि भारी कपड्यांचा आपल्या मुलापुढें आपणाला मुळींच हव्यास नसल्याचें इथें आई अभिमानानें सांगतें आहे . आणि तिचें सर्व प्रकारचें सुख तिच्या मुलांमध्येंच केंद्रीभूत झालें असल्याचें सांगतांना तिला जणुं ब्रह्मानंद होतो आहे ! शेजारणीनें अगर नात्यांतल्या बाईनें अमूक एक केलें म्हणून अभिमान दाखविला , तर घरच्या गरिबीची री न ओढतां अगर त्याबद्दल वाईट वाटूं न देतां , ती या रीतीनें आपल्या श्रीमंतीचा दिमाख बोलून दाखवीत आहे , असें हें मोठें आगळें सौदर्यं या ओव्यांनीं व्यक्त केलेलें आहे .
एक रुपयाभाराच्या लुगड्यावर खूष होऊन आई इथें त्या लुगड्याचे जरीचे पदर म्हणून मुलाकडे बोट दाखवीत आहे . त्याचप्रमाणें लोकांच्या गळ्यांतील दागिन्यांची पर्वा न करतां ती आपला चंद्रहार बघा म्हणून मुलाकडे पहात आहे . एवढेंच नव्हे तर लेण्यानेसण्यामुळें प्राप्त न होणारें वैभव केवळ ह्या मुलांच्यामुळें प्राप्त झाल्याचा तिला अभिमान वाटतो आहे ! ठेवणीच्या शालजोडीशीं तिनें मुलाची तुलना केली आहे . तिच्या मनाची ही केवढी विशालता !
पाटला जातं पाणी ऊंसासकट जाईला
सईला किती सांगूं सुक बाळाच्या आईला
बुट्टीचं दळायान बाई दुरडीमदीं आलं
बाळ जोडीला ग आलं दिस नाचारीचं गेल
बाळाच्या आगमनामुळें परिस्थितीमध्यें झालेला फरक इथें मोठ्या सुंदर रीतीनें सांगितलेला आहे . पाटाच्या पाण्यानें मळा पिकल्याचें सांगून जाईला पाणी मिळावें तसा आईला बाळानें आनंद दिला . मोठ्या आकर्षक तुलनेनें आईचें मन इथें मोहरलें आहे ! बाळामुळें दिवस चांगलें आल्याची खूण म्हणून दळण मोठें झाल्याची माहिती इथें आली आहे , हा दृष्टांतहि सुरेख आहे .
रडूं नको बाळा तुला खाऊ देतें गूळ
सोड पदराचा पीळ
या गीतामध्यें खाऊचा हट्ट घेऊन रडत बसलेल्या बाळाची समजूत आई घालीत आहे . बाळानें आईचा धरलेला पदर आणि घेतलेला हट्ट इथें 'पीळ ' या शब्दानें व्यक्त झाला असून , गूळ खावयास दिल्यानें तो संपेल असेंहि त्याच्या उल्लेखावरून लक्षांत येतें . पूर्वीच्या काळीं मुलाला गप्प बसविण्यासाठीं हातांत गुळाचा खडा देत असत , असें यावरून दिसतें .
नेनंता (लहान ) मुराळी ग जातो वाटेनं खेळयीत
ढग वळवाचा गाळीयीत जरी पटका लोळवीत
सासरीं गेलेल्या बहिणीला आणायला म्हणुन गेलेल्या छोट्या बाळाचें हें कौतुक आहे . वळवाच्या पावसांतहि जरीपटका लोळवीत बाळ आनंदानें खेळत खेळत बहिणीकडे जात आहे असा हा सुंदर देखावा आहे .
दिष्ट नि झाली म्हनूं शाळेला जातां जातां
माज्या ग बाळकानं जरी पोषाक केला हुता
दिष्ट नि झाली म्हनूं तालीम तक्कयावरी
लाडका बाळराज झाड सुरूचं नाक्यावरी
दिष्ट नि झाली म्हनूं मीठमोहर्यंनी हुईना काई
बाळाला झाली दिष्ट येसबंदला जातें बाई
दिष्ट नि झाली म्हनूं मीठमोहर्या काळा बिब्बा
माजा ग बाळराज बाई अंगनीं चंद्र उबा
दिष्ट नि झाली म्हनूं घेती मोहर्या घोळयीनीं
माजा ग बाळराज आला लेजीम खेळूयीनी
दिष्ट नि झाली म्हनूं मिर्च्या उतरीतें बारा
माजा गा बाळ राजा हाई दृष्टीजोगा हिरा
मुलाच्या चांगल्या गुणविष्कारानें अगर चांगल्या दिसण्यामुळें त्याला दृष्ट होते अशी सामान्य स्त्रीची कल्पना आहे . याच कल्पनेचा आविष्कार दृष्टीची हीं ना तीं कारणें दर्शवीत इथें आलेला आहे . दृष्ट झाली म्हणजे बाळाचें कांहीं बरेंवाईट होईल ही धास्ती आईला वाटते . त्यामुळें असें होण्याची कारणें शोधीत ती बाळावरून येसबंद , शेणकूट , केंस , मिरच्या , मीठ , मोहर्या , बिब्बा वगैरे सामान दोन्ही हातांत गच्च धरते आणि तें पांचसातदां मुलावरून उतरून चुलींत टाकते . अशावेळीं बाळाला पाहिलें अलेल त्या सर्वांच्या नांवांचा उच्चार करून ती पूटपुटते कीं , '...ह्या सगळ्यांच्या डोळ्यांत खाराकुट्टाची राक पडूं दे !' आणि मग तिचा जीव हलका होतो ! चुलींतल्या निखार्यावर हें दृष्टीचें सामान फुटायला लागलें म्हणजे मग आल्यागेल्याच्या नांवानें बोटें मोडीत चुलीचें काजळ मुलांच्या कपाळावर लावून मग ती निश्चिंत मनानें इतर कामाला लागते . तरीपण -
दिष्ट नि झाली म्हनूं मीठमोहर्या चुलीबाई
दिष्ट झालीया करूं काई
दिष्ट नि झाली म्हनूं मीठमोहर्या काळी माती
चंद्र कोम्याला एक रातीं
अशी रुखरुख तिच्या मनांत बराचवेळ राहातेच आणि एका रात्रींत आपला चंद्र कोमेजला या कल्पनेनें तिला धास्ती वाटते .
उजेड पडयीतो नाक्याच्या ग कंदीलाचा
लाडक्याच्या माज्या जर झळकतो मंदिलाचा
देखन एवडं पन डोळ भिवया आकाखालीं
माजा ग बाळराज चाल जानीच्या झोकाखालीं
किती नटशील बाळा नटनटूनी काय हुतं
लाडक्या बाळराया रूप लागलं कुटं जातं
काळ्या मानसाला नका म्हनूंसा काळा काळा
माज्या ग राजसाचा इटुसारका तोंडावळा
मुलाच्या फाजिल नटव्या मुरडण्याची कल्पना इथें आलेली आहे . काळ्या मुलानें आपल्या रूपाबद्दल वाईट न वाटून घेतां विठ्ठलासारखें आपण आहोंत म्हणून समाधानांत रहावें असें इथें आईनें मोठ्या खुबीनें सुचविलें आहे .
पूर्वीच्या काळीं मंदिल ( रेशमीजरीचा फेटा ) बांधण्याची चाल होती . तेव्हां त्याचाहि इथें उल्लेख आला असून त्याची चाहूल रात्रींच्या वेळीं नाक्यावरून येणारा मुलगा कंदिलाच्या उजेडांत दिसल्यानें लागली आहे .
पिकल्या पानांचा ग इडा बांदावा चवकोनी
लाडके मैनाबाई भाचा जावई नातीं दोनीं
पिकल्या पानांचा ग इडा सुकुनी गेला वाया
मौजे तू भैनबाई कांत रुसला पड पायां
पिकल्या पानांचा ग इडा बांदितें पीळदार
सावळे भैनाबाई केळ लवंगाच मोळ मार
पिकल्या पानाची तुज्या कांताला आवयीड
माजे तूं भैनाबाई पान दिव्यानं निवयीड
स्वतःच्या जावई झालेल्या भाच्याला पानाचा चौकोनी विडा करून द्यावयाला आई मुलीला शिकवीत असतांना , या गीतांत बहीणहि आपल्या बहिणीला तीच शिकवण देत आहे . नवर्याला द्यावयाचा विडा ताजा पाहिजे , तो पीळदार पाहिजे आणि त्याला केळाच्या देठांवर अगर लवंगांचा मोळा (खिळा ) मारला पाहिजे असें बजावून सांगतांना ती म्हणते आहे कीं , तुझ्या नवर्याला पानाची फार आवड आहे तेव्हां तूं दिव्यापुढें पानें नीट निवडून पुसून घेत जा ; आणि जर नवरा विड्यापायीं रुसलाच तर पाया पडून , पडती बाजू घेऊन , त्याचा रुसवा काढीत जा . पूर्वीच्या काळीं आईप्रमाणें मोठी बहिण धाकट्या भावंडांना कशी शिकवण देत असे , त्याचा हा एक लक्षांत ठेवण्यासारखा नमुना आहे असें म्हणतां येईल .
पांची प्रकाराचं ताट द्रोण तुपाचा कुठं ठेवूं
वाणीतिणीच्या बंदु जेवू
पांची प्रकाराचं ताट द्रोण दुधाचा निवायाला
तूप भिनलं शेवायाला
पांची प्रकाराचं ताट निरशा दुधांत सोनकेळ
तोंडीं लावाया रामफळ
पांची प्रकाराचं ताट भाजी मेथीची विसरली
बंदु सरदारा चुकी झाली
पांची प्रकाराचं ताट दुधा तुपानं भरली वाटी
बंदु जेवतो जगजेठी
भावाला बहिणींनें वाढलेल्या पंचपक्वान्नाचें हें सुंदर वर्णन आहे . शेवया , तुपाचा द्रोण , दुधाची वाटी , मेथीची भाजी , सोनकेळ , रामफळ इत्यादि पदार्थावरून घरच्या गाईम्हशीमुळें असलेली दुधातुपाची सुबत्ता आणि परसदारींच्या बागेंत येणारीं फळे यांच्या सहाय्यानें पंचपक्वान्नांचा आनंद पूर्वी लुटतां येत असे , हें यावरून दिसून येतें . बाहेरचे पदार्थ गोळा करण्याची यातायात करीत न बसतां आणि घरचें असेल त्यावरच भावासाठीं जेवण करीत असतांना , बहिणीला सुगृहिणी म्हणून वाटणारें हें समाधान आगळें आहे . आजकाल मात्र याची बरीच उणीव दिसून येते !
पोथी नि पुस्तकांनी माज भरल रांजन
लाडक्या बंदुजीनं मागं सारील बामन
या गीतांत शिकलेल्या हुषार भावाचें कौतुक बहीण करीत आहे . आपल्या घरीं रांजण भरून पुस्तकेंजमा झाल्यानें भाऊ ब्राह्मणापेक्षांहि हुषार असल्याचें हें भाबडें मन सांगतें आहे ! पूर्वीच्या काळीं मोठ्या प्रमाणांत ब्राह्मण वर्गच ज्ञानसंग्रह करीत असे . त्यामुळें त्यांसहि लाजवील अशी कर्तबगारी आपल्या ब्राह्मण नसलेल्या भावानें केली , म्हणून बहिणीला झालेला हा आनंद मोठा ह्रदयस्पर्थी तसाच समाधानकारकहि आहे .
जात्या ईसवरा कोन्या डोंगरीचा ऋषी
भावा भैनीवानी हुरदं उकलीलं तुझ्यापाशीं
बहिणभावांनीं एकमेकांशी खुल्या दिल्यानें गुजगोष्ट करावी त्याप्रमाणें आपण जात्याशीं बोलूं शकल्याचें समाधान बहिणीनें इथें प्रकट केलेलें आहे ! तिचा हा भोळाभाव मनहारी आहे . त्याचप्रमाणें कोणत्या तरी डोंगरावरून आलेला ऋषीच जात्याच्या रूपानें समोर असल्याची व जात्याला ईश्वर म्हणून संबोधल्याची तिची कल्पनाहि वाखाणण्याजोगी आहे .
बहीणभावंडांच्याबद्दल असें किती बोलावें तेवढें थोडेंच वाटावें , एवढ्या या विषयावरील ओव्या अमाप आहेत .
या ठिकाणीं खेड्यांतील बहुजनसमाजामधील स्त्रियांनी गाइलेलीं हीं सुमधुर भावाबहिणीचीं गीतें आहेत . त्यांचें सौंदर्य आगळें आणि सगळ्यांत सगळें वाटावें एवढें देखणें आहे . याच ग्रंथातील इतर विषयांवरील प्रकरणांमधून याच विषयावरील वेगळा भाव प्रकट झाला आहे , तोहि या संदर्भात पहाणें उचित होईल यांत शंका नाहीं .
मायबाप
उभ्या आयुष्याचा बर्यावाईटाचे वाटेकरी होणारे भागीदार म्हणून माणसाला आईबापांचा मोठा आधार वाटतो . विशेषतः सासुरवाशिणींना तर ह्या आधाराची अतिशय आवश्यकता वाटते त्यांच्या जीवनाची जणूं सारी भिस्त आईवडिलांच्यवरच पडलेली असते ! चांगली कामगिरी केल्यानंतर कौतुक करायला , चुकलें माकलें तर सांभाळून घ्यायला , ल्यानेसायची हौस भागवायला , थकल्या भागल्या जिवाला विसांवा द्यायल आणि कोणत्याहि प्रसंगाला पाठीशीं उभें रहायला आईबापाखेरीज सासुरवाशिणीला इतर कुणी दिसत नाहीं , आठवत नाही . भाऊ झाले तरी ते गोड आहेत तोंवरचेच बहिणी झाल्यातरी त्यांच्या मनाप्रमाणें होतेंय तोंवरच्याच . आईबापांचें तसें नाहीं . त्यांच्या मायेला ना आदि ना अंत . त्यांच्याजवळ मुलींपासून कसलीहि ना अपेक्षा ना प्राप्ति . सारें जणूं निरपेक्ष . त्यामुळें बायका भल्या दिलानें आईवडिलांची थोरवी गात असतात .
बापाजी समींदर बया मालन व्हाती गंगा
दोगांच्या सावलींत कर आंगूळ शिरीरंगा
बापाजी माजा वड बया मालन वडजाई
दोगांच्या सावलीची किती सांगू मी बडेजाई
काशी बनारसी बनारसीचा डोंगूर
मायबाप माजी बाई सर्व तीर्थांचा आगर
ववी मी गातें काशींतल्या काशीनाथा
रामचंदर माजा पिता सीता रानी माजी माता
ववी मी गातें पित्या माज्या दौलताला
सावळ्या बंदुराया बया तुळस शेजाराला
आईवडील म्हणजे जणुं तीर्थांचें आगर आणि त्याची छाया म्हणजे जणुं देवादिकांची छाया , अशा सुंदर धार्मिक भावनेनें नटलेल्या व प्रेमळ श्रद्धेनें फुललेल्या या ओव्या आहेत .
माळीन सादवीती देठासकट कारलं
मायबापांनीं ग दिलं साजासहित डोरलं
वैराळ सादवीतो चुड लियाच्या बाया किती
माजी ती माऊली चौघी लेकींचं नांव घेती
पिता माजा चंदन बया माजी गोंदन
हावस माजी हुती दोनी झाडांच्या मधून
काळी चंद्रकळा बगतें दिव्याच्या ग ज्योती
पिता माजा दवलता हिर्या किंमत सांग किती
हावस मला मोठी तांबडं लुगडं काळी चोळी
माय मालनी बोलती चल बाजारा येरवाळी
चोळ्यावरी चोळ्या किती फाडूं मी शेलारीच्या
पिता माजा दवलत खेपा करीतो गालेरीच्या
उंच उंच चोळी मी ग लेतीया आडवारी
बयाच्या जिवावरी मी कां भोगिते तालीवारी
बापाजी माजा वड बया मालन पिंपरण
दोगांच्या सावलीला झोप घेतें मी संपूरण
बाजाराला गेली माजा बाजार थोडा थोडा
पिता माजा दवलत संगं वासाचा येलदूडा
आईवडिलांनी आपल्या लेकीची पुरविलेली हौस या गीतांतून साईन संगीत आलेली आहे . दारांत येणारी माळीण देटासह कारल्याचा पुकार करीत (सादवीत ) असतांना वडिलांनीं कोल्हापुरी साजाची दिलेली देणगी मुलगी आठवीत आहे . त्याचप्रमाणें वडिलांनी घेतलेली काळी चंद्रकळा दिव्याच्या उजेडांत नजरेंत भरलेली आहे , तेव्हां तिच्या किंमतीची विचारपूस ती वडिलांच्याजवळ करीत आहे . अशावेळीं कौतुकानें वा अभिमानानें ती वडिलांना हिरा म्हणून संबोधिते आहे ! आई वडिलांनीं ग्वाल्हेरकडून मागविलेली भारी चोळी आपण नेहमी वापरतों असें सांगतांना हि मुलगी वाटेल ती हौस पुरविण्याची आईवडिलांची तयारी असल्याचें सांगते आहे . बाजारांत जातांना संगें येणारे वडील हे वेलदोड्याच्या वासाप्रमाणें समाधान देणारे आहेत , असा इथें आलेला उल्लेख वडिलांच्याबद्दलचा पराकोटीचा आदर दर्शवीत आहे .
आईवडिलांच्या सावलीमध्यें आपणाला संपूर्ण सुख मिळत असल्याची ग्वाही देऊन या गीतांतील मुलगी , आपल्या चारीहि मुलींचा आईला अभिमान वाटत असल्याचें , कासाराला केलेल्या बोलाविण्याच्या निमित्तानें सांगते आहे .
या गीतांत आलेल्या शेलारीच्या (जुन्या काळचें मौल्यवान कापड ) चोळीवरून आणि ग्वाल्हेरच्या खेपेवरून पूर्वीच्या काळच्या हौसेची व ती पुरविण्यासाठीं घेतल्या जात असलेल्या तसदीची कल्पना येते .
लुगड्याची घडी बाई यीना ग माज्या मना
पित्या माज्या दवलता बापा नेसूं दे तुमच्या सुना
लुगड्याची घडी दोनी पदर रामसीता
घडी घालीतो माजा पिता नेस म्हनीती माजी माता
लुगड्याची घडी मीं कां टाकीली बाकावरी
सावळे भैनाबाई माजा रुसवा बापावरी
लुगड्याची घडी त्यांत रेशीम काय न्हाई
पिता राजस बोलतो लेकी एवढ्यानं झालं न्हाई
आपल्या मनाप्रमाणे लुगडें घेतलें नाहीं असें वाटल्यामुळें वडिलांच्यावर रुसलेल्या लेकीचें हें मनोगत आहे . आई वडिलांच्या जवळ हट्ट घेणार्या मुलीची ही भावना स्त्रियांच्या नित्य परिचयाची असल्यानें तिची गोडी थोडी अधिक वाटते ! या गीतांत हे लुगडें नाहीं मनाला आलें तरी 'एवढ्यानेच संपलें असें नव्हें तर मी पुन्हां दुसरें घेईन ' अशी बापानें घातलेली समजूत लेकीनें संयमानें वागावें ही शिकवण देण्याच्या दृष्टीनें महत्त्वाची आहे .
बया म्हनूं बया सुट तोंडाला पाजूर
माजी मदाची घागर
बया म्हनूं बया तोंडाला येतं ग्वाडू
माजं मनूक्याचं झाडू
लेकीनें आईच्या प्रीतीचा गाइलेला हा महिमा मोठा सुंदर तसाच ह्रदयस्पर्शीहि आहे . आईच्या प्रेमाची उपमा -अलंकाराच्या सहाय्यानें केलेली ही वाखाणणी लक्षांत घेण्याजोगी आहे .
दंडावरची चोळी बाई आनीक वर सार
लाडके बाळाबाई बाजूबंदाला जागा कर
भरल्या बाजारांत उंच किरान्यामंदी पेरू
लाडके बाळाबाई सार्या गोतांत पिता थोरू
बारा बैलांची दावन मागं म्हशीला डांब रवा
पित्या माज्या दौलताची बाई राजाची बग हवा
बारीक बांगडी नको भरूंस काला किता
जोंवर माजा पिता राजवर्खीची काय कथा
बहिईबहिणींच्यामध्यें वडिलांच्या घराची आणि कीर्तीची होणारी ही बोलाचाल आहे . वडील आहेत तोंवर राजवर्खींसारखी भारी बांगडी भरायला हरकत नाही आणि अंगावर बाजूबंदासारखा दागिनाहि यायला हरकत नाहीं , अशी या गीतांनी केलेली भाषा जुन्या काळच्या हौसेच्या मायबापांची हकीकत सांगते आहे .
सावली शिताळ हितं उतरीलं वज्जं
मावली माजी बया इसाव्याचं झाड माजं
सुकादुकाच्या हुरदीं बांदील्या मीं ग पुड्या
भेटली बयाबाई आता सोडीतें थोड्या थोड्या
गांवाला कुन्या गेली भैनभावंडांची जाळी
बंदु पोर सवदा संग भैन लेकुरवाळी
माय लेकीचं बोलनं जशी दुधाची उकळी
लाडके राजूबाई माता मनाची मोकळी
आई म्हणजे जणुं विसाव्याचें झाड आणि ह्रदयांत बांधून ठेवलेल्या सुखदुःखाच्या पुड्या सोडून शांतता देणारी देवता , अशी या गीतांत आलेली भावना विशेष कल्पनारम्य आहे . मायलेकींचे बोलणे फार खुल्यादिलानें होतें असा या भावनेचा अर्थ असून , दुधाला उकळी फुटावी तसा त्या बोलण्याचा थाट असतो , असें इथें सुचविलें आहे .
पोरसवदा भाऊ लेकुरवाळ्या बहिणीला घेऊन गांवाला गेल्यामुळें आईला वाटत असलेल्या काळजीचा या गीतामधील भावनाविष्कार मोठा चित्ताकर्षक आहे .
उभ्या मी गल्लीं जातें खडा हालना भुईचा
येल शितळ जाईचा
उभ्या मी गल्लीं जातें नीट धरूना पासवा
कुन्या गरतीचा कुसवा
उभ्या मी गल्लीं जातें न्हाई हालत पापनी
नांव बापाचं राखुनी
उभ्या मी गल्लीं जातें काम येळच्या येळला
हुतें गरतीच्या साळला
उभ्या मी गल्लीं जातें दंड भुजा झाकुयीनी
नांव आईचं राकुयीनी
आईबापांनी आपणाला कशाप्रकारची शिकवण दिली आहे त्याची मोठी सुरेख माहिती प्रत्यक्ष कृतीनिशीं इथें देण्याचा प्रयत्न एका लेकीनें केलेला आहे . आपल्या हालचालीवरून आपण कुणाची मुलगी आहोंत हें सांगण्याचा हा प्रकार मोठा सूचक , तसाच आजच्या सुशिक्षित मुलींनीं धडा घेण्याजोगाहि आहे .
जागा बगुनी दिल्या पागा वतनं बगुनी दिल्या लेकी
पित्या माज्या दौलताला शाना चातुर म्हनूं किती
वडिलांनी आम्हां बहिणींना किती चांगलीं स्थळें बघून दिलें आहे , हे सांगण्याची तर्हा मोठी सुंदर आहे . जुन्या काळीं कसलें वर बघून मुलीला द्यावयाची पद्धति होती याचा अंदाज या गीतावरून येतो .
चांदणं टिप्पूर पुनवी बाईचं
शोभिवंत घर माझ्या ग आईचं
चांदणं टिप्पूर चांदण्या जोगी रात
पित्या राजसाला किष्ण देवाची सोबत
माहेरच्या घराचें चांदण्या रात्रीं दिसणारें हें वैभव आगळें आहे . कृष्णदेवाची सोबत वडिलांना आहे म्हणजे देवाचा वरदहस्त आपल्या माहेरीं आहे , असें या गीतांत सुचविलें आहे .
नदीच्या पल्याड ग काडी हालती लव्हाळ्याची
तितं माजी हैती बाई मामा मावशी जिवाळ्याची
हिरव्या चोळीवरी कुणीं काढीली गवळण
ह्या ग नारीला सांगूं किती हाय हौसची मावळण
उचकी लागीयिली कां ग उचकी तुजी घाई
मायेच्या मावशीनं सई काडीली कशापाई
आईवडिलांच्या प्रमाणेंच माहेरच्या इतर गण गोतांच्या आपल्यावरील प्रेमाची साक्ष इथें सासुरवाशीण देत आहे .
नदीच्या पलीकडे असलेल्या मामा मावशींच्या जिव्हाळ्याची खूण म्हणून लव्हाळ्याची काडी हालते आहे , मावशीनें आठवण काढली म्हणून उचकी लागते आहे आणि हिरव्या चोळीवरील नक्षीमुळें आत्याची याद येते आहे , हा या गीतांतील भावनाविष्कार मोठा आकर्षक आणि स्त्रीस्वभावाच्या विशेष आवडीनिवडी दर्शविणारी आहे .
आईवडिलांच्या प्रेमानें नटलेला यापेक्षा वेगळा भावनाविष्कार याच ग्रंथातील इतर प्रकरणांमध्ये आलेला आहे , त्याचें वाचनहि या भावनाविष्काराच्या जोडीला होणें आवश्यक आहे . म्हणजे मग हा विषय निरनिराळ्या दृष्टि -कोनामधून भाबड्या स्त्रियांनीं कसा हाताळलेला आहे , याची कल्पना यावयास अधिक सोपें जाईल .
मायबापांची थोरवी गावयाची म्हणजे सागरापेक्षांहि अधिक खोलीमध्यें बुडी मारावयाची आणि त्याच्या विस्तारापेक्षांहि अधिक मर्यादा गांठावयाची असा प्रकार आहे . केवळ शब्दांनी ही भावना खुलत नाहीं . केवळ कल्पनेनेंहि ती नटत नाहीं . तिची खरी भव्यता शब्दातीत आहे .
हावशा माजा कांत
उभ्या जन्माची जोखीम अंगावर घेतलेल्या आपल्या पतिराजाबद्दल सर्व सामान्य स्त्रियांनीं सांगितलेलीं गीतें मोठीं पहाण्याजोगीं आहेत . पूर्वीच्या काळीं घरांतील वडीलधार्या मंडळींच्या देखत नवराबायको बोलत नसत . एरव्हीं देखील त्यांचें बोलणें चालणें कुणाच्या पहाण्यांत येत नसे . तेव्हां असें असूनहि आपल्या नवर्याबद्दल सामान्य बाईनें जात्यावर बसून स्वतःशींच केलेली गुजगोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे .
एक तर नवर्याच्या जिवावर जगावयाचें तेव्हां निमूटपणें घडेल तें पहावयाचें आणि तो सांगेल तें ऐकावयाचें अशी स्थिति जुन्याकाळीं असे ; आणि दुसरें म्हणजे त्याच्याबद्दल बरेंवाईट कांहीहि बोलावयाची सोय नसे ! तो म्हणजे जणुं देव आणि त्याचें बोलणें म्हणजे जणूं ब्रह्मवाक्य ! परंतु असें असूनहि आमच्या खेडुत स्त्रिया आपल्या नवर्याबद्दल बोलल्या आहेत . मोकळ्या मनानें त्यांनी आपली भावना प्रकट केली आहे .
नवास करितें कुळस्वामी जोतीबाला
हात जोडीत म्हनीतें कुंकूं जलमीं कपाळाला
आपणाला अखंड सौभाग्य लाभावें म्हणून एक सुवासिनी इथें देवाला , घरच्या कुळस्वामीला , विनंति करीत आहे . नवस करीत आहे . त्यामुळें सामान्य स्त्रीच्या दृष्टीनें ही भावना बहुमोलाची आहे .
लेन्यामंदी लेनं कोलापुरी डोरलं
हिरकनी चोळीवरी लेनं लोळतं पिवळं
हौसचा भरतार हौस करीतां र्हाईना
राम अवतारीं डोरलं बाई खिशांत मावना
लेन्यामंदी लेनं गळीं डोरलं कानीं फुलं
कपाळीचं माजं कुंकूं बाई भाळींचा चंद्र डुल
लेन्यामंदी लेनं नथ लेवावी येरल्याची
जाळीच्या मन्याखाली हवा पहावी डोरल्याची
जिचा भर्तार गुनायाचा तिचा संसार सुखायाचा
शेल्यानं बनातीचा जुवा बसला दुहीयीचा
जुन्या काळच्या गळ्यांतील बहुतेक सर्व दागिन्यांचा उल्लेख करुन त्यामध्यें मंगळसूत्राचें असणारें वैभवशाली स्थान या गीतांनीं दर्शविलेलं आहे . त्याचप्रमाणें नवरा हौशी असून त्याचें व आपलें फार प्रेमानें चाललें असल्याचे इथें सांगितलें आहे . गुणी नवरा असेल तर शेला आणि बनात यांची संगत जुळावी तशीं नवराबायकोंची मैत्री प्रेमाची होते , अशी इथें आलेली भावना सुंदर आहे , तशीच कल्पनासौष्ठव दर्शविणारीहि आहे .
चवघी आमी जावा पांचवी माजी सासू
नंद कामिनी मदीं बस माज्या चुड्याला सोबा दीस
काळी ग चंद्रकळा दोनी पदर सारयीक
सावळे भैनाबाई हौशा कांताची पारयीक
बारीक बांगडी मला भरावी वाटली
हावशा कांतानं ग तार पुन्याला धाडीली
गांवाला गांव शिवू पान मळ्याला पायरी
हावशाच्या जिवावरी दुनिया भरली दुईरी
जोडव्याचा पाय हळूं टाकावा मालनी
सईला किती सांगूं कांत बगीतू चालनीं
हळदी मिरचीला गिराईक गूळ तितंच मोलयीला
हावशा माजा कांत धनी मालाचा बोलयीला
खोपींत खोपकरी कुठं गेल्याती मोटकरी
हावशा कांताचा ग जरीपटका धाववरी
घरामधील गणगोतांत नवर्याचें स्थान काय आहे हें सांगून इथें बायका आपल्या नवर्याच्या कर्तबगारीची थोरवी गात आहेत .
उंच वाढलेल्या पानमळ्याला पायरी करून (पायर्यांची शिडीकरून ) नवर्यानें नवी दुनिया निर्माण केली आहे , जोडव्याच्या पायाच्या चालीवरून वळण पारखलें आहे , काळी चंद्रकळा हौसेनें आणली आहे इत्यादि ही नवर्याविषयींची भावना आपल्या शब्दांत बोलून दाखविण्याची पद्धति मोठी छानदा आहे .
आपल्या शेतकरी नवर्याची इथें त्याच्या धावेवर पडलेल्या जरीच्या फेट्यावरून होणारी शोधाशोध आणि हळद मिरची गूळ याला आलेलें गिर्हाईक बघून त्याच्याबद्दल वाटलेला अभिमान या दोन्हीहि कल्पना विशेष ह्रदयंगम आहेत .
माळ्याच्या माळ्यामंदी केळी नारळी जावाजावा
मधीं गुलाबा तुजी हवा वास घेणार गेलें गांवा
गांवाला गेल म्हनूं गळ्याची ग गळापोत
हावशा माजा कांत चंद्र हिल्लाळाची ज्योत
गांवाला गेल म्हनूं माज्या गळ्याचा ताईत
हावशा कांताला ग सर्व्या देशाची म्हाईत
गांवाला गेल म्हनूं माजी खजीबीन्याची पेटी
लाडके भैनाबाई वाडा भयान लाग पाठीं
नवरा गावाला गेल्यानंतर विरहांमुळे मनाची होणारी कुत्तरओढ आणि वाटणारी रुखरुख या गीतांनी मोठी बहारीची रंगविली आहे . नवर्याचें नांव न घेतां त्याला हावशा कांत म्हणून तो गांवी गेल्याच्या त्याच्या बायकोनें सांगितलेल्या या खुणा कल्पनारम्य आहेत . गळ्यांतील भारी दागिना आणि भावनांच्या खजिन्याची पेटी म्हणून नवर्याचा इथें होणारा गौरव वाखणण्याजोगा आहे . पतिवरील निष्ठेचा हा एक सुंदर दाखला आहे , असें म्हणावयास हरकत नाही .
माज्या ग अंगनांत सूर्या किरनाचं एक झाड
हावशा माज्या कांत झाला उशीर सबा सोड
भरल्या सबेमंदीं हात देतें मी छतायाला
हावशा ग सरदार उबा काँग्रेस मतायाला
भोळ्या भाबड्या सामान्य स्त्रीनें राजकारणामध्यें व निवडणुकीमध्यें भाग घेणार्या आपल्या पतीचें रंगविलेलें हें अलिकडच्या काळांतील चित्र लोकगीतांच्या अखंड निर्मितीचें निदर्शक म्हणून अभ्यासण्याजोगें आहे . सूर्य किरणाच्या अंगणातील झाडाच्या हालचालीवरुन पतीच्या माघारीं परतण्याची बांधलेली ही खूणगांठ मोठी खुबीदार आहे !
प्रीतीचा एवढा कांत नको प्रीतीवर जाऊं
पानयांतलीबी नाचू न्हाई लागत अनुभाऊ
नवर्यानें आपल्यावर प्रेम केलें म्हणून तेवढ्यावरूनच , त्याच्या अंतःकरणाचा ठाव लागला असें समजून चालूं नये , कारण पाण्यांतल्या नावेचा अनुभव कळत नाहीं , असा इशारा या गीतानें सासुरवाशिणीला दिलेला आहे !
दुबळ्या भरताराची सेवा करावी आदरानं
पाय पुसाव पदरानं
दुबळ्या भरताराची नको करूंस हेळईना
कपाळीचं कुंकू सोनं दिल्यानं मिळईना
दुबळा भरतार बाई भाजीची आणी नोट
मीग हांसत सोडी गांठ
दुबळा भरतार न्हाई नारीच्या खातरंत
भाजी वेंचीतो धोतरांत
एखादीचा नवरा थोडा कमकुवत असेल किंवा कर्तबगार नसेल तर तिनें त्याची हेळसांड करू नये अगर त्याच्याकडे दुर्लक्ष करूं नये , असा महत्त्वाचा इषारा या गीतानें सासुरवाशिणीला दिला आहे . त्याचबरोबर सौभाग्याचा हा धनी सोन्यानाण्यांनीं मिळत नाहीं हेंहि सांगून टाकलें आहे ! त्याची सेवा तर आदरानें करावींच परंतु त्याच्या कर्तबगारीचीहि वाहवा करावी , असें हें गीत सांगत आहे . या सर्व कल्पनाविष्कारावरून एक गोष्ट इथें अशी लक्षांत येते कीं , जुन्या काळी नवर्याला देव मानून वागण्याची चालरीत बायका अवलंबीत असत व त्याचप्रमाणें पुनर्विवाहाचीहि चाल त्यावेळीं समाजाला मान्य नसावी !
रागीट भरतार बच्च्या नागाचा फुसकार
हवशाचा राग मी ग हंसून केला गार
रागीट भरतार समजी करीतें नानापरी
लाडक भैनाबाई आडवा दिला ग नराहरी
रुसल भरतार एक दिसाला दोन वेळ
पोटींचा बाळराज घाली धोतराला पीळ
भरताराचा राग डाव्या डोळ्याची तराटनी
अंतरींची ग शानी बाई हसत देतें पाणी
भरताराचा राग जसा वारूळीचा नाग
लाडके बाळाबाई त्येच्या हुकमांत वाग
रागावलेल्या नवर्याचें हें शब्दचित्र मोठें मजेदार आहे ! नागाप्रमाणें फूत्कार टाकणार्या नवर्याच्या हुकमांत वागायची आज्ञा करून या गीतानें हंसतमुखानें त्याला सामोरी जाणारी त्याची बायको रंगविलेली आहे . त्याचप्रमाणें त्याचा राग शांत करण्यासाठीं त्याच्या धोतराचा सोगा धरून त्याच्यामागें लागलेला आपला बाळ त्याच्या हातीं दिला असल्याची इथें आलेली माहिती वास्तवपूर्ण आणि विलक्षण परिणामकारकहि झाली आहे .
इसाचं नेसयीनं माजं तिसाचं दांडीवर
हौसदारानं खंडीली मुंगी पैठण माडीवर
तांबड्या लुगड्याची निरी रुतती माज्या पोटा
चुड्याच्या जिवावर मला शालूला काय तोटा
परटीन धुनं धुती लिंबं देतें मी ताजीताजी
चुड्या ग राजसाची दोनीं धोतरं अमदाबाजी
शिष्याच्या दुकानी चुडा बसला भोळा राजा
हौशाच्या मांडीवरी हिरवी साडी ग बामनवजा
आपली हौस पुरविणार्या नवर्याचें कौतुक इथें बायको करीत आहे . घरच्या गरिबींतूनहि तिला त्याचें दिसणारें हें वैभव आजच्या स्त्रियांनी डोळे भरून पहण्यासारखें आणि मन लावून जोपासण्यासारखें आहे ! या गीतांत आलेल्या तलम कपड्याविषयी प्रसिद्ध असलेल्या अहमदाबाद गांवाची , बामनवजा लुगड्याची आणि मुंगी पैठनच्या यात्रेची माहिती जुन्या काळची हौस कशी खुलत असे याची कल्पना देत आहे .
विहीरीच्या धांववरी बाभळबाई ती माऊली
हावशा कांताला मोटकर्याला सावली
हात जोडीतें तुला विहिरीबाई सवंदरी
सांबाळ ग माज चारी बैल मोटकरी
हात जोडीतें मी रातबाई ग तुला
हावशा म माज्याला झाला उशीर यायला
शेतीचें काम करणार्या आपल्या नवर्याला उशीर झाला म्हणून त्याला घरीं सुखरूप येण्यासाठी रात्रीला बायकोनें केलेली ही प्रार्थना आणि फार वेळ मोट हाणणार्या नवर्याला सांभाळ म्हणून तिनेंच विहिरीला व मोटेच्या सवंदराला जोडलेले हात या कल्पना विशेष ह्रदयस्पर्थी आहेत . त्याचप्रमाणें विहिरीवरील बाभळ आपल्या नवर्याला सावली देत आहे , म्हणून बायकोला होणारा या गीतांतील आनंदहि मोठा बहारीचा आहे . सामान्य स्त्रीनें घेतलेली नवर्याची ही काळजी भोळीभाबडी असली , तरी चित्ताकर्षक आहे यांत शंका नाही .
वाटच्या वाटसरा नको करूंस उभा घोडा
कांत माजा जंगलांत मोजी वाघीणीच्या दाढा
या ओवीनें बायकोला वाटणारा नवर्याचा धाक दाखविला आहे . आपल्या बायकोनें इतर कुणाशी बातचीत करतां कामा नये म्हणून राग पाखडणार्या नवर्याची ही तर्हा आहे ! वाघिणीशी झुंज खेळण्याचें सामर्थ्य अंगीं बाळगणार्या नवर्याशीं गाठ आहे , तेव्हां तूं आपल्या आल्या मार्गाने चालूं लाग , अशी विनवणी इथें सासुरवाशीण ओळखीच्या माणसाला करीत आहे .
दळण दळीतें लोखंडाच्या बोटांनीं
वेखंडाची घुटी मला दिली बयानीं
सासुरवास करणार्या नवर्याचा जाच किती होतो आहे याची कल्पना या ओवीनें दिली आहे ! आईनें जणुं वेखंढाची घूटी बाळपणीं दिली त्यामुळेंच माझीं बोटें लोखंडाचीं होऊन दळण दळीत आहेत , अशी ही काळजाला जाऊन भिडणारी भावना आहे !
वाट मी किती पाहूं गांवा गेलेल्या सजनाची
येळ झालीय भोजनाची
वाट मी किती पाहूं गांवा गेलेल्या वकीलाची
चित्रं कोम्यालीं बंगल्याची
वाट मी किती पाहूं गांवा गेलेल्या रंगेलाची
पानं सुकलीं रतीबाची
गांवाला गेलेल्या पतीची वाट पहाणारी ही बायको मनाला वाटणारी हुरहूर इथें मोठ्या युक्तीनें बोलून दाखवीत आहे . उघड उघड असें काहीं बोलून न दाखवितांना रतिबाची पानें सुकली आहेत , जेवायची वेळ झाली आहे आणि घरांतील सजीव व निर्जीव अशीं दोन्हींहि चित्रें कोमेजून गेलीं आहेत , अशी ती इथें भाषा करीत असल्यानें या भावनेस विशेष गोडी आलेली आहे .
वार्यानं हालती ग पानमळ्याची शेवरी
दिष्ट नि झाली म्हनूं माज्या कुंकवाच्या चिरी
लिंबलोन करीती ग सासूबाईची पैल निरी
जतान कर देवा माजी कुंकवाची चिरी
दिष्ट नि झाली म्हनूं अंगनीं पाय धुतां
हावशा माज्या कांता गोर्या बा रजपुता
नवर्याला दृष्ट झाल्याची बातमी पानमळ्याच्या हालत्या शेवरीनें बायकोला दिली असल्याची या गीतांतील कल्पना मोठी ह्रदयंगम आणि विचारवंताला विचार करायला लावणारी आहे . तसेंच नवरा राजपुत्राप्रमाणें गोरा आहे म्हणून त्याला दृष्ट होतांच सासूबाई लिबलोण करीत आपल्या बाळाचें रक्षण करून आपल्या कुंकवाला दीर्घायुष्य चिंतीत आहे , ही या ठिकाणीं आलेली भावनाहि ह्रदयस्पर्थी आहे .
आहेव मरन मला द्यावं पारवती
चवघे माझे बंधु खांदे माझे घरगुती
आहेव मरन किती सयांनो ग मौज
पुढं चाले कंत मागं गोताची ग फौज
आहेव मरन जन म्हनती भलं भलं
हावशा भरतार फूलं उडवीत गेल
आहेव मेली नार चला तिच्या घरी जाऊं
तिच्या ग करंडीचं कुंकूं कपाळीं लेवूं
नवरा जिवंत असतांना येणारें मरण मोठें सुखाचें असते , या कल्पनेनें भारून गेलेल्या सामान्य स्त्रीनें याचि देहीं याचि डोळां पाहिलेलें आपलें मरण या गीतांत आलेलें आहे . सौभाग्याची ही थोरवी सामान्य स्त्रीच्या दृष्टीचें विलक्षण सौंदर्यशाली आहे यांत शंका नाही !
गोड भरताराचं सुक सये सांगतां येतां जातां
भर दिवसां डोलला ग बाई सूख्या पाणी पितां
रागालोभानें भरलेलें हें प्रेमळ नवर्याचें सुख बोलून दाखवीत असतांना मनाला केवढा विरंगुळा मिळाला आणि वेळेचें कसें भान राहिलें नाहीं , याची मोठी सुंदर हकीकत या गीतानें सांगितलेली आहे .
थोरलं माजं घर हडीगल्लास लोंबत्याती
सासूबाईचं बाळराज धनी वाड्याला सोबत्याती
माडीवरी ग माडी चढली सासर मामाजीची
उभी राहून बघतें लंका तिथून माहेराची
आपल्या घरच्या वैभवाला साजणार्या नवर्याचें हें कौतुक आणी या घरांतून दिसणारें माहेरचें वैभव या दोन्हीहि भावना या गीतांतून मोठ्या दिलखुलास पद्धतीनें व्यक्त झालेल्या आहेत . सासरीं भरपूर वैभव नांदत असलें आणि नवराहि त्या वैभवाला लाजवील एवढा चांगला असला , तरी माहेरची झोपडी देखील रावणाच्या लंकेप्रमाणें दिसतें आहे , ही इथें प्रकट झालेली सासुरवाशिणीच्या मनांतील भावना विशेष लोकप्रिय झालेली आहे . हा स्त्री स्वभावाचा एक सहजसुंदर आणि मनोरम असा मंगल आविष्कार आहे यांत शंका नाहीं .
सामान्य स्त्रीनें आपल्या नवर्याच्या केलेल्या पारखीपैकीं कांही पैलू असे आहेत . त्यांचें तेज विविध प्रकारांनी नटलें आहे . 'चुडा ' म्हणून नवर्याचा उल्लेख करून वाटणार्या स्त्रीसुलभ लाजेनें या गीतांचें अंतरंग विशेष सजविले असल्यानें त्यांची गोडी अवीट आहे असें म्हणावयास हरकत नाही .
शेतीवाडी
खेडोपाडींच्या बहुतेक सर्व लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत असतो . त्यामुळें शेती करणार्या कुटुंबातील सर्व माणसें शेताला एखाद्या देवाप्रमाणें मानून त्याची उगानिगा करीत असतात . उभें जीवनच शेत पिकवून मिळेल त्यावर भागवावयाचें असल्यानें , रात्रंदिवस त्यांच्या मनांत शेताचाच विचार प्रामुख्यानें घोळत असल्यास नवल नाहीं .
ह्या शेतकरी मंडळींचे मुख्यतः दोन प्रकार आहेत . एक स्वतःची शेती असून ती घरीं कसणार्या मंडळींचा आणि दुसरा म्हणजे लोकांच्या शेतावर मजुरी वा रोजगार करणार्या मंडळींचा . परंतु ह्या दोन्ही प्रकारांतील मंडळी आपल्याला शेतकरी म्हणूनच अभिमानानें संबोधितात .
अशा शेतकरी घरांमधील शेतीविषयक कल्पनेचा आविष्कार त्या घरच्या आया बहिणींनीं कसा केला आहे हें पहाण्यासारखें आहे .
गांवा शेजारीं गावंदर शिवशेजारी पानमळा
पित्या माज्या दौलताची सदा कुनब्याची तारंबळा
या गीतानें वडिलांचे शेत कुठें आहे त्याची माहिती दिली असून , गांवजवळ शेत असूनहि सदोदित त्या शेताच्या कामानिमित्तानें त्यांची तारांबळ उडालेली आते , असेंहि सांगितलें आहे .
शेता नि शिवारांत कोन पिवळ्या बनातीचा
सावळा बंदुराया धनी चावर जमीनीचा
वाटवरी ग मळा आल्या गेल्याचा घोलाना
बंधु माजा कुनबी बाई भीडचा बोलना
वाटवरी मळा काट्या लावूनी केला बंद
अभंड त्येची नार काय करील भाऊबंद
शिवचं एवढं शात बाई अंब्यानं येती सोबा
सावळा बंदुराजा चंद्र बांदाव हाई उबा
चावरभर म्हणजे १२० बिघे जमीनीचा मालक असलेला आपला भाऊ त्याच्या अंगातील पिवळसर लोकरी कापडाच्या (बनातीच्या ) कपड्यावर आपण ओळखूं शकलों , अशी माहिती या गीतांत एक बहिण देत आहे . खेरीज तिनें त्या भावाबद्दल असेंहि सांगितलें आहे कीं , हें शेत -हा मळा -रस्त्यावरच असल्यानें अनेकांचें तिथें येणें जाणें होतें आहे . परंतु हा भाऊ भीड चेपूं शकत नसल्यानें शेतावाडीचें नुकसान होत असल्याचा ती इषारा देते आहे ! या शिवाय ती असेंहि सांगतेय कीं , भावजयीनें वाईटपणा पत्करून व भाऊबंदांकडून बोलून घेऊनहि कांट्या लावून मळ्याचा बंदोबस्त केला ! तथापि बांधावरील अंब्याच्या सावलींत भाऊ उभा असल्यानें आल्या गेलयला चंद्रासारखें त्याचें दर्शन घडतें आहे , याचाहि ती अभिमानानें उल्लेख करीत आहे .
तशी ही अगदीं साधीच गोष्ट आहे , परंतु मोठ्या कौशल्यानें या गीतांनीं तिची गुंफण केल्यानें या भावनेला विशेष गोडी आलेली आहे .
बैलामंदीं बैल बैल मथुर्या दूध पेला
शेला घालूनि शेतां नेला त्येनं खंडीचा पेरा केला
बैलामंदी बैल बैल सरदार्या दूध पेला
बैल येशींत डिरकला धनी मनांत हारखला
शिवच्या शेतामंदीं उच्च मांडव कुनायाचा
नटव्या बंदुजीनं बैल बांधीला पांचशाचा
शेतीसाठीं जिवापाड मेहनत देणार्या बैलांच्याबद्दल शेतकर्याच्या मनांत विलक्षण हौस नांदत असते . स्वतःच्या मुलाप्रमाणें त्याचा लळा बैलांना लागलेला असतो . बैलांना सोडून शेतकरी कधींहि जेवत नाहीं ! एवढेंच नव्हें तर स्वतः जेवण्यापूर्वी बैलांचें वैरणपाणी तो अगोदर पहातो आणि मग स्वतः जेवतो . तेव्हा अशा हौशी मालकानें बैलांचें कसे कौतुक केलें व स्वतःची हौस कशी भागवून घेतली त्याची माहिती हीं गीतें देत आहेत .
बैलांना हौसेनें दूध पाजणें , त्यांच्या अंगावर शेला घालणें , त्यानें केलेल्या कामाचा अभिमानानें उल्लेख करणें , त्यांना चांगल्या नावानें हांक मारणें , त्यांच्यासाठीं मांडव घालणें , त्यांचा आवाज (डरकाळी ) ऐकून आनंदित होणें इत्यादि प्रकरची हौस इथें मोठ्या सुंदर रीतीनें प्रकट झालेली आहे . शेतकर्याला होणारा हा आनंद मोठा दृष्ट लागावा असाच आहे !
दुरून वळकीती तुज्या गाडीची चक्कयीरं
बैल न्हवत पाकयीरं
दुरून वळकीती तुज्या गाडीची धुम्मायीळ
बैल गाडीची संबायीळ
दुरून वळकीती तुज्या बैलांची मी जोडी
तट्ट्या गाडीला नागमोडी
दुरून वळकीती तुज्या गाडीचीं काळीं खोंडं
त्येंला लावीली सरकी पेंड
दुरून वळकीती तुज्या गाडीची खडाखड
फुल्या पालक नांवं दंडं (शोभे )
लांबून धांवत येणार्या बैलांच्या चाहुलीवरून तीं कुणाचीं आहेत आणि त्यांचे अंगीं कोंणते गुण आहेत , याची पारख करणारी बहीण इथें भावाशीं हितगूज करते आहे . पांखराप्रमाणें वेगांत धांवणारे बैल आणि त्यांची विलक्षण धांवाधांव बघून इथें बहीण भावाला इषारा देऊन त्यांना सांभाळ म्हणते आहे . हेतु एवढाच कीं , बैल कदाचित् असेच उधळतील आणि आटोक्यांत न आले तर भावाला इजा होईल , अपघात होईल तेव्हां तो टळावा !
या गीतामध्यें सरकी व पेंड खाणार्या बैलांच्या काळ्या रंगावरून , गाडीच्या नागमोडी तट्ट्यावरून आणि फुल्या व पालक या नांवांच्या पुकारावरून भावाचीच गाडी येत असल्याची खूणगांठ बहिण मनामध्यें बांधीत असल्याची मोठी चित्तवेधक हकीकत आली आहे .
सामान्य स्त्रीमनानें केलेले हे रोजच्या जीवनांतील अचूक अंदाज सुशिक्षित मनाला हेवा वाटावा एवढे देखणे आहेत .
मारक्या बैलाला ग बाई भेतंया सारं गाव
धन्या लाडक्या दावं लाव
मारक्या बैलाला ग चाळ साकळ्या काळं कंडं
चेंडू चितार्या नांव दंडं
मारक्या बैलानं ग बाई शिवारीं केला दंगा
धनी गांवाला गेला सांगा
एखादा शेतकरी बैलांची पारख करण्यांत एवढा हुषारी मानतो कीं , मारका बैल देखणा असतो म्हणूनच त्याला खरेदी करून दावणीची शोभा वाढवावची ! वास्तविक बैल मारका असला म्हणजे फार पंचाईत होते . खुद्द धन्याचीच तो केव्हां आंतडीं बाहेर काढील नेम नसतो ! तरी पण न भितां अशा बैलाचा धनी होण्याचा त्याचा अभिमान मोठा आगळा असतो ! अशाच एका धन्याची व त्याच्या हौसेची माहिती या गीतांनीं सांगितली आहे .
सार्या गांवाला भीति वाटणारा बैल तुला वश झालेला असला , तरी त्याला दावें लावून आवरण्याचा इषारा इथें देण्यांत आलेला आहे . त्याचप्रमाणें काळीं कंडं (दावीं ), चाळ आनि साखळ्यांनीं नटवलेल्या बैलांच्या चेंडू व चितार्या या नांवांचेंहि इथें कौतुक केलेलें आहे .
बैल कितीहि मारका असला तरी सहवासानें तो धन्याचा लाडका होतो . तो म्हणेल तें तो ऐकतो . पण त्याच्या आपरोक्ष मात्र कुणाचीहि मात्रा त्याच्या जवळ चालत नाही ! या गीतानें अशाच एका प्रसंगाचें वर्णन केलें आहे . शेतामध्यें धुमाकूळ घातलेल्या बैलाला आवरायला कुणीं इथें नाहीं . त्याचा धनी गांवाला गेला आहे . तेव्हां त्याच्या वाटेला कुणी जाऊं नये , असा इषारा या ठिकाणीं दिलेला असून त्याचा आविष्कारहि चटकदार झालेला आहे .
ज्येष्ठ ग महिन्यांत ईज झालीया कावयीरी
बंदु राजाच्या हातांत ग कुरी झालीया नवयीरी
ज्येष्ठांतील पाऊस सुरू झाला आणि पेरणीला योग्य एवढी जमिनीला घात आली , म्हणजे मग खरिपाच्या पिकांची पेरणी सुरू होते . आभाळांत वीज कावरीबावरी होऊन नंगानाच करीत आहे अशा वेळीं कुरी (पाभर ) भावाच्या हातांत नवरी होऊन उभी असल्याचा हा मनोहर देखावा आहे . सामान्य स्त्रीच्या कल्पनेचा हा विलास खरोखरच चित्तवेधक असून विचारी मनाला भुरळ पाडणारा आहे .
वळवाचा पाऊस ग फळीं धरूनी उठयीला
ताईता बंदु राज बाळ कुनब्याचा नटयीला
वळवाच्या पावसाच बाई झाल्याती आगार
बाळराजाच्या शेतामंदीं सोडी पान्याच सागर
वळवाच्या पावसाचं पाणी अंगनीं सांठलं
कुरी धराया उठलं बाळ कुनब्याचं नटल
वळवाच्या पावसाचें हें वर्णन आहे . आभाळांत चिक्कार ढग जमा झाले असून आतां आपल्या बाळाच्या शेतांत पाण्याचा सागर निर्माण करूं देत , अशी भोळ्या भाबड्या आईनें व्यक्त केलेली ही इच्छा आहे . यावेळीं ती आणखी म्हणते आहे कीं , अंगणात वळवाचा पाऊस आल्यानें प्रेरणीसाठीं जायला म्हणून आनंदानें माझा शेतकर्याचा बाळ उठला आहे व त्यानें हातांत कुरी घेतली आहे .
शेतकरी आईनें आपल्या परीनें केलेलें हें पावसाचें आणि मुलाचें वर्णन मोठें आकर्षक झालें आहे यांत शंका नाहीं .
शेताला गेली कुरी आडवी लागली माजी निरी
ताईता बंदू माज्या तुमची पिकूं द्या शेतसरी
शेताला गेली कुरी ताशीं लावूनी उबी केली
लाडक्या बाळायांनीं बैलबाबाला हांक दिली
शेताला गेली कुरी बैलाला म्हनी बाबा
नटव्या बंदुजीच्या पैल्या तासाला देव उबा
शेताला गेली कुरी शेत काजबीळाची वडी
माज्या ग बाळायाची बारा बैलांची हाई जोडी
शेताला गेली कुरी बीं नेलंया उडीदाचं
माजा ग बाळरज पेरं पेरीतो मिरगाचं
मृग नक्षत्रामधील पेरणीचा थाट या गीतांनी चित्रित केलेला आहे . सुरवातीला इथें माहेरच्या कुरीला -भावाला -सामोरीं येऊन त्यास भरपूर पीकपाणी लाभूं दे असा आशीर्वाद देणारी बहीण आलेली आहे . सासरीं गेल्यानंतरहि माहेरचें भलें व्हावें म्हणून धडपडणार्या बहिणीच्या मनाचा हा मंगल आविष्कार आहे !
पेरणी करीत असतांना मध्येंच जर थांबावें लागलें तर त्या थांबण्यात कुरी 'तासाला ' उभी केली असें म्हणतात . या गीतामध्यें एक वेळ बैलाच्या निमित्तानें व एक वेळ देवाचा साक्षात्कार घडल्यानें कुरी उभी राहिल्याचा उल्लेख आलेला आहे ! कदाचित अशा वेळीं शेतकर्यांना बैलामध्येंहि देवाचें दर्शन घडत असावें व त्याच अनुषंगानें या गीताची रचनाहि झाली असावी .
या गीतामध्यें शेताला काजळाच्या वडीची उपमा दिलेली आहे ! काळ्याशार नि मऊ शेताबद्दलचा हा अभिमान असून बारा बैलांनीं तिची मशागत होत असल्याचेंहि इथें सांगितलेलें आहे . आपलें शेत कशा प्रकारचें आहे हे सांगण्याची ही पद्धति मोठी सुरेख आहे यांत शंका नाहीं .
पेरणील जातेवेळीं कशाचें बीं नेलें आणि पेरणी केव्हां झाली याचाहि या गीतामध्यें उल्लेख आला असून मृगामधील पेरणीचा हा हंगाम असल्याचें सांगितलें आहे . इथें उडदाच्या बियाण्याऐवजीं इतर कोणतेंहि बियाणें घातलें तरी चालतें .
शेताला गेली कुरी आडवा आलाय ग मांग
सावळ्या बंदुराजा त्येला हरीचा दे मान
या गीतानें एका फार मोठ्या सामाजिक समजुतीचा उल्लेख केलेला आहे . पेरणीला जात असतां वाटेमध्यें जर मांग जातीचा मनुष्य आला तर फार शुभ मानतात . एवढेंच नव्हें तर गीतामध्यें त्याहि पलीकडे जाऊन असें म्हटलें आहे कीं , त्या माणसाला देवाप्रमाणें मान द्यावा !
आजच्या काळामध्यें अस्पृश्य जमातीला 'हरीजन ' म्हणून जे नामाभिधान दिलें गेलें आहे त्याचाच हा जुन्या काळचा अवशेश असावा !
शिवच्या शेतामंदी उभ राहिलं बापल्याक
बंदु हावशा बोलत्यात काय पेरनी झाली झाक
शिवच्या शेतामंदीं दिवट्या बायाचं हिलायार
बंदुराच्याच्या माज्या ग हाई मळ्यांत गुरायाळ
नागिनी पद्मीनी वाट निराळी पुसयीर
बंदुला माज्या बाई शेतीं झालाया उशीयीर
बैल सरज्या माजा टाकी डिरकी शेतामंदी
बाळराजा माजा हाई सावध छपरामंदीं
इथें बापलेकांनीं कष्ट घेऊन केलेली पेरणी फार सुंदर झाल्याची खूण म्हणून फोफावून वर आलेल्या पिकांत ते दोघे उभे असल्याची माहिती आलेली आहे . तसेंच ते उभे असलेलें शेत शिवेवरील असून त्याच शेताच्या एका भागांत गुर्हाळ असल्याची माहिती त्याठिकाणीं लावलेल्या अनेक दिवट्यांच्या उजेडावरून लक्षांत येत आहे .
शेतांतील बैल डिरकाळ्या फोडीत असलेला बघून इथें त्या शेतकर्याची आई बैलांना सांगते आहे कीं , माझा बाळ छपरामध्यें झोपला असला तरी त्याची झोप सावध आहे .
या गीतांमध्यें एक विशेष गोष्ट आली आहे ती अशी कीं , एक बहीण शेतावरून उशिरां येणारा भाऊ सुखरूप यावा आणि त्याला कांहीं इजा वा दुखापत होऊंनये म्हणून सापांना (नागिणी पद्मिणींना ) प्रेमाचा इषारा देते आहे ! तिचें सापांना व नागांना म्हणणें असें कीं , त्यांनी भावाची वाट लक्षांत घेऊन आपली वाट वेगळी धरावी ! याच प्रकारची आणखी एक ओवी अशी सांपडते -
नागिनी पद्मीनी नग पडूंसा वाटंतिटं
सावळ्या बंधुजीची न्हाई सक्याची चाल नीट
इथेंहि भावार्थ तोच आहे . पण बोलण्याची तर्हा निराळी आहे तितकेंच काय तें !
दोन बैल कुरीयीला खोंडं जुपली कुळवाला
नटव्या बंदु माजा कुनबी गांवांत वळकला
बारा बैलांचा कुनबी बाई मोटा त्यो भेडदार
माज्या ग बाळायाचा बाई रेशमी पाडसार
बारा बैलांच नांगूर कुंद्याच्या ग पडीवरी
पित्या माज्या दौलताचा बारा म्हईन घरचा गडी
बारा बैलांचा कुनबी बाई दिसतो येडसारू
लाडके भैनाबाई घरीं रेशमी पाडसारूं
बारा बैलांचा कुनबी बाई गांवांत मातला
सोन्याचा ग फाळ बाई नांगरीं घातला
बारा बैलांचा कुनबी दिसतू ग मालबळी (बळीराजा )
माज्या ग बाळायाची फास सोन्याची जानवळी
बारा बैलांचा नांगरु त्यांत आगल्या हाई शाना
घेतो बिगाचा कडूकोना
बारा बैलांची दावण घरांत असलेल्या शेतकर्याच्या कामगिरीचें हें वर्णन आहे . दिसायला वेडसर आणि भिडस्त म्हणून अशा शेतकर्याचा नांवलौकिक असला तरी इथें त्याची कामगिरी औताच्या रेशमी दोर्या करण्याएवढी मोठी दाखविलेली आहे ! त्याचप्रमाणें त्यानें सोन्याचा फाळ नांगराला लावण्याइतपत धनसंपत्ति कमावली असेंहि इथें आवर्जून सांगितलेलें आहे ; आणि या सर्वाला कारण म्हणून शेवटून दुसर्या जोडीच्या शिवाळावर बसून नांगर हाकणार्या आगल्याला गौरविला आहे हें विशेष होय !
शेतकर्याच्या घरचें आणि त्याच्या कर्तबगारीचें हें वैभव मोठें अभिनव तसेंच आकर्षकहि आहे , असें म्हणावयास हरकत वाटूं नये , एवढा हा भावनाविष्कार सुंदर साधलेला आहे .
पीकलं पीकपाणी राशी लागल्या वावयीडीं
पित्या माज्या दौलतचं कुनीं कळवीलं चावयीडीं
पीकलं पीक पाणी गाड्या येत्यात्या धुम्मयीत
सावळ्या बंधुजीची बापलेकाची उम्मयीत
गाड्या बी मागं गाड्या बाई आल्यात्या अंगनीं
पिता माजा दवलत घेतो पेवाच्या बांधनीं
आकाड सरावनीं कुनीं वावडी लावियीली
पित्या माज्या दौलतानं जुन्या जुंदळ्या धार दिली
गहूं हरबर्याच्या गाड्या बाई येशींत थटल्या
सावळ्या बंधुजीनं दंडभुजांनीं रेटील्या
वाटवरली ग हीर चाकं करीती भिरीभिरीं
नटवा माजा बंदु मनमोहन मोटवरी
बारा बैत्यांची तुज्या बाई धाववैनं वाटू
लाडक्या बाळराजा मोटकर्याला हूती दिष्टू
मोट नि मोटकरी बंधु पानक्या बोलयीना
लाडके भैनाबाई पाणी जमीनी तोलयीना
जुंदळ्याच्या गाड्या बाई येऊद्या घराकडं
घरच्या पंडिताची वड त्येची ग पेवाकडं
पिकलं म्हणूनी जन बोलीती येशीमंदी
घरच्या पंडिताचा तिवडा बुडाला राशीमंदी
पिकलं म्हणूनी जन बोलीतां राहीना
घरच्या पंडिताचा गल्ला हंबारीं माईना
शेतीच्या मावल्या कुनीं पुजील्या थंडवानी
सावळ्या बंदुजीची सीमा सांडली जुंदळ्यांनी
सुगीसराईनंतर भरपूर पीकपाणी आलेल्या घरचें हें वर्णन आहे . कष्टाळू माणसाच्या कामाला मिळालेलें फळ या गीतांनीं मोठ्या ह्रदयंगम रीतीनें चित्रीत केलेलें आहे .
नवीन आलेलें धान्य घेऊन येणार्या गाड्या बापलेकांची उमेद दाखवीत आहेत . मळणीसाठीं रोवलेला खळ्यामधील खांब (तिवडा ) बुडून जाईपर्यंत अगर वावडी ओलांडून जाईल एवढी रास उभी राहील इतकें धान्य आलें असतं , चावडिवर ती बातमी जाते आहे , अंगणांतील धान्यचीं पोतीं पेवांत ओतलीं जात आहेत , दंडांचा आधार देऊन पोती उतरलीं जात आहेत , आलेला पैसा अंबारींतहि मावेनसा झाला आहे , म्हणजे धान्य ठेवण्यासाठीं भिंतींत केलेली जागाहि पैशाला अपुरी होत आहे , अशी सविस्तर माहिति नव्यानें आलेलय पिकबाबत इथें आली आहे . त्याचप्रमाणें एवढें भरपूर धान्य आलें , तेव्हां शेतीच्या देवीची पूजा एवढी मन लावून कोणीं केली असावी , याचाहि समाधानानें इथें विचार झालेला आहे .
आषाढ आणि श्रावण हे पावसाचे महिने . परंतु या दिवसांतहि वडील पाऊस नसेल तेव्हां जुने जोंधळे वाडवीत आहेत , अशी या ठिकाणीं माहिती आलेली आहे . यावरून असें लक्षात येतें की , गेल्यासालचें धान्य वर्षभर पुरूनहि उरेल एवढें भरपूर प्रमाणात घरीं ठेवण्याची चाल जुन्याकाळीं सर्वत्र होती .
या गीतामध्यें मोटेचा उल्लेख मोठा सुंदर आला आहे . हें सगळें अमाप पीकपाणी घरीं यायला विहिरीचाहि उपयोग फार झाला , असें नकळत इथें सुचविलेलें दिसतें . जमिनीला झेपेनासें व्हावें एवढें पाणी मोटेने काढणार्या भावाला , धावेवर असलेल्या रस्त्यानें जाणायेणार्या बैत्याबलुत्यांची दृष्ट लागेल , अशी भीति या गीतांत व्यक्त झाली आहे ! भावाच्या अबोल स्वभावाचाहि इथें उल्लेख आला असून , त्याच्या अविस्मरणीय कामाची पारख त्याला मनमोहन कृष्ण म्हणत केलेली दिसते !
नव्या वर्षी आलेल्या धान्याची साध्या भोळ्या शेतकरी बाईनें सांगितलेली ही माहिती विशेष उल्लेखनीय असून तिच्या वर्णनशैलीचें व कल्पनाशक्तीचें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे , असें म्हणण्याचा मोह इथें अनावर होतो !
जेवनाची ग पाटी धयादुधाची लोटकीं
सून बयाची धाकटी
जेवनाची ग पाटी भावज गुजरी आला घाम
बंधु शिवचीं शेतं लांब
जेवनाची ग पाटी बाई उतरीतें मदल्या बांदा
हांक मारीतें गोर्या चांदा
जेवनाची ग पाटी सारी मदर मळ्याकडं
धनी लाडका बैलापुढं
जेवनाची ग पाटी डुईला आला कडू
येळ टळली औत सोडूं
शेतावर जाणार्या घरच्या माणसांना दुपारचें जेवण बायका शेतावर घेऊन जात असतात . त्या प्रसंगाचें हें वर्णन आहे . या गीतामध्यें डोक्याला कढ येईपर्यंत शेत लांब असल्याची माहिती आली असून एवढ्या लांब इतर पदार्थांच्या बरोबर दही व दूध घेतलेली लोटकीं (मातीची भांडीं ) भरून नेल्याचेंहि इथें सांगितलेलें आहे . त्याचप्रमाणें वेळ टळून गेल्यानें आपल्या नवर्यानें आतां औत सोडावें , असें त्याचें जेवण घेऊन मळ्याकडे येणार्या कारभारणीराला वाटत असल्याचीहि माहिती इथें आलेली आहे .
पाटच्या पार्यामंदीं हांक मारीतो पैरकरी
लाडक्या बाळीशाची बैल इरसरीला हाईत घरीं
या ओवीमध्यें सहकार्यानें शेती करण्याच्या पद्धतीस 'पैरा ' या नावानें संबोधिलें असून त्या पद्धतीला पाठिंबा दिलेला आहे . एकमेकांच्या मदतीनें एकमेकांचे शेतीचें काम करण्यानें एकप्रकारची ईर्षा निर्माण होत असल्याचें इथें सूचित झालेलें आहे . पहाटेच्या वेळीं पैरकरी आपल्या बाळाला हांक देत असून त्याला आपल्या घरच्या ईर्षेबाज बैलाच्या जिवावर तो आनंदानें होकार देत असल्याचा हा चित्तवेधक प्रसंग आहे . एकमेकांवर ईर्षा करणारे बैल आणि त्याचा धनी घरीं असणें ही शेतकर्याच्या भाग्याची गोष्ट मानली जाते .
बारा बैलांचा नांगरू माजा आगल्या रुसला
झाला न्हारीला उशीरू बैल सोडूनी बसला
न्याहारीसाठीं वेळेवर भाकर न मिळाल्याकारणानें नांगरावरचा आगलीवर जाणारा मुलगा रुसून बसला आणि त्यानें नांगराचे बैल सोडून दिले , असा हा गमतीदार प्रसंग आहे . इथें आलेल्य 'नांगरू ' व 'उशीरू ' या शब्दावरून ज्ञानदेवकालीन भाषेचा सुगावा सापडतों व या ओवीचें (इतर आलेल्या मागील कांहीं ओव्याप्रमाणे ) जुनेपणहि लक्षांत येतें .
शिवच्या शेतामंदीं आकड्या बाईंनीं केली मात
बोलत भाऊ भाऊ घाली बुचाड लवनांत
सुगीसराई आटोपल्यानंतर भाऊ भाऊ मोठ्या आनंदानें गप्पा गोष्टी करीत , कणसांच्या भारानें वांकलेल्या ताटाचीं बुचाडें लवणांत रचीत असल्याची हकीकत या गीतानें सांगितली आहे .
सोन्याची अंगठी बाई कशानं झिजयिली
पित्या माज्या दौलतांनीं रास गव्हाची मोजीयिली
नव्या वर्षी आलेलें धान्य मापानें मोजतां मोजतां हातांतील सोन्याची अंगठी झिजून गेल्याची मोठी अभिमानास्पद माहिती या गीतांत आलेली आहे ! अंगठी झिजली असें सांगतांनाच इथें वडिलांचें घर भराभराटीला आलें नि माहेरीं सुखासमाधानाचे दिवस आले , हें मोठ्या अभिमानानें सांगितलेलें आहे .
शेतकरी जीवनाचे असे विविध पैलू दर्शविणार्या आणखी कितीक ओव्या सांपडणें शक्य आहे . परंतु मला ज्या मिळाल्या त्यांचा दिमाख हा असा आहे . खरें शेतकरी जीवन पारखून घेण्यासाठीं या गीतांचा आरशाप्रमाणें उपयोग होईल याची मला खात्री वाटते .