स्त्रीधन - कृष्णा कोयना
लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
जुन्या महाबळेश्वरामध्यें उगम पावून सातारा, कोल्हापूर, बेळगांव, इ. जिल्ह्यांना पावन करीत मच्छलीपट्टणजवळ जाऊन समुद्राला मिळालेली कृष्णा नदी म्हणजे भाविक हिंदुमनाची एक आवडती देवता आहे. भारतामध्यें गंगा नदीला जेवढें महत्त्व तेवढेंच दक्षिण महाराष्ट्राला कृष्णेचें वेड आहे. एखाद्या देवतेप्रमाणे मराठी मन कृष्णेची पूजा करीत असतें. तिच्या सान्निध्यामध्यें सर्व देवतांना प्रसन्न करतां यावें तिच्या स्नानानें स्वतःचा देह पावन करून सोडावा, तिच्या सहवासांत शेतसराई भरघोस पीक देणारी व्हावी आणि तिला नारळ अर्पण केला असतांना सर्व चांगले तेवढें आपणाकडे यावें, या भावनेनेंच मराठी मन कृष्णेची पूजा करीत असतें.
आमच्या सामान्य स्त्रियांनीं ह्या कृष्णेची व उत्तर सातार्यांतील कराडजवळ तिला येऊन मिळणार्या कोयनेची कल्पना आपल्या ओव्यांमधून अशी रंगविलेली आहे-
भरली किष्णा कोयना कोयना हातोडी खडा फोडी
बंदु दंडानं पाणी तोडी
भरली किष्णा कोयना बेटं मुजलीं कंजाळाची
धाव पडली सांगाड्याची
भरली किष्णा कोयना किष्णा आलीया वाईदेशीं
कोयना आलीया कोकनाशीं
भरली किष्णा कोयना दोगींच्या झाल्या भेटी
सैदापूराच्या पैलतटी
भरली किष्णा कोयना पाणी चढलं गुमानीत
बुडलीं शिकरं तासांत
कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या प्रवासांतील मुलुखाची आणि त्यांना पूर आला असतांना होणार्या हालचालीची माहिती इथें आलेली आहे.
कोयनेचें पाणी दोन्ही बाजूंचा कडा फोडीत चढलें असतांना भाऊ पोहायला निघाला आहे, कृष्णाकोयनेच्या पुरानें भोंवतालचीं झाडेंझुडें आणि वनस्पति बुडून गेल्या आहेत अशावेळीं सांगाड्यांनीं आपल्या भोपळ्यांच्या सांगडी नदींत टाकल्या आहेत. दोघींचेहि पाई भरमसाट चढून कांठावरील किंवा पात्रांमधील देवळांची शिखरें त्यांच्या तासांत म्हणजे पात्रांत बुडाली आहेत आणि दोघींची भेट सैदापुराजवळ घडली आहे, अशी हि हकीकत आहे.
नदीला पूर आला असतांना आणि बेफाम वेगानें धावणारें तिचें पाणी नजरेंत भरलें असतांना सुचलेले हे विचार आहेत. या विचारसौंदर्याला कल्पनेंचीं फार मोठी भरारी लाभलेली नसली, तरी त्याच्याजवळ प्रामाणिकपणा मात्र भरपूर आहे.
किष्णाबाई बोल कोयना अवकाळ तुजं पाणी
दोघी जाऊंया शांतवानी
कोयनाबाई बोल किष्णा नळांत कां ग गेली
इंग्रज सायेबांनीं बळजबर त्येनीं केली
किष्णाबाई बोल नको इंग्रजा बांधूं पूल
खेड्याचा र्हानावाला जोड्यासकट पाय दील
किष्णाबाई बोल कोयना तपाची झाली राक
इंग्रज सरकारानीं मला नळांत नेली पाक
कृष्णा आणि कोयना या दोघीजणी एकमेकींशीं इथें हितगुज करीत आहेत, कोयनेचें पाणी अवखळ म्हणून संगमानंतर एकत्र व्हायचें तर शांतपणें जाऊंया असें कृष्णा तिला सांगते आहे आणि मग तें जणुं मान्य केलें असें गृहित धरूनच कोयना कृष्णेला विचारते आहे कीं, तुला इंग्रजांनीं बळजबरी करून नळांत कां बरें नेली ? आणि कृष्णा तिला सांगते आहे कीं, माझ्या तपाची राखरांगोळी करून मला नळामध्यें नेली आणि जणुं लोक माझ्या पायाशीं यायचे ती मीच त्यांच्या पायाशीं गेलें ! अलीकडच्या नव्या सुधारणेमुळें लोकांची सोय झाली, तरी नदीला काय वाटत असेल याची त्यांनींच केलेली ही कल्पना खरोखरच गमतीची आहे, यात शंका नाहीं.
या गीतामध्येंच कृष्णेनें इंग्रजाला पूल बांधतांना नकार दर्शवून दिलेला इषार मोठा मजेशीर आहे ! ती म्हणते कीं, माझ्या डोक्यावर जर पूल बांधला जाईल, तर खेड्यांतून येणारा माणूस मला बघून मान द्यावा म्हणून पायातील जोडा काढीत असे, तो आतां माझ्या डोक्यावर त्याच्यासह पाय देऊन खुशाल पुढें जाईल !
स्वतःच्याजवळ असलेल्या भाविक श्रद्धेला बळी पडून व्यक्त झालेली ही भावना मोठी अभिनव तशीच जुनी चालरीतहि दर्शविणारी आहे. वास्तविक पादत्राण पाण्याचा स्पर्श झाल्यानें भिजून खराब होईल हें एक व दुसरें म्हणजे सहजगतीनें नदीतून चालतां यावें म्हणून काढून घ्यावयाचें असतें. पण श्रद्धाळू मनाला ही भावना अधिक पटली आणि तिचा असा हा मनोहर आविष्कार झाला !
कृष्णा कोयनेवर रचलेल्या आणखी अशाच पुष्कळ ओव्या असतील. परंतु मला जेवढ्या गवसल्या त्यांचें रंगरूप हें असें आहे.
Last Updated : December 20, 2013
TOP