मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ३७ वा

काशी खंड - अध्याय ३७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
अगस्तीनें प्रार्थिला शिवकुमार ॥ तूं माझिया वियोगतमाचा अमृतकर ॥ तृप्त नव्हेचि माझा चित्तचकोर ॥ तुझिया विलासें प्रकाशे पैं ॥१॥
तुमची वैखरी शब्दरत्नखाणी ॥ तेथें उद्भवती शिवनाममणी ॥ ते लेववितां माझिया श्रवणीं ॥ तरी तृप्ति नाहीं ॥२॥
तुझीं वक्त्रें जैसीं हिमकमळे ॥ तीं विकासलीं शिवनामसूर्यबळे ॥ तेथें लुब्धलें माझें मन अलिकुळें ॥ परी तृप्ति नव्हे सर्वथा ॥३॥
तुझीं वक्त्रें अंबुनिधी ॥ शिवनाममुक्तें जयामधीं ॥ तो म्यां प्राशिला उदधी ॥ परी तृप्ति नव्हेचि ॥४॥
माझिया मनाचा तंतु करोनी ॥ ओंविलें शिवनामरत्नमणी ॥ परी या शृंगाराची धणी ॥ नव्हेचि मजलागीं ॥५॥
तुज प्रणाम जी हरकुमरा ॥ शिवकथेचिया पूर्ण भांडारा ॥ मज दीनअनाथाचिया दातारा ॥ षडानना ॥६॥
आतां एक प्रश्न असे जी मनीं ॥ जें ज्ञानवापीतीर्थ काशीस्थानीं ॥ कैसें निर्मिलें पुण्यजीवनीं ॥ मज निरुपावें स्वामिया ॥७॥
तंव बोलिला षडानन ॥ परीयेसीं गा अगास्ति एक सगुण॥ पांत्र अपात्र न विचारी धन ॥ वृष्टि करी सर्वत्रीं ॥८॥
तरी तोही शिवाज्ञासहित ॥ जाणा परोपकारी त्वरावंत ॥ तूं तरी महातपस्वी महंत ॥ पुण्यकथापात्र ॥९॥
तरी तुवां कथा प्रश्निली साक्षेपीं ॥ कैसी निर्मिली ते ज्ञानवापी ॥ ते महाकिल्मिषदहनी अद्यापी ॥ कल्याण कल्पी ॥१०॥
तरी परियेसी गा ऋषिनाथा ॥ ज्ञानवापीची मूळ कथा ॥ तो कूप निर्मिलासे समर्था ॥ महारुद्रें स्वहस्तें ॥११॥
तरी कुंभजा परियेसीं वचन ॥ पृथ्वीसी पडिलें होतें अवर्षण ॥ अनावृष्टि केलीसे वरुणें जाण ॥ शत वरुषेंपर्यत ॥१२॥
तैं उष्णता थोर सूर्यकरें ॥ पोळती पर्वताचीं पाठारें ॥ सीमा सांडिलिया सप्तसागरें ॥ जाहाले उद्वस उदधी ॥१३॥
पुरला जळचारांचा संकेत ॥ पृथ्वीसी थोर जाहाला आकांत ॥ चतुर्विध खाणींचा निःपात ॥ प्रथमचि जाहाला ॥१४॥
दग्धलिया भरवनस्पती ॥ गंगोदकें अदृश्य जाहालीं क्षितीं ॥ निर्जळ जाहाली वसुमती ॥ जाहाल महाप्रलयो ॥१५॥
तैं समुद्रीं होतें अल्प जळ ॥ तेथेंचि संचलें मीनकुळ ॥ परी तेंही जाहालेंसे कुश्वळ ॥ मृत्यु जाहाला सर जंतूंसी ॥१६॥
ईशानरुद्र आला वाराणशी ॥ तैं शिवाज्ञें स्वस्थ असे पंचक्रोशी ॥ परी उदकेंविण त्या जंतूंसी ॥ होतसे कल्पान्त ॥१७॥
मग ईशानरुद्र पाहे उदक ॥ स्नपावया तो त्रिपुरांतक ॥ मग मांडिलें थोर कौतुक ॥ न देखेचि जीवन ॥१८॥
मग त्या रुद्रें त्रिशूळेंकरुनी ॥ कूप खणिलाअ तत्क्षणीं ॥ परीं सर्वथा न देखे जीवन नयनीं ॥ मग काय करिता जाहाला ॥१९॥
मग धुंडीतसे सप्त पातळें ॥ तेथें अदृश्य होतीं पुण्यजळें ॥ नानपरींचा सुगंधें निर्मळें ॥ आणिलीं रुद्रें पैं ॥२०॥
स्वर्ग-मृत्यु-पातालमंडलींचीं उदकें ॥ महापवित्रें पापक्षालकें ॥ तीं रुद्रें आणिलीं कौतुकें ॥ घातली ज्ञानवापीमध्यें ॥२१॥
काशीमध्ये पूर्ण केलें जीवन ॥ विश्वनाथासी करीतसे स्नपन ॥ मग मांडिले जी अनुष्ठान ॥ ईशानमहारुद्रें ॥२२॥
एकादश्ज अयुत संवत्सर ॥ त्या रुद्रें केलें जी अपार ॥ मग प्रसन्न जाहाला तो शंकर ॥ स्थापिलें रुद्रपुरीसी ॥२३॥
ऐसी हे ज्ञानवापीची उत्पत्ती ॥ तुज समूळ निरुपिली अगस्ती ॥ एथे एक अपूर्वता जाहाली पुढती ॥ ते परियेसी कुंभजा ॥२४॥
ते ज्ञानवापी रुद्रनिर्मित ॥ युगानुयुगीं दोष धुवीत ॥ तेथें एक वर्तले अद्‍भुत ॥ तें आश्चर्य थोर काय सांगूं ॥२५॥
तरी परियेसीं अगस्ती उत्तमा ॥ तो ज्ञानवापीचा पूर्ण महिमा ॥ ते कथा परिसतां महाकल्मषतमा ॥ होतसे पराभव ॥२६॥
अगस्ती या ज्ञानवापीचीं नामें ॥ जो त्रिकाळ उच्चारी नेमे ॥ तेणें पूर्वजां केलीं निजधामें ॥ कैलासमंदिरीं ॥२७॥
अगस्ती या ज्ञानवापीचे दर्शनेंकरुन ॥ सहस्त्र जन्मांचे दोष होती दहन ॥ आणि कैलासपद पावन ॥ चंद्रार्कवरी जाणिजे ॥२८॥
ज्ञानवापीचें स्नान जयासी घडे ॥ तयासी शंकराचें सिंहासन जोडे ॥ तेणें पूर्वजांसी घातलीं गडें । शिवलोकी सुकृतांची ॥२९॥
ज्ञानवापीचें घडे आचमन ॥ तया कैलासी घडे अमृतपान ॥ जंववरी सप्त समुद्रीं जीवन ॥ तंववरी वसे तो शिवासनीं ॥३०॥
आतां असो हे अधिक फलश्रुती ॥ कथा सांगणें असे पुढती ॥ ज्ञानवापीची जे अद्‍भुत ख्याती ॥ ते परियेसी अगस्ती ॥३१॥
काशीमध्ये एक षट्‍कर्मी ॥ ब्राह्मण होता हरि नामें स्वामी ॥ त्याची कन्या नित्य महानेमी ॥ सुशीला नाम तियेचें ॥३२॥
जयंती नामें तिची माता ॥ तिणें आराधिलें भवानीकांता ॥ तिणें मागीतली दुहितां ॥ सुशीला नामें ॥३३॥
कन्या सुंदर महालावण्य ॥ सर्व जनांसी पडिलें अतिमौन ॥ ते देवकन्या परियेसीं तरुण ॥ मदनमोहिनी ॥३४॥
ती ज्ञानवापीचें करी नित्य स्नान ॥ आणि वापीचेंचि करी पूजन ॥ कूष्मांडवल्लीचीं पुष्पें आणून ॥ समर्पी ज्ञानवापीसी ॥३५॥
ते वापीचिया सोपानीं पूर्ण ॥ नित्य समर्पी अक्षता चंदन ॥ नाना सुंगंधे मेळवून ॥ समर्पी वापीसी ॥३६॥
ऐसी नित्य ज्ञानवापीची ॥ ते कन्या करी ब्राह्मणाची ॥ ऐसी भक्ती मांडिली शिवाचा ॥ लागलें ध्यान शिवाचें ॥३७॥
अभिलाष करणें परपुरुषीं ॥ हें नाहीं सुशीलेचें मानसीं ॥ परी कामातुर परपुरुषांसी ॥ थोर अभिलाष तियेचा ॥३८॥
तें अतिलावण्य देखोनि दृष्टीं ॥ मृग जैसे भुलती दीपघटीं । एक पतंगापरी पाहाती मिळावयासाठी ॥ तिच्या ज्योतिस्वरुपीं ॥३९॥
कोणीएक बलात्कारें भोगूं पाहाती ॥ परी विश्वनाथासी बहुत भीती ॥ मग काशीमध्ये राहों न देती ॥ गण त्रिपुरांतकाचे ॥४०॥
एकासी ऐसा विचारु ॥ तियेसी शब्द घालिती कामातुरु ॥ तंव ते चालिली पूजा करुं ॥ ज्ञातवापीची पैं ॥४१॥
तियेसी ज्ञानवापीचें स्मरण मनीं ॥ त्या दुष्टांसी न बोले वचनीं ॥ जैसी श्वानांची दिर्घध्वनी ॥ न मानीचि सिंह ॥४२॥
मग खेदासा पावले थोर ॥ म्हणती हे नेदीचि प्रत्युत्तर ॥ इचे मनीं करणें असेल वर ॥ कवणा कंठीं सूत्र इचें ॥४३॥
ऐसी ते सुशीला द्विजकन्या । जगत्रय मोहिलें तिचे लावण्या ॥ तियेच्या शंकती सुंदर तारुण्या ॥ गंधर्वकुमरी ज्या ॥४४॥
ऐसी ते पूजी ज्ञानवापीसी ॥ तेथेंचि क्रीडे सखियांसीं ॥ मग सायंकाळी गृहासी ॥ जाय सुशीला नित्य ते ॥४५॥
तंव मलयनामें जो पर्वत ॥ तेथें गंधर्व होता मंगलकेत ॥ महाप्रौढींचा स्त्रीविरहित ॥ तो पर्वतीं बहुकाळ असे ॥४६॥
त्यासी सुशीला झाली श्रुत बाळा ॥ महालावण्य ते चंद्रकळा ॥ मग तो आला ते वेळां ॥ आनंदवनासी ॥४७॥
संचार केला काशीपुरीं ॥ तेणें देखिला ते द्विजकुमरी ॥ तिची साम्यता स्वर्गसुंदरी ॥ न तुळती देवांगना ॥४८॥
मग तो गंधर्व मंगलकेत ॥ तियेसी न्यावया छिद्र पाहात ॥ मग अष्टादशदिन अकल्पित ॥ राहिला तो काशीस्थळीं ॥४९॥
मग कवणे एके वेळीं ॥ पूजावया त्रिकाळीं ॥ ज्ञानवापीसी आली द्विजबाळी ॥ सुशीला सुंदरी ते ॥५०॥
मग वैशाख शुद्ध पौर्णिमेचे दिनीं ॥ त्रिकाळ ज्ञानवापीसी पूजोनी ॥ मग मंचक घातला अंगणीं ॥ ज्यंती मातेनें ॥५१॥
तेथें निद्रित झाली ते सुशीला ॥ व्योमी भासला शशी पूर्णकळा ॥ तंव तो गंधर्व कैसा अवलीळा ॥ प्रकटला मंगलकेतु ॥५२॥
तेणें अभ्रीं झांकोळला शशी ॥ मग प्रवर्तली मध्यनिशी ॥ मंचक घेऊनियां आकाशीं ॥ उसळला गंधर्व तो ॥५३॥
मंचकासहित नेली सुशीला ॥ तो घेऊनि गेला मलयाचला ॥ निद्रित असतां द्विजबाळा ॥ नेली अचेतन ते ॥५४॥
मग उदय  झाला मार्तंडासी ॥ तंव निद्रा हरली सुशीलेसी ॥ पाहे तंव मातापितृठायासी ॥ न देखेचि बाळा ते ॥५५॥
म्हणे मज घेऊनि आला हा कवण ॥ कीं मी देखतसें हें स्वप्न ॥ म्हणोनि मागुतें केलें शयन ॥ मंचकावरी तेधवां ॥५६॥
तंव निद्रा ये सुशीलेसी ॥ भ्रमित झालीसे मानसीं ॥ म्हणे हे तंव नगरी नव्हे काशी ॥ दिसतसे ब्रह्मारण्य ॥५७॥
स्वप्नीं कैंचा देखिला भास्कर ॥ हा तंव प्रत्यक्षचि साचार ॥ म्हणे स्वप्न नव्हे काय विचार ॥ वर्तला मज समजेना ॥५८॥
न दिसे ज्ञानवापी मंदिरें ॥ प्रासाद शिवालये मनोहरें ॥ सप्तखणी दामोदरें ॥ न देखें काशीपुरीचीं ॥५९॥
हें तंव ब्रह्यारण्य दारुण ॥ महातपस्वियांचे हें स्थान ॥ येथें महामृगेंद्र पंचानन ॥ गर्जताती महद्‌भूतें ॥६०॥
म्हणे येथें कैंची देशनगरें ॥ दशदिशा गर्जताती महाघोरें ॥ मग बोभाती दिर्घस्वरें ॥ कैसें घडलें कर्मसूत्र ॥६१॥
मग तो गंधर्व मंगलकेत ॥ अदृश्य्त परिसोनि मात ॥ मग दुरोनि आला धांवत ॥ सुशीलेजवळी तेधवां ॥६२॥
मग सुशीला म्हणे गंधर्वासी ॥ भला रे मला घेऊनि आलासी ॥ आतां शाप देऊं तुजसी ॥ तरी तुवां रक्षिला प्राण माझा ॥६३॥
आणि माझी मनोवृत्ती ॥ मी तंव पतिव्रता महाख्याती ॥ करितां ज्ञानवापीची भक्ती ॥ आणिलें तुवां गंधर्वा ॥६४॥
जो मज स्पर्शेल प्रथम नर ॥ तोचि माझे इच्छेचा पूर्णवर ॥ ऐसा माझे मनींचा निर्धार ॥ होतें मी कल्पित ॥६५॥
आणिका न वरीं सत्य जाणा ॥ तो श्रेष्ठ कां नव्हे त्रिभुवना ॥ पतीवांचूनि मज कवणा ॥ न व्हावा अंगस्पर्श ॥६६॥
तुवां लाविला प्रथम मज कर ॥ तरी तूंचि आतां माझा इच्छावर ॥ परी सुरतसंबंधविचार ॥ स्वयंवरेंविण न घडेचि ॥६७॥
स्वयंवर न घडे मातापितरांविण ॥ तूवां मज आणिलें निष्कारण ॥ आतां जन्मांतरीं तुजवांचून ॥ न वरीं आणिकातें ॥६८॥
आतां जरी जावें मातृगृहासी ॥ तरे थोर न्यूनता पितरांसी ॥ जन भेडसाविती तयांसी ॥ जे कन्या कोणी नेली होती ॥६९॥
आतां सर्वथा जन्मांतरावांचून ॥ नव्हे तुझे माझें सिद्ध करणे ॥ आतां तूं घे माझें भाददान ॥ जन्मांतरीं तूंचि वरुं ॥७०॥
मज ज्ञानवापी अंतरली ॥ आणि काशीपुरी अप्राप्त जाहाली ॥ इहलोक-परलोकांसी मुकली ॥ पूर्ण अभागिनी मी आतां ॥७१॥
मज येथें तुवां आणिलें ॥ मातापितरांसी आप्राप्त जाहालें ॥ ऐसें विचारितां सर्व कार्य नासलें ॥ निष्फळ जाहाला संसार ॥७२॥
जरी करावें तपासाधन ॥ तरी तपायोग्य नव्हे स्थान ॥ माझे मनोरथ न होती पूर्ण ॥ एक वाराणसीविरहित ॥७३॥
ऐसा संसार निष्फळ जाणोनी ॥ मग सुशीलेने जाणीतलें मनीं ॥ गंधर्वासी भाकदान देऊनी ॥ देह दग्धिला अग्रीमध्यें ॥७४॥
ऐसी ते सुशीला जाहाली अग्निहुत ॥ खेद पावला मंगलकेत ॥ मग विचारीतसे चित्तांत ॥ गंधर्व तो आपण ॥७५॥
मज अपराध घडला थोर ॥ जरी तिजसीं करितों बलात्कार ॥ तरी ते पतिव्रतापणें निर्धार ॥ शापिती मज आतां ॥७६॥
म्यां केला हरावयाचा पुरुषार्थ ॥ तें सर्वही कार्य जाहालें व्यर्थ ॥ सफळ नव्हे जी मनोरथ ॥ जाहालों दोषबाधित ॥७७॥
मज दिधलेंसे भाकदान ॥ जें आणिका न वरीं तुजवांचून ॥ शरीराचें केलें दहन ॥ जैसी पूर्णाहुती ॥७८।
स्त्री होऊनि पुरुषार्थ केला थोर ॥ देहीं माझा संकल्प निर्धार । तरी मी वृथा पुरुषार्थी नर ॥ धिक्‍ जीवित्व माझें ॥७९॥
मजसाठी केला देह दहन ॥ तरी माझें जीवित्व काय कारण ॥ ऐसा तो चिंताक्रांत होऊन ॥ केला देहत्याग ॥८०॥
ऐसीं दोघें जाहालीं अग्न्याहुती ॥ दक्षिणादिशीं मलयपर्वतीं ॥ षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ कैसा पुढार तयांचा ॥८१॥
तंव चंद्रसेन नामें महाराजा ॥ तयासी नसे पुत्रप्रजा ॥ त्याचिया उदरा गेली विप्रात्मजा ॥ सुशीला ते ॥८२॥
तो नंदिवर्धनींचा भूपती ॥ तयाची प्रिया नामें जयातंती ॥ तिचे उदरीं जन्मली महाशक्ती ॥ सुशीला ते ॥८३॥
राजयासी उत्साह जाहाला पूर्ण ॥ याचक तृप्त केलें सन्मानेंकरुन ॥ कन्येसी केलें नामधारण ॥ कलावती ऐसें ॥८४॥
रायें ज्योतिषी पाचारिले कौतुकें ॥ ते पाहाती कन्येचीं सामुद्रिकें ॥ तीं बरवीं उत्तमें सुलक्षणिकें ॥ उमटलीं दिसती ॥८५॥
बरवी शंखचक्रांची आकृती ॥ अंकुश कुंडल तियेचे हातीं ॥ म्हणोनि नाम कलावती ॥ होईल राजस्वामिनी ॥८६॥
ऐसी त्या चंद्रसेनाचें घरी ॥ जन्म पावलीं ते महासुंदरी ॥ तियेचें लावण्य त्रैलोक्यामाझारीं ॥ अनुपम जाहालें पैं ॥८७॥
तंव भद्रासेन नामें भूपती ॥ तयासी नाहीं पुत्रसंतती ॥ त्याच्या गृही जाहाली उत्पत्ती ॥ मंगलकेत गंधर्वाची ॥८८॥
तो सुवर्णखंडींचा राजेश्वर ॥ गृहीं लक्ष्मीचा बडिवार ॥ पूर्ण सर्वज्ञ जैसा सुरेश्वर ॥ तैसा तो भद्रसेन ॥८९॥
धर्मरजयवंती त्याची सुंदरी ॥ तो गंधर्व आला तियेचे उदरीं ॥ उत्साह जाहाला राजराष्ट्री ॥ सकळ जनांसी तेधवां ॥९०॥
मग राजयानें ज्योतिषी पाचारुन ॥ पुत्राचें केलें नामकरण ॥ नाम ठेविलें शूरसेन ॥ बहुत धन वेंचिले ॥९१॥
मग ते चंद्रसेनाची दुहिता ॥ मागीतली भद्रसेनसुता ॥ मग पर्णिली कलावती कांता ॥ शूरसेनें राजपुत्रें ॥९२॥
त्यांचे जाहालें होतें भाकदान ॥ तें घडलें पूर्वसुकृतें करुन ॥ मग भद्रसेनें राज्य संपूर्ण ॥ समर्पिलें शूरसेनासी ॥९३॥
ऐसा कलावतीसह राजा असतां ॥ दिन क्रमिले राज्य चालवितां ॥ सौभाग्य पुत्र पौत्र अरोगता ॥ त्या सुवर्णखंडमंडळीं ॥९४॥
तंव काशीचा ब्राह्मण एक ॥ महाअग्निहोत्री पुण्यश्लोक ॥ सुवर्णखंडीं गेला भिक्षुक ॥ चित्रपट घेऊनियां ॥९५॥
तेणें पट दाखविला राजयासी ॥ मग राजा म्हणे ब्राह्मणासी ॥ आतां तुम्हीं जावें आमुचे राणीसी ॥ चित्रपट दाखवावया ॥९६॥
मग तो गेला ब्राह्मण मंदिरीं ॥ जेथें असे ती कलावती सुंदरी ॥ परिचारिका जाऊनि झडकरी ॥ जाण्विती मात तियेसी ॥९७॥
मग थोर सन्मानिलें ब्राह्मणासी ॥ कलावतीनें वंदिलें त्यासीं ॥ म्हणे ब्राह्मणा कवणे देशीं ॥ राहाणें असे तुमचें ॥९८॥
ब्राह्मण म्हणे राहाणें काशीस्थानीं ॥ मणिकर्णिका असे संनिधानीं । तूं अससी पवित्र राजपत्नी ॥ अक्षय करिसी दानपुण्य ॥९९॥
तुझी परिसोनियां पुण्यकीर्ती ॥ चित्रपट आणिला तुजप्रती ॥ मग हर्षली ती कलावती ॥ चित्रपट देखिनियां ॥१००॥
मग कलावती म्हणे सुभटा ॥ आम्हांसी दाखवीं ह्या चित्रपटा ॥ तेणें कांहीं एक धर्मवाटा ॥ श्रुत होतील आम्हांसी ॥१०१॥
तुमचें राहाणें काशीक्षेत्रीं ॥ सुशील गंगास्नायी अग्निहोत्री ॥ तरी काशीतीर्थे लिहिलीं चित्रीं ॥ तीं दाखवीं आम्हांसीं ॥१०२॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ सखियांसह बैसली कलावती ॥ ब्राह्मण दाखवी तियेप्रती ॥ चित्रपट कसिआ पहा हो ॥१०३।
मंचकीं ठेवूनि चित्रपटासी ॥ ब्राह्मण म्हणे कलावतीसी ॥ आतां प्रथम तीर्थ परियेसी ॥ मणिकर्णिका हें ॥१०४॥
ही स्वर्गमोक्षाचा मार्ग पूर्ण ॥ सुरेंद्र इच्छिते इचें स्नान ॥ यक्ष किन्नर चतुरानन ॥ स्मरती मणिकर्णिकेसी ॥१०५॥
गंधर्व सिद्ध साधक योगाभ्यासी । महामुनिवर वैकुंठवासी ॥ ब्रह्मादिक या मणिकर्णिकेसी ॥ इच्छिती दर्शना ॥१०६॥
या मणिकर्णिकेचें तीरीं वसिजे ॥ इंद्रपदाऐसें राज्य प्रहरिजे ॥ जेणें स्वर्गमोक्षमार्ग पाविजे ॥ या मणिकर्णिकाद्वारीं ॥१०७॥
इचे तीरीं वाच्छिती पंचत्व ॥ हे शिवाची शक्ती महासत्त्व ॥ युगानुयुगीं इचें महत्त्व ॥ देवनदी हे पाहें ॥१०८॥
हे शिवभूषणा महासरिता ॥ तत्काळ पाविजे सायुज्यता ॥ दर्शन आचमन स्नान करितां ॥ नाहीं संदेह मुक्तीचा ॥१०९॥
किरणा धूतपापा सरस्वती ॥ गंगा यमुना ह्या पुण्यकीर्ती ॥ पंचगंगा जे नित्य स्मरती ॥ त्यांसी काळ न बाधीत ॥११०॥
ब्राह्मण म्हणे कलावतीसी ॥ आतां चित्रपटींचीं तीर्थे परियेसीं ॥ कवणें लिंगें स्थापिलीं ये वाराणसी ॥तीं परियेसीं आतां ॥१११॥
पंचलिंगे पंचमहाभूतांची ॥ दशलिंगे दश दिशांची ॥ आणि अष्ट लिंगें अष्ट कुलपर्वतांचीं ॥ जाणिजे सुलक्षणें ॥११२॥
नव ग्रहांची लिंगे नव हीं ॥ कश्यपस्त्रियांचीं तेरा हीं ॥ आणि सप्तऋषींचीं सप्त हीं ॥ आणि त्यांचिया स्त्रियांचें ॥११३॥
ऐसीं लिंगें सांगतां वाराणसी ॥ पराभव होतसे महादोषांसी ॥ विस्मय होत हरिहरांसी ॥ लिंगसंख्या करितां ॥११४॥
द्विज म्हणे कलावतीसी ॥ हे ज्ञानवापी तीर्थ पाहे कैसी ॥ हे निर्मिली जनहितार्थासी ॥ ईशानरुद्रें पैं ॥११५॥
ज्ञानवापी देखतां राजपत्नी ॥ तियेसी पूर्वजन्म सुचला ज्ञानीं ॥ मग ती पडली मूर्च्छा येऊनी ॥ ज्ञानवापी देखतां ॥११६॥
ऐसें ते मूर्च्छित जाहाली कलावती ॥ सखिया गजबजिल्या बहुतीं ॥ एक नाना उपचार जाणविती ॥ परी असंभाव्य ज्वर ॥११७॥
ज्वर उद्भवला महाउष्ण ॥ उपचारिती शीतळ चंदन ॥ एक शिंपिती शीतळ जीवन ॥ कुमुदिनीपत्रेंकरुनियां ॥११८॥
एकी रंभागर्भपत्रें शीतळें ॥ एकी पवन करिती अंचळें ॥ एकी सपक्षवातें मंजुळें ॥ उपचारितो सखिया पैं ॥११९॥
ऐसें नानापरीचे उपचार ॥ सखिया जाणविती अपार ॥ परी तो न शमेचि महाज्वर ॥ कलावतीचा ॥१२०॥
तंव चित्रांगी नामें एकी ॥ कलावीची परम सखी ॥ तिणें कलावतीसी उचलोनि मंचकीं ॥ बैसविली ते समयीं ॥१२१॥
ते अतिचतुर होती गुणांची ॥ तिणें परीक्षा जाणितली ज्वराची ॥ ते म्हणे हेचि औषधी याची ॥ जाणीतली साच म्यां ॥१२२॥
चित्रपट दिधला तिये करी ॥ म्हणे तीर्थे पहा हो काशीपुरीं ॥ हें वचन परिसोनि सुंदरी ॥ झालीसे सचेतन ॥१२३॥
मग सखियांसी बोले साक्षेपीं ॥ मज दाखवा गे रुद्रवापी ॥ तें माझें जन्मस्थान मी तपीं ॥ बैसलें होतें ॥१२४॥
ते ज्ञानवापी माझें माहेर ॥ माझिया मातापितरांचे निजघर ॥ तें दाखवा हो काशीपुर ॥ माझी जन्मभूमि ॥१२५॥
कलावती म्हणे चित्रागद ॥ तूं माझी सखी प्राणआनंदे ॥ धर्मकथेचिये पूर्णप्रदे ॥ परियेसीं उत्तर माझें ॥१२६॥
हे रुद्रवापी देखोनि उत्तम ॥ मज सुचला पूर्वजन्म ॥ रुद्रवापीसी मी नित्यनेम ॥ करीं पूजाविधि पैं ॥१२७॥
माझीं मातापितरें जीं पूर्वजन्मीं ॥ जयंती माता पिता हरिस्वामी ॥ काशीपुरी माझी जन्मभूमी ॥ माझें पूर्वनाम सुशीला ॥१२८॥
पूर्वी या रुद्रवापीच्या तटीं ॥ मी त्या सुखियांसी खेळें धाकुटी ॥ ते रुद्रवापी देखेन दृष्टीं ॥ तेव्हां स्वस्थ प्राण माझे ॥१२९॥
तंव चित्रांगी म्हणे कलावतीसी ॥ ऐसें पूर्वगत सुचलें तुजसी ॥ तरी ते परम निधान काशी ॥ केवीं आम्हां प्राप्त पैं ॥१३०॥
कलावती म्हणे भृत्यांसी ॥ तुम्हीं विज्ञापना कीजे रायासी ॥ त्वरावंत यावें मंदिरासी ॥ नातरी वेंचीन प्राण मी ॥१३१॥
तंव राजा बैसलासे भद्रासनीं ॥ मात जाणविली भृत्यांनी ॥ म्हणती तुम्हांसी राजगृहिणी ॥ पाचारिते मंदिरासी ॥१३२॥
तंव राजा सेवकवचनेंसी ॥ वेगीं आला मंदिरासी ॥ तंव कलावतीनें राजयासी ॥ प्रार्थियेलें बद्धहस्तीं ॥१३३॥
कलावतीं म्हणे स्वामीनाथा ॥ काशी कीजे पुण्यस्वार्था ॥ नाहीं तरी आम्हांसी थोर व्यथा ॥ होईल जी शेवटीं ॥१३४॥
ते काशी माझें पूर्वजन्मस्थान ॥पूर्वीं माझें तुम्हीं केलें हरण ॥ तें देखेन तैं स्वस्थ प्राण ॥ वांचतील माझे ॥१३५॥
तंव राजा म्हणतसे सुंदरी ॥ तूं अत्यंत माझी प्राणेश्वरी ॥ जे जे इच्छा उद्भवेल तुझे शरीरीं । ते ते प्रिय मजला बहु ॥१३६॥
तुझ्या मुखें उद्भवेल जें शब्दरत्न । तें माझ्या मनाचें पूर्ण भूषण ॥ हें समग्र राज्य तृणासमान ॥ मानीन शब्दें तुझिया ॥१३७॥
मग रायें पाचारिले पुण्यजोशी ॥ राज्य समर्पिलें मुख्य पुत्रासी ॥ मग निघता झाला वाराणशी ॥ कुटुंबिनीसहित ॥१३८॥
नव सहस्त्र ज्या शुभ्रश्वेत ॥ कपिला घेतल्या सालंकृत ॥ द्रव्यें रत्नें तरी गज मदोन्मत्त ॥ भरिले शत एक ॥१३९॥
पंचशत वाजी पवनगती ॥ हिरे घेतले महातेजदीप्ती ॥ महादिव्यांबरें अविंधमुक्तीं ॥ भरलीं उष्ट्र अपार ॥१४०॥
सवें सखिया घेतल्या पवित्रा ॥ ऐसी योजिली तिहीं काशीयात्रा ॥ दोघें सुस्नात जाहालीं पूर्वसूत्रा ॥ क्रमिती काशीमार्ग ॥१४१॥
आलीं मणिकर्णिकातीरीं ॥ तै कैसी देखिली दिव्य सुंदरी ॥ केले द्विज ब्राह्मण ॥ षट्‌कर्मिक जे ॥१४३॥
वेंचिले अश्वगजभांडारा ॥ धेनु दिधल्या द्विजवरा ॥ महादानें कलावतीं सुंदरा ॥ समर्पी सत्पात्रांसी ॥१४४॥
सुवर्ण वेंचिलें पद्मभरी ॥ रत्नमणिदान दिव्यांबरीं ॥ महामृगमद शिवद्वारीं ॥ वेंचिले अनाथासी ॥१४५॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ पूर्वेसी उदयो जाहाला दिनमणी ॥ ते रविरश्मी पडती वनीं ॥ महिमा मणिकर्णिकेचा ॥१४६॥
ते मणिकर्णिकेची वाळुका तीरीं ॥महासेतज दिसतसे सूर्यकरीं ॥ इतुकें ब्राह्मण मणिकर्णिकेचे तीरीं ॥ येते जाहाले गा अगस्ती ॥१४७॥
ऐसी देवनदी पुण्यजीवनी ॥ महिमा न सांगवे षडाननी ॥ ते शिवप्रिया चक्रपुष्पकरणी ॥ पूजिली कलावतीनें ॥१४८॥
मग कलावती आणि राजा ॥ पूजावया आलीं वृषभध्वजा ॥ षण्मुख म्हणे गा कुंभजा ॥ कैसा पूजिला विश्वनाथ ॥१४९॥
मुक्तचूर्णाचिया रंगमाळिकीं ॥ सुरेख दिसती रत्नमाणिकीं ॥ मणिकर्णिकेचिया उदकीं ॥ स्नपिला हर ॥१५०॥
समर्पिलीं चंदनादि द्रव्यें शीतळें ॥ रत्न मणि मुक्त सुवर्णकमळें ॥ शुद्ध कपिलाघृते निर्मळें ॥ प्रकाशल्या दिव्य सहस्त्र ज्योती ॥१५१॥
अगस्ति म्हणे षडानना ॥ माझे मनचाकाचिया घना ॥ शीतळ उपचार त्रिनयना ॥ बहु प्रिय किमर्थ ॥१५२॥
शिवसुत म्हणे गा कुंभोद्धवा ॥ जो शीतळ उपचार करी शिवा ॥ तो भक्त बहु प्रिय महादेवा ॥मज आणि वीरभद्राहून ॥१५३॥
कंठीं हालहलाची उष्णता थोर ॥ भाळीं तृतीय नेत्रींचा अंगार ॥ तो महाप्रळयींचा वैश्वानर ॥ करीतसे उष्णता ॥१५४॥
म्हणोनि शीतळ उपचार शिवा ॥ अत्यंत प्रिय गा घटोद्भवा ॥ शीतळ गंगा मस्तकीं महादेवा ॥ बहु प्रिय ॥१५५॥
मौळीं धरिला शीतळ शशी ॥ शीतळ कमळें प्रिय शिवासी ॥ शीतळ गंगोदक स्नपनासी ॥इच्छीतसे विश्वनाथ ॥१५६॥
जैसा चंदन प्रिय फणिवरां ॥ तरी तीं भूषणें असती शंकरा ॥ म्हणोनि नित्य मैलागरतरुवरा ॥ इच्छीतसे शिव आवडीनें ॥१५७॥
शीतळ शालिधान्याचिया अक्षता ॥ त्या विश्वनाथासी होती प्रिय तत्त्वतां ॥ शीतळ विभूती भवानीकांता ॥ प्रिय होय अत्यंत ॥१५८॥
ऐसा नानाउपचारीं शूळपाणी ॥ पूजिला सुवर्णखंडराजयांनीं ॥ पूजा समर्पिला गा अगस्तिमुनी ॥ ते मज न सांगवे ॥१५९॥
मग कलावती आणि राजेश्वरु ॥ आलीं ज्ञानवापीची पूजा करुं ॥ ते देखता न सांवरे गहिंवरु ॥ ते पतिव्रतेसी ॥१६०॥
स्मरलाअ पूर्वजन्मींचा वृत्तांत ॥ चक्षूंसी प्रवाहे अश्रुपात ॥ ते कलावती स्तुति करीत ॥ ज्ञानवापीची तेधवां ॥१६१॥
न सांवरेचि आनंद गहिंवरु ॥ सद्नदित जाहाला कंठस्वरु ॥ म्हणे माझी माता आणि पितरु ॥ तूचि ते ज्ञानवापी ॥१६२॥
पूर्वजन्मीं तुझीं भक्ती करितां ॥ वेळ क्रमीं येथेंचि खेळतां ॥ ते तूं जोडलीस वो आतां ॥ कल्पकोटी सामर्थ्ये ॥१६३॥
मग त्या कूपजळीं दंपती ॥ स्नानें करोनि पूजा समर्पिती ॥ सोपानें बांधिलीं मुक्तीं ॥ अमोघ रत्नीं माणिकीं ॥१६४॥
मग राजा आणि राजपत्नी ॥ बैसलीं ज्ञानवापीचे ध्यानीं ॥ मग पंच अहोरात्र पारणीं ॥ केली राजाकलावतींनी ॥१६५॥
मग अष्ट अहोरात्र उपवासी ॥ राजा कलावती सखिया दासी ॥ यांनी दश दिन व्रत मानेंसी ॥ केलें पारणें भक्तीनें ॥१६६॥
मग पक्षव्रतें घेतलीं तिहीं ॥ ज्ञानवापीचें स्मरण देहीं ॥ ज्ञानवापीची पूजा प्रत्यहीं ॥ करिती राजा राणी स्वर्ये तीं ॥१६७॥
मग घेतलीं त्यांहीं भासव्रतें ॥ तपें कृश जाहालीं बहुतें ॥ दंपत्यें एकचि गा मतें ॥ पूजिती ज्ञानवापीसी ॥१६८॥
ऐसी केलीं मासउपोषण ॥ पक्षव्रतें कृष्णचांद्रायण ॥ अगस्ति ऐसे क्रमिले गा दिन ॥ त्रयोदश मासवरी ॥१६९॥
ऐसीं राजा राणी आणि दासी ॥ एकाग्र पूजिलें ज्ञानवापीसी ॥ आश्चर्य वर्तलें त्रयोदशमासीं ॥ त्या ज्ञानवापीमध्यें ॥१७०॥
त्या कूपांतूनि जटियाळ ॥ पुरुष निघाला महाविशाळ ॥ कीं तो प्रकटला जाश्वनीळ ॥ भक्तीस्तव त्यांचिया ॥१७१॥
तयानें करीं धरिलीं कलावती ॥ ते साक्षात केली पार्वती ॥ राजा सर्वाभरणेंसी पशुपती ॥ केला तया जटियानें ॥१७२॥
जैशा हैमवतीच्या सखिया ॥ तैशा कलावतीच्या दासिया ॥ मानवी बुद्धी पालटलिया ॥ जाहाल्या दिव्यशरीरी ॥१७३॥
तंव स्वर्गपंथाचिया वाटा ॥ वाजिन्नल्या भेरी घंटा ॥ विमानें उतरलीं क्षितितटा ॥कैलासाहुनी ॥१७४॥
विमानीं अप्सरा गंधर्वगायन ॥ करीं कनकदंड चामरें पूर्ण ॥ संभ्रम विभ्रम शैलादिगण ॥ आले ते विमानीं ॥१७५॥
षण्मुख म्हणे गा अगस्तिमुनी ॥ कलावती आणि राजा विमानीं ॥ मग नेली कैलासभुवनीं ॥ शिवमंदिरीं समस्त ॥१७६॥
ऐसें ज्ञानवापीचें महिमान ॥ ज्यासी घडे स्नान दर्शन ॥ कैलासपद सायुज्यता ॥ होय दर्शनमात्रें ॥१७८॥
त्रिकाळ जपे जो ज्ञानवापी ॥ नित्य स्नान करी त्या कूपीं ॥ ज्ञानवापीजळें नित्य स्नपी ॥ विश्वनाथासी ॥१७९॥
ऐसा संवत्सर वर्ते एक नेम ॥ स्मरे जी पूर्वजन्म ॥ ऐसे सर्वसिद्धीचे स्थान उत्तम ॥ काशीपुरी ते ॥१८०॥
प्रथम रुद्रकूप नाम त्यासी ॥ पूर्वजन्म सुचला कलावतीसी ॥ मग गुणनाम झालें तियेसी ॥ ज्ञानवापी ऐसें ॥१८१॥
हे ज्ञानवापीची कथा पूर्ण ॥ अगस्तीसी निरुपी षडानन ॥ ते हे कथा कल्मषदहन ॥ परिसावी नित्य नित्य ॥१८२॥
शिवदास गोमा प्रार्थी श्रोतयांसी ॥ आतां सावधान होइंजे पुढती कथेसी ॥ आतां चतुर्वणाचारनीति कैसी ॥ दोषहरिणी कथा जे ॥१८३॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ज्ञानवापीवर्णनं नाम सप्तत्रिंशाध्यायः ॥३७॥
श्रीसांसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥श्रीरस्तु ॥
॥ इति सप्तत्रिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP