स्त्रीधन - देवादिकांचीं गाणीं

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

रोजच्या धकाधकीच्या मामल्यामधून थोडी सोडवणूक मिळावी, काबाडकष्टांतून फावला वेळ गवसावा, काळजीमधून मुक्तता व्हावी, केल्या कर्मांतून चांगले निघावें, मुलेंबाळें सुखांत रहावींत, आल्या संकटांमधून सहीसलामत सुटण्याचा मार्ग सांपडावा, घरीं आबादी आबाद नांदावी, पुण्य पदरांत पडावें आणि सर्व प्रकारची शांति मनाला लाभावी म्हणून माणूस देवाची पूजा करीत असतो. रोजच्या देवपूजेमुळें जणूं आपल्या बर्‍या वाईटाचा हवाला आपण देवावर सोडून मोकळें होतों हीच भावना ! विशेषतः सर्वसामान्य स्त्रियांची तर अशी श्रद्धा असते कीं, आपल्या सगळ्या कर्तबगारीचा आणि खुद्द आयुष्याचाहि देवच धनी आहे ! त्यामुळें देवादिकांची कर्तबगारी वर्णन करणारीं पोथीपुराणें ऐकण्याकडे त्यांच्या मनाचा विशेष कल झुकलेला आढळून येतो. कांहीं समजो अगर न समजो ऐकल्या गोष्टीमुळें आपलें चांगलें होणार, ही श्रद्धा त्यांना चिकटून राहिलेली असते. अशा वेळीं लक्षांत राहिलें असेल तें सारें आठवणींत जमा करून, भाविकतेनें मनांत घोळवावयाचें व त्याचा सुचेल तसा आविष्कार करावयाचा, अशा थाटानें त्या देवादिकांचीं गाणीं गात असतात. मग त्यांत अमूक एकच देव येईल असें नाही, तर ओळखीच्या सार्‍या देवांची मोजदाद एकत्र झालेली दिसेल !
पहिलि माझी ओवी            पहिला माझा नेम
तुळशी जवळी राम            पोथी वाची
दुसरी माझी ओवी            दुधाची भावना
लक्ष्मी नारायणा            विनंति माझी
तिसरी माझी ओवी            तिरकुटाच्या परी
ब्रह्मा विष्णूवरी            बेल पत्री
चवथी माझी ओवी            चवथीच्या चांदा
मोतीयाच्या भांगा            अंबाबाई
पांचवी माझी ओवी            पांची पांडवांसी
पूजा आरंभीसी            विठोबाची
इथें या पांच ओव्यांच्यामध्यें निरनिराळ्या देवांच्या जोडीलाच पूजेच्या साहित्याची जमवाजमव झालेली असून शेवटीं विठोबाच्या पूजेचा आरंभ दर्शविलेला आहे.
पैली माजी ववी            सुद्ध होऊं माजं काम
रोहिणीच्या पोटीं            आल्याती बळीराम
दुसरी माजी ववी            खीरसागर जगूजेठी
देव किष्ण आल            देवकीच्या पोटीं
तिसरी माजी ववी            द्वारकेच्या काना
आतां सोडवीला            देवकीचा बंदीखाना
चवथी माझी ववी            चारी चौक नमील
आतां गोकुळांत            बहु आनंद मांडील
पांचवी माजी ववी            देवा तुला दरशान
आतां उभारल्या            गुड्या पताका तोरनं
साव्वी माजी ववी            गातें पाकळुका
ववीला गातें मी            पंढरीचा पर्णसका
सातवी माजी ववी            सातवा अवतार
तुकाराम बोल            न्हाई फिरून संसार
आठवी माजी ववी            गाईली रामावरी
आतां गोकुळांत            झाली आनंदाची टाळी
नव्वी माझी ववी            गाईली रघुनाथा
विठ्ठलाची पूजा            आरंबांत आतां
धाव्वी माझी ववी            धाव्वा अवतार
घोड्यावरी स्वार            किष्ण होणार
आकरावी माझी ववी        आकरा खिमनी हनुमंत
सोन्याची पालकी            त्यांत जानकी रघुनाथ
बारावी माजी ववी            हरी गाईला पुरता
आंबारीचा हत्ती            चंद्रभागे वरता
ज्या परीनें ज्या देवाचा महिमा गातां येईल व गावासा वाटेल त्या परीनें तो इथें गायला गेलेला आहे. प्रत्येकाचें वेगळेंपण दाखविण्याचा इथें प्रयत्‍न झालेला असून तो सामान्य स्त्रियांच्या दृष्टीनें उल्लेखनीय आहे असें म्हणतां येईल. परंतु या ओव्यांचा कांहीं भाग सोडला तर कल्पनाशक्तीचें वैभव इथें फारसें दिसत नाहीं.
या ओव्यांच्या निमित्तानें जास्त करून पंढरीच्या विठोबाचें गुणगान अधिक झालेलें आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. कारण इथें विठोबाचा उल्लेख वारंवार आलेला आहे.
पहिली ग माझी ओवी        तेत्तीस कोटी देवा
सावळ्या बाळराजा            विटेवरल्या सदशीवा
दुसरी ग माझी ओवी        माता रुक्मिणीच्या चुड्या
जन्मला किष्ण देव            तुटल्या बंद-बेद्या
तिसरी माझी ओवी            त्रिभुवनीं करी राज्य
सावळा पांडुरंग            करी माजं कामकाज
चवथी माझी ओवी            चारी चौक भरुनी
जन्मले किष्ण देव            बहु आनंद करूनी
पांचवी माझी ओवी            पांची पांडवांला
गोकुळीच्या किष्णाला        द्रौपदीच्या बंधवाला
सहावी माझी ओवी            मंडप देतो शोभा
सावळा पांडुरंग            हरीकीर्तनाला उभा
सातवी माझी ओवी            रुक्मिणी सत्यभामा
हरीच्या रथामंदीं            सोळासस्त्र नारी जमा
आठवी माझी ओवी            करीतें मी लिंबलोण
सावळा पांडुरंग            गादीं बसले भगवान
नववी माझी ओवी            पंढरी ग पाठवा
लाडके भैनाबाई            विठू निजला उठवा
दहावी माझी ओवी            कोंबडा भांग देई
सावळा पांडुरंग            हरी चालला आंघोळी
पंढरीचा विठोबा आणि गोकुळाचा कृष्ण या दोघांच्या गुणगानाचा मोठा छानदार असा हा आविष्कार आहे. या ठिकाणीं देवादिकांना मानवी रूप देऊन आपल्या मनांतील कल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्‍न यशस्वीरीत्या केलेला आहे. विठ्ठलानें हरिकीर्तनाला उभें रहावयाचें व आंघोळीला जावयाचें या कल्पना वरील प्रयत्‍नाच्या निदर्शक म्हणून पहातां येतील
सर्व प्रकारच्या देवादिकांचे गुणगान गावयाच्या वरील प्रकारांचा विचार करतां असें प्रामुख्यानें दिसून येतें कीं, भगवान् श्रीकृष्ण आणि पंढरीचा विठ्ठल यांच्यावर अधिक भर दिलेला असून इतर देवांचा अनुषंगानें जमेल तेवढा उल्लेख आलेला आहे. सामान्य स्त्रिया ह्या साक्षर नसल्यानें व त्यामुळें धार्मिक ग्रंथांचें वाचन त्या करूं शकत नसल्यानें असें होणें शक्य आहे ! एरव्हीं कृष्ण आणि विठ्ठल यांच्यावरील निस्सीम भक्तीच्या जोडीला इतरांच्याकडे एवढें कमी लक्ष गेलें नसतें.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP