मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ३ रा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशी खंड - अध्याय ३ रा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ३ रा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ मग प्रवर्तलिया प्रभातकाळ ॥ भ्रमण करितां दिक्पाळ ॥ ताराग्रहणक्षत्रांची माळ ॥ अडकली तैं पर्वता ॥१॥रविशाशिरहंवर त्वरित ॥ पश्चिमेसी मार्ग क्रमावया उदित ॥ तंव पुढें देखिला नभचुंभित ॥ विंध्य पर्वत तो ॥२॥मेरुप्रदक्षिणेचें कार्य ॥ बहु त्वरावंत सोम सूर्य ॥ परी किं करोति पुढें आश्चर्य ॥ देखिलें तिहीं तत्काळ ॥३॥सृष्टिकार्याची अवस्था ॥ हृदयीं कल्पीतसे सविता ॥ प्रकाश व्हावया सर्व जीवजंतां ॥ चौर्यायशीं लक्ष योनींप्रती ॥४॥हा धर्म कल्पीतसे तरणी ॥ म्हणे हें विघ्न उदेलें कोठूनी ॥ मार्ग राहिला रोधूनी ॥ ग्रहणक्षत्रदिक्पतींचा ॥५॥स्वर्गलोकींहूनि मंदाकिनी ॥ येत येतां मृत्युभुवनीं ॥ जनां उद्धरावयालागुनी ॥ शिवकांता उदेली ॥६॥मेरुनें समर्पिली जयासी कन्या ॥ तो आडवा देखिला गिरीमान्या ॥ तेर्णे रोधिली तरंगिणी धन्या ॥ भागीरथी तेधवां ॥७॥तैसा ग्रहणक्षत्रांआ भार ॥ कोंडोनि राहिला तो गिरिवर ॥ मेरुसीं बांधोनि स्पर्धा थोर ॥ वाढला गिरी तो ॥८॥आतां असो हे दृष्टांतवार्ता ॥ विंध्याद्रीनें निरोधिला सविता ॥ तेणें नाशिली हे योग्यता ॥ सर्व कार्यांची ॥९॥उत्तरेसी माध्यान्हीं रविकर ॥ दक्षिणेसी प्रवर्तला अंधकार ॥ तेणें भूमंडळी झाले थोर ॥ प्रलय आकांत तेधवां ॥१०॥राहिलीं नक्षत्रांची चलनें ॥ तिथि वार नक्षत्रें आणि लग्नें ॥ यज्ञ होमादि सिद्धिसाधनें ॥ राहिली तेव्हां षट्कर्मे ॥११॥अवनीवरी राहिले कर्मयाग ॥ तेणे देवांसा नाहीं यज्ञभाग ॥ ऐसा विंध्याद्रीनें रोधिला मार्ग ॥ रविचंद्राचा तेधवां ॥१२॥ऐसा विचारितां प्रश्न ॥ म्हणती अकथ्य कर्त्याचें कारण ॥ तरी हें भूत भविष्य वर्तमान ॥ अव्यक्त जाण आम्हांसी ॥१३॥म्हणोनि सर्व ग्रह तारागण तरणी ॥ स्थिर झाले आपुले स्थानीं ॥ म्हणती कर्ता जाणे सर्व करणी ॥ आपण राहूं येथेंचि ॥१४॥मग विंध्याचे पाठारीं सहस्त्रकर ॥ बैसतां दक्षिणेसी प्रवर्तला अंधार ॥ तेणें प्रलय झाला थोर ॥ मृत्युलोकासी तेधवां ॥१५॥मग तरणि म्हणे गा अरुणापक्षा ॥ आपणां मेरुप्रदक्षिणेची अपेक्षा ॥ आतां स्मरुं त्या विरुपाक्षा ॥ जेणें केलें हें अरिष्ट ॥१६॥न कळे कैंचा उद्भवला गिरी ॥ मार्ग निरोधिला गगनोदरीं ॥ मागील प्रदक्षिणें हा क्षितीवरी ॥ देखिला नाहीं सर्वथा ॥१७॥ऐसा तरणि झाला अवस्थाभूत ॥ तेणें आकांत भोंवला पृथ्वींत ॥ प्रमथां अव्यक्त झालीसे मात ॥ भूत भविष्य वर्तमानांची ॥१८॥राहिली दिक्पातींची घिरटी ॥ तेणें वरुण झालासे आवृतदृष्टी ॥ अवर्षण झालेंसे क्षितितटीं ॥ लक्ष संवत्सरपर्यंत ॥१९॥यागमागावीण सर्वही ॥ देव क्षुधातुर झाली पाहीं ॥ परी किं करोति सविता तोही ॥ निरोधिला मार्ग तेधवां ॥२०॥दक्षिणेसी प्रलय घोर अंधारें ॥ उत्तर संहारिली माध्यान्हरविकरें ॥ ऐसें जाणोनियां वज्रधरें ॥ आदरिलासे विचारु ॥२१॥मग सर्व सुरांसह सुरनाथ ॥ दिक्पति आणि प्रमथ ॥ क्रमिते झाले तेव्हां पंथ ॥ गुरुचे भेटीकारणें ॥२२॥मग तो अंगिराचा कुमरु ॥ वज्रधरें वंदिला बृहस्पति गुरु ॥ मग कथिता झाला विचारु ॥ सृष्टिकार्याचा ॥२३॥गुरुसी प्रार्थना करी वर्जधर ॥ अवर्षण झालें जी लक्ष संवत्सर ॥ प्रमथांसी पीढा झाली थोर ॥ यागभागेवीण ॥२४॥आतां प्रलय मांडला आत्यंतिक ॥ विनाशकाळा पावला मृत्युलोक ॥ क्षितीं भ्रष्ट झाले षट्कर्मिक ॥ राहिलीं कर्मे याग हवनें ॥२५॥मग बोले गुरु दिव्यधी ॥ सर्व विद्यारत्नक्षीराब्धी ॥ सांगता झाला उपायसिद्धी ॥ सहस्त्रनेत्रासी साक्षेपें ॥२६॥गुरु म्हणे जी वज्रमुष्टी ॥ विघ्न उदेलें असे क्षितितटीं ॥ तरी हे असे विरिंचिदेवाची सृष्टि ॥ आता तोचि करील उपावो ॥२७॥तरी दिक्पाति आणि ग्रह ॥ आपण प्रार्थूं तो पितामह ॥ मग देव आणि सर्व ग्रह ॥ झालेती एकवट ॥२८॥ते दिक्पति एकत्र होऊन ॥ शशीचा कांत सहस्त्रनयन ॥ नैऋत आणि वरुण ॥ वैश्वानरं तो एक ॥२९॥सोम आण सहस्त्रकर ॥ कृतांत आणि तो समीर ॥ कुबेरे आणि देवगुरु थोर ॥ सकळ सुर जे कांहीं ॥३०॥ऐसे मिळवोनि प्रमथ ॥ प्रथम निघाला तो सुरनाथ ॥ मग क्रमिते झाले पंथ ॥ सत्यलोकींचा ॥३१॥ते विधिसंनिधानीं पावले एकमेळें ॥ जयजयकारें गर्जती वदनकमळें ॥ भूमीवरी ठेवूनि भाळें ॥ घालिते झाले लोटांगणे ॥३२॥मग देवीं आरंभिली स्तुति ॥ जयजयाजी सत्यलोकपति ॥ जयजयाजी वेदमूर्ति ॥ पितामह होसी सर्वांचा ॥३३॥तंव विधि बैसलासे ध्यानीं ॥ देव स्तविती नाना वचनीं ॥ तो कैसा देखिला चतुरानन नयनीं ॥ प्रमथादिकीं समस्तीं ॥३४॥देखिला तेजःपुंज ऐसा ॥ सहस्त्र विद्युल्लता लोपती प्रकाशा ॥ कीं मार्तंड उजळली पूर्व दिशा ॥ तैसा देखिला विरिंचि तो ॥३५॥जैसी गभस्तीची तेजदीप्ती ॥ तैप्ती विधितनूची कांती ॥ देवांचे नेत्र झाले मंदवृत्ती ॥ रुप न्याहाळितां ते ठायीं ॥३६॥मग स्तवी गुरु अंगिरा ॥ जयजयाजी सावित्रीवरा ॥ जयजयाजी सृष्टिकरा ॥ पितामह तूं एक ॥३७॥तुझिया स्मरणमात्रें ॥ क्षणामाजीं हरिसी तापत्रयें सर्वत्रें ॥ उद्धरलों जी दर्शनमात्रे ॥ देखिलें नेत्रें रुप तुझे ॥३८॥त्रैलोक्य तुमची संतति ॥ ऐसा तू समर्थ सावित्रीपति ॥ तरी या देवगणांची काकुळती ॥ धांवणे करा जी सत्वर ॥३९॥पुण्यफळ प्राप्त झाले आम्हांसी ॥ जें दर्शन दिधलें त्वरेंसीं ॥ तरी या त्रिविध तापासी ॥ करीं मुक्त सर्वस्वें ॥४०॥तुम्हां केलिया प्रसन्न ॥ तरी सर्वही सिद्धीचें कारण ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥ प्रथमादिकीं आदरेंसी ॥४१॥प्रलय मांडिला जी दारुण ॥ अवनींत जाहलें अवर्षण ॥ लक्ष संवत्सर पूर्ण ॥ झाले असती ये वेळां ॥४२॥मार्ग रोधिला सोमसूर्यांचा ॥ क्षयो झाला जी पृथ्वीचा ॥ आतां उपाव देखिजे साचा ॥ जेणें तरे हे मेदिनी ॥४३॥ऐसी देवगुरुची वाणी ॥ परिसोनी विधि विचारी मनीं ॥ करींची घातली स्मरणी ॥ श्रवणबिळीं तेधवां ॥४४॥मग विधि मधुर वाणीसीं ॥ बोलता झाला देवगुरुसीं ॥ मी तोषलों तुझिये भक्तीसी ॥ अहर्निशीं जाण पां ॥४५॥विधि म्हणे जी बृहस्पती ॥ मी तोषलों तुझिये स्तुती ॥ जैसा मंदाकिनजिळें पशुपती ॥ संतोषे सेवितां ॥४६॥तुम्ही आलेति ज्या कार्यासी ॥ तें निवेदावें सर्व आम्हांसी ॥ मग देवगुरु वदे विधीसी ॥ शैलवर्तमान तें ॥४७॥कैसी प्रकाशाची गती ॥ ते किमर्थ कथिजे गभस्तीप्रती ॥ जे सृष्टी तुमची मनोवृत्ती ॥ केवीं कथावी तुम्हांसी ॥४८॥तूं होशी इच्छेचा दाता ॥ भूत भविष्य वर्तमान कथिता ॥ तूं चार खाणी उद्भविता ॥ पितामह तूंचि होसी ॥४९॥बाळक झालें बोलकें ॥ म्हणोनि माता बोलवी कौतुकें ॥ तीं उत्तरें जरी निरर्थकें ॥ परी मानी सत्य ऐसीं ॥५०॥तैसी तुमची मानसेच्छा ॥ आम्हां करीतसां पृच्छा ॥ जैसी ते धेनु समत्वें वत्सां-॥ वरी वोळे पैं जैसी ॥५१॥तरी हेंचि यावया कारण ॥ थोर लाभ जें तुमचें दर्शन ॥ यानंतर जें निरुपण ॥ तें किंचित्कार्य जाणावें ॥५२॥सर्व कुळाचळांमाजी गिरिनाथ ॥ विंध्याद्री झाला जी समर्थ ॥ तेणें निरोधिला पंथ ॥ ग्रहतारासोमसूर्यांचा ॥५३॥जैसा शुद्धमृतभोजनीं हरळ ॥ दशनीं घसरे प्राशितां कवळ ॥ तैसा यज्ञ भागीं विंध्याचळ ॥ संचरला देवांसी ॥५४॥पृथ्वीमाजी झालासे कल्पांत ॥ हा मध्येंच उठावला पर्वत ॥ मार्ग खोळंबले समस्त ॥ नभचुंबित दीर्घ तो ॥५५॥ऐसी मेरुप्रदक्षिणेची चिंता ॥ श्रद्धाविमुख झालों सावित्रीकांता ॥ दिनमानाचिया गती सविता ॥ बहुत असे त्वरावंत ॥५६॥परी सर्वथा न चले कांहीं ॥ आतां तुम्हां श्रुत असो सर्वही ॥ जेणें संतोषती देव हृदयीं ॥ तोचि करावा उपावो ॥५७॥मग विधि वदे उपावयुक्ती ॥ परिसा जी देवगुरु बृहस्पती ॥ जें असेल तुमचे चित्तीं ॥ तेंचि होईल सिद्ध कार्य ॥५८॥कैसी जाईल हे वसुमती ॥ इसी रक्षक बहुत असती ॥ ते परिसावे हो बृहस्पती ॥ कवण कवण कैशापरी ॥५९॥जे कां सदा व्रती नेमी ॥ आणि तत्पर जे स्वधर्मी ॥ ते एक योजिले कामीं ॥ पृथ्वीरक्षक सर्वथा ॥६०॥जे कां उदार मनाचे ॥ आणि सत्यार्थ भावाचे ॥ असत्य न वदती वाचे ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६१॥शुद्धभाव शुद्धभक्ति ॥ सत्यवादी दृढमति ॥ ते एक रक्षक असती ॥ या महीतळातें ॥६२॥शांति क्षमा दया देहीं ॥ आणि नित्यानित्य समता पाही ॥ सर्वभूतीं समदृष्टि सर्वदाही ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६३॥परस्त्रियेतें न अभिलाषिती ॥ धर्मकाजीं द्रव्य वेंचिती ॥ शिवालयीं अखंड वसती ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६४॥शिवस्तुतिपरायण जे सदा ॥ साधुजनांची नेणती निंदा ॥ अखंड चुकविती प्रमादा ॥ ते एक पृथ्वीतारक ॥६५॥नित्य आचरती षट्कर्म ॥ शौच संध्या कुलधर्म ॥ ध्यान अध्ययन यजन याजन नेम ॥ प्रतिग्रहवर्ज भिक्षाटन ॥६६॥ऐसे जे गायत्रीजपकारक ॥ ते भूमंडळी द्विजनायक ॥ तेही एक महीरक्षक ॥ योजिले असती जाणिजे ॥६७॥गांधिसुतें प्रतिसृष्टि केली ॥ ते गायत्रीचि आव्हानिली ॥ मग ते सिद्धि प्राप्त झाली ॥ बहुतां जनांसी पैं ॥६८॥ते गायत्री वेदत्रयाआधीं ॥ द्विजमुखें झालीसे सिद्धी ॥ तेणें स्फुरतसे मंत्रविधी ॥ सूर्यरथासी पैं ॥६९॥नाना अर्ध्य देतां तरणीसी ॥ त्या अर्ध्ये मुक्ति तयासी ॥ तेणें सर्वही राक्षसांसी ॥ होतसे क्षय तत्काळ ॥७०॥बिंब उदय झालिया संध्यासाधन ॥ तें संध्या नव्हे तरणीचा अपमान ॥ त्याचेनि अर्ध्य देतां तत्क्षण ॥ उद्भवती राक्षस ॥७१॥ते अस्ताचळा जाऊनि मागुती ॥ सूर्यमूर्तीशीं युद्ध करिती ॥ अर्धाबिम्भ असता जे अर्ध्य देती ॥ तेणें पावती क्षयातें ॥७२॥ऐसे ते उत्तम द्विजवर ॥ त्यांस दान दीजे साचार ॥ दिव्यांबरें आणि अलंकार ॥ द्यावे आदरें विप्रांसी ॥७३॥तरी उत्तम कैसे ब्राह्मण ॥ न घेती अधमाचें दान ॥ नित्य ब्रह्मचर्याचरण ॥ स्त्रीसंग नाहीं ऋतूविना ॥७४॥तेचि उत्तम गा ब्राह्मण ॥ काशी प्रयाग राहिले सेवून ॥ जे ईश्वरभक्तिवांचून ॥ आन सर्वथा नेणती जे ॥७५॥तयांसी गोदान दीजे ॥ सुवर्णशृंगी मुक्तें बांधिजे ॥ मग ते भावपूर्वक समर्पिजे ॥ काशीं प्रयागीं सर्वथा ॥७६॥तरी धेनु कैसी ॥ मी विरिंचि जपतसें तियेसी ॥ दुग्ध स्त्रवे जे जनांसी ॥ परोपकारलागोनी ॥७७॥गोमयाचें जें सडासंमार्जन ॥ तेथें प्रमथादिकांचे आसन ॥ गोमूत्रें तरी तत्क्षण ॥ शीत हरे सर्वही ॥७८॥गोघृताविण श्राद्ध शून्य ॥ गोदुग्धेंविण निष्फळ यज्ञ ॥ गोदंडमुखीं स्पर्शतां जाण ॥ भंगती दोष दिनत्रयाचे ॥७९॥जे गोधनें प्रतिपाळिती ॥ आणि जे गायीची सेवा करिती ॥ तयांसी गोलोकप्राप्ती ॥ युगानुयुगी निरंतर ॥८०॥ब्रह्मा सृष्टिकर्ता झाला ॥ तैं गायत्रीमंत्र आव्हानिला ॥ ऐसा प्रमथांसी वदला ॥ विरिंचिनाथ तो ॥८१॥वेद उद्भवले जयेपासून ॥ ते गायत्री कैशी गा न्यून ॥ तरी स्वर्गमृत्युपाताळभुवन ॥ हें कर्तव्य जियेचें ॥८२॥ऐशा ज्या नाना धर्मनीती ॥ वर्तते असती या क्षितीं ॥ तयांचेनि शक्ती वसुमती ॥ तरली असे सर्वदा ॥८३॥ऐसें तो विरिंचि वदला ॥ मग देवीं जयजयकार केला ॥ मागुती आज्ञा करिता झाला ॥ प्रमथादिकांसी ॥८४॥तुम्ही आलेति ज्या कार्यासी ॥ तरी आतां जावें वाराणशीसी ॥ तेथें असे अगस्तिऋषी ॥ तो करील कार्य तुमचें ॥८५॥पूर्वापार ऐसेंचि एक ॥ झालें होतें प्रलयांतक ॥ तें किंचितमात्र कौतुक ॥ सांगों अगस्तिमुनीचे ॥८६॥इल्वल वातापी दैत्य उद्भवले ॥ ते पूर्वी अगस्तीनें भक्षिले ॥ तैसेंच हें कार्य करील वहिलें ॥ तुमचें जाणा ऋषिवर्य ॥८७॥ऐसें विरिंचि अनुवांदला ॥ मग देवी जयजयकार केला ॥ म्हणती आमुचा तपतरणि उदया आला ॥ जैं घडेल तीर्थ काशी ॥८८॥विधि उत्तरे ऐकोनि ऐसीं ॥ देवांचे उजळले वदनशशी ॥ परमानंद झाला मानसीं ॥ चकोरांसमान ॥८९॥विरिंचिदेवाचीं शब्दरत्नें ॥ देवीं घेतलीं महायत्नें ॥ मग तयांसी करिती जतनें ॥ हृदयमांदुसेमाजी भरुनी ॥९०॥सप्त सागरांचिया शुक्ती ॥ की त्या देवांची हृदये होतीं ॥ तेथें वर्षल्या स्वाती ॥ विधिआज्ञांअंबु तें ॥९१॥ऐसी आज्ञा करी विधाता ॥ उचंबळल्या देवांच्या चित्तसरिता ॥ म्हणती कार्य हो न हो आतां ॥ आपणां लाभ काशीचा ॥९२॥सफळ जी आमुचा जन्म ॥ सफळ जन्मांतरींचे यज्ञ होम ॥ सफळ आमुचा व्रतनेम ॥ जे प्राप्त काशी आम्हांतें ॥९३॥आमुचीं सामर्थ्ये अनुपम्य ॥ जे ब्रह्मादिकांसी अगम्य ॥ आम्हांसी ते झाली सुगम ॥ पूर्वभाग्यें काशीपुरी ॥९४॥विधिआज्ञा वंदोनि मौळीं ॥ मग देव निघाले तत्काळीं ॥ मनोवेगें भूमंडळीं ॥ आले असती ते ॥९५॥मग सत्यलोकींहूनि प्रमथ ॥ दिक्पति आणि सुरनाथ ॥ क्रमिते झाल पथ ॥ काशीपुरीचा तेधवां ॥९६॥गगनीं जैसीं गंधर्वनगरें ॥ तैसीं देवांचीं विमानें सुंदरे ॥ कीं ते गगनामाजी तारे ॥ उदेले सतेज ॥९७॥छत्रें शोभती मौक्तिकांची ॥ कळशीं प्रभा कोटि विद्युल्लतांची ॥ माजी गायनें गंधर्वादिकांची ॥होत असती सर्वकाळ ॥९८॥बहु त्वरेंसी उतरती देव भार ॥ गण-गंधर्व-यक्ष-किन्नर ॥ जैसें मेरुमस्तकींहूनि नीर ॥ उतरे मंदाकिनीचें ॥९९॥ऐसे भूमंडळीं आले सुरगण ॥ त्यांहीं देखिलें आनंदवन ॥ जैसें तटाक जळें परिपूर्ण ॥ देतसे लहरी आनंदें ॥१००॥जेथें हेमकुमुदिनी अपार ॥ तेंचि काय वसिन्नलें काशीपुर ॥ त्यामाजी कमळें ते प्रसाद मनोहर ॥ भक्त तेचि अलिकुळ तेथें ॥१०१॥आतां असो हे पाल्हाळवाणी ॥ सर्व देव बैसले विमानीं ॥ ते आनंदवन काशीस्थानीं ॥ उतरते जाहाले ॥१०२॥देवीं देखिली ते काशी ॥ सुखावले परम मानसीं ॥ तें मज निरुपावयासी ॥ कैंचि मति पामरा ॥१०३॥मृत्युकाळीं मिळे अमृतपान ॥ कीं क्षुधितालागीं जेवीं मिष्टान्न ॥ कीं सुषुप्तिकाळी मृदु आस्तरण ॥ प्राप्त होय दैवयोगें ॥१०४॥कीं सांपडे पूर्वजांचा ठेवा ॥ कीं कल्पद्रुम जोडला निर्दैवा ॥ त्याहूनि विशेष जाहाले देवां ॥ जैसें रंकासी राज्यपद ॥१०५॥आतां असो हे दृष्टांतयुक्ती ॥ देव प्रवेश करिती अविमुक्ती ॥ ते कथा परिसावी जी पुढती ॥ महापुण्यपावन ॥१०६॥शिवदास गोमा बद्धहस्तीं ॥ प्राथर्तिसे श्रोतयांप्रती ॥ आताम भेटेल देवांसी अगस्ती ॥ ते कथा पुढारीं परिसावी ॥१०७॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंड विरिंचिदर्शन-सुरकाशीप्रवेशो नाम तृतीयाध्यायः ॥३॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ इति तृतीयाध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : September 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP