मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४९ वा

काशीखंड - अध्याय ४९ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ तंव अगस्ति वदे जी षडानना ॥ तूं कल्पद्रुमाचिया जीवना ॥ माझिया मनचातकाचिया घना ॥ होशी इच्छेसारिखा ॥१॥
तरी स्वामी तुमाचिया वचनामृतें ॥ अजूनि तृप्ति नव्हे जी मातें ॥ निरूपिलें काशीशाचे महिमेतें ॥ नाना युक्तींकरूनी ॥२॥
आतां परियेसीं मृगांकधरवीर्या ॥ कांहीं प्रश्न असे आचार्या ॥ महायोगीश्वरा ब्रह्मचार्या ॥ विवेकवक्ता तूं ॥३॥
ज्ञानांजनाची सिद्धी ॥ चतुर्वेदशास्त्रांची महा मांदी ॥ तरी तो लोलार्क काशीमधीं ॥ कैसें सामर्थ्य तयाचें ॥४॥
तंव बोलता झाला तो ब्रह्मचारी ॥ शास्त्रजंबुक वेदकेसरी ॥ जें अनुवादलीं हरि हर गौरी ॥ तें परियेसीं गा अगस्ती ॥५॥
लोलार्क झाला काशीमध्यें ब्रन्ध ॥ विमलकुंड स्थापिलें पुण्यजीवन ॥ तेथें घडे जयासी पूजा स्नान ॥ त्यासी प्राप्त कैलास ॥६॥
लोलार्की घडे जयासी पूजाविधी ॥ संवत्सर एक कीजे पूजासमाधी ॥ तरी ओळंगों येती अष्टसिद्धी ॥ सत्य जाण अगस्ती ॥७॥
तंव वदला मैत्रावरुणी ॥ जो महामहंत अगस्तिमुनी ॥ षण्मुखाप्रती दीनवदनीं ॥ प्रार्थिता झाला ॥८॥
म्हणे परिसा जी स्वामिनाथा ॥ मज निरूपा लोलार्काची कथा ॥ त्यासी एवढा पुरुषार्थ समर्था ॥ काय म्हणोनियां ॥९॥
ऐसें प्रश्निलें घटोद्भवें ॥ तंव बोलों आरंभिलें कूपोद्भवें ॥ म्हणे या विमलकुंडीं सदाशिवें ॥ केलें गा अनुष्ठान ॥१०॥
विमलकुंडींचें पुण्यजीवन ॥ तेणें आधारें विभूति चर्चून ॥ मग केलें भस्मलेपन ॥ त्रिपुरांतकें पैं ॥११॥
ते भस्मधूली लावितां विभूती ॥ कांहीं रज पडिले ते क्षितीं ॥ मग प्रसन्न झाला पशुपती ॥ लोलार्कासी ॥१२॥
अगस्ति वदे जी षडानना ॥ माझिया वियोगयागयजमाना ॥ माझिया मनोजीवनासी पूर्णजीवना ॥ प्रलयक्षीराब्धी तूं ॥१३॥
लोकार्कीं आला होता त्रिनयन ॥ वर देऊनि झाला प्रसन्न ॥ तेथें दोषी उद्धरला कवण ॥ तें सांगें मज ॥१४॥
श्रोतीं एकाग्र व्हावें जी मनीं ॥ कथा परिसा महादोषनाशिनी ॥ स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ परिसें कथन ॥१५॥
विंध्याद्रीच्या व्योमपाठारीं ॥ पर्वत असे सह्याद्री ॥ तेथें दक्षिणदेशामाझारी ॥ असे काम्यकवन ॥१६॥
तें त्रिपुरांतकाचें निजघर ॥ तेथें शिव झाला होता कामातुर ॥ तेंचि गुणनाम झालें साचार ॥ काम्यकवन ऐसें ॥१७॥
तंव अगस्ति वदे स्वामिनाथा ॥ मज निरूपा आधीं हे कथा ॥ शिव कां बाधिला कामव्यथा ॥ तें सांगा मज ॥१८॥
तुझे आनानीं कथामृत वोगर ॥ एकापरीस एक रुचिकर ॥ मी बहु अशक्त जी जेवणार ॥ मज नाहीं तृप्ती ॥१९॥
कीं लोभियापुढें कीजे द्रव्यराशी ॥ तें भांडार समर्पिजे तयासी ॥ मग दाखविजे मुक्तें रत्नराशी ॥ तेंही काय पां न घे तो ॥२०॥
जे दुर्भिक्षकाळींचिया रंका ॥ संनिध निळतां धान्यकणिका ॥ त्यावरी दीजे मिष्टान्न पत्रशाका ॥ तरी तो कां पां न घे ॥२१॥
तैशी लोलर्काची कथा सांगतां ॥ प्रकटली तुमची मुख्य योग्यता ॥ जैशी स्फटिकशुद्धि करितां ॥ पाविजे चिंतामणि ॥२२॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ हे कथा परिसा एकाग्रमनीं ॥ त्रिपुरांतक आणि दाक्षायणी मिळोनी ॥ मांडिला विनोद ॥२३॥
आनंदवनस्थळीं जाश्वनीळ ॥ इच्छें आरंभिला क्रीडाखेळ ॥ खेळ मांडिला सारीपाट सकळ ॥ हैमवतीसी ॥२४॥
श्रोतां असे जी येथें एक विचार ॥ मातापितरांची क्रीडा न सांगे कुमर ॥ तरी अगस्तीसी काय होता अविचार ॥ जे स्वामीसी प्रश्न केला ॥२५॥
कांहीं एक पित्याचीं क्रीडनें ॥ तीं किंचित्‍ मात्र न घडे सांगणें ॥ परी मातृक्रीडा हे कवणें ॥ अनुवादों नये ॥२६॥
तरी जे षण्मुखाची जननी ॥ प्रथम शिवअंगना दाक्षायणी ॥ ते पूर्णाहुती झाली हवनीं ॥ प्रजापतीचिया ॥२७॥
श्रोतां एक असे जी विचारणा ॥ शिवासी झाल्या एकादश अंगना ॥ तयांमध्यें माता षडानना ॥ एकही नाहीं ॥२८॥
त्या पुत्रापरी सेविजे शक्ती ॥ तरी हा जन्मला कूपोदकीं ॥ म्हणोनि अगस्तीसी कौतुकीं ॥ सांगतसे पैं गा ॥२९॥
ऐसा क्रीडतसे स्मरारिदेहीं ॥ तेथें उमेनें जिंकिलें सर्वही ॥ मग शिवावेगळी वस्तु कांहीं ॥ असेचि ना पैं ॥३०॥
मग अशक्त दिसे शूलपाणी ॥ सर्वही जिंकिलें दाक्षायणीं ॥ मग क्रोधायमान होऊनी ॥ शिवें केला गृहत्याग ॥३१॥
हारविला डमरू त्रिशूळ ॥ गजांबर परिधानें सकळ ॥ रुंडमाळा आणि शंखमाळ ॥ नंदिकेश्वर तो ॥३२॥
हारविला कंठींचा जोगवटा ॥ हारविला विभूतीचा पट्टा ॥ कबरीभार हारविल्या जटा ॥ मोकळिल्या पैं ॥३३॥
उरगहार जो होता कंठीं ॥ तोही हारविला धूर्जटीं ॥ मग उरली ते कांसोटी ॥ परी तेही हारविली ॥३४॥
तंव नारदमुनी तेथें आले ॥ तेणें विश्वरूप कैसें देखिलें ॥ जैसें लतापत्रीं वोसंडिलें ॥ चैत्यवृक्षातें ॥३५॥
संसारकार्यासी धांवता सैरा ॥ मार्गीं वरपडा होय तस्करा ॥ तेणें नेइजे भांडवलपसारा ॥ मग दिसे उदास ॥३६॥
नारदासी देखोनि धूर्जटी ॥ मौनेंचि राहिला अधोद्दष्टी ॥ हारविलें ऐश्वर्य कांसोटी ॥ झाला दिगंबर तो ॥३७॥
मग शिवासी वदे शैलबाळी ॥ जिंकिलें पण दीजे जी चंद्रमौळी ॥ आपुले आपण घेतां तत्काळीं ॥ नलगे वाढ वेळ ॥३८॥
मंग शंकर वदे शैलबाळे ॥ आतां मागुती सारीपट खेळें ॥ न खेळसी तरी मी बळें ॥ कांहींचि नेदीं ॥३९॥
दाक्षायणी म्हणे विश्वंभरासी ॥ तुम्हांसी काज नाहीं खेळावयासी ॥ आमुचें घेतां आम्हांसी ॥ न ये आडवा कोणीही ॥४०॥
तंव दाक्षाय़णीसी नारद ॥ दाखवी नेत्रखुणें विनोद ॥ दाक्षायणी वदे दीजे जी निबंध ॥ हारविला पण तुम्हीं ॥४१॥
माझिया प्राणसखिया बहुती ॥ महाबळशक्तीचिया महाद्‍भुती ॥ त्या जरी चेतविलिया पशुपती ॥ तरी तुम्हां ठाव नाहीं ॥४२॥
मग सखिया लागोनि सहस्त्र एक ॥ त्यांहीं तत्काळ लुटिला त्र्यंबक ॥ सर्व आभरणें घेऊनि त्रिपुरांतक ॥ नागविला त्यांहीं ॥४३॥
गौरीनें चेतविल्या त्या सुंदरा ॥ पैल ते शिवाचे गण धरा वो धरा ॥ पैल धरोनि आणा हो कुबेरा ॥ भांडारी शिवाचा ॥४४॥
आतां तुम्हीं सोडवा त्रिनयन ॥ पैल धरोनि आणा वो गोकर्ण ॥ शैलादि आणि नंदी वहन ॥ आणि घंटाकर्ण तो ॥४५॥
शंकरें चोरोनिया आम्हांसी ॥ आभरणें लपवितो गणांपासीं ॥ एकी धांविन्नल्या धरावयासी ॥ तंव पळाले शिवगण ॥४६॥
ऐसें देखोनियां नारदमुनी ॥ आनंदें नाचत निर्भत मनीं ॥ ऐसा विनोद खेळ दाक्षायणीं ॥ केला शंकरासी ॥४७॥
तंव क्रोधा चढला त्रिपुरांतक ॥ भुमीसी त्राहाटिलें पिनाक ॥ सर्व त्यजूनि निघाला त्र्यंबक ॥ धनुष्य भाते सर्वही ॥४८॥
सारीपाटाचेनि संबंधें ॥ काशी प्रहारिली महाक्रोधें ॥ मग त्या त्रैलोक्यबोधें ॥ धरिला दक्षिणमार्ग ॥४९॥
मग सह्यार्द्राचे पृष्टीं ॥ तो गोदावरीचे उत्तरतटीं ॥ तेथें राहिला धूर्जटी ॥ महेश्वरमौळीं ॥५०॥
तेथें गुप्त राहिला जाश्वनीळ ॥ तेंचि गुणनाम जाहालें महेश्वरमौळ ॥ मग तेथोंचि क्रमिला काळ ॥ बहुतेक दिन ॥५१॥
मग दाक्षायणी विचारी प्रबंधू ॥ म्हणे विनोदाचा जाहाला महाक्रोधू ॥ ठायीं घालिता गा विश्वाचा बोधू ॥ नारदमुनी तो ॥५२॥
मग नारद म्हणे वो शैलनंदिनी ॥ महेश आहे तो काम्यकवनीं ॥ तापसियाचा वेष धरूनी ॥ राहिला तेथें ॥५३॥
आतां तूं भिल्लीचा वेष धरूनी ॥ मयूरपत्रांचीं आभरणें लेऊनी ॥ तेथें नवरसें नृत्य करोनी ॥ मोहूनि भुलवीं शिवातें ॥५४॥
तुज प्रकट जातां दाक्षायणी ॥ तो अति कोपेल शूलपाणी ॥ भिल्लीवेषें काम्यकवनीं ॥ संचारावें तुवां ॥५५॥
मानला नारदाचा विचार ॥ नेसली मयूरपत्रांचेम अंबर ॥ कंठीं गुंजावळीफळांचे हार ॥ करीं पिनाक वाहिलें ॥५६॥
वाटे गिरिकमळकर्णिका श्रवणी ॥ केतकीपत्र मौळीं खोंवुनी ॥ भोंवतीं वेष्टिली ते कुमुदिनी ॥ मकरंदादिकीं परिपूर्ण ॥५७॥
मुकुट मौळीं बांधिला पूर्ण ॥ सुनीळ नयनीं अंजन ॥ नागवेलपत्री सुंदर दशन ॥ विद्युत्प्राय जैसे ॥५८॥
वसंतें वन शोभलें सहज ॥ पदमात्रीं प्रवाहे अंबु सतेज ॥ मध्यें कोकिळांचें शब्दचोज ॥ पंचमस्वराचें ॥५९॥
तेथें पक्षिकुळाचे शब्दस्वर ॥ अब्जडावाचीं पैंखणीं मल्हार ॥ तेव्हां गायनें त्रिशूलधर ॥ चेतविला भिल्लीनें ॥६०॥
मग रुद्रें सोडोनियां ध्यान ॥ पुढें होतसे पाहे नृत्य गायन ॥ तंव भिल्ली करीतसे ॥ पैंखण ॥ कंठीं राग गातसे मल्हार ॥६१॥
तंव कामें भुलविला पंचानन ॥ म्हणोनि तेंचि नाम जाहले काम्यकवन ॥ तेथें नाना गतींचें पैंखण ॥ दाखवीतसे भिल्ली ॥६२॥
मग शिव म्हणे नृत्यांगनी ॥ मज प्रत्युत्तर करीं कां मधुरवाणीं ॥ येरी म्हणे जनक जननी ॥ कोपतील मज ॥६३॥
मग आसन सोडोनि शंकरें ॥ कांहींएक इच्चिले कर्पूरगौरें ॥ त्या भिल्लीणीसीं एकसरें ॥ मांडिला विनोद ॥६४॥
तियेसी धरूं पाहे शूलपाणी ॥ तंव ती स्थिर चमके हास्यवदनी ॥ ऐसा हिंडविला वनोवनीं ॥ महादेव पैं ॥६५॥
हर शिणला जाणोनि गौरी ॥ स्थिर होते शिवें धरिली करीं ॥ म्हणे अवसर देईं मज सुंदरी ॥ नृत्यांगने अबले ॥६६॥
मी तरी तुझियानें वीर्यवृत्ती ॥ तेणें जरी उद्भवेल विपत्ती ॥ तरी कैलासाची जे गृहस्थिती ॥ समर्पीन तुज ॥६७॥
आणि मी तरी सर्व देवांचा अधीश ॥ विश्वंभर तो महेश ॥ महाकल्प तो मज पलांश ॥ वर्तत असे ॥६८॥
मी तुझा गृहस्थ शूलपाणी ॥ मज वास त्या कैलासुभुवनीं ॥ तेथें तूं माझी गृहिणी ॥ होईं भिल्ली भोगांगना जे ॥६९॥
पाहा हो पंचानन सैरा ॥ याणें भक्षिलें विवेकविचारा ॥ भय-लज्जेपासाव शंकरा ॥ फिरविलें इणें ॥७०॥
तरी मानवी पिंड ते केवढे ॥ ते तंव हीनसामर्थ्य थोकडे ॥ हे तंव क्षणमात्रें मन्मथसागरीं बुडे ॥ नीति नाहीं तयांसी ॥७१॥
मग म्हणे शिवाप्रती ॥ आम्ही ऐकितों तूं क्रोधवृत्ती ॥ सर्व देवांसी अगम्य पार्वती ॥ ते तुवां त्यजिली कीं ॥७२॥
स्त्रियेसी न दीजे द्र्व्यहर रती ॥ आणि पुत्र प्रजा हो संतती ॥ ऐसें चुके नर यासी गती ॥ होय अधःपातातें ॥७३॥
तरी ऐसा तूं तामस त्रिशूळधर ॥ तैसाचि आम्हां करिशी अव्हेर ॥ आम्हां सांदोनियां दिगंबर ॥ जाशील वनांतरीं ॥७४॥
तरी ऐसी क्षमा पूर्ण ॥ आम्हांसी दीजे जी भाषदान ॥ तरीचि तुमचें प्रीतिवचन ॥ करीन मी सत्य ॥७५॥
शिव म्हणे बरवा योजिला प्रयत्न ॥ हें प्रिये मज तुझें शब्दरत्न ॥ त्यासी करीन मी महायत्न ॥ ह्रदयमांदुमाझारीं ॥७६॥
मग भाक देऊनि तये वेळीं ॥ दिव्यकमळीं भरोनि अंजळी ॥ घालिती जाहाली शिवाचे मौळीं ॥ वेषधारिणी पैं ॥७७॥
मग शिवासी वदे ते भिल्लिणी ॥ तुझे घरीं असे जे दाक्षायणी ॥ तियेसी कोपशी तरी मी सांडोनी ॥ जाईन पुनरपि हो ॥७८॥
मग भिल्लीसी वदे पंचाननी ॥ तुझा शब्द तो मज कौस्तुभमणी ॥ तो जडीन मी शुद्ध कोंदणीं ॥ आपुले ह्र्दयीं ॥७९॥
तुझिया प्रतिशब्दासी साक्ष ॥ मी सर्वथा न करीं तोयभक्ष ॥ ऐसी भाक देतसे विरूपाक्ष ॥ भिल्लिणीसी ते काळीं ॥८०॥
मग भिल्लिणी म्हणे गा पशुपती ॥ तूं मकरध्वज मी तुझी रती ॥ ऐसें वदोनि तयाप्रती ॥ वनभिल्लीनें ॥८१॥
आलिंगन देऊनि त्रिपुरारी ॥ वामांगीं बैसविली ते सुंदरी ॥ मुख अवलोकी प्रीति थोरी ॥ चंद्रमौळी तो ॥८२॥
तंव शंभु मुख अवलोकीत ॥ मग भिल्ली वेष पालटी त्वरित ॥ कीं शुक्ति भंगूनि शुद्ध मुक्त ॥ देखिलें जैसें ॥८३॥
तरी हेचि गा महदादिश क्ती ॥ इची कवणा न कळे संतती ॥ अनंत ब्रह्मांडें असे खेळती ॥ ब्रह्मपुरुषासंगें ॥८४॥
जैसें परिसासंगें लोहादिक ॥ वेधोनि जाहालें शुद्ध चौसष्टिक ॥ तैसें शिवासरिसें देह कनक ॥ जाहालें भिल्लीचें ॥८५॥
मग ते हिमाद्रिजा वदे शिवासी ॥ आम्हीं क्रीडाखेळ केला तुम्हांसी ॥ सारिपाट खेळतां मानसीं ॥ धरिला विषम भावो ॥८६॥
सारीपाट खेळतां जी पशुपती ॥ तुम्हांसी आम्हीं लाविजे ख्याती ॥ हें अनुवादणें जी त्रैलोक्यपती ॥ वृथाचि सदाशिवा ॥८७॥
म्हणोनि चरण वंदी शैलबाळी ॥ मी सर्वद्रोही चंद्रमौळी ॥ मग शिवें ह्रदयकमळीं ॥ आलिंगिली आदिशक्ती ॥८८॥
ऐसा भवानीसी भेटला शंकर ॥ तेथें पुष्प वृष्टी करिती सुरवर ॥ कीं ते उडुगण रिचवती अपार ॥ शिव दर्शना लागीं ॥८९॥
मग त्या काम्यकवना माझारी ॥ शैलबाळा आणि त्रिपुरारी ॥ शिवसुरतीं होती दक्षकुमरी ॥ शत एक संवत्सर ॥९०॥
मग पार्वतीनें विनविला महेश ॥ येथें येतील परमपुरुष ॥ ते देखतील आपुला भोगविलास ॥ त्रिपुरांतका ॥९१॥
शिव म्हणे हें न विचारीं प्रिये ॥ या वनामध्यें कोणी न ये ॥ येथें येतांचि देह पालट होये ॥ जंतु नाम स्त्रीरूप ॥९२॥
तंव श्राद्धदेव सूर्यनंदन ॥ तेणें पुत्रास्तव मांडिला यज्ञ ॥ ऋषि चुकले देतां अवदान ॥ ते जाहाली कन्या पैं ॥९३॥
तियेसी नाम ठेविलें जी इला ॥ ऐसें क्रमिलें बहुत काळा ॥ मग हरि विरिंची तया स्थळा ॥ आले कोणे काळांतरीं ॥९४॥
मग विरिंची आणि हृषीकेश ॥ ते कन्येचा करिते जाहले पुरुष ॥ सुधन्वा नामें राजाधीश ॥ केला सूर्यवंशी ॥९५॥
मग तों सुधन्वा ते वनीं ॥ व्याहाळी खेळतां प्राशिलें पाणी ॥ मग स्त्री जाहाला तत्क्षणीं ॥ शिवशापास्तव ॥९६॥
ऐसा तो स्त्री जाहाला तया स्थळीं ॥ तो राहिला शापवनाच्या पाळीं ॥ तंव सोमसुत आला व्याहाळीं ॥ बुधराज तो ॥९७॥
तियेसी पुशिलें सोमनंदनें ॥ तंव मौन धरिलें तिणें ॥ मग ते अपरिणीत ऐसें जाणोनि तेणें ॥ नेली बुधरायें ॥९८॥
मग बुधरावापासाव तिये नारी ॥ चार पुत्र जाहाले तिचे उदरीं ॥ मग विचारिली ऋषी श्वरीं ॥ तिचिया शापाची निष्कृती ॥९९॥
मग वसिष्ठादि महा मंत्री ॥ तिंहीं उपदेशिली ती स्त्री ॥ म्हणती तूं सूर्य वंशींचा महाक्षत्री ॥ तप करीं पुरुषत्वास्तव ॥१००॥
मग शिवालयाच्या पाळीं ॥ तपा बैसली ते शापबाळी ॥ मग प्रसन्न जाहाला चंद्रमौळी ॥ दिधला वर तियेसी ॥१०१॥
मग तियेसी वदे शंकर ॥ तुझिया तपाचा जाहालासे भार ॥ तूं मासपरत्वें होसी स्त्रै नर ॥ असत्य नव्हे शाप माझा ॥१०२॥
मग एक मास भोगी चंद्रकुमर ॥ दुसीरये मासीं होय तो नर ॥ मग एक जाहाला तया कुमर ॥ इक्ष्वाकुनामें सूर्यवंशीं ॥१०३॥
मग तो अयोध्येचा केला अधिपती ॥ रेणूराव जाहाला पुत्र तयाप्रती ॥ मग सूर्यवंश विस्तारला क्षितीं ॥ तयापासाव ॥१०४॥
ऐसे ते शापाचे महाकष्ट ॥ सुधन्वा भोगीतसे दुर्घट ॥ शापयोगें धरिलें तट ॥ शिवालयाचें ॥१०५॥
मग तप केलें आयुष्यभरीं ॥ तंव प्रसन्न जाहाला त्रिपुरारी ॥ मग शिव म्हणे वो सुंदरी ॥ तूं होशील सरितारूप ॥१०६॥
महावंद्य होशी तूं क्षितीवरी ॥ ऐसा वर देता जाहाला तये नारी ॥ तुझिया दर्शनमात्रें चराचरीं ॥ होय उद्धार प्राणियांचा ॥१०७॥
तुझ्या स्नानें उद्धरती ब्रह्मचारी ॥ नाना अंत्यज ज्ञाती दुष्टशरीरी ॥ तेही मुक्त होतील निर्धारीं ॥ दर्शनमात्रें ॥१०८॥
तूं महापवित्र होशील जगीं ॥ तुझें स्नान इच्छिती महायोगी ॥ तरी तुवां यमपुरीचिया मार्गीं ॥ वर्जिलें महादोषियां ॥१०९॥
मग इलागंगा नाम जाहालें तियेसी ॥ सिंधुप्रिया जावें पश्चिमेसी ॥ तंव नारदमुनि आला वेगेंसीं ॥ सर्व देव घेऊनियां ॥११०॥
सर्व देवेंसी आला इंद्र ॥ अष्ट दिक्पाल तरणी चंद्र ॥ हंसीं विरिंचि पालाणूनि पक्षींद्र ॥ आला नारायण ॥१११॥
मग देव म्हणती गोदावरीसी ॥ आतां तुवां प्रार्थावें इलागंगेसी ॥ शिव प्रसन्न जाहाला तियेसी ॥ मग तूं महत्त्वें महती होसी ॥११२॥
त्रिशूलधर असे शापवनीं ॥ तेथें आम्हांसी जावों न ये म्हणोनी ॥ स्त्रीरूप होऊं तत्क्षणीं ॥ सर्व देव आम्ही ॥११३॥
मग ते महादादि मायेसहित ॥ गौतमी आणि दक्षजामात ॥ त्वरें आला तेथें लक्ष्मीकांत ॥ प्रमथेसी असे ॥११४॥
जैसा महागिरीच्या पाठारीं ॥ तृणपर्णांतें जैसा वन्हि संहारी ॥ तैसा देवदोषांतें त्रिपुरारी ॥ दग्धिता झाला पैं ॥११५॥
तरी पर्वतींहूनि सरिता ॥ तृणकाष्ठें लोटीतसे येतां ॥ तैशी रुद्रासवें दक्षदुहिता ॥ लोटीतसे देवदोषांतें ॥११६॥
तरी सूर्योदयाचेनि योगें ॥ तम पळतसे पश्चिममागें ॥ तैशीं शिवशक्तीचेनि योगें ॥ पळती देवांचीं दुरितें ॥११७॥
ऐसीं त्रिपुरांतक आणि पार्वती ॥ शापवनांतूनि निघती ॥ तंव भवानी झाली तृषावती ॥ शिवाजवळी पैं ॥११८॥
शिवें दक्षिण कर उभारिला ॥ महीगर्भीं त्रिशूळ हाणीतला ॥ त्या महाप्रहारें भेद केला ॥ सप्त पाताळांसी ॥११९॥
मग त्रिशूळ उत्पाटी चंद्रमौळी ॥ तंव निघाली उदकाची उकळी ॥ तें पुण्यांबु होतें पाताळीं ॥ भोगावतीचें पैं ॥१२०॥
मग तें प्राशन केलें गौरीं ॥ मौळीं वंदिता झाला त्रिपुरारी ॥ शिवें निर्मिली पुण्यकीर्ती थोरी ॥ शिवालयनाम तीर्थ तें ॥१२१॥
ऐसें तें शिवालयनाम तीर्थ ॥ त्यासी वर देताहे विश्वनाथ ॥ सर्व जीवां वर्जिला यमपंथ ॥ तेथींच्या स्नानदानें ॥१२२॥
मात्रागमनी सुरापानी ॥ ब्रह्मद्वेषी गोहत्यारी प्राणी ॥ ते स्नानदानें कैलासभुवनीं ॥ जाती सत्य अवधारा ॥१२३॥
ऐसा वर देतां चंद्रमौळी ॥ त्रिशूळें प्रदक्षिणा केली पाळी ॥ पंचक्रोशी बांधूनि पौळी ॥ केलें प्रमाण शिवालयाचें ॥१२४॥
त्या शिवालयाच्या पूर्व तीरीं ॥ उभी राहिली शैलकुमरी ॥ तिणें कुंकुम घेतलें करीं ॥ रेखावया मळवट ॥१२५॥
शिवालयाचे पुण्यजीवनें ॥ करीं कुंकुम मर्दिलें गिरिजेनें ॥ तंव देखिलें हैमवतीनें ॥ ज्योतिर्लिंग ऐसें ॥१२६॥
तंव भवानी वदे विश्वेश्वरासी ॥ या तीर्थीदकीं मर्दिलें कुंकुमासी ॥ मळवट करावया आम्हांसी ॥ परियेसीं सदाशिवा ॥१२७॥
तरी हें पाहीं सहस्त्ररंग ॥ कुंकुमाचें जाहालें ज्योतिर्लिंग ॥ मग त्या लिंगाचा पूर्वयोग ॥ शिव कथी भवानीसी ॥१२८॥
हें लिंग होतें अगाध पाताळीं ॥ तें त्रिशूळें काढिलें ये वेळीं ॥ मग उकळी आली पृथ्वीमंडळीं ॥ उदकासरसी ॥१२९॥
तें शिवें वंदिलें वक्षःस्थळीं ॥ मग स्थापिलें शिवालयाचे पाळीं ॥ दाक्षायणीतें मर्दिलें करस्थळीं ॥ तेंचि नाम घृष्णेश्वर ॥१३०॥
मग तें शिवालयतीर्थ जाणोन ॥ आले समस्तही देव गीर्वाण ॥ देखिलें शिवालय पुण्यजीवन ॥ मग केलें स्नान त्यांहीं ॥१३१॥
मग हरि विरिंचि इंद्रगण ॥ समस्तीं साधिलें संध्यावंदन ॥ अष्टगंध अक्षता घेऊन ॥ प्रतिष्ठिती लिंगासी ॥१३२॥
जे भावें पूजिती या लिंगासी ॥ न्यायिक द्रव्य आणि पुत्रपुष्षेंसीं ॥ ते वंद्य अर्यमादि पितरांसी ॥ कैलासपद पावन तयां ॥१३३॥
जैसा तो विश्वनाथ काशीस्थळीं ॥ तैसाचि घृष्णेश्वर शिवालयपाळीं ॥ कैलास प्राप्त अंत्यजादि सकळीं ॥ दर्शनें या लिंगाच्या ॥१३४॥
मग नारायण आणि विधाता ॥ यांहीं प्रार्थिलें भवानीकांता ॥ हे इलागंगा गोदेसी मिळतां ॥ होईल पवित्र ॥१३५॥
मग शिव म्हणे गा विरिंचि हरी ॥ आम्हीं वर दिधलासे ये सुंदरी ॥ तुवां जावें पश्चिमसागरीं ॥ होईं सिंधुप्रिया ॥१३६॥
तो शब्द होय केवीं असत्य ॥ मग शिवा प्रार्थी श्रीअनंत ॥ तुमचा शब्द आणि गोदेचें महत्त्व ॥ करूं सत्य आतां ॥१३७॥
हे सिंधुगामिनी जाहाली इला ॥ तरी समुद्र आणूं जी सेवाळा ॥ शब्द मानला जाश्वनीळा ॥ मग म्हणे तथास्तु ॥१३८॥
मग हरि म्हणे त्या वरुणासी ॥ तुवां जाऊनियां जलार्णवासी ॥ पाचारूनि आणावें त्या समुद्रासी ॥ या शिवभुवनीं ॥१३९॥
मग सिंधूसी म्हणे वरुण ॥ तुज वर जाहाला ये वेळां सगुण ॥ हरि विरिंचि त्रिनयन ॥ पाचारिले काम्यकवनीं ॥१४०॥
सिंधु म्हणे कर्दमकुमरा ॥ मी सेवेसी सावध असें शंकरा ॥ ऐसें म्हणोनि हरि-वज्रधरां ॥ मी सेवाळीं सर्वकाळ ॥१४१॥
मग इला धरी दक्षिणमार्ग ॥ करिती जाहाली गोदेचा संसर्ग ॥ तो देवीं दाखविला परमयोग ॥ गोदावरीसंगमू ॥१४२॥
ऐसी इला केली सिंधुकामिनी ॥ मग देव निघाले संध्यावंदनीं ॥ परी गौरमीसंगें पूर्ववाहिनी ॥ केली देवी पैं ॥१४३॥
मग देव वदती जी शूलपाणी ॥ आतां उश्शाप वदें काम्यकवनीं ॥ तेथें अज्ञान जन येती म्हणोनी ॥ प्रार्थना असे ती देवांनी ॥१४४॥
मग उश्शाप वदला महेश ॥ येथें एक म्यां वर्जिला वायस ॥ सकळीं करावा वास ॥ या महेश्वरमौळीं ॥१४५॥
ऐसें तें शिवालय काम्यकवन ॥ तेथें सर्व देवीं केलें स्नान ॥ मग पूजिला पंचानन ॥ महदादिसहित ॥१४६॥
मग देव गेले स्वर्गपंथें ॥ जीं जीं बिडारें तींचि जाहालीं तीथें ॥ ऐसा वर दिधला समर्थें ॥ सदाशिवें तेथें पैं ॥१४७॥
या शिवालयाच्या स्नानें परियेसा ॥ महापापी ते ते गेले कैलासा ॥ तेणें कृतांता जाहालासे वळसा ॥ जाहालें यमपुर उद्वस ॥१४८॥
नाना देशीं पड्तीं अवर्षणें ॥ तेणें उद्वस होती पुरें पट्टणें ॥ तीं जैसीं मंद चलनवलनें ॥ देशाधिपतीचीं पैं ॥१४९॥
तेथें कृतांताचें न चले कांहीं ॥ कैलासा पावन जाहाले सर्वही ॥ मग विचारणा देखोनि देहीं ॥ निघाला यमरावो ॥१५०॥
तेणें सवें घेतला भगनेत्री ॥ आणिक चित्रगुप्त महामंत्री ॥ महिषवाहन जो महाक्षत्री ॥ निघाला यम ॥१५१॥
ऐसा तो आपकार्या सूर्यसुत ॥ सत्यलोकाचा मार्ग क्रमीत ॥ तेथें जाणविला वृत्तांत ॥ विरिंचिदेवासी ॥१५२॥
मग इंद्र विरिंचि यमरावो ॥ वेगें पावले वैकुंठठावो ॥ तेथें पूजिते जाहाले श्रीरावो ॥ पद्मनाभ पैं ॥१५३॥
मग हरि आणि समस्तही ॥ कैलासासी गेले देव सर्वही ॥ मग पूर्वमात जाणविली त्यांहीं ॥ श्रीशंकरासी पैं ॥१५४॥
मग हरि म्हणे शूलपाणी ॥ महा उत्तम तीर्थ केलें जी मेदिनीं ॥ महत्त्वें मंद जाहाली धामिनी ॥ काशीपुरी तुमची ॥१५५॥
मर्त्य जंतु पूजिती ज्योतिर्लिंग ॥ त्यांसी प्राप्त मुक्तिमार्ग ॥ तेणें सर्व महात्म्य जाहालें कुरंग ॥ काशीपुरीं जान्हवीचें ॥१५६॥
नाना जैशी रविप्रकाशगती ॥ सूर्यकरें अभ्रें जैशीं लोपती ॥ तैशी मंद जाहाली दीप्ती ॥ अविमुक्तीची पैं ॥१५७॥
हें मानलें शंकरासी ॥ तेणें आज्ञा केली हरिदेवांसी ॥ गुप्त करावें ज्योतिर्लिंगासी ॥ आणि शिवालयतीर्थ ॥१५८॥
मग सर्वदेवेंसीं लक्ष्मीपती ॥ शिवालय आच्छादीतसे क्षितीं ॥ ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठाकृती ॥ आच्छादिली पृथ्वीगर्भीं ॥१५९॥
देवीं शिवालय आच्छादिलें ऐसें ॥ मग ऐलराजें केलें साठी धनुष्यांऐसें ॥ परी तें नव्हे पूर्वापार ऐसें ॥ मंद योगार्चन पैं ॥१६०॥
ऐसें घृष्णेश्वरआख्यान ॥ अगस्तीसी निरूपी स्वामी षडानन ॥ ऐसें जाहालें गा तें काम्यकवन ॥ मित्रावरुणसुता ॥१६१॥
या काम्यकवनाच्या दक्षिणतीरीं ॥ प्रतिष्ठाननामें पुण्यनगरी ॥ तेथें गोदावरीचे उत्तरतीरीं ॥ महापुण्यस्थळ तें ॥१६२॥
षणमुख म्हणे गा ऋषिनाथा ॥ हें तुवां प्रश्निलें परमार्था ॥ आतां परिसावी पिप्पलेश्वराची कथा ॥ जी वर्तली प्रतिष्ठानीं ॥१६३॥
आतां श्रोतीं व्हावें सावधान ॥ कथेसी समर्पिजे श्रवण ॥ परिसा पिप्पलेश्वराचें महिमान ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१६४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते शिवालयतीर्थ-घृष्णेश्वरवर्णनं नाम एकोनपंचाशत्तमाध्ययः ॥४९॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥  शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥    

॥ इति एकोनपंचाशत्तमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP