मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ५८ वा

काशीखंड - अध्याय ५८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ शिव असतां मंदराचळासी ॥ कैसी आज्ञा केली महाविष्णूसी ॥ काशीमार्ग
क्रमावया ॥१॥
शंकर म्हणे गा चक्रपाणी ॥ सर्व देव गेले आनंदवनीं ॥ तेथें सर्व गेले ते क्षेमा ॥ कैसे असती पाहावें ॥३॥
मग ज्ञानें पाहिलें शार्ङ्गधरें ॥ तंव कार्य साधिलें विघ्नहरें ॥ अष्टादश दिनीं लंबोदरें ॥ पाचारिलें विष्णूसी ॥४॥
ऐसा हरीनें देखिला ज्ञानोदय ॥ दिवोदास राजाचा अंतसमय ॥ तयाचे इच्छावृद्धीचा क्षय ॥ देखिला विष्णूनें ॥५॥
मग श्रीहरि वदे जी शंकरा ॥ पिनाकपाणी कर्पूरगौरा ॥ जी तूं प्रलयीं काशीपुरधरा ॥ त्रिशूळाग्रावरी ॥६॥
जे तुमचिया नामस्मरणेंकरून ॥ पंच महादोष होती दहन ॥ सिद्धि पावती महाकार्यकारण ॥ तपस्वियांचीं ॥७॥
मनीं स्मरतां शिवनामावळी ॥ ज्यांहीं क्रमिली काशीस्थळीं ॥ तरी त्यांचे मनोरथ चंद्रमौळी ॥ तूंचि सफळकर्ता ॥८॥
तरी तें संपादिलें जी कारण ॥ गणाधीशें माया केली संपूर्ण ॥ आतां उरले असती स्वल्प दिन ॥ दिवोदास राजाचे ॥९॥
गणाधीश राहिला काशीपुरीं ॥ आम्हांसी पाचारिलें त्रिपुरारी ॥ अष्टादश दिन जाहालियावरी ॥ निर्धारीं ॥ आम्हांसी जाणें घडेल ॥१०॥
ऐसें चक्रपाणी अनुवादला ॥ तेणें पंचानन संतोषला ॥ भाळीं अमृतकर प्रकाशला ॥ आनंद तेणें ॥११॥
फणी उभारिती तक्षक भूषणीं ॥ जटीं उचंबळली उत्तरवाहिनी ॥ हालाहल तें जाहालें कंठस्थानीं ॥ अमृतातुल्य ॥१२॥
मग शिव म्हणे गा भक्तवरा ॥ तुम्हांसी पाचारिलें चक्रधर ॥ तरी साह्य करावया लंबोदरा ॥ न कीजे विलंब ॥१३॥
मग उभा राहोनियां चक्रपाणी ॥ अभिवंदन केलें शिवचरणीं ॥ वामांगी असे सिंधुनंदिनी ॥ कमळजा तो ॥१४॥
उभयतीं वंदिलें पंचानना ॥ मग दांपत्यें केली प्रदक्षिणा ॥ पुढती निघालीं आनंदवना ॥ विष्णु आणि कमळजा ते ॥१५॥
ऐसा नमस्कारिला विरूपाक्ष ॥ स्वामी वीरभद्र ठेविला साक्ष ॥ मग हरीनें पाचारिला ताराक्ष ॥ निजवाहन तो ॥१६॥
लक्ष्मीनारायण गरुडपृष्ठीं ॥ तो उमपला व्योमपोटीं ॥ मग काशीपुरी देखोनियां द्दष्टीं ॥ आला गंगातीरासी ॥१७॥
तेथें देखिला अरुणासंगम ॥ मग संतोषला पुरुषोत्तम ॥ तेथें निश्चळ राहिला विहंगम ॥ अरुणासंगमीं ॥१८॥
त्या अरुणासंगमीं चक्रपाणी ॥ सिंधुजेसहित श्रीहरि बैसला आसनीं ॥ गरुड जवळी शिष्य होऊनी ॥ सेवेसी सावधान असे ॥१९॥
लक्ष्मीसी वदे नारायण ॥ मार्ग क्रमीत आलों आपण ॥ रजें मलिन झाले चरण ॥ न रिघवे हो गंगेमाजीं ॥२०॥
हे प्रत्यक्ष शिवाची निजअंगना ॥ केवीं स्पर्श कीजे मलिनचरणा ॥ तरी आरंभिजे सचैल स्नाना ॥ या अरुणासंगमीं ॥२१॥
मग गरुडासी म्हणे श्रीहरी ॥ कमंडलु भरीं गंगानीरीं ॥ ताराक्षें आणिलें झडकरी ॥ तें गंगोदक ॥२२॥
चरणक्षालन करी सिंधुजा ॥ हरिचरणीं समर्पिली पूजा ॥ संतोषविलें गरुडध्वजा ॥ गरुडें आणि लक्ष्मीनें ॥२३॥
तेथें श्रीहरीचें पदांबु प्रवाहलें ॥ तेंचि विष्णुपादोक तीर्थ झालें ॥ मग त्या संगमीं हरीनें केलें ॥ सचैल स्नान ॥२४॥
मग त्या अरुणासंगमीं हरी ॥ सर्वाभरणतीर्थ स्थापना करी ॥ ते स्वर्गतरंगिणीचे तीरीं ॥ अरुणासंगमीं ॥२५॥
तरी त्या आदि लक्ष्मीनारायणें ॥ तीर्थें स्थापिलीं कवणकवणें ॥ तेथें झालिया दर्शनस्नानें ॥ पापें दहती शत जन्मांचीं ॥२६॥
महारण्याचे ठायीं दीर्घध्वनी ॥ शंखस्फुरण करी वदनीं ॥ तें महातीर्थ शंखपाणी ॥ प्रथम स्थापिता झाला ॥२७॥
दैत्यांचा त्रास मानिला होता शक्रें ॥ शिवें कापिलीं त्या त्रिपुराची वक्रें ॥ या महासुदर्शनचक्रें ॥ तें चक्रतीर्थ स्थापिलें ॥२८॥
लवणासुराचा जो कुमर ॥ गदुनामा महाअसुर ॥ हरीची गदा त्रिभुवना भार ॥ निःपातिलातेणें ॥२९॥
ती हरीची गदा महासमर्थ ॥ तेंचि तेथें स्थापिलें गदातीर्थ ॥ तेथींचे दर्शनाचा स्वार्थ ॥ इच्छिती अमरादिक ॥३०॥
सचैल स्नान केलें गंगोदकीं ॥ गंगा नमस्करिली कौतुकीं ॥ तेथें पद्म उमटलें पादुकीं ॥ तेंचि झालें पद्मतीर्थ ॥३१॥
जें क्षीरार्णवींचें शयन मुदुळ ॥ तो कद्रूचा सुत सहस्त्रमौळ ॥ तेंचि शेषतीर्थ स्थापिलें केवळ ॥ चक्रधरें ॥३२॥
वामांगीं मिरवतसे सिंधुजा ॥ जे महालक्ष्मी कमलजा ॥ तें लक्ष्मीतीर्थ गरुडध्वजा ॥ अत्यंत प्रिय ॥३३॥
विनता-क्श्यपांचा कुमर ॥ तो हरिवहन गरुडेश्वर ॥ तेंचि तीर्थ शार्ङ्गधर ॥ स्थापिता जाहला ॥३४॥
षण्मुख म्हणे गा ऋषि अगस्ती ॥ जितुकीं तीर्थें स्थापिलीं श्रीपतीं ॥ तितुक्या स्थापिल्या केशवमूर्ती ॥ तें ऐका आतां ॥३५॥
प्रथम आदिकेशन तीर्थमूर्ती ॥ केशवतीर्थ निर्मिलें श्रीपतीं ॥ मग मत्स्यकेशवाकृती ॥ तें मत्स्यतीर्य ॥३६॥
तेथें केलिया स्नान दर्शन ॥ मत्स्यकेशवीं कीजे अभिवंदन ॥ तरी अष्टादश पुराणें दान ॥ दिधलीं ब्राह्मणांसी ॥३७॥
तेथेंचि कूर्मकेशव पूजिजे ॥ कूर्मतीर्थीं स्नान दान कीजे ॥ तरी ऐसिया सुकृता पाविजे ॥ वेंचिले भारमणी ॥३८॥
तेथें वराहकेशव पूजितां ॥ वाराहतीर्थीं स्नान दान करितां ॥ तो प्राप्त होय ऐशा सुकृता ॥ घडे पृथ्वीप्रक्षिणा ॥३९॥
विदारनृसिंहाचें दर्शन ॥ नृसिंहतीर्थींचें स्नान दान ॥ आणि प्रल्हादेश्वराचें पूजन ॥ विधियुक्त घडे तयासी ॥४०॥
तेथींचा वामनकेशव पूजिलिया ॥ वामनतीथीं स्नान दान केलिया ॥ एक रात्र अनुष्ठान जाहालिया ॥ घडे तया शतयागपुण्य ॥४१॥
तेथेंचि परशुराम पूजिला विधीं ॥ भार्गवतीर्थीं स्नान दान साधी ॥ तरी चतुर्याग ब्रह्मचर्याचा विधी ॥ घडे जी तयासी ॥४२॥
तेथेंचि रामकेशव पूजितां ॥ रामतीर्थीं स्नानदान करितां ॥ पावन होइजे तपसुकृता ॥ लक्ष संवत्सरांचिया ॥४३॥
तेथेंचि गोपीगोविंदपूजन ॥ त्या गोपीतीर्थीं स्नानदान ॥ तरी सामर्थ्य होइजे पावन ॥ सहस्त्र गोदानांचें ॥४४॥
ऐसीं तीर्थें स्थापिलीं नारायणें ॥ तितुकींही केशव जाहाला आपण ॥ उत्तरमानसीं पापनाशन ॥ आदिकेशव तो ॥४५॥
ऐसा तो आदिअरुणासंगम ॥ तेथें आदिकेशव पुरुषोत्तम ॥ तेथें प्रल्हाद हरि तो काम ॥ अगाध लिंगांतें ॥४६॥
ऐसा त्या संममीं करूनियां विधी ॥ मग प्रवेशता जाहाला काशीमधीं ॥ हरीनें ते कैसी देखिली त्रिशुद्धी ॥ शिवधामिनी ते ॥४७॥
मग लक्ष्मीप्रति बोले चक्रपाणी ॥ हे पहा शिवाची निजधामिनी ॥ कल्पानुकल्पीं आनंदवनी ॥ अचळ असे ॥४८॥
हे दुर्लभ सुर-नर-पन्नगादिकां ॥ हे दुर्लभ सुरेंद्र-बह्मादिकां ॥ सिंधुजे आमुची जन्मभूमिका ॥ अविमुक्ति काशी हे ॥४९॥
हें विश्वनाथाचें निजभुवन ॥ हें आमुचें पूर्वजन्मस्थान ॥ सहस्त्र जन्मांचें पाप महादारुण ॥ हरिती निमिषमात्रें ॥५०॥
ऐसें आपुलिया जन्मभूमीचें ॥ सुरेंद्रदेवां दर्शन कैंचें ॥ तरी हें पुण्यस्थान शंकराचें ॥ अगाध महिमा असे ॥५१॥
कमलजेसी म्हणे मुरारी ॥ मी किती हे वर्णूं काशीपुरी ॥ येथींचिया तृणतुळणेसी ब्रह्मा हरी ॥ न तुळती सर्वथा ॥५२॥
मग ते काशीपुरींसी मुरारी ॥ बद्धपाणी अभिवंदन करी ॥ मग लक्ष्मी आणि चक्रधारी ॥ कैसीं प्रवेशलीं काशींत ॥५३॥
मग ते कमलजा सिंधुनंदिनी ॥ महासौंदर्य लावण्यखाणी ॥ तिनें वेष धरिला भगवगुणीं ॥ संन्यासयोग ॥५४॥
ताराक्ष पक्षींद्र तो महाबळी ॥ तो शिष्य निरंतर जवळी ॥ पूर्णशास्त्रें सहस्त्रनामावळी ॥ उच्चारीत असे ॥५५॥
तें योगिनीचें सौंदर्य वाखाणितां ॥ लावण्या न तुळे रविकांता ॥ कीं विष्णु स्त्रीरूप झाला होता ॥ बहुतां कारणीं ॥५६॥
भस्मासुराचे अवसानी ॥ विष्णु जाहाला होता लावण्यमोहिनी ॥ ते सुंदरा देखोनि शूलपाणी ॥ द्रवला तत्काळ ॥५७॥
जैं मथन केलें सागरीं ॥ तैं एक मोहिनी झाला श्रीहरी ॥ सप्तसाठी कोटी महाअसुरीं ॥ वेष्टिली होती पैं ॥५८॥
आणिक प्रल्हादाचा जो कुमर ॥ विरोचननामा असुर ॥ तो सप्तदीपवतीचा नृपवर ॥ सूर्यउपासक तो ॥५९॥
त्याचे गृहीं एक मोहिनी झाला विष्णु ॥ क्षयातें पावविला विरोचनु ॥ तैसा झाडितां बळी जन्मला चरणु ॥ अंगुष्ठीं मोहिनीच्या ॥६०॥
म्हणोनि लावण्यमहामोहिनी ॥ लावण्यें जिंकिला शूलपाणी ॥ सहस्त्राक्ष झाला भगलांछनी ॥ ते लावण्यगुणें ॥६१॥
लावण्यें मोहिला अमृतकरू ॥ लावण्यें शरीर अव्हेरू ॥ लावण्यें वेधिला देवगुरू ॥ भोगिली बंधुकांता ॥६२॥
म्हणोनि लावण्य धरिलें लक्मीनें ॥ मोहिनी झाली असे लावण्यखाणी ॥ त्या श्रीमंतांची विध्वसावया मोहिनी ॥ प्रवेशे काशीमध्यें  ॥६३॥
ऐसी ते विश्वमोहिनी ॥ भगवग्दुणवेष सिंधुनंदिनी ॥ जवळी शिष्य महाज्ञानी गुणी ॥ सुपर्ण तो जी ॥६४॥
काशीं प्रवेशोनि भ्रमण करी ॥ तिनें मोहिल्या नरनारी ॥ विनाशकाळ संचरतां शरीरीं ॥ अशुभ गुण पैं ॥६५॥
कैसा राज्यान्त समय पातला ॥ सदुबुद्धीचा स्मर गळाला ॥ गणाधीश तोचि काळ क्षोभला ॥ त्या सर्व लोकांसी ॥६६॥
योगिनी भ्रमतसे धामीं ॥ ते श्रीमंत पाचारिती संभ्रमीं ॥ लावण्य देखोनि शुभ ते कुकर्मीं ॥ नर प्रवर्तते जाहाले ॥६७॥
एक ते कामातुर दुष्ट कुबुद्धी ॥ तयांसी योगिनीज्ञान प्रबोधी ॥ म्हणे कां विस्मृति जाहाली आत्मबुद्धी ॥ कामातुर हो ॥६८॥
कामातुरांसी ज्ञान उपदेशी ॥ कामचेष्टा करी ब्रह्मचार्‍यांसीं ॥ वशीकरण सांगे पतिव्रतांसी ॥ स्तंभन-मोहनादिक ॥६९॥
एकासी प्रकटवी उच्चाटण ॥ एकासी उपदेशी ब्रह्मज्ञान ॥ तेणें आत्मा तोचि तत्त्व निर्गुण ॥ ब्रह्मस्वरूप हें ॥७०॥
सर्व घटीं व्यापक विश्वंभर ॥ एकबीजपणें सर्वांकुर ॥ बीजासारिखें कडू मधुर ॥ होतसे सर्वदा ॥७१॥
कुलालगृहीं नानापरींचीं ॥ पात्रें निपजती मनोयुक्तीचीं ॥ तीं सर्वही एकेचि मृत्तिकेची ॥ परी नामें भिन्न ॥७२॥
एकचि देखणें बहुतां द्दष्टीं ॥ एकचि तालध्वनि उभय पाणिपुटीं ॥ एकचि ब्रह्मस्वरूप सर्वां घटीं ॥ सविस्तर असे ॥७३॥
पुरुषांचे देहीं शिव व्यापकमूर्ती ॥ स्त्रियांचे देहीं काय असे गा शक्ती ॥ तरी हे सर्व प्रहरा विश्रांती ॥ पिपीलिकाख्य ब्रह्म ॥७४॥
तुम्ही श्रीमंत निर्मिले श्रेष्ठाचे ॥ आणिक जन निर्मिले कवणाचे ॥ हे मलिन द्वैतभाव देहींचे ॥ करा रे यांचा त्याग ॥७५॥
देहभाव हाचि मोहकर्म ॥ हें मूळ व्हावया नामजन्म ॥ तरी हाचि स्मरा रे नित्यधर्म ॥ जे भेद न करावा ॥७६॥
आतां असो हें ब्रह्मज्ञानकथन ॥ योगिनीनें मोहिले सर्व जन ॥ तंव राजयानें पाचारिला ब्राह्मण ॥ जुनाट गणाधीश ॥७७॥
मग राजा वदे जी वृद्ध ब्राह्मणा ॥ आम्हांसी ज्या सांगीतल्या खुणा ॥ जो सत्पुरुष अष्टादश दिना ॥ भेटेल आम्हांसी पैं ॥७८॥
स्वामी तो कवण असे किती दूरी ॥ ब्राह्मण बैसला मृगाजिनावरी ॥ उच्चारिता जाहाला वैखरी ॥ नरेंद्रापति ॥७९॥
तो राजसभेमाजी पूज्यमान ॥ कीं चतुर्दश विद्यांचें मूळ स्थान ॥ राजयासी लागलें पूर्ण ध्यान ॥ त्या ब्राह्मणाचें ॥८०॥
मग नक्षत्रपट पाहिला तेणें ॥ कथिलीं भूत भविष्य वर्तमानें ॥ म्हणे राया ऐक माझीं वचनें ॥ रिंपुजया तूं ॥८१॥
नक्षत्रपटींचिया पुण्यश्लोका ॥ आम्हीं पाहिली मनोवृत्तीची परीक्षा ॥ तरी वर्ततसे घटिका ॥ सत्पुरुषा यावयासी ॥८२॥
आपण बैसिजे राजभद्रासनीं ॥ आतांचि देखाल तें रूप नयनीं ॥ पूर्वेसी उदय झाला जी तरणी ॥ प्रातःकालसमयीं ॥८३॥
तंव काय करी नारायण ॥ लक्ष्मीनें मोहिले सर्व जन ॥ आपण हरि झाला ब्राह्मण ॥ महाविचक्षण तो ॥८४॥
मार्तंडें उजळलीं पूर्वदिशा ॥ ब्राह्मण येतां देखिला तैसा ॥ कोटि विद्युल्लतांचिया प्रकाश ॥ ऐसीं दिव्य परिधानें ॥८५॥
श्यामसुंदर कांति सांवळी ॥ कौस्तुभ मिरवे वक्षःस्थळीं ॥ कोटि रत्नांची प्रभा मौळीं ॥ कांसे वेष्टिलासे पीतांबर ॥८६॥
दिव्य कमळाची माळा कंठीं ॥ सुवर्णपादुका पदतळवटीं ॥ मृगमदतिलक ऊर्ध्व ललाटीं ॥ कमळाक्ष पैं तो ॥८७॥
मृगेशाऐसें धीर गमन ॥ यज्ञोपवीत जें मृगाजिन ॥ मग तो क्रमिता झाला भद्रस्थान ॥ दिवोदासाचें पैं ॥८८॥
अष्टादशार्क आले पूर्ण ॥ गणेशें केलें होतें जें प्रमाण ॥ तंव येतां देखिला दुरोन ॥ दिव्य ब्राह्मण तो ॥८९॥
गणेश तो येत येत ॥ मग राजयातें देखा जी म्हणत ॥ दिवोदास झाला अति विस्मित ॥ देखोनियां ब्राह्मणासी ॥९०॥
आश्चर्य वर्तलें नृपवरा ॥ येतां देखिलें द्विजवरा ॥ मग राजा निघाला सामोरा ॥ उतरोनि सिंहासनातळीं ॥९१॥
क्षितीं कर स्पर्शोनि मौळीं ॥ ब्राह्मण वंदिला सभामंडळीं ॥ मग करीं धरोनि तत्काळीं ॥ बैसविला सिंहासनीं ॥९२॥
ब्राह्मणें सांगीतली खूण ॥ ते पूर्ण जाहाले अष्टादश दिन ॥ मग राजा करिता जाहाला सन्मान ॥ उभयतां ब्राह्मणांचा ॥९३॥
जें वृद्ध ब्राह्मण बोलिला प्रत्युत्तरीं ॥ राजयानें सास मानिली शरीरीं ॥ मग पूजिता जाहाला उपचारीं ॥ षोडशीं पैं ॥९४॥
मग आपुलिया निजमंदिरीं ॥ जेथें राजनायिका सुंदरी ॥ त्यांच्या लावण्यें लोपती गंधर्वकुमरी ॥ राजांगना परियेसा ॥९५॥
ब्राह्मण राजयानें करीं धरोनी ॥ सन्मानें आणिला राजभुवनीं ॥ मग बैसले जी एकांतस्थानीं ॥ राजा आणि ब्राह्मण ॥९६॥
मग तो महाराज काशीचा अधिप ॥ करसंपुट जोडोनियां नृप ॥ पुसता जाहाला जी प्रश्रसंकल्प ॥ द्विजोत्तमासी ॥९७॥
मग राजा म्हणे जी द्विजमूर्ती ॥ किमर्थ क्रमिली अविमुक्ती ॥ कीं देखोनि माझी सत्त्वशक्ती ॥ कृपा केली मज ॥९८॥
आजि सुफळ जन्मार्क ॥ जी तुम्ही भेटलां द्विजनायक ॥ कीं तो सर्वभूतीं व्यापक ॥ होसी विश्वपालक तूं ॥९९॥
मग वदता झाला द्विजमूर्ती ॥ म्हणे धन्य गा नृपती ॥ तुजसारिखा राजा पुण्यकीर्ती ॥ न भूतो न भविष्यति ॥१००॥
तूं महासमर्थ जी भूपाळा ॥ तपःशक्तीनें रक्षिलें महीमंडळा ॥ पराभविलें देवां सकळां ॥ पुरुषार्थपणें ॥१०१॥
ऐसा तुं सर्वगुणसंपन्न नृपती ॥ परी हेंचि गा लांछन तुजप्रती ॥ तुवां दवडिला रे पशुपती ॥ काशीबाहेरी ॥१०२॥
हे सप्तद्वीपवतींत तूं धन्य ॥ वेष्टिलें सप्तसमुद्रांचें आवरण ॥ मध्यें परिघपुरी निजभुवन ॥ वाराणसी हे ॥१०३॥
संतति-संपत्तींचा तूं सागर ॥ शेषनंदिनीचा प्रतिवर ॥ शत पुत्रांचा पितर ॥ महानरेंद्र तुं ॥१०४॥
अविमुक्तीसारिखी राजधानी ॥ जे अंतसमयीं मोक्षदायिनी ॥ जोंवरी स्वर्गसरिता मंदाकिनी ॥ धूतपापा हे ॥१०५॥
अपार तुझे सामर्थ्यगुण ॥ जें तुज प्राप्त हें काशीभुवन ॥ येथींचा स्वामी तूं सहस्त्रगुण ॥ अमरेशाहूनि अधिक ॥१०६॥
आतां हे अविमुक्तीची भूमी ॥ सामर्थ्यें पाविजे बहुतां जन्मीं ॥ तो तूं ये पुरीचा प्रभु स्वामी ॥ तुळिजे शिवासीं ॥१०७॥
ऐसा तूं सर्व भूमीचा महेंद्र ॥ तुजसीं न तुळे तो सुरेंद्र ॥ तुज म्हणों जरी चंद्र ॥ तरी झालासी ग्रामोग्रामीं ॥१०८॥
मग राजा म्हणे गा द्विजोत्तमा ॥ मज प्राप्त तुमची क्षमा ॥ तरी निरूपीन राजधर्मा ॥ तुम्हांपुढें स्वामी ॥१०९॥
माझे मंडळीं नाहीं यम-सूर्यस्पर्श ॥ एकवीस विश्वे पुण्याचा वास ॥ मी सप्तद्वीपवतीचा अधीश ॥ राखिली आपुली शक्ती ॥११०॥
ऐशीं सहस्त्र वरुषें महीमंडळ ॥ दोष लिंपों नेदींचि सकळ ॥ अवघे सत्त्वधीर लोकपाळ ॥ पुण्याचाचि पर्वत ॥१११॥
आधिव्याधींची नाहीं गंधवार्ता ॥ पृथ्वीमंडळीं सर्वही पतिव्रता ॥ शास्त्रश्रवणें श्रीमंतां ॥ होतसे अल्प दिन ॥११२॥
राजा वदे जी द्विजा विचक्षणा ॥ म्यां पूर्ण ओळखिलें तुम्हांसी नारायणा ॥ तरी जाणितली तुमची प्रज्ञा ॥ वैकुंठवासी तूं ॥११३॥
अपार माझें तप अनुष्ठान ॥ जे पुरुषोत्तमासी झालें दर्शन ॥ हें सुफल जी राज्य करून ॥ जे भेटलेती तुम्ही ॥११४॥
मी परम अन्यायी तुमचा ॥ मज द्रोह घडला शिवाचा ॥ परी प्रादुर्भाव दैवाचा ॥ यासी मी न तुळें ॥११५॥
किमर्थ मर्त्य जंतु मानवें ॥ त्यांही सुरेंद्रासी केवी तुळावें ॥ तुम्हांसी पूजिजे शरीरजीवें ॥ करूनियां संकल्प ॥११६॥
देवा न कळे तुमचें लाघव ॥ तुम्हांसी संकल्पावा सद्भाव ॥ तुम्ही विपत्ति भोगवितां देव ॥ ब्रह्माचरणीं त्या चर्या ॥११७॥
हरिश्चंद्र सत्त्वधीर नृपती ॥ त्यासी तुम्हीं देवीं भोगविली विपत्ती ॥ दोषेंविण तुम्हीं सरितापती ॥ मथिला सागर ॥११८॥
आपुलिया धर्में वर्तला बळी ॥ त्यासी विपत्ति योजिली यज्ञकाळीं ॥ तो विनादोषें घातला पाताळीं ॥ ऐसा तूं नारायण ॥११९॥
ऐसे तुम्ही देव गीर्वाण ॥ म्यां तृणतुल्य मानिले पूर्ण ॥ ऐशीं सहस्त्र वर्षें गमन ॥ नव्हेचि त्या देवांचें ॥१२०॥
रौरवासुराचा जो कुमर ॥ तो त्रैलोक्या अजिंक्य वृत्रासुर ॥ तेणें पराभविले सकळ सुर ॥ इंद्रादिक ते ॥१२१॥
तेणें शक्ति मंद केली तुमची ॥ तुम्हां अस्त्रभार झाला करींचि ॥ उपकारा ओढवला दधीचि ॥ महाऋषि तो ॥१२२॥
तेणें उपकार केला तुम्हां ॥ तुम्हीं घेतला त्याचा जीवात्मा ॥ ऐसा पृथ्वीमंडळीं तुम्हां ॥ न मानेचि सत्त्वधीर ॥१२३॥
आतां निर्घारितां पृथ्वीमंडळीं ॥ देवांपुढें नाहीं अत्य़ंत बळी ॥ शौर्यें धैर्यें सर्वकाळीं ॥ देवचि तुम्ही ॥१२४॥
स्वर्ग मृत्यु पाताळ त्रिपुटें ॥ तुम्ही बरवे अति श्रेष्ठे ॥ तुम्हांसी वंदावें करसंपुटें ॥ साष्टांगें शिरीं ॥१२५॥
अन्यत्र भेद तुम्हांसीं न धरावा ॥ सत्य मिथ्या न वंचिजे अहंभावा ॥ आतां तुम्हांसी प्रिय जी माधवा ॥ ती आज्ञा कीजे आम्हां ॥१२६॥
मग श्रीहरीनें तो राजा भूपती ॥ उपदेशिला मंत्रशक्तीं ॥ पाहा हो केवढी सुकृताची प्राप्ती ॥ जो श्रीहरि गुरू ॥१२७॥
हरि म्हणे महींद्रनायका ॥ तूं पावन होशील सर्व लोकां ॥ विमानें येतील सत्यार्का ॥ वैकुंठींहूनि पैं ॥१२८॥
तुम्ही क्रमाल वैकुंठभुवन ॥ ऐसें भविष्य असे वर्तमान ॥ तरी आतां देखें महाज्ञान ॥ राजपद सफळ करावया ॥१२९॥
रायें पाचारिले शुभ मंत्री ॥ त्यांसी आज्ञापिता झाला वक्रीं ॥ आतां येथें यावया त्रिनेत्री ॥ कारण जाहालें असे ॥१३०॥
सरला आपुला राज्यभोग ॥ हें कथावया आलासे श्रीरंग ॥ आम्हां ओढवला मार्ग ॥ पूर्वभाग्यें वैकुंठीचा ॥१३१॥
आतां दिवोदास जाईल वैकुंठा ॥ देवां मुक्त झालिया वाटा ॥ येथें येणें होईल नीलकंठा ॥ काशीयात्रेचिया ॥१३२॥
ऐशीं सहस्त्र वरुषें बंधन ॥ देवांसी अप्राप्त आनंदवन ॥ तो मार्ग मुक्त करावया गजवदन ॥ आलासे लंबोदर ॥१३३॥
देवांसीं केलें होतें महावैर ॥ घातले होते काशी बाहेर ॥ सुरेंद्र आदिकरूनि शंकर ॥ दिक्पतींसहवर्तमान ॥१३४॥
येथें यावया झाले महाबळी ॥ यांचे मनोरथ फळले बहुफळीं ॥ चित्तवृत्तिसरिता पूर्ण जळीं ॥ प्रवाहलिया ॥१३५॥
त्यांसी करितां अनुष्ठानसिद्धी ॥ आतां प्राप्त झाली पूर्णसिद्धी ॥ मनोवेगें येतील काशीमधीं ॥ महास्वार्थास्तव ॥१३६॥
म्यां धर्मराज्य केलें क्षितीं ॥ तेणें मज स्फुरली अविमुक्ती ॥ म्यां पराभविले दिक्पती ॥ या काशीसामर्थ्यें ॥१३७॥
ऐसी हे शिवाची निजधामिनी ॥ हे सिद्धिदायक निजकामिनी ॥ हे आपशक्तीनें नानाजन्मवनी ॥ पासाव सोडवी ॥१३८॥
हे सुपरीत करी विपरीता नाश ॥ येथें नाहीं कालाचा प्रवेश ॥ येथींचें भूतभविष्य महेश ॥ शिवचि जाणे ॥१३९॥
ऐसी हे आनंदवनस्थळी ॥ अविनाश प्रळयकाळीं ॥ पाहातां स्वर्ग मृत्यु पाताळीं ॥ ऐसी पुरी कोठें ॥१४०॥
म्यां मागीतली सप्तद्वीपवती ॥ परी हे वेगळी अविमुक्ती ॥ महाउदरा जी पशुपती ॥ तेहीं मजप्रती समर्पिली ॥१४१॥
व्हावया वंशावळीविस्तार ॥ ऐसें अनुवादला नृपवर ॥ कवणासी करील राज्यधर ॥ मेदिनीचा ॥१४२॥
अगस्ती वदे जी षण्मुखा सुभटा ॥ कवणासी दिधलें राज्यपटा ॥ राजा कैसा जाईल विकुंठा ॥ तें मज निरूपावें स्वामिया ॥१४३॥
शिवदास गोमा मंदमतीं ॥ आर्षशब्दें प्रार्थी श्रोतयांप्रती ॥ पुढील प्रसंगीं दीर्घयुक्तीं ॥ मज दीजे अधिकार ॥१४४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते ॥ विष्णुकाशीप्रवेश-दिवोदासगमनं  नाम अष्ट पंचाशत्तमाध्यायः ॥५८॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति अष्टपंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP