मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय २३ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशी खंड - अध्याय २३ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय २३ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रोते व्हा सावधान आतां ॥ परिसा ध्रुवासी कथा ॥ ध्रुवाची मांडिली पूर्ण व्यथा ॥ इंद्रादि देव मिळोनी ॥१॥पहा जो जैसा अनादि अंधकार ॥ त्यासी देखों न शकती रविकर ॥ तैसा तपीं अढळ देखोनि ध्रुव थोर ॥ न साहवे वज्रधरा ॥२॥मग वरुणासी म्हणे वज्रधर ॥ हा आपुला पूर्ण शत्रु ध्रुव साचार ॥ यासी शस्त्रें करावा मार ॥ तरी हा तापसी वधूं नये ॥३॥आतां शिळाधारीं करावी वृष्टी ॥ पाषाण प्रहरावे कोटयनुकोटी ॥ मग या गिरीच्या तळवटीं ॥ पावेल मृत्यूतें ॥४॥दोष नाहीं तुम्हां पांचांसी ॥ पृथ्वी आप तेज वायु गगनांसी ॥ शंकराचा वर असे तुम्हांसी ॥ तेणें तुम्ही निर्दोष ॥५॥मेघवृष्टीचेनि जळें ॥ सरिता धांवती महाबळें ॥ तेथें संहारती जंतुकुळें ॥ हें दूषण कोणासी ॥६॥त्या मिश्रित उद्भवे समीर ॥ वृष्टीसवें उठें हिम अपार ॥ तेणें होतसे जीवसंहार ॥ तो सांग पां कोणा दोष ॥७॥पर्वताचे तळीं लागतां वैश्वानर ॥ तेथें जंतूंचा होतसे संहार ॥ तो सांग पां आतां निर्धार ॥ कवणा दोष लागतसे ॥८॥ऐसीं पापपुण्यांचीं उत्तरें ॥ वरुणासी कथिलीं वज्रधरें ॥ मग त्या कर्दमाचिया कुमरें ॥ आज्ञा वंदिली मस्तकीं ॥९॥ऐसें करूनि एकमत ॥ ध्रुवासी मांडिला कल्पान्त ॥ तंव हे मात जाहाली श्रुत ॥ नारदमुनीसी तेधवां ॥१०॥मग नारदें येऊनि वैकुंठासी ॥ तेणें जाणविलें पुरुषोत्तमासी ॥ म्हणे जयजयाजी वैकुंठवासीं ॥ भक्तवत्सला विश्वेशा ॥११॥तुझी कृपा जयावरी पूर्ण ॥ तयासी काय करी दोष विघ्न ॥ आम्हीं त्रिलोकीं करितां गमन ॥ देखिलें कांहीं विपरीत ॥१२॥तें तुम्हां आधींच श्रुत असेल मुरारी ॥ तूं सर्वव्यापक श्रीहरी ॥ परी हें देखूनि माझी वैखरी ॥ स्थिर न होय सर्वथा ॥१३॥तरी हाचि असे जी प्रश्न ॥ सुनीति-उत्तानचरणांचा नंदन ॥ धुव नामें अतिविचक्षण ॥ भक्त तुझा जाण पां ॥१४॥सहस्त्र वरुषें अनुष्ठानीं ॥ तुम्हांसी स्मरतो चक्रपाणी ॥ आतां तपाचिया अवसानीं ॥ विघ्न मांडिलें सुरेश्वरें ॥१५॥ध्रुवाचिया अनुष्ठाना ॥ शंका बाधिली सहस्त्रनयना ॥ तेणें आज्ञा केलीसे वरुणा ॥ तो करील आताम शिलावृष्टी ॥१६॥त्यांहीं उपाय केले थोर ॥ परी तो न ढळे ध्रव किशोर ॥ मग आरंभिला विचार ॥ शिलावृष्टीचा ॥१७॥तो उत्तानचरणाचा सुत ॥ सांभाळीं तुझा प्रियभक्त ॥ ऐसा कथिला जी वृत्तान्त ॥ नारदें हरीसी ॥१८॥मग श्रीहरि म्हणे ब्रह्मसुता ॥ कायसें विघ्न माझिया भक्ता ॥ मी तयासी असें रक्षिता ॥ आधींच देखा सावध ॥१९॥मी असतां गा त्याचें ह्रदयीं ॥ मग विघ्न तेथें करील कायी ॥ मज भावें स्मरतां पाहीं ॥ मी तेथेंचि वसे निरंतर ॥२०॥माझे भक्त म्हणिजे अचेत ॥ आणि देव म्हणिजे सचेत ॥ हे दोघे ऐस्यें मिश्रित ॥ तेथें मृत्यु कैंचा संचरे ॥२१॥भक्त देवाचें भूषण ॥ भक्तावीण कैंचें देवपणा ॥ म्हणोनि भक्तांकारण ॥ आधीं रक्षितों साक्षेपें ॥२२॥भक्त नाहीं तेथें कैंचा देव ॥ प्रजा नाहीं तेथें कैंचा राव ॥ शींव नाहीं तेथें कैंचा गांव ॥ वसेल कैसा सांग पां ॥२३॥म्हणोनि पूर्ण भावें जो भक्त ॥ तेथेंचि मी असें अनंत ॥ जैसा जळाविरहित स्वस्थ ॥ कैसा वांचेल मत्स्य तो ॥२४॥शशिविरहित नाहीं कळा ॥ कुमुदिनी न सांडी जळा ॥ तैसा देव नव्हे वेगळा ॥ भक्तापासूनि सर्वथा ॥२५॥म्हणोनि गा ब्रह्मात्मजा ॥ मी भक्तांजवळी असें सहजा ॥ तेथें विघ्नकाळांच्या फौजा ॥ न शकती बाधूं कवणासी ॥२६॥मग काय करी नारायण ॥ काढिलें चक्र सुदर्शन ॥ तत्काळ पाठविलें आज्ञा करून ॥ ध्रुवाजवळी ॥२७॥चक्रासी आज्ञा करी मुरारी ॥ ध्रुवासंनिध जाईं सत्वरीं ॥ तेथें जाऊनियां निवारीं ॥ शिळावृष्टी संपूर्ण ते ॥२८॥तंव मी पांचवे दिवशीं ॥ वेगीं येऊनि ध्रुवापासीं ॥ जे इच्छा त्याचे मानसीं ॥ तो वर देईन तयातें ॥२९॥मग क्रमिता जाहाला नारदमुनी ॥ चक्र उतरलें मृत्युभुवनीं ॥ निमिषमात्रें मधुवनीं ॥ आलें ध्रुवाजवळिक ॥३०॥चक्र उतरलें भूमंडळीं ॥ गुप्त घिरटया घाली ध्रुवाजवळी ॥ तंव गर्जिन्नले व्योममंडळीं ॥ प्रळयमेघ ॥३१॥दुमदुमलीं सप्तपाताळविवरें ॥ धराकंप जाहाला सत्वरें ॥ कीं संख्या सरली एकसरें ॥ ब्रह्मकल्पाची ॥३२॥तडिता कडकडती महाघोषें ॥ कीं गर्जिन्नलीं दिग्ग्जांचीं मुखें ॥ मौळी खालीं करोनि दचके ॥ शेष भयें पाताळीं ॥३३॥वराह कूर्म सांवरिती सृष्टी ॥ शिळापाषाणांची होतां वृष्टी ॥ व्योमींहूनि अनंतकोटी ॥ शिळा पडती असंभाव्य ॥३४॥ अपार गगनाचिया पोटीं ॥ व्यापिले गिरी कोटयनुकोटी ॥ कितीएक क्षितितळवटीं ॥ पडती परोपरी ॥३५॥ध्रुव करीतसे अनुष्ठान ॥ तेथें फिरतसे सुदर्शन ॥ शिळा तोडीतसे महात्राण ॥ करें मृत्तिका ज्यापरी ॥३६॥शिळावृष्टि करितां वरुण ॥ त्यासी दाटला जी थोर शीण ॥ परी ध्रुवह्रदयीं नारायण ॥ न विसंबे सर्वथा ॥३७॥ध्रुवावरी पडती जे जे गिरी ॥ ते ते सुदर्शन तत्काळ निवारी ॥ येर पडती क्षितीवरी ॥ ते रुतती क्षितिगर्भीं ॥३८॥ऐसे अष्टही दिक्पती ॥ ध्रुवासी पीडिती बहुत रीती ॥ परी त्यासी रक्षिता कमलापती ॥ न बाधी पीडा सर्वथा ॥२९॥मग तेथें आला वज्रमुष्टी ॥ ध्रुव दाटला असेल शैलतळवटीं ॥ तंव तेथें देखिली धिरटी ॥ सुदर्शनाची ॥४०॥मग तो जाहाला आश्चर्य करिता ॥ म्हणे यासी श्रीहरि रक्षिता ॥ समर्थाचिया सुता ॥ केवीं गांजिती दुर्बळ ॥४१॥मग हरिचक्रासी करूनि वंदन ॥ ते देव आणि सहस्त्रनयन ॥ क्रमिते झाले अमरभुवन ॥ आपुलाले स्थानीं ॥४२॥ऐसें त्या ध्रुवाचें होतां अनुष्ठान ॥ आलें तपाचें अवसान ॥ आतां भेटेल भीनारायण ॥ सुनीतिसुतासी आदरें ॥४३॥जैसा आषाढीं वरुणवृष्टीसी ॥ चातक उल्हासे मानसीं ॥ तैसा हरीचिया भेटीसी ॥ कल्पीतसे ध्रुव तेव्हा ॥४४॥जैसी वर्षाऋतूसी ॥ मेघां गति होत आकाशीं ॥ तैसा श्रीहरी उदित मानसीं ॥ भेटीलागीं ध्रुवाचिया ॥४५॥ऐसी हे ध्रुवाची चरित्र-कथा ॥ ते परिसावी महापुण्य स्वार्था ॥ जेणें पराभवे महाव्यथा ॥ कल्पवरी दोषांची ॥४६॥सहस्त्र वर्षें जाहालें तप संपूर्ण ॥ ध्रुवें साधिलें अनुष्ठान ॥ तपांतीं पावला नारायण ॥ गरुडासनीं तो ॥४७॥मग त्या वैकुंठींहुनि अनंत ॥ भक्तकाजा आला धांवत ॥ यजाचें वहन विनतासुत ॥ पक्षींद्र जाण तो ॥४८॥जैसा गिरी मंदराचळ ॥ तैसा तो पक्षींद्र शरीरीं स्थूळ ॥ अवघा शुभ्र तेजकल्लोळ ॥ जैसा तो दुजा भानु ॥४९॥आलोहित ज्याचीं चंचुपुटें ॥ जैसीं महागिरीचीं कपाटें ॥ कृष्णचक्षु ते भ्रुकुटें ॥ तडाग जैसे दिसताती ॥५०॥ऐसा तो कश्यपाचा नंदन ॥ वैकुंठवासियाचें निजवहन ॥ त्याचा जन्मवृत्तान्त संपूर्ण ॥ पुढें सांगो श्रोतयांसी ॥५१॥असो त्या ध्रुवाजवळी ॥ हरि आलासे तत्काळीं ॥ रूप दाखविलें ते वेळीं ॥ विराटस्वरूप म्हणती जें ॥५२॥तो पक्षींद्र जैसा का पर्वत ॥ वरी आरूढला लक्ष्मीकांत ॥ ध्रुवें देखिला अकस्मात ॥ परम घवघवीत तेजस्वी ॥५३॥ध्रुव उठिला स्मेरवदनीं ॥ साष्टांगें लोळत हरिचरणीं ॥ त्यासी देखता झाला चक्रपाणी ॥ भरला धुळीं धूसर जो ॥५४॥ध्रुवें देखिला कैसा हरी ॥ जैसा सुवर्णाचळ पृथ्वीवरी ॥ कीं मेघ वोळला अंबरीं ॥ सुनीळ जैसा ॥५५॥तेथें शंखाची गर्जना थोरी ॥ पीतांबर विद्युल्लता निर्धारीं ॥ मग कृपाजळें ध्रुवावरी ॥ वृष्टी केली तत्काळ ॥५६॥मेरूसमान देखिलें नारायणा ॥ जैसी मेरूसी नक्षत्रांची प्रदक्षिणा ॥ तैसी हरिकंठीं मिरवली जाणा ॥ वैजयंती माळा मनोहर ॥५७॥जेवीं ग्रहनक्षत्रें अपार ॥ तेवीं हरिकंठीं नवरत्नांचा हार ॥ तरणी-तारापतीहूनि तेजाकार ॥ तोचि काय कौस्तुभमणी ॥५८॥देखिला चतुर्भुज घनश्याम ॥ भाळीं मृगमदतिलक उत्तम ॥ तो भृकुटीसी झाला संगम ॥ सिताअसितांचा गोपीचंदनें ॥५९॥रत्नदीप प्रकाशले मुकुटीं ॥ श्यामकांति अंगीं उटी ॥ तेथें शोभतसे गोमटी ॥ सिंधुसुता गौरवर्ण ॥६०॥ असो जी हरीची गुणव्याख्या आतां ॥ हे कोणे काळीं न सरे सांगतां ॥ श्रोता वक्ता हे उभयतां ॥ तृप्ती न पावती कदाही ॥६१॥ऐसा ध्रुवें हरि देखिला ॥ जैसा अवर्षणीं मेघ वोळला ॥ नातरी क्षुधितासी प्राप्त झाला ॥ पीयूषआहार ॥६२॥जैसें मूर्खासी जोडे वेदाध्ययन ॥ कीं रंकासी प्राप्त राज्यपद पूर्ण ॥ तैसें उचंबळलें अंतःकरण ॥ हरि देखूनि ध्रुवाचें ॥६३॥ध्रुव डवरला कर्मधुळीं ॥ म्हणोनि करीतसे आंघोळी ॥ श्रीहरिचरणगंगाजळीं ॥ निर्दोष झाला समूळ तो ॥६४॥मग चतुर्भुजीं ध्रुवातें ॥ ह्रदयीं आलिंगिलें प्रेमें बहुतें ॥ कीं चुकलें बाळक जननीतें ॥ सांपडलें पाहतां ॥६५॥तैसे ध्रुव आणि लक्ष्मीपती ॥ दोघे दाटले अतिप्रीतीं ॥ कीं शीतकर मोकली सोमकांतीं ॥ अमृतधारा अखंड ॥६६॥करुणारसाचिया लहरी ॥ उद्भवल्या ध्रुवाचिया शरीरीं ॥ तंव नाभी नाभी म्हणे श्रीहरी ॥ माझिया निजभक्ता ॥६७॥करें कुरवाळितां मुखकमळ ॥ अंबूनें दाटलें चक्षुमंडळ ॥ धुळीनें भरलें जें वक्षःस्थळ ॥ तें झाडिलें पीतांबरें ॥६८॥आलिंगन ॥ ध्रुवा-मेघश्यामां ॥ जैस परीस फेडी लोह-काळिमा ॥ तैसा ध्रुव भेटतां पुरुषोत्तमा ॥ फिटली भ्रांती समूळ ॥६९॥मग प्रवर्तली क्षमा शांती ॥ ध्रुव प्रवर्तला हरिस्तुती ॥ मग वाखाणिला लक्ष्मीपती ॥ विष्णुसहस्त्रनामें तेघवां ॥७०॥जें असे स्कंदपुराणीं ॥ तरी तें संस्कृत व्यासवाणी ॥ तेचि ओगरू श्रोतयांचे श्रवणीं ॥ महाराष्ट्रभाषा प्रियकर ॥७१॥ध्रुव म्हणे जी श्रीहरी ॥ महामत्स्या ह्रयग्रीववेषधारी ॥ कच्छरूपें पृष्ठी धरी ॥ चतुर्दश भुवनें पहा हो ॥७२॥वराहरूपा तुझे दशनी ॥ शमीपत्रतुल्य अवनी ॥ जैसा निष्कलंक व्योमस्थानीं ॥ शीतकर दिसे ॥७३॥जयजयाजी नरकेसरी ॥ प्रल्हादरक्षका श्रीहरी ॥ नखें विदारिला महाअरी ॥ हिरण्यकशिपू तो ॥७४॥अनागत भासती पुराण ॥ तुझें रूप परमाद्भुत वामन ॥ छळिसी महि आक्रमून ॥ बळी नृपासी तूं ॥७५॥तूं भृगुपती जी महाप्रतापा ॥ निर्वीर्य करिसी क्षत्रियतापा ॥ सज्जूनियां दिव्य चापा ॥ तो बधिला सहस्त्रार्जुन ॥७६॥दिक्पतींमध्यें महामणी ॥ वधिला सहअसुर रावणी ॥ बंधनमुक्त केला वज्रपाणी ॥ प्रमथांसहित ॥७७॥हलधररूप असे सगुण ॥ फेडावया अंबऋषीचे उसन कालिंदीतोय-समान ॥ शरीरकांती तुझी ते ॥७८॥अव्हेरूनि श्रुतिमार्ग शुद्ध ॥ रूप धरिसी तूं बौद्ध ॥ आत्मकार्य करावया सिद्ध ॥ हंसदशा दाविसी ॥७९॥धूम्रकेतूसी खङ्ग घेऊन ॥ म्लेच्छांचें करावया निर्दळण ॥ कल्किरूपें अवतरसी पूर्ण ॥ धर्ममर्यादा रक्षावया ॥८०॥ऐसा तूं दशविध अवतार धरून ॥ पाळिसी भक्तांलागून ॥ ऐसें वर्णिती वेद पुराण ॥ दयाळुवा ॥८१॥जयजयाजी श्रीअनंता ॥ शेषशायी लक्ष्मीकांता ॥ तूं सर्वांभूतीं पूर्ण भरिता ॥ आगमनिगमां अतर्क्य तूं ॥८२॥पक्षियांमाजीं गरुडेश्वर ॥ तो तूं होसी शार्ङ्गधर ॥ श्वापदांमाजीं होसी कुंजर ॥ तें रूप तुझें ओळखावें ॥८३॥स्थावरांमाजी चंदन ॥ तो तूं होसी नारायण ॥ स्वेदजांमाजीं परिपूर्ण ॥ तारापतिरूप तुझेंचि ॥८४॥पंचभूतांमाजीं अंबु जें अज ॥ ते तूं होसी गरुडध्वज ॥ तीर्थांमाजीं तीर्थराज ॥ जो प्रयागमाधव तों तूं ॥८५॥सागरांमाजीं जो ॥ क्षीराब्धी ॥ तो तूं शेषशायी अगम्यसिद्धी ॥ सप्तद्वीपवती वसुमतीमधीं ॥ जंबुद्धीप तूं होसी ॥८६॥कुळाचळांमाजीं मेरू ॥ तो तूं होसी शार्ङ्गधरू ॥ वृक्षांमाजीं पुण्यतरुवरु ॥ कल्पद्रुम तूं एक ॥८७॥नरांमध्यें जो पुण्यशीळ ॥ तो तूं होसी घननीळ ॥ क्षमेचा गुण जें नैश्चल्य ॥ तें रूप तुझेंचि जाणावें ॥८८॥वेदांमाजीं सामवेदोच्चार ॥ तो तूंचि गा श्रीधर ॥ शिळांमाजीं साचार ॥ शालिग्राम शिळा तूं ॥८९॥नक्षत्रांमाजी शीतकर ॥ तो तूं होसी लक्ष्मीवर ॥ अहींमाजी वासुकी थोर ॥ तोही श्रीवर तूं साच ॥९०॥सप्तस्वरांमाजीं पंचम ॥ तो तूं होसी मेघश्याम ॥ षड्रागांमध्यें उत्तम ॥ नटनारायण तूं होसी ॥९१॥ऋषीश्वरांमाजी चक्रपाणी ॥ तूं कपिल महामुनी ॥ कवींमध्यें प्रसिद्ध पुराणीं ॥ व्यासरूप तुझेंचि ॥९२॥शास्त्रांमाजीं जें भागवत ॥ तें तूं होसी श्रीअनंत ॥ श्रुतींमाजीं पूर्णभरित ॥ यजुर्वेद तूं एक ॥९३॥क्षीरामाजीं जें नवनीत ॥ तें तूं होसी गा श्रीअनंत ॥ श्रृंगारांमाजीं जें शुद्ध मुक्त ॥ तें तूं होसी श्रीहरी ॥९४॥जैं नेत्रीं दीजे सोगियांचें अंजन ॥ तैं जैसें सांपडे निघान ॥ तैसा तूं अनंत नारायण ॥ भासतोसी भक्तांलागीं ॥९५॥आतां असो हे ध्रुवाची स्तुती ॥ श्रोतयां मानसीं नव्हे तृप्ती ॥ आतां हरि ध्रुव अतिप्रीतीं ॥ बोलते जाहाले ॥९६॥ध्रुवा तूं मजकारणें ॥ देह दमविला पुरुषार्थपणें ॥ सहस्त्र वर्षें अनुष्ठानें ॥ महाभक्तीं बैसलासी ॥९८॥तरी तूं भक्तांमाजीं भक्तराव ॥ तुवां मज समर्पिला भाव ॥ आतां माग रे कैवल्यठाव ॥ जो अपेक्षित मानसीं ॥९९॥तुज नृपत्व देऊं वसुमतीचें ॥ जोंवरी मंडळ सवित्याचें ॥ कीं दिक्पतींमाजीं कुबेराचें ॥ पद देऊं तुज संपूर्ण ॥१००॥चतुर्दश कोटि सैन्येंसीं ॥ करूं यमपुरीचा निवासी ॥ कीं महाप्रळयीं जो दाही ब्रह्मांडासी ॥ तो आहवनीय करूं ॥ तुज ॥१०१॥कीं साठ कोटि परिवार ॥ जो वृष्टि करी कर्दमकुमर ॥ तयाचें पद देऊनि करूं जलधर ॥ सांग मजलागीं भक्तराया ॥१०२॥चौर्यायशीं लक्ष जंतुमात्रीं ॥ जो व्यापक मारुत सर्वत्रीं ॥ त्याचें अथवा ज्यासी प्रसवला अत्री ॥ त्या शशीचें देऊं पद तें ॥१०३॥कीं पद देऊं अमरावती ॥ करूं चतुर्दश रत्नांचा अधिपती ॥ यांमाजीं जें वसें चित्तीं ॥ तें सांगावें मज आतां ॥१०४॥तंव ध्रुव बोले स्वभावें ॥ पित्याचें सामर्थ्य पुत्रानें भोगावें ॥ तरी पुत्र होऊनि न यावें ॥ संसारीं तेणें सर्वथा ॥१०५॥आपण करिजे तपाचें संकट ॥ आणि पद इच्छिजे उच्छिष्ट ॥ तो व्यर्थ जन्मला संसारीं भ्रष्ट ॥ वृथा नरकाया तयाची ॥१०६॥जें तुझें चरणकमल अनुच्छिष्ट ॥ तेंचि मी अंगीकारीन सुभट ॥ इतर पदें जीं बोलिलीं उच्छिष्ट ॥ न अंगीकारीं मी कोणाचीं ॥१०७॥ध्रुवें प्रार्थिला ह्रषीकेश ॥ तुझिया चरणकमळीं असे सुगंधवास ॥ तेथें भृंग माझा मनअंश ॥ असावा सेवावयासी ॥१०८॥हरि तुझिया चरणगंगाजळीं ॥ आम्ही फेडूं जी कर्मधुळी ॥ माझी मनोमीन त्या पूर्ण जळीं ॥ असावा सर्वदा ॥१०९॥हरि हेचि कल्पना माझिया मना ॥ चरणसेवा दीजे नारायणा ॥ मग तो लक्ष्मीकांत प्रतिवचना ॥ बोलता जाहाला ध्रुवासी ॥११०॥ध्रुवासी वदे ह्रषीकेशी ॥ मी प्रसन्न जाहालों तुजसी ॥ तुज म्यां केलें कल्पायुषी ॥ हें तूं जाण सत्य पां ॥१११॥तुज वर दिधला असे अचळ ॥ पद योजिलें असे अढळ ॥ कल्पसंवत्सरींही निश्चळ ॥ भोगीं स्वर्गपद अक्षय ॥११२॥हरि म्हणे परियेसीं गा ध्रुवा ॥ पूर्वीं पूजिलें म्यां सदाशिवा ॥ तेणें मज प्राप्त केला ठेवा ॥ इच्छेसारिखा ॥११३॥ध्रुवपद आणि सुदर्शन ॥ हीं मज समपी पंचानन ॥ तें पद अभुक्तचि अजून ॥ ठेविलें असें तुजलागीं ॥११४॥मग ध्रुव बोले हो नारायणा ॥ तुवां कैसें पूजिलें पंचानना ॥ तें भावपूर्वक दयाघना ॥ श्रुत करवीं माधवा तूं ॥११५॥तंव बोलता झाला दैत्यारी ॥ सुनिश्चळ मनातें करीं ॥ जैसा म्यां पूजिला त्रिपुरारी ॥ परिसावें आतां ध्रुवा तूं ॥११६॥बहुतां भक्तीं मज प्रश्निलें ॥ परी मीं तयां नाहीं सांगीतलें ॥ त्यां माझें ह्र्दय संतुष्ट केलें ॥ म्हणोनि सांगों तुज आतां ॥११७॥ध्रुवा कोणे एके काळीं ॥ त्रिपुरदैत्य उदेला महाबळी ॥ त्यासी वधावया चंद्रमौळी ॥ रचिता झाला शस्त्रभार ॥११८॥दधीचिऋषीच्या अस्थी ॥ शिवें मागीतल्या प्रसन्नयुक्ती ॥ त्यांचें शस्त्र घडी पशुपती ॥ आपणांकारणें ॥११९॥ध्रुवा परिसावें आश्चर्य थोर ॥ ऐसें म्हणूनि कथिता झाला शार्ङ्गधर ॥ ते कथा परिसा जी सविस्तर ॥ शिवदास गोमा प्रार्थीतसे ॥१२०॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ध्रुवलोककथने ध्रुववरप्रदानं नाम त्रयोविंशाध्यायः ॥२३॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ इति त्रयोविंशाध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : September 28, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP