मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४८ वा

काशीखंड - अध्याय ४८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऐसें कद्रूचें दास्यत्व करितां ॥ अतिकृश जाहाली सुपर्णमाता ॥ मग वैनतेय झालासे प्रश्निता ॥ मातेप्रती ते काळीं ॥१॥
सुपर्णें देखिली कैशी ते जननी ॥ जैशी अंबूविणें कमळिणी ॥ कीं शशिकला राहूचे वदनीं ॥ काळवंडे जैशी ॥२॥
कीं माध्यान्हीं अमोघ सुमन ॥ तैसें देखिलें मातृवदन ॥ मग प्रश्निता जाहाला सुपर्ण ॥ मातेप्रती त्या समयीं ॥३॥
विनतेसी वदे महापुरुषार्थी ॥ माते तूं कष्टी कवण्या कर्थीं ॥ कीं पडलीस पुण्यतपस्वार्थीं ॥ म्हणोनि जाहालीस अशक्त ॥४॥
तंव बोलिली दक्षनंदिनी ॥ महापतिव्रता तपस्विनी ॥ म्हणे बा वंध्या पुत्रेंविण जननी ॥ ते जैशी मी दुःखी ॥५॥
जैसें दुःख अपुत्रिक मातेसी ॥ ते सरिताकूलींची वल्ली जैशी ॥ अफळ जन्म तियेचे कुशीं ॥ तैशी पुत्रमाता दुःखी ॥६॥
तंव सुपर्ण म्हणे वो माते ॥ तूं जें अनुवादलीस सत्य तें ॥ ते पुत्र धराभार हो विनते ॥ ऐशा दुःखी जयांच्या माता ॥७॥
तरुपर्ण वातें जैसें उडे नभीं ॥ नातरी चैत्यवृक्ष अशोभी ॥ कीं ते वृक्ष अफलित क्षितिगर्भीं ॥ भारें दाटे मही ते ॥८॥
तंव सुपर्ण म्हणे मातेप्रती ॥ तें मज सांगावें जेणें तूं दुःखी निश्चितीं ॥ मग पूर्वील कथा निरूपी गरुडाप्रती ॥ जो पण केला क्रीडतां ॥९॥
मग ज्ञानें पाहातसे सुपर्ण ॥ तंव आले उश्शापाचें अवसान ॥ म्हणे इसी घडलें होतें शापदान ॥ अरुणपुत्राचें ॥१०॥
तंव ताराक्ष म्हणे मातेसी ॥ तुवां विज्ञापावें कद्रूसी ॥ म्हणें जें अत्यंत प्रिय तुजसी ॥ तें मागावें मजप्रती ॥११॥
जेणें आम्ही होऊं दास्यमुक्त ॥ असे जे तुम्हां कवण प्रांत ॥ तेंचि करूं तुम्हांसी प्राप्त ॥ ऐसें पुसावें तियेसी ॥१२॥
मग विनता निघाली वेगेंसीं ॥ विज्ञापिती जाहाली कद्रूसी ॥ म्हणे मागावें जें प्रिय तुम्हांसी ॥ जेणें होईन मी दास्यातीत ॥१३॥
जें प्रिय असेल तुझ्या मनीं ॥ ते तूं वस्तु मागें वो बहिणी ॥ मग विचारीतसे शेषजननी ॥ काय पां मागों आतां ॥१४॥
मग कद्रू वदे प्रत्युत्तर ॥ आम्हांसी दीजे पीय़ूषआहार ॥ जेणें माझे सर्वही कुमर ॥ अजरामर होतील पैं ॥१५॥
आम्हांसी द्यावें अमृत ॥ मग तूं दास्यापासोनि मुक्त ॥ ऐशी आज्ञा घेऊनि त्वरित ॥ निघाली विनता ॥१६॥
मग कद्रूचें प्रतिवचन ॥ तें सुपर्णासी केलें निरूपण ॥ म्हणे त्यांसी प्रियभोजन ॥ दीजे पीयूषाचें ॥१७॥
मग ताराक्ष वदे प्रतिवचन ॥ मी अमृत आणीन भरंवशान ॥ यावरी विनता वदे वचन ॥ गरुडाप्रती ॥१८॥
जेथें आहे पीयुष ॥ त्या क्षीरसागरीं थोर प्रयास ॥ तेथें सुर-नरादि राक्षस ॥ रक्षण करिती सर्वकाळ ॥१९॥
मग ताराक्ष वदे प्रत्युत्तरीं ॥ म्हणे माते ते राक्षस दुराचारी ॥ समस्त मारूनि क्षीरसागरीं ॥ करीन रिघाव ॥२०॥
विनतात्मज म्हणे वो माते ॥ मज आहार दे वो दक्षसुते ॥ महावैश्वानर असे प्रज्वलित निश्चितें ॥ माझिया जठरींचा ॥२१॥
मग विनता वदे ताराक्षासी ॥ तूं क्रमितां क्षीरसमुद्रासी ॥ तेथें भक्षीं कुटिल निषादांसी ॥ ही माझी आज्ञा पैं ॥२२॥
त्या कुटिल निषादांसी भक्षितां ॥ पुत्रा ब्राह्मण ओळखें रे निरुता ॥ तो मारितां जाइजे अधःपाता ॥ चंद्रार्कवरी पैं ॥२३॥
मग ताराक्ष मातेप्रती पुसतसे ॥ म्यां ब्राह्मण ते जाणावे कैसे ॥ ते ओळखों येत ऐसे ॥ काय ती खूण सांगावी ॥२४॥
मग बोलिली ते दक्षनंदिनी ॥ तूं राक्षस भक्षितां त्या वनीं ॥ कंठीं लागेल जैसा अंगारक वन्ही ॥ ओळखें तोचि ब्राह्मण ॥२५॥
द्विजाचिया स्त्रियेसी व्यभिचार ॥ रतिरमणीं जो संघटे नर ॥ तो महाकुष्ठी होय निर्धार ॥ पृथ्वीमंडळीं ॥२६॥
पूर्वपुण्य गांठीं असेल जरी ॥ तरी तो कष्टी न होय जन्मवरी ॥ मग त्यासी चुकेल येरझारी ॥ चौर्‍यायशीं गर्भींची ॥२७॥
कुष्ठी न होय तरी तो होय पिसा ॥ अपस्मारें भ्रमे दाही दिशा ॥ महादीर्घदोषिया कर्मव्यवसां ॥ पडे तो नर ॥२८॥
ब्रह्मस्वाचा जो धरी अभिलाष ॥ तो विषासमान करी गा नाश ॥ मग ऐसें जाणोनि तो गरुडेश ॥ उडाला गगनीं ॥२९॥
तो महाक्षुधेचेनि ज्वाळीं ॥ निषादांसी भक्षीतसे वनस्थळीं ॥ तंव अवचितांचि कंठनाळीं ॥ लागला वन्ही ॥३०॥
ताराक्ष वमूनि टाकी पृथ्वीवर ॥ तंव ते स्त्री देखिली धीवरी ॥ ज्ञानें पाहे तंव तिचे उदरीं ॥ गर्द ब्राह्मणाचा ॥३१॥
मग सुपर्ण उडे खगांतरीं ॥ आला सुवर्णाचलाचे पाठारीं ॥ तेथे देखिला तपश्चर्या करी ॥ पिता कश्यप तो ॥३२॥
कश्यपें देखिलें ताराक्षासी ॥ मग आलिंगिला ह्रदयासी ॥ पुत्रदर्शनें तो महाऋषी ॥ आनंदला ते समयीं ॥३३॥
मग स्वामी म्हणे गा अगस्ती महंता ॥ पुत्रदर्शनें आनंदला तो पिता ॥ जैशी आनंदे संगमीं सरिता ॥ जळीं जळ मिळतां पैं ॥३४॥
कीं जैसें महातीर्थयात्रेसी ॥ धारास्नपन होय शिवासी ॥ आनंदें हर इच्छी पूजेसी ॥ तैसा पिता पुत्रदर्शनें ॥३५॥
मग पित्यासी वदे पक्षीश्वर ॥ स्वामी मज दीजे जी पूर्ण आहार ॥ सहस्त्र वर्षें क्षुधातुर ॥ मी असें जी स्वामी ॥३६॥
तंव कश्यप म्हणे सुपर्णा ॥ आतां तूं परियेसीं माझ्या वचना ॥ जेणे मिळसी पूर्ण भोजना ॥ तें सांगों तुज आतां ॥३७॥
धनेंद्रनामें वाणिज्यकर ॥ तो काशीमध्यें होता पूर्वापार ॥ तेणें प्रसन्न करूनियां शंकर ॥ मागितले पुत्र दोनी ॥३८॥
सुवर्णकनामें तो प्रथम पुत्र अवधारा ॥ प्रसूतिक नामक दूसरा ॥ मग निमालिया त्याचिया पितरा ॥ लागला कलहो दोघांचा ॥३९॥
ते द्रव्यलोभाचे निमित्तें ॥ हाणूं म्हणती एकमेकांतेम ॥ दोघे बंधु परी प्रीतिमार्गातें ॥ न स्वीकारिती ॥४०॥
मग ते काशीचे लोक चांग ॥ तुळोनि विभागिती त्यांचा द्रव्यभागा ॥ परी भांडती ते बंधुवर्ग ॥ न घेती प्रीतीनें भागातें ॥४१॥
ऐसें त्या दोघांचें नित्य भांडण ॥ त्यांचे कलहा त्रासले सर्व जन ॥ मग ते देते जाहाले शापदान ॥ एकमेकां ते काळीं ॥४२॥
प्रथम बोले वडील सहोदर ॥ तूं होशीर कूर्म जलचर ॥ येरू म्हणे तूं होशील कुंजर ॥ स्थलचर जो कां ॥४३॥
ऐसें एकमेकांसी शापदान ॥ विग्रह जाहाला करितां भांडण ॥ तंव तत्काळ धांविन्नले गण ॥ त्रिपुरांतकाचे ॥४४॥
काळभैरव आणि विकटमूर्ती ॥ देहलीविनायक परशुहस्ती ॥ मग त्या दोघां बधुवर्गाप्रती ॥ ताडिते जाहाले महाद‍भुत ॥४५॥
मग तो बोलिला गजेंद्रनाथ ॥ म्हणे तुम्हां काय गा एवढा स्वार्थ ॥ काशीमध्यें असोनि द्रव्यार्थ ॥ पापी तुम्ही कल्पितां ॥४६॥
येथें काशीजंतूंचा जो सर्व व्यापार ॥ तो कर्ता करविता पूर्ण शंकर ॥ तुम्ही मंदमती ॥ अतिक्रूर ॥ न राहिजे काशीमध्यें ॥४७॥
येथें शिवसूत्रें चालती जंतु ॥ शाप-उच्छापांची वृथाचि मातु ॥ तुमचें भांडण तोडील विनतासुतु ॥ सुपर्ण तो पैं ॥४८॥
मग सुवर्णिक आणि प्रसूतिक ॥ त्यांसी खेदिता जाहाला विनायक ॥ जो गजेंद्र महाविन्घांतक ॥ घातले तेणें बाहेरी ॥४९॥
येथें नाहीं रे शिवआज्ञेवांचून ॥ तुम्हां वाराणसी नव्हे पावन ॥ तुम्ही व्हाल रे भक्ष्य भोजन ॥ गरुडेश्वराचें ॥५०॥
ऐसे ते दोघे बंधु दुराचारी ॥ शिवगणीं घातले काशीबाहेरी ॥ मग सुवर्णाचलाचे पाठारीं ॥ क्रमिते झाले दोघेही ॥५१॥
त्यांसी घालितां पंचक्रोशीबाहेरी ॥ शापदान संघटलें शरीरीं ॥ देहपालट झाला झडकरी ॥ झाले ते कूर्म-कुंजर ॥५२॥
मग त्या महामेरूचे पाठारीं जाण ॥ तेथें क्रमिते जाहाले दोघेजण ॥ मग सुवर्णसरोवर पूर्ण ॥ देखिलें तिंहीं ॥५३॥
शत योजनें तडाग देखिला ॥ अवघा पूर्ण जीवनें आथिला ॥ मग त्या पूर्ण नीरीं एक प्रवेशला ॥ कूर्मरूप होऊनियां ॥५४॥
कुंजर संचरला वनस्थळीं ॥ कूर्म तो राहिला जळीं ॥ परी कलह कोणते काळीं ॥ न तुटेचि पैं त्यांचा ॥५५॥
कश्यप म्हणे गा गरुडेश्वरा ॥ तूं जाईं त्या वायव्यकोणीं सरोवरा ॥ ते कूर्म-कुंजर तुझिया आहारा ॥ निर्मिले पुत्रा पैं ॥५६॥
ऐसे ते दुराचारी अपराधी ॥ निंरतर भांडती दुष्टबुद्धी ॥ दोधे चारा घेऊनि मग युद्धीं ॥ प्रवर्तती नित्यकाळ ॥५७॥
तों कैसा उडाला पक्षीश्वर ॥ पक्षें झांकला दिनकर ॥ कीं पर्जन्यीं जैसा गंधर्वेश्वर ॥ लोपवी सोमसूर्यातें ॥५८॥
मग देखिलें सुवर्णसरोवर ॥ तेथें भांडती कच्छ आणि कुंजर ॥ पशु जाहाले अहंकार ॥ न सांडिती ते दोघे ॥५९॥
तरी त्या कच्छ-कुंजरां दोघांजणां ॥ कैसें लक्षिलें त्यांचिया प्रमाण ॥ कुंजर देखिला नयनें जाणा ॥ त्रयोदश योजने ॥६०॥
द्वादर योजनें त्याचा पसर ॥ इतुका प्रमाण असे तो कुंजर ॥ आतां कूर्म जो जळचर ॥ किती संख्या पैं त्याची ॥६१॥
पसर द्वादश योजनें त्यांचा ॥ आणि चतुर्दश योजनें उंचा ॥ ऐसा त्याचा शरीरसंख्य़ेचा ॥ लक्षिला भावो ॥६२॥
ऐसे भिडतां देखिले दोनी ॥ कीं पर्वतां होतसे संघटणी ॥ मग ते दोघे दोहीं चरणीं ॥ धरिले गरुदे ॥६३॥
झडपिले पक्षांचे फडत्कारीं ॥ दोहीं चरणीं जैसे उचलिले गिरी ॥ मग प्रवेशला गगनोदरीं ॥ एकवीस मंडळें ॥६४॥
धरिलें नखाग्राच्या मुष्टी ॥ मग तो क्रमी ब्योमाचे पोटीं ॥ कीं दोनी फळें एकचि देठी ॥ नेतसे पक्षींद्र ॥६५॥
ऐसा नभी क्रमीतसे ताराक्ष ॥ बैसावया पाहातसे वृक्ष ॥ जैसा गजस्थानीं सहस्त्रांक्ष ॥ जय पावे गिरीपासोनि ॥६६॥
ऐसा क्रमीतसे नभभार्गीं ॥ तंव मेरुपाठारीं दक्षिणभागी ॥ महावृक्ष देखिला उंच वेगी ॥ एकवीस स्वर्गवरी ॥६७॥
ताराक्ष पाहे भूमंडळी ॥ तंव वृक्ष देखिला जांबळी ॥ खांदिया देखिल्या ब्योमपोकळीं ॥ गेलिया अष्ट दिशा ॥६८॥
मग त्या वृक्षाचिया लतेसी ॥ ताराक्ष बैसला खांदीसी ॥ मग पाहे वृक्षाचिया पेडासी । देखिलें सरोवर ॥६९॥
त्याची पेड द्वादश योजनें ॥ सरोवर आथिलें पूर्ण जीवनें ॥ त्या वृक्षाचें फळ जैसें वारण ॥ ऐरावतातुल्य ॥७०॥
तें फळ पडतां सरोवरीं ॥ मग पूर्ण होय त्याची रसधारी ॥ मग तें अंबु वाहे सागरीं ॥ भरती सप्तही समुद्र ॥७१॥
मग त्या सरोवराचें जीवन ॥ शेवाळमिश्रित होतसे फेन ॥ तेथें निपजे चौसष्टिक सुवर्ण ॥ त्या नांव जांबूनद ॥७२॥
मग फांदी गेली वायुकोणीं ॥ तेथें ऋषीश्वर बैसले ध्यानीं ॥ वालखिल्यनामक महामुनी ॥ ते विधीचे कुमर ॥७३॥
तों सुपर्णाचे भारें डाहाळी ॥ त्राणें कडाडली नभमंडळी ॥ ते ब्रह्मसुत पडतील भूतळीं ॥ म्हणोनि धरिली सुपर्णे ॥७४॥
कच्छ कुंजर चरणमुष्टीं ॥ डाहाळी धरिलीसे चंचुपुटीं ॥ मग तो उतरला गिरिकुटीं ॥ हिमाद्रीप्रती ॥७५॥
ते डाहाळी लागतांचि पर्वत ॥ अवघ जाहाला हेमवंत ॥ मग ते ब्रह्मयाचे सुत ॥ ठेविले हिमाद्रीसी ॥७६॥
मग ते गज कूर्म पूर्णंवैरी ॥ गरुडें भक्षिले उदरभरी ॥ मग सुवर्णाचलाचिया पाठारीं ॥ साधिलें उड्डाण ॥७७॥
मग काय करी विनतानंदन ॥ तेणें अमृताचा मांडिला प्रयत्न ॥ तेथूनि क्रमिता जाहाला भुवन ॥ अमरेशाचें ॥७८॥
तो अमरभुवनासी जाऊनी ॥ अमृत पाहातसे नयनीं ॥ तंव बोलिली गगनवाणी ॥ गरुडासी ते काळीं ॥७९॥
म्हणे कां पडसी चिंताविवसीं ॥ आतां तूं जाईं क्षीरार्णवासी ॥ तेथें पंच कुंडें अमृताचीं परियेसीं ॥ भरलीं असती ॥८०॥
मग तेथोनि कश्यपनंदन ॥ करी क्षीरार्णवासी उड्डाण ॥ तेणें क्षीराब्धि देखिला पूर्ण ॥ चौसष्ट लक्ष योजनें ॥८१॥
तो पृथ्वीचा आवरण समुद्र ॥ तेथें जाऊनि बैसला तो पक्षींद्र ॥ जैसा राहु ग्रासी अमृतचंद्र ॥ तैसा ताराक्ष पीय़ूषी ॥८२॥
तेथें जंव गेला विनतासुत ॥ तंव देखिले तेथें राखणायित ॥ संख्या शत सहस्त्रगणित ॥ हरीचे गण असती ॥८३॥
तेथें भौमराव तो गणाधीश ॥ त्यावरी उठावला हो पक्षीश ॥ पीयूष प्राशन करावें हा उद्देश ॥ तंव हटकिला भौमें ॥८४॥
तो अमरेशाचा दूत बलाढयवृत्ती ॥ त्यासी गरुडें झडपिलें पक्षवार्ती ॥ चरणीं विदारूनियां प्राप्ती ॥ केली यमपुराची तया ॥८५॥
तेणें पळ सुटला रक्षणकरां ॥ एक धांविन्नले अमरपुरा ॥ त्यांहीं श्रुत केलें त्या वज्रधरा ॥ शचीरमणातें ॥८६॥
मग सर्व सुरेंसीं वज्रधर ॥ रथीं बैसला जयंतकुमर ॥ मग अमृतकाजीं धावणेंकर ॥ झाला इंद्र तो ॥८७॥
ऐसा निघाला शचीकांत ॥ सवे निजवहन चतुर्दंत ॥ ऐसा स्वभारेंसीं अमरनाथ ॥ आला क्षीरार्णवासी ॥८८॥
ऐसा आला सहस्त्रनयन ॥ तेणें पाचारिला सुपर्ण ॥ तंव तो पक्षींद्र कोपायमान ॥ पूर्ण जाहाला ते काळीं ॥८९॥
मग पक्षाचेनि झंझावातें ॥ देव पराभविले कश्यपसुतें ॥ मग प्रवर्तला महामल्लयुद्धातें ॥ ताराक्ष तो ॥९०॥
सुपर्णा आणि देवेशा ॥ महायुद्ध मांडिलें परियेसा ॥ दोघे बंधु परी महाआवेशा ॥ चढले महाद्‍भुत ॥९१॥
शस्त्रें आव्हानिलीं सहस्त्रनयनें ॥ तीं गरुडासी जैशीं शुष्कतृणें ॥ कीं पर्वतावरी पडिजे पर्जन्यें ॥ तेवीं गरुडा तृणतुल्य ॥९२॥
मग कोपला तो सहस्त्राक्ष ॥ तेणें वज्रें हाणीतला ताराक्ष ॥ कीं तो बिल्वपत्रें विरूपाक्ष ॥ पूजिला जैसा ॥९३॥
न मानीच वज्राचा प्रहार ॥ जैसा कमळीं हाणीतला कुंजर ॥ कीं तरुणर्णें महागिरिवर ॥ ताडिजे जैसा ॥९४॥
मग विनतासुत काय करी ॥ नखाग्रें उत्पाटिला महागिरी ॥ मग हाणीतला तो तो वज्रधारी ॥ गरुडें तेणें ॥९५॥
तो अंगासी लिगटला पाषाण ॥ तेणें त्रासला सहस्त्रनयन ॥ तेणेंचि गुणनाम जाहालें सुपर्ण ॥ गरुडेश्वरासी ॥९६॥
घायीं त्रासिला तो सुरपती ॥ वैनतेयें हाणीतला वज्रहस्तीं ॥ भेणें पळाला तो अमरावतीं ॥ निजगृहा आपुलिया ॥९७॥
ऐसा वज्रधर पळाला ॥ विनतासुत विजयी जाहाला ॥ मग सुपर्ण प्रवेशला ॥ अमृत हरावयासी ॥९८॥
तंव तेथें होता हुताशन ॥ तो चौफेरी प्रबळला कृशान ॥ मग काय करी तो सुपर्ण ॥ वन्हीच्या ज्वाळांसी ॥९९॥
तेणें गगनीं साधिलें उड्डाण ॥ चंचुपुटीं भरिलें मंदाकिनीजीवन ॥ मग शांत केला हुताशन ॥ आमृतकुंडींचा तो ॥१००॥
मग काय करी तो सुरेश्वर ॥ वैकुंठासी पाठविला हेर ॥ तेथें प्रार्थावया शार्ड्गधर ॥ अमृतकाजीं ॥१०१॥
इंद्रें पाचारिला अंगिराकुमरु ॥ जया नाम बृहस्पति देवगुरु ॥ त्यासी पुसता जाहाला विचारु ॥ गरुडाचा पैं ॥१०२॥
म्हणे जी हा कवणाचा कवण ॥ महापुरुषार्थी कवणाचें वरदान ॥ हा एवढा संपूर्ण ॥ कवण माता पिता याचे ॥१०३॥
तंव देवगरु वदे सहज ॥ हा तरी धाकुटा बंधु तुज ॥ यासी वोढवलें मातृकाज ॥ म्हणोनि आला सुपर्ण हा ॥१०४॥
इतुका परिसूनि वृत्तांत ॥ सुरपती राहिला निवांत ॥ बृहस्पती आणिक सांगत ॥ वृत्तांत त्या गरुडाचा ॥१०५॥
इंद्रासी वदता झाला बृहस्पती ॥ हा पक्षिकुळाधिपती ॥ ऐसा वर दिधला याप्रती ॥ विरिंचिनाथें ॥१०६॥
मग अमृत घेऊनि पक्षीश ॥ मार्गीं निघाला तो सपीयूष ॥ तंव धांविन्नला ह्रषीकेश ॥ अमृत घ्यावयाकारणें ॥१०७॥
धांवूनि आला मेघश्याम ॥ अमृत नेतां देखिला विहंगम ॥ हाटकिता जाहाला पुरुषोत्तम ॥ गरुडाप्रती ते काळीं ॥१०८॥
हरि म्हणे रे वनचरा ॥ अमृत टाकीं रे मत्स्यआहारा ॥ कीं जाऊं पाहासी यमपुरा ॥ असतां आयुष्य ॥१०९॥
म्हणोनि हाणितला गदाघातें ॥ आणिक बाणें विंधिला बहुतें ॥ ते दर्भपत्राऐसे गरुडातें ॥ लागती अंगीं ॥११०॥
मग ज्ञानें पाहे लक्ष्मीकांत ॥ तंव गरुडाचा न दिसे मृत्युअंत ॥ बहु शस्त्रें हाणितां वैनत ॥ परी हरीस न मानी तो ॥१११॥
ऐसिया देखोनि गरुडाच्या पुरुषार्था ॥ महा आश्चर्य वाटलें वैकुंठनाथा ॥ अघटित देखोनि आपुलिया चित्ता ॥ हरिनें विचारिलें मनी ॥११२॥
यासी युद्ध करितां संपूर्ण ॥ तरी हा नाटोपे सर्वथा जाण ॥ तृणतुल्य केलें क सुदर्शन ॥ आतां युद्ध ते कायसें ॥११३॥
हा पुरुषार्थी जाणवला आम्हां ॥ युद्धीं न जिंकवे विहंगमा ॥ ऐसें मनीं जाणवलें मेघश्यामा ॥ मग काय करिता जाहाला ॥११४॥
आतां हाचि निर्धार पूर्ण ॥ जे ह्या पक्षींद्रासी होइजे प्रसन्न ॥ मग हरि म्हणे भुजा उभारून ॥ वर मागें गरुडा तूं ॥११५॥
तंव हास्य करी गरुडेश्वर ॥ कल्पद्रुमासी प्रसन्न केवीं पांगार ॥ काय इच्छा पुरवील पाथर ॥ चिंतामणीची पैं ॥११६॥
गगनीं उद्भवलिया तारा ॥ त्या काय लपवितील दिनकरा ॥ मृगेंद्र काय मागेल मयूरा ॥ ऐसें केवीं घडे ॥११७॥
सरिता सागरासी प्रसन्न ॥ तरी हा शब्द गा अप्रमाण ॥ महापर्वतासी शुष्क तृण ॥ काय पां देऊं शकेल ॥११८॥
तरी परियेसीं गा मधुसूदना ॥ ही विपरीत देखिली विचारणा ॥ मी समर्थ तूं माग रे कृपणा ॥ इच्छा मनोभावें ॥११९॥
जें असेल त्रैलोक्याविरहित ॥ तुज कवणे काळीं नव्हे प्राप्त ॥ तुज मनापरीस प्रिय अत्यंत ॥ तें मी देईन श्रीहरी ॥१२०॥
त्रैलोक्यमंडळीं ज्या ज्या वस्ता ॥ हरी त्या देऊं शके भलता ॥ त्याविरहित अपूर्व वरें आतां ॥ माग तें मज दातयासी ॥१२१॥
तंव बोलिला तो नारायण ॥ तूं गृहस्थ मी तुझ्या ब्राह्मण ॥ तरी तूं होईं गा माझें वहन ॥ सुपर्णा आतां ॥१२२॥
गरुड म्हणे नारायणा ॥ मी जन्मलों याचिया कारणा ॥ तूं स्वामी मी सेवक जाणा ॥ रक्षीं मज अनाथासी ॥१२३॥
आजि सफळ जन्मदिन आमुचा ॥ जो लाभ प्राप्त हरिचरणांचा ॥ आतां तुझिया चरणकमळांचा ॥ घेईल पृष्ठीं भार ॥१२४॥
सुपर्ण म्हणे जी श्रीअनंता ॥ मज त्या चरणकमळींची अपूर्वता ॥ तेथें माझें मानस क्रीडतां ॥ पावेन महासुख ॥१२५॥
तें हरिनाम जपतां ह्रदयांत ॥ म्हणोनि मी जाहालें शक्तिमंत ॥ पुरुषार्थपणें बोलिलों ॥ मात ॥ तुमची कृपा म्हणोनि ॥१२६॥
मग संतोषला नारायण ॥ म्हणे बा गरुडा तूं ब्रह्म सगुण ॥ रथीं ध्वजस्तंभीं आरोहण ॥ असावें सर्वकाळ ॥१२७॥
वैनतेय म्हणे मी ह्रषीकेशी ॥ माता जाहालीसे कद्रूची दासी ॥ स्वामी ते निवारोनी विवसी ॥ य़ेईन मागुता ॥१२८॥
जो मी पुरुषार्थ वदलों वैखरीं ॥ तो तूंचि माझ्या ह्रदयीं श्रीहरी ॥ हे तुवांचि देखिली आपुली थोरी ॥ माझेनि मुखें ॥१२९॥
मज हांक माराल ज्या वेळीं ॥ तेव्हांचि असेन चरणांजवळी ॥ मग पहुडले हरी तये वेळीं ॥ मग आला वज्रधर ॥१३०॥
ऐसा गरुडासमीप आला अमरेश ॥ तेणें ह्र्दयीं आलिंगिला पक्षीश ॥ म्हणे आजि सफल जन्मदिवस ॥ बंधुवा तूं भेटलासी ॥१३१॥
मग सुपर्णासी वदे सहस्त्रनयन ॥ तुम्हांसी मानवला नारायण ॥ ऐसा तुमचा पुरुषार्थ कवण ॥ तो सांगावा बंधु मज ॥१३२॥
म वदता जाहाला विहंगम ॥ आपुला सांगे जो पुरुषार्थधर्म ॥ आणि पुरुषार्थाचा जो करी नेम ॥ तो पुरुष निंद्य जगीं ॥१३३॥
परी बंधुपणें तुवां पुशिलें ॥ तरी तुम्हां पाहिजे सांगीतलें ॥ तुजसी मी विभक्त न बोलें ॥ सुरेश्वरा बंधुवा ॥१३४॥
तूं माझा ज्येष्ठ बंधु सुरनाथ ॥ तुम्हांसी सांगीतला पुरुषार्थ ॥ तरी सत्यचि मानावा जी अर्थ ॥ माझिया शब्दाचा तुम्हीं ॥१३५॥
ही सप्तद्वीपवती मेरुमेदिनी ॥ कुळाचळांसी पृष्ठीवरी घेऊनी ॥ तुझी अमरावती चंचुपुटीं धरूनी ॥ उडों शकें स्वर्गीं ॥१३६॥
सुपर्णासी वदे सुरपती ॥ ऐसा पुरुषार्थीं बंधु मजप्रती ॥ हा अमृतकुंभ मज हातीं ॥ दिधला असे महादेवें ॥१३७॥
मज मागेल तो शूळपाणी ॥ मग म्यां अमृत द्यावें कोठूनी ॥ तरी तूं बंधूवा माझ्य़ा विचारूनी ॥ सांग पां मजलागीं ॥१३८॥
जैसे श्रोतयांविण नव रस ॥ कीं तारापतीविण आकाश ॥ तैसा मी विभ्रष्ट गा देवाधीश ॥ अमृताविरहित पैं ॥१३९॥
गरुड म्हणे गा देवाधीशा ॥ मज कारण नाहीं गा पीयूषा ॥ परी माता पडिलीसे वेवसा ॥ दास्यपणाचिया ॥१४०॥
आतां खूण सांगतों सुरेश्वरा ॥ अमृतघट देतों फणिवरां ॥ तुवां पक्षियाचे रूपें एकसरा ॥ न्यावा झडपोनि ॥१४१॥
शक्रें पक्षीरूप धरिलें त्वरित ॥ मग ताराक्षें आणिलें अमृत ॥ तंव आनंद वर्तला बहुत ॥ सर्पां कद्रूसुतांसी ॥१४२॥
मग सुपर्ण वदे कद्रूसी ॥ आतां तुम्हीं जावें वो स्नानासी ॥ शुचिर्भुत होऊनियां अमृतासी ॥ भक्षावें तुम्हीं ॥१४३॥
मग सर्प आणि शेषजननी ॥ वेगें आलीं गंगास्नान करूनी ॥ तंव ताराक्षें ठेविला दर्भासनी ॥ पीयूषघट तो ॥१४४॥
मग बोलिली ते दक्षबाळी ॥ तुझी माता दास्यावेगळी ॥ अमृत देतां तियेच्या करतळीं ॥ तंव झेंपाविलें इंद्रें ॥१४५॥
तो भगनेत्री जाहाला ससाणा ॥ अमृतघट नेत गगना ॥ घेऊनि गेला अमरभुवना ॥ अमरेश तो ॥१४६॥
सर्प कद्रू अपमानुनी ॥ म्हणती साध्य गेलें करींहूनी ॥ दास्यें पीडिली विनता बहिणी ॥ हें तिचें उसनें ॥१४७॥
म्हणोनि कुबुद्धी असेल जे देहीं ॥ तें भल्यांनीं प्रहारिजे सर्वही ॥ जैसे अमृतातें अपमानिलों आम्ही अही ॥ तैसेचि चिंतातुर ते ॥१४८॥
अमृतकुंभ होता दर्भासनीं ॥ तो अमरेशें नेला झडपोनी ॥ घेऊनि आला वज्रपाणी ॥ अमरावतीसी ॥१४९॥
अमृत घेऊनि गेला सुरपती ॥ तेंचि गुणनाम जाहालें अमरावती ॥ सर्व देव अमरेश म्हणती ॥ वज्रधरा पैं ॥१५०॥
सर्पांसी होती अमृताची क्षुधा ॥ दर्भासनीं होतें अमृत सुधा ॥ तें प्राप्त नव्हे विखारां अबद्धां ॥ अल्पमती त्यांची ॥१५१॥
मग सर्प चाटिती त्या दर्भासनीं ॥ तेणें चिरूनि जिव्हा जाहालिया दोनी ॥ पोटीं पाय आले म्हणोनि ॥ फणिवर ते ॥१५२॥
तेथोनि सर्प पक्षी यांचें वैर ॥ हे कळी लागलीसे पूर्वापार ॥ मग माता घेऊनि काशीपुर ॥ पावला गरुड तो ॥१५३॥
तंव कद्रूचा मुख्य कुमर ॥ जो सहस्त्रमौळी फणिवर ॥ सत्यलोका जाऊनि सृष्टिकर ॥ प्रार्थिला तेणें ॥१५४॥
म्हणे जी विरिंचि सृष्टिकरा अधीशा ॥ आम्ही अति भीतसों त्या खगेशा ॥ आम्हां करील तो वळसा ॥ हें तुम्हांसी असावें श्रुत ॥१५५॥
आम्हांसी राहावयाकारण ॥ विधि निरूपिजे एकादें स्थान ॥ तेणें स्वस्थ होतील आमुचे प्राण ॥ या गरुडाहातीं पैं ॥१५६॥
मग विरिंचि बोले तये वेळीं ॥ काळियें असावें यमुनाजळीं ॥ तक्षकें खांडववनस्थळीं ॥ वासुकीनें शिवापाशीं ॥१५७॥
ऐरावतासी राहाणें मलयगिरी ॥ पृथ्वीभार घेऊनि फणेवरी ॥ पाताळभुवनीं रहिवास करीं ॥ सहस्त्रफणी तूं ॥१५८॥
ऐसें वदला विरिंचिदेवो ॥ विखारांसी मानला सत्यभावो ॥ मग क्रमिते जाहाले ठावो ॥ आपुलाले पैं ॥१५९॥
मग ताराक्ष विनता काशीपुरीं ॥ तपसाघनें केलीं बरवियापरी ॥ सहस्त्र वरुषें त्रिपुरासी ॥ आराधिला गरुडानें ॥१६०॥
मग प्रसन्न जाहाला त्रिनयन ॥ एकविसावें स्वर्गस्थान ॥ तें जंबूवृक्षीं भुवन ॥ दिधलें गरुडा तुजलागीं ॥१६१॥
मग सुपर्णासी म्हणे शंकर ॥ तुवां जे लिंग स्थापिलें गरुडेश्वर ॥ तें माझें स्वरूप विश्वभर ॥ पूजिती जे जे ॥१६२॥
तेथें जे जे करिती दर्शन ॥ किंचित पत्रीं तोयस्नपन ॥ तयांचें निवारे महा विन्घ ॥ सर्पविषारजळीं ॥१६३॥
ऐसा देऊनि नाभीकार ॥ मग त्याचि लिंगीं राहिला हर ॥ मग तो गेला कश्यपकुमर ॥ जंबुवृक्षीं बैसावया ॥१६४॥
ऐशी गरुडेश्वराची शक्ती ॥ स्वामीस प्रश्नीतसे अगस्ती ॥ षण्मुख निरूपी तयाप्रती ॥ तें परिता श्रोते हो ॥१६५॥
स्वामीसी वदे अगस्तिमुनी ॥ मग ते विनता दक्षनंदिनी ॥ मार्तंड पूजिला काशीस्थानीं ॥ त्या नांव विनतादित्य ॥१६६॥
मग विनतेसी वदे वरदान ॥ ते मुक्त केली दास्यापासून ॥ मग करिती जाहाली अनुष्ठान ॥ कश्यपकांता ते ॥१६७॥
आतां श्रोते सावध शरीरीं ॥ कथामृत परिसा जी श्रवणद्वारीं ॥ जेवितां तृप्ति न होय तरी ॥ परिसावें पृथक्‍  मागुतें ॥१६८॥
हे कथा परिसतां श्रवणीं ॥ महाकिल्बिषा होय दहनी ॥ पवन होइजे कैलासभुवनीं ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१६९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते खखोल्क-विनतादित्यवर्णनं नाम अष्टचत्वारिंशाध्यायः ॥४८॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति अष्टचत्वारिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP